Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
: 25 September 2022
Time
07.10 AM to 07.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २५ सप्टेंबर २०२२ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· राज्यातल्या सर्व जिल्ह्यांचे
पालकमंत्री जाहीर, औरंगाबाद- संदीपान भुमरे, जालना - बीड - अतुल सावे,
परभणी - उस्मानाबाद- तानाजी सावंत, लातूर, नान्देड- गिरीश महाजन तर हिंगोलीच्या पालकमंत्रीपदी
अब्दुल सत्तार यांची नियुक्ती
· लातूर, औरंगाबाद सह नागपूर आणि
यवतमाळ इथं उभारण्यात येणाऱ्या अतिविशेषोपचार रुग्णालयाच्या कामांना गती देण्याचे वैद्यकीय
शिक्षण मंत्र्यांचे निर्देश
· नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर नागपूर-गोवा हा नवा 'इकॉनोमिकल कॉरिडॉर' विकसित करणार
-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
· मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे सीबीआयच्या
ताब्यात
· देशाच्या विकासात पत्रकारांची भूमिका अतिशय महत्त्वाची- केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड
· स्वातंत्र्य, समता, बंधुभाव आणि न्यायावर आधारित समाज पुनर्रचना करण्याचं ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर जर्नादन वाघमारे यांचं
आवाहन
· नांदेड आणि बीड जिल्ह्यातल्या दोन
वेगवेगळ्या अपघातात आठ जण ठार
आणि
· इंग्लंड विरुद्धची तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची मालिका भारतीय महिला संघानं जिंकली तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध आज भारताचा तिसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना
****
आता सविस्तर बातम्या
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातल्या सर्व जिल्ह्यांच्या
पालकमंत्र्यांची नावं काल जाहीर केली. औरंगाबादच्या पालकमंत्रिपदी मंत्री संदिपान
भुमरे यांची तर हिंगोलीच्या पालकमंत्रिपदी अब्दुल सत्तार यांची नियुक्ती करण्यात
आली आहे. अतुल सावे यांच्याकडे जालना तसंच बीड, तानाजी सावंत यांच्याकडे परभणी, उस्मानाबाद
तर गिरीश महाजन यांच्याकडे लातूर तसंच नांदेड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं
आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील. दीपक केसरकर-
मुंबई शहर, मंगलप्रभात लोढा -मुंबई
उपनगर, चंद्रकांत पाटील - पुणे, दादा भुसे- नाशिक गुलाबराव पाटील - बुलडाणा तसंच जळगाव, राधाकृष्ण विखे पाटील, अहमदनगर आणि सोलापूर, तर
संजय राठोड यांच्याकडे यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रिपद सोपवण्यात आलं
आहे.
****
लातूर, औरंगाबाद सह नागपूर आणि
यवतमाळ इथं उभारण्यात आलेली अतिविशेषोपचार रुग्णालयं तत्काळ कार्यान्वित
करण्यासाठी कामांना गती द्यावी आणि त्यासंदर्भातील अहवाल कालमर्यादेत सादर
करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. ते काल
मंत्रालयात याबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होते. राज्य शासनाने सन २०३० पर्यंत
सर्वांना परवडणाऱ्या उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा पुरवण्याचं उद्दिष्ट ठरवलेलं असून, यानुसार प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
उभारण्याचं राज्य शासनाने निश्चित केलं आहे, सर्वसामान्यांना शासकीय वैद्यकीय रूग्णालयात दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याला
प्राधान्य देण्यात येत असून यासाठी आगामी काळात आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांची
मदत घेणार असल्याची माहिती महाजन यांनी दिली.
****
भारत हा जगाच्या आर्थिक पुनरुज्जीवनाचं इंजिन ठरेल, असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला आहे.
त्या काल बारामती लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यात इंदापूर इथं डॉक्टर्स, इंजिनियर, वकील, व्यापारी, युवा
वर्ग यांच्याशी बोलत होत्या.
जगात भारताची अर्थव्यवस्था सर्वात गतिमान आहे. आगामी वर्षातही सर्वात गतिमान
अर्थव्यवस्था भारताचीच राहणार असल्याचं सीतारामन म्हणाल्या. महागाईच्या मुद्द्यावर
सातत्यानं काम करावं लागणार असल्याचं, सीतारामन यांनी नमूद केलं.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते २०२०-२१ या वर्षासाठीचे राष्ट्रीय
सेवा योजना पुरस्कार काल प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती भवनात झालेल्या या
कार्यक्रमात दोन विद्यापीठं, राष्ट्रीय
सेवा योजनेचे दहा गट, त्यांचे
कार्यक्रम अधिकारी, आणि
राष्ट्रीय सेवा योजनेच्या ३० स्वयंसेवकांचा हे पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
यामध्ये मुंबईतले कार्यक्रम अधिकारी सुशील शिंदे यांच्यासह प्रतिक कदम आणि दिवेश
गिन्नारे या विद्यार्थ्यांनाही गौरवण्यात आलं. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा
मंत्री अनुराग सिंह ठाकूर, यांच्या
सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
****
नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाप्रमाणे
नागपूर-गोवा हा विदर्भ-मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्र ते गोवा असा नवा 'इकॉनोमिकल कॉरिडॉर' विकसित केला जाणार आहे, उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. ते काल नागपुरात नॅशनल रियल इस्टेट
डेव्हलपमेंट कॉन्सिल विदर्भ, या
संस्थेच्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात बोलत होते. बांधकाम व्यावसायिक आणि विकासक
क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना त्यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात
आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात ५ हजार किलोमीटरचे 'एक्सप्रेस 'महामार्ग
तयार करण्याचं सूतोवाच केलं आहे. याशिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या
मार्गदर्शनात नागपूर -दिल्ली
आणि नागपूर -हैदराबाद महामार्ग विकसित होणार आहेत, असं फडणवीस यांनी सांगितलं
****
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना काल गुन्हे अन्वेषण विभाग- सीबीआय
नं काल ताब्यात घेतलं. दिल्ली उच्च न्यायालयानं संजय पांडे यांचा ताबा सीबीआयकडे
देण्याची अनुमती दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या
कर्मचाऱ्यांचे फोन अवैधरित्या टॅपिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर असल्यानं
सक्तवसुली संचालनालयानं त्यांना गेल्या १९ जुलै रोजी अटक केली . ८ जुलै रोजी संजय
पांडे यांच्या कंपनीतून सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी २५ लॅपटॉप, संगणक तसंच सर्व्हर ताब्यात घेतले होते.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून
देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा ९३ वा भाग असेल.
आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम
प्रसारित होईल.
****
नवरात्रोत्सवात आरोग्य विभागाकडून 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' हा
उपक्रम राबवला जाणार असून १८ वर्षावरील साडे तीन कोटी माता भगिनींची यात
प्रतिबंधात्मक तसच उपचारात्मक तपासणी करण्यात येणार आहे. आरोग्य मंत्री डॉ.तानाजी
सावंत यांनी काल बीड इथं झालेल्या मेळाव्यात ही माहिती दिली. या उपक्रमात
राज्यातील तांडा, वस्ती, गावपाड्या पासून ते थेट महानगरातील महिला-मुलीपर्यंत तपासणी
करण्यात येणार आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळे पासून ही तपासणी करण्यात येणार
असल्याचं सावंत यांनी सांगितलं. या बरोबरच ऑनलाईन बदल्या आणि आरोग्य विभागात रिक्त
असलेल्या पदांची भरती देखील प्राधान्याने हाती घेत असल्याचं तानाजी सावंत यांनी
सांगितलं आहे.
****
कमी कालावधीत येणाऱ्या आणि जास्त उत्पादन देणाऱ्या वाणाचा शेतकऱ्यांमध्ये अधिक
प्रसार होणं आवश्यक असून, कमी
कालावधीची पिकं घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिल्यास, उत्पन्न वाढेल असं कृषी मंत्री अब्दूल सत्तार यांनी म्हटलं
आहे. काल परभणी इथं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरात शेतकऱ्यांना
बियांणे वाटप कार्यक्रमात सत्तार बोलत होते. विद्यापीठाने मागील दहा वर्षात कोणती
वाणं तसंच तंत्रज्ञान विकसित केलं, याची
माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवावी, जमीन, हवामान, पेरणीची
वेळ, वातावरण याची तंतोतंत
माहिती दिल्यास, शेतकऱ्यांना लाभ होईल असं
सत्तार म्हणाले.
****
राज्यात अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हतबल झाला असून आत्महत्यांचं
प्रमाणही वाढत असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीच्या वतीनं काल औरंगाबाद इथं
विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. विधान परिषदेतले विरोधी
पक्ष नेते अंबादास दानवे, काँग्रेस
जिल्हाध्यक्ष माजी आमदार कल्याण काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष
कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. शासनाच्या योजना
शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाही असा आरोप यावेळी दानवे यांनी केला.
****
पत्रकार म्हणजे सरकार आणि नागरिक यांच्यातला दुवा असून सरकारच्या योजना
तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम पत्रकार करु शकतात, देशाच्या विकासात पत्रकारांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे, असं केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी म्हटलं
आहे. काल औरंगाबाद इथं “वार्तालाप” या एकदिवसीय माध्यम कार्यशाळेचं तसंच केंद्रीय संचार
ब्यूरोच्या “आठ वर्षे - सेवा, सुशासन, गरीब
कल्याण” या विषयावरच्या छायाचित्र
प्रदर्शनाचं डॉ कराड यांच्या हस्ते उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. सरकार आर्थिक समावेशनाच्या दृष्टीनं, बँकींग सुविधा नसलेल्यांसाठी बँकींग सुविधा, निधी नसलेल्यांसाठी निधी पुरवठा, आणि असुरक्षित घटकांना संरक्षण प्रदान करणं या तीन आधारस्तंभावर कार्य करत
असल्याचं डॉ. कराड यांनी सांगितलं.
****
सामाजिक पुनर्घटनेसाठी सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले आणि त्यांच्या
सहकाऱ्यांनी केली होती. पण ते काम अद्याप पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे जातीविहीन
व्हा. स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, न्याय
यावर आधारित समाज पुनर्रचना करण्याचं आवाहन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जर्नादन वाघमारे
यांनी केलं आहे. डॉ वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली काल औरंगाबाद इथं सत्यशोधक समाज
प्रतिष्ठानच्या वतीनं सत्यशोधक समाज शत्तकोत्तर सुवर्ण महोत्सवी अधिवेशन घेण्यात
आलं, यावेळी अध्यक्षीय भाषणात
वाघमारे बोलत होते. समाज रचनेसाठी फुले, शाहू, आंबेडकर यांच्या कार्याचा
वारसा आणि त्याचा उपयोग कसा करावा हे ठरवणं गरजेचं असल्याचं डॉ वाघमारे यावेळी
म्हणाले. या अधिवेशनाचं उद्घाटन श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर
यांच्या हस्ते झालं. महात्मा फुले यांचा विचार व्यापक असून, आजही तो कसा लागू पडतो, या विषयी डॉ.पाटणकर यांनी माहिती दिली. या एक दिवसीय अधिवेशनात विविध विषयांवर
परिसंवाद झाले.
****
नांदेड आणि बीड जिल्ह्यात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात काल आठ जण ठार तर
चार जण गंभीर जखमी झाले आहेत. नांदेड जिल्ह्यात भोकर ते हिमायतनगर राष्ट्रीय
महामार्गावर करंजी फाटा इथं ट्र्क आणि आयशर वाहनाच्या भीषण अपघातात पाच जण जागीच
ठार झाले तर चार जण गंभीर जखमी झाले. रेल्वे विद्युतीकरणाच्या कामासाठी झारखंडहून
आलेल्या कामगारांचा मृतां मध्ये आणि जखमींमध्ये समावेश आहे. अन्य अपघात बीड
जिल्ह्यात केजमध्ये दुपारी दोन वाजता घडला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या
शाळेच्या बसला एकाच दुचाकीवर जाणाऱ्या तीन जणांची दुचाकी धडकली. उपचारादरम्यान या
तिघांचा मृत्यु झाला.
****
भारत आणि इंग्लंड यांच्यातली तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका भारतीय महिला क्रिकेट
संघानं तिन्ही सामन्यात विजय मिळवत जिंकली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली
झालेल्या या मालिकेतल्या अंतिम सामन्यात भारतानं यजमान इंग्लंडवर १६ धावांनी विजय
मिळवला. भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करत ४५ षटकं आणि ४ चेंडूत १६९ धावा केल्या, प्रत्युत्तरादाखल इंग्लंडचा संघ ४३ षटक आणि ३ चेंडूत १५३
धावा करत सर्वबाद झाला.
****
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरु असलेल्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या
मालिकेतला तिसरा निर्णायक सामना आज हैदराबादमध्ये होणार आहे. नागपूरमध्ये पावसामुळे झालेला आठ षटकांचा दुसरा
सामना भारतानं जिंकला. त्यामुळे सध्या दोन्ही संघ एक- एक नं बरोबरीत आहेत.
****
लातूर जिल्ह्यात मानसिक आरोग्य आढावा मंडळाचा फायदा मानसिक रुग्णांना व्हावा
यासाठी प्रयत्न करावेत, असं
आवाहन जिल्हा न्यायाधीश सुरेखा कोसमकर यांनी केलं आहे. मानसिक आरोग्य कायदा २०१७
अंतर्गत मानसिक रुग्णांचे हक्क अबाधित राहण्यासाठी राज्य शासनाने राज्यात एकूण आठ
विभागामध्ये मानसिक आरोग्य आढावा मंडळाची स्थापना केलेली आहे. असा त्यांनी यावेळी सांगितलं.
****
No comments:
Post a Comment