Monday, 26 September 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 26.09.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 26 September 2022

Time 07.10 AM to 07.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २६ सप्टेंबर २०२२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

·      आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक उत्पादनांच्या खरेदीचं अभियान गतिमान करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन

·      अतिवृष्टीतून वगळलेल्या सर्व शेतकऱ्यांना येत्या पंधरा दिवसांच्या आत नुकसान भरपाईची रक्कम देण्याचं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचं आश्वासन

·      हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांच्या वाहनावर अमरावती जिल्ह्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ल्याचा प्रयत्न

·      औरंगाबाद शहरातील नऊ हजार फेरीवाल्यांना स्वनिधीचं वाटप- केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

·      शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ

आणि

·      ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना जिंकत भारतानं २-१ च्या फरकानं मालिका जिंकली

 

सविस्तर बातम्या

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया- पीएफआयच्या कार्यकत्यांनी पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या असतील तर त्यांच्याविरुध्द गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पुणे पोलिस आयुक्तांना दिल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते काल पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. या संघटनेवर बंदी घालण्याबाबत निर्णय केंद्र सरकार घेईल, देशात किंवा राज्यात अशी घोषणाबाजी अजिबात खपवून घेतली जाणार नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. पीएफआय विरोधात शुक्रवारी झालेल्या कारवाईनंतर शनिवारी पुणे शहरात निदर्शनं करण्यात आली होती.

दरम्यान, आंदोलनाच्या चित्रीकरणाची संपूर्ण तपासणी केल्यानंतर त्यात आक्षेपार्ह आढळल्यास संबंधितांविरुध्द देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जाईल असं पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील राज्यात कोणतीही देश विरोधी कृत्ये खपवून घेतली जाणार नसल्याचं मुंबईत वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं.

****

आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक उत्पादनांच्या खरेदीचं अभियान गतिमान करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काल आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात देशवासियांना संबोधित करतांना ते बोलत होते. दोन ऑक्टोबरला गांधी जयंती आणि आगामी सणांच्या निमित्ताने खादी, स्थानिक हातमाग, हस्तकलेसह स्थानिक उत्पादनांच्या खरेदीवर जनतेनं भर दिला पाहिजे, असं सांगत, जनतेनं देशी उत्पादनांची विक्रमी खरेदी करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं.

जनतेनं प्लॉस्टिक वगळता अन्य साहित्यापासून बनवलेल्या पिशव्यांचा वापर करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. देशात कापडी, सुती, काथ्या आणि केळीच्या तंतूपासून तयार करण्यात येणाऱ्या पारंपारीक पिशव्यांचा वापर वाढत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

दिव्यांगांसाठी विकसित करण्यात आलेल्या ब्रेल लिपी या भारतीय सांकेतिक भाषेबद्दल आणखीन जागरुकता वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ७५ दिवस चाललेल्या सुरक्षित सागर या मोहिमेची सांग़ता गेल्या १७ तारखेला, सागरी किनारा स्वच्छता दिनी झाली. या मोहिमेत लोकसहभागातून दिलेल्या योगदानाबद्दल पंतप्रधानांनी सर्वांचं अभिनंदन केलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व प्रकल्पांना गती मिळणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. माथाडी कामगारांचे नेते अण्णासाहेब पाटील यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त माथाडी कामगारांच्या मेळाव्यात ते काल मुंबईत बोलत होते. माथाडी कामगार महामंडळाने आपल्या कार्यकाळात ५० हजार उद्योजक तयार केले, असेच उद्योजक यापुढेही तयार व्हावेत यासाठी उद्योजक कर्जात वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

****

अतिवृष्टीतून वगळलेल्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांना येत्या पंधरा दिवसांच्या आत नुकसान भरपाईची रक्कम दिली जाईल, असं आश्वासन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिलं आहे. सोलापूर जिल्ह्यात बार्शी-लातूर मार्गावर काल शेतकरी संघटनेच्या आंदोलकांशी  सावंत बोलत होते. अतिवृष्टीतून वगळलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि पिकविम्याची अग्रीम रक्कम मिळण्यासाठी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली या मार्गावर आंदोलन करण्यात आलं होतं. सावंत यांनी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन तूर्तास मागे घेत असल्याचं गायकवाड यांनी सांगितलं.

****

अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील जनावरांचा लम्पी आजार नियंत्रणात असल्याचं पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल नांदेड इथं बोलत होते. राज्यातील ३० जिल्ह्यात या आजाराचा पशुधनात शिरकाव झाला आहे, मात्र  पशुपालकांनी, शेतकऱ्यांनी घाबरून न जाता शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे आपल्या स्तरावर काळजी घ्यावी, असं आवाहन विखे-पाटील यांनी केलं. लम्पी आजारामूळे ज्या पशुपालकांनी आपली जनावरे गमावली आहेत त्यांच्यासाठी शासनातर्फे अर्थसहाय्य केले जात आहे. याव्यतिरिक्त जिल्हा परिषदेलाही सानुग्रह अनुदान देण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत, असं विखे-पाटील यांनी सांगितलं.

****

हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांच्या वाहनावर काल अमरावती जिल्ह्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, सुदैवाने या हल्ल्यात कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. बांगर हे अंजनगाव सुर्जी इथं देवनाथ मठाचे मठाधिपती महंत जितेंद्रनाथ महाराज यांचं दर्शन घेऊन परतत असताना, कथित शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत, बांगर यांच्या गाडीची काच फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र काच फुटली नाही. वाहनचालकाने प्रसंगावधान राखून गाडी न थांबवता पुढे नेली. पोलिसांनी सध्या तरी कोणताही गुन्हा दाखल केला नसल्याचं, वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.

****

औरंगाबाद मध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर हॉप ऑन हॉप ऑफ बससेवा सुरू करण्याची चाचपणी करण्याची सूचना पर्यटन विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनतर्फे काल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत ते बोलत होते. औरंगाबादच्या पर्यटन प्रचारासाठी संस्थेची नेमणूक करणं, पर्यटनावर लघुपट महोत्सव आयोजित करणं, नव्या विमान सेवा सुरू करणं, विद्यार्थ्यांना पर्यटनाचे धडे देणं, पर्यटनाशी संबंधित छोटे छोटे अभ्यासक्रम तयार करणे, जायकवाडी इथं बोट क्लब तयार करणं, आदी विषयांवर पर्यटन मंत्री लोढा यांच्यासोबत यावेळी चर्चा झाली.

****

केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे आज औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तापडिया नाट्य मंदिरात आयोजित ‘एक लक्ष वृक्ष लागवड उपक्रमाच्या गौरव सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी साडे सहा वाजता विमानाने ते मुंबईकडे प्रयाण करतील.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ५४१ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८१ लाख १९ हजार ३४५ झाली आहे. काल या संसर्गानं दोन रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४८ हजार ३२९ इतकी झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८२ शतांश टक्के आहे. काल ५४६ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७९ लाख ६७ हजार ३१४ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक १३ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या तीन हजार ७०२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल २७ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये लातूर जिल्ह्यात ९, औरंगाबाद ७, जालना ६, उस्मानाबाद जिल्ह्यातल्या ३ तर नांदेड आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

****

औरंगाबाद शहरातील नऊ हजार फेरीवाल्यांना प्रत्येकी १० हजार रुपये स्वनिधी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी दिली. ते काल औरंगाबाद इथं आढावा बैठकीत बोलत होते. ही योजना अनेक लाभार्थ्यांपर्यंत पोहचावी यासंबंधी त्यांनी संबंधितांना निर्देश दिले. लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बँकेचे तीन अधिकारी महापालिकेत कायम उपलब्ध राहतील असं त्यांनी यावेळी सांगितलं. शेतकऱ्यांना विनातारण प्रत्येकी १ लाख ६० हजार रुपये कर्ज देण्याची योजना केंद्रानं सुरु केल्याचं ते यावेळी म्हणाले.

****

शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे. मराठवाड्यात आदिशक्तीच्या साडे तीन शक्तिपीठांपैकी माहूर इथं रेणुका माता, तुळजापूर इथं तुळजाभवानी तसंच अंबाजोगाई इथल्या योगेश्वरी देवीसह सर्वच ठिकाणच्या देवी मंदिरांमध्ये शारदीय नवरात्रोत्सवाची जोमानं तयारी सुरु आहे.

 

तुळजापूर इथं तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेची सांगता होऊन आज पहाटे देवी सिंहासनारूढ झाली. दुपारी १२ वाजता घटस्थापना होणार असून, येत्या १० ऑक्टोबरपर्यंत विविध विधी, होमहवनादी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली.

घटस्थापनेनिमित्त सोलापूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज शासकीय सुटी जाहीर केली आहे.

नांदेड जिल्ह्यात माहूर इथं भाविकांच्या सुविधेसाठी देवस्थानच्या वतीनं चोख व्यवस्था करण्यात आली आहे.

अंबाजोगाई इथं आज सकाळी ९ वाजता घटस्थापना आणि महापूजा होऊन योगेश्वरी देवीच्या नवरात्रोत्सवास सुरुवात होणार आहे. सकाळी सहा ते रात्री ११ वाजेपर्यंत भाविकांना देवीचं थेट दर्शन घेता येणार आहे. सकाळी ६ ते दुपारी ११ वाजेपर्यंत देवीस अभिषेक करता येणार आहेत. महोत्सवाच्या कालावधीत दररोज संगीत भजन, गायन कीर्तन, जगदंबेचा गोंधळ होणार आहे.

****


शिंदे फडणवीस सरकार हे शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, बेरोजगारांच्या विरोधात असून लूट करणारे सरकार असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. ते काल औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथं शिवसेना मेळाव्यात पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते. पालकमंत्री संदिपान भुमरे यांचं नाव न घेता, दानवे यांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली.

****

मुख्यमंत्री होण्यासाठी नाही, तर राज्यात विकासाची क्रांती घडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं, असं रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी म्हटलं आहे. ते काल वर्धा इथं शिवसेना हिंदू गर्व गर्जना संपर्क यात्रेअंतर्गत जाहीर सभेत बोलत होते.

राज्यात गेली अडीच वर्षे शिवसेना सत्तेत असूनही शिवसेनेचे कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांची कामं झाली नाहीत. कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक तर सोडाच, शिवसेनेचे आमदार आणि मंत्र्यांना भेटण्यासाठीही उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडे वेळ नव्हता. त्यामुळे राज्याचा विकास थांबला होता, अशी टीका भुमरे यांनी केली.

****

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना जिंकत भारतानं २-१ च्या फरकानं मालिका जिंकली आहे. काल हैदराबादमध्ये झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघानं २० षटकांत ७ बाद १८६ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करत भारतीय संघानं १९ षटक ५ चेंडूत ४ बाद १८७ धावा करत सामना जिंकला. सूर्यकुमार यादवला मॅन ऑफ मॅच म्हणून तर मालिकेत सर्वाधिक ८ बळी घेण्याऱ्या अक्षर पटेलला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आलं.

****

हैदराबाद मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त औरंगाबाद इथल्या देवगिरी किल्ल्यावर काल सकाळी  हेरिटेज वॉक आणि स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. स्वातंत्र्य सैनिकांनी निजामाच्या सैन्याला चकवा देऊन किल्ल्यावर तिरंगा फडकवला, त्याचा रोमांचक इतिहास जाणून घेण्याची संधी या मोहिमेत सहभागी झालेल्या नागरिकांना मिळाली.

****

जुन्या निवृत्ती वेतन योजनेच्या मागणीसह अन्य मागण्यांसाठी मराठवाडा शिक्षक संघाच्यावतीनं काल जालना इथं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. गांधीचमन चौकातून काढण्यात आलेल्या या मोर्चात शिक्षक मोठ्या संख्येनं सहभागी झाले. विविध मागण्यांचं एक निवेदन शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी जिल्हा प्रशासनाला सादर केलं.

****

कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याच्या निषेधार्थ अहमदनगर इथं घरेलू मोलकरीण कामगार संघटना, नवरात्रोत्सवात नवदुर्गा जागर आंदोलन करणार आहे. क्रांती असंघटित कामगार संघटनेच्या माध्यमातून हे आंदोलन केलं जाणार आहे.

****

No comments: