Tuesday, 27 September 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 27.09.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 27 September 2022

Time 07.10 AM to 07.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २७ सप्टेंबर २०२२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      राज्यातल्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर आज सुनावणी

·      औरंगाबाद शहरात एका तासात एक लाख १८ हजार वृक्ष लावण्याचा विश्व विक्रम देशासाठी प्रेरणादायी - केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे

·      राज्यात २० हजार पोलिसांची मेगाभरती करणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·      माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर तातडीनं सुनावणी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालयाला आदेश

·      मराठा आरक्षणाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची जाहीर माफी

·      मुंबईतल्या अधिश बंगला अवैध बांधकाम प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली

·      राज्यातल्या एक हजार १६५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी, आता १६ ऑक्टोबरला मतदान

·      शारदीय नवरात्रोत्सवाला सर्वत्र उत्साहात आणि भक्तिभावानं प्रारंभ

·      राज्यात आरोग्य विभागाच्या ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित विशेष अभियानाला सुरुवात

आणि

·      संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर रामचंद्र देखणे यांचं निधन

 

सविस्तर बातम्या

राज्यातल्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर आज सुनावणी होणार आहे. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत तसंच आमदारांच्या अपात्रतेबाबत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटानं दाखल केलेल्या विविध याचिकांवर सुनावणी होईल. शिंदे गटातल्या आमदारांनी विधानसभा उपाध्यक्षांनी बजावलेल्या नोटीशींना आवहान दिलं असून, शिंदे सरकारची वैधता, विधानसभा अध्यक्षांची निवड यासह काही मुद्यांवर शिवसेनेनं दाखल केलेल्या याचिकांचा यात समावेश आहे. शिवसेना पक्ष कुणाचा, याबाबत निवडणूक आयोगाकडे सुनावणी प्रलंबित असून, यासंदर्भातला निर्णयही आज होण्याची शक्यता आहे.

****

औरंगाबाद शहरानं एका तासात एक लाख १८ हजार वृक्ष लावण्याचा केलेला विश्व विक्रम संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी असल्याचं, केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी म्हटलं आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त औरंगाबाद शहरात १५ ऑगस्ट २०२२ रोजी एका तासात एक लाख १८ हजार वृक्ष लावण्याचा विक्रम झाल्यानिमित्त, वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया बुक संस्थेतर्फे, या उपक्रमात सहभागी सर्वांना काल चौबे यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. मराठवाड्यात तेहतीस टक्के वनक्षेत्र अपेक्षित असतानाही फक्त आठ टक्के वनक्षेत्र असल्याबद्दल आणि वनविभागाच्या संथ कामाबद्दल चौबे यांनी नाराजी व्यक्त केली.

****

राज्यात येत्या काळात २० हजार पोलिसांची मेगाभरती करण्यात येणार असल्याचं उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते काल मंत्रालयातल्या समिती कक्षात गृह विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते. पोलिस दलाच्या आधुनिकीकरणाचा फेर प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, सर्व पोलिस घटकांच्या आकृतिबंध मंजुरीचे प्रस्ताव ३१ डिसेंबरपूर्वी पूर्ण करण्याची सूचना फडणवीस यांनी यावेळी केली.

****

काळा पैसा वैध केल्याप्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर तातडीनं सुनावणी घेत, निर्णय घेण्याचे आदेश, सर्वोच्च न्यायालयानं मुंबई उच्च न्यायालयाला दिले आहेत. अनिल देशमुख यांची जामीन याचिका २१ मार्चपासून प्रलंबित असल्याची नोंद, न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आणि हिमा कोहली यांच्या पीठानं घेतली असून, देशमुख यांचा अर्ज याच आठवड्यात सुनावणीसाठी घेऊन, त्यावर तातडीने निर्णय घेण्याची सूचना केली. जामीन याचिका प्रलंबित ठेवणं कलम २१ अंतर्गत जगण्याच्या अधिकाराशी सुसंगत नाही, असं निरीक्षणही न्यायालयानं नोंदवलं आहे. अनिल देशमुख यांना नोव्हेंबर २०२१ मध्ये सक्तवसुली संचालनालय-इडीने अटक केली होती, ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

****

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल मराठा समाजाची जाहीररित्या माफी मागितली आहे. २०२४ पर्यंत मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास आपण मंत्रिपदाचा राजीनामा देऊन मराठा आंदोलनात सहभागी होऊ, अशी घोषणाही त्यांनी केली आहे. मराठा समाजात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असून, आपण पाळण्यातल्या बाळापासून ते ९० वर्षांच्या व्यक्तीपर्यंत माफी मागायला तयार असल्याचं, सावंत यांनी म्हटलं आहे.

****

मुंबईतल्या अधिश बंगल्यातील अवैध बांधकाम प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. तसंच या बंगल्यातलं अवैध बांधकाम दोन महिन्यात पाडण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत. या काळात जर राणे यांनी बांधकाम नियमानुसार न केल्यास बृहन्मुंबई महानगरपालिकेला पुढील कारवाईची मुभा असेल, असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.

****

राज्यातल्या १८ जिल्ह्यांमधल्या एक हजार १६५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी, येत्या १३ ऑक्टोबरऐवजी आता १६ ऑक्टोबरला मतदान होईल, तर मतमोजणी १४ ऑक्टोबरऐवजी १७ ऑक्टोबरला होईल. राज्य निवडणूक आयोगानं प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

राज्य निवडणूक आयोगानं सात सप्टेंबरला या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यात सदस्यपदांसह थेट सरपंचपदाचाही समावेश आहे. सुधारित कार्यक्रमानुसार १६ ऑक्टोबरला सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच या वेळेत मतदान होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी तीन वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल.

****

शारदीय नवरात्रोत्सवाला काल सर्वत्र उत्साहात भक्तिभावानं प्रारंभ झाला.

देवीच्या साडे तीन शक्तिपीठांपैकी नांदेड जिल्ह्यातलं माहूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर इथं विधीवत घटस्थापना करण्यात आली. तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा पूर्ण होऊन काल पहाटे देवी पुन्हा सिंहासनारूढ झाली. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते विधिवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली.

नांदेड जिल्ह्यात माहूर इथं भाविकांच्या उपस्थितीत रेणुका देवीच्या नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. विजयादशमीपर्यंत इथं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

अंबाजोगाई इथं काल सकाळी घटस्थापना आणि महापूजा होऊन योगेश्वरी देवीच्या नवरात्रोत्सवास सुरुवात झाली. सकाळी सहा ते रात्री ११ वाजेपर्यंत भाविकांना देवीचं थेट दर्शन घेता येणार आहे. महोत्सवाच्या कालावधीत दररोज विविध कार्यक्रम होणार आहे.

नाशिक जिल्ह्यात वणी इथं श्री सप्तशृंगी देवीच्या अलंकारांची काल सकाळी मिरवणूक काढण्यात आली. विश्वस्त मंडळाच्या वतीने महापूजा झाल्यावर, महाआरतीनंतर मंदिर भाविकांसाठी खुलं झालं. नूतनीकरणामुळे सुमारे दोन महिन्यांपासून देवीचे दर्शन भाविकांसाठी बंद होतं.

औरंगबाद इथं कर्णपुरा देवीच्या नवरात्र उत्सवाला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते सपत्नीक आरती आणि घटस्थापना करून प्रारंभ झाला. या ठिकाणी भरणारी यात्रा पंचक्रोशीतल्या आबालवृद्धांचं आकर्षण आहे.

****

शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं राज्याचा आरोग्य विभाग ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित विशेष अभियान राबवत आहे. हे विशेष अभियान यशस्वी करण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

माता निरोगी राहावी, जागरूक राहावी आणि समाजात तिच्या आरोग्याबद्दल संवेदनशीलता निर्माण व्हावी, या उद्देशानं हे अभियान राबवलं जात आहे. पाच ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या अभियानात राज्यातल्या सर्व माता, भगिनींनी आरोग्याची आवश्य तपासणी करून घ्यावी, असं आवाहन, मुख्यमंत्रीयांनी केलं आहे. या अभियानातर्गंत प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत १८ वर्षांवरच्या वयोगटातल्या महिलांच्या सर्व प्रकारच्या तपासण्या होणार आहेत. रक्त तपासण्या, जननी सुरक्षा योजना प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांचं नवीन बँक खातं उघडणं, गरोदर मातांचं आधारकार्ड जोडणं यांचा यात समावेश असल्याची माहितीही आरोग्य विभागानं दिली आहे.

औरंगाबाद इथं मनपा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनात कालपासून या योजनेला प्रारंभ झाला. काल या अभियानात अनेक महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

उस्मानाबाद इथं जिल्हा परिषदच्या माजी उपाध्यक्षा अर्चना पाटील यांच्या हस्ते या अभियानाचं उद्घाटन झालं. यावेळी उपस्थित महिलांना जननी सखी योजनेसह विविध योजनांची माहिती देण्यात आली.

बीड जिल्ह्यातल्या केज इथं आमदार नमिता मुंदडा आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांच्या हस्ते या अभियानाची सुरुवात झाली. या शिबिरात जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घेऊन आपल्या आरोग्याची तपासणी करण्याचं आवाहन साबळे यांनी यावेळी केलं.

****

मराठवाडा आणि विदर्भात शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत, यामध्ये बँकांशी संबंधित योजनांचं कर्जवाटप बॅकांनी संवेदशनशीलपणे करण्याची सूचना, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी केली आहे. औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालयात किसान क्रेडीट कार्ड योजना आणि प्रधानमंत्री स्वनिधी योजनांच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. स्वनिधी ते समृध्दी योजनेत औरंगाबाद, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांचा समावेश असून यात परभणी जिल्ह्याच्या समावेशाचे प्रयत्न करणार असल्याचंही कराड यांनी सांगितलं.

****

परभणी जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या प्रयत्नातून काल पूर्णा तालुक्यात होत असलेला एका बालविवाह रोखण्यात यश आलं. धनगर टाकळी इथं एका अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती मिळाली होती, जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी कैलास तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसेवक आर.डी. घिरडकर, अंगणवाडी सेविका सुशिला पांचाळ, सरपंच-उपसरपंच यांच्या उपस्थितीत हा बालविवाह थांबवण्यात आला.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे २५६ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८१ लाख १९ हजार ६०१ झाली आहे. काल या संसर्गानं दोन रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४८ हजार ३३१ इतकी झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८२ शतांश टक्के आहे. काल ३१५ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७९ लाख ६७ हजार ६२९ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक १३ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या तीन हजार ४४१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

मराठवाड्यात काल नऊ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये लातूर जिल्ह्यातल्या पाच, हिंगोली दोन, तर औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

****

गेल्या काही दिवसांपासूनच्या अतिवृष्टीमुळे जालना जिल्ह्यातल्या फूलशेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अतिपावसानं फुलांचं उत्पादन कमी झालं तसंच फुलं सडून गेली. जवळपास ५० ते ६० टक्के उत्पादन कमी झाल्याचं उटवद इथले फुल उत्पादक शेतकरी विलास मुळे यांनी सांगितलं. २०० रुपये किलो दराने विकली जाणारी फुलं ऐन नवरात्रात १०० रुपये किलो दराने विकली जात आहेत, बाजारात प्लास्टिकच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी येत असल्यानंही फुलांच्या विक्रीवर परिणाम होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

संत साहित्याचे अभ्यासक आणि ज्येष्ठ भारूडकार डॉक्टर रामचंद्र देखणे यांचं काल पुण्यात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं, ते ६७ वर्षांचे होते. भारुड विषयावर विद्यावाचस्पती ही पदवी मिळवलेले देखणे, साहित्य क्षेत्रात एक उत्तम लेखक म्हणून प्रसिद्ध होते. वारकरी, कीर्तनकार, भारूडकार अनेकांना साहित्याच्या अभ्यासात वाचस्पती पदवीकरता मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक, याबरोबरच पिंपरी चिंचवड प्राधिकरणाचे जनसंपर्क अधिकारी म्हणून ते सर्वांना परिचित होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज पुण्यात वैकुंठ स्मशानभूमी मध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. देखणे यांच्या निधनाबद्दल साहित्य आणि अध्यात्मिक क्षेत्रातून दु:ख व्यक्त होत आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात सामाजिक वनीकरण परिक्षेत्रांतर्गत अरण्यम पद्धतीने कातपूर इथं वृक्ष लागवड अभियानाचं उद्घाटन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते काल झालं. यावेळी बोलताना चव्हाण यांनी, जायकवाडी पक्षी अभयारण्य परिसर आणि जायकवाडी पाटबंधारे प्रकल्प परिसरात अरण्यम वृक्ष लागवडीतून जैवविविधतेचं संवर्धन, पुनरुज्जीवन होण्यास मदत होणार असल्याचं, मत व्यक्त केलं.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...