Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 26 September 2022
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २६
सप्टेंबर २०२२ दुपारी १.०० वा.
****
शारदीय नवरात्रोत्सवाला
आजपासून प्रारंभ होत आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नवरात्रोत्सवाच्या
शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभप्रसंगी सर्वांचं जीवन ऊर्जा आणि आनंदानं भरावं असं त्यांनी
आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे.
मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनीही, शारदीय नवरात्रोत्सवाकडून राज्याचा सर्वांगीण विकास, समृद्धीकरिता व्रतस्थ राहण्याची प्रेरणा घेऊ
या अशा शब्दांत नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
***
उस्मानाबाद
जिल्ह्यात तुळजापूर इथंही कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला
आजपासून प्रारंभ झाला. मध्यरात्री एक वाजता देवी तुळजाभवानी मंचकी निद्रा संपवून आपल्या
गर्भ घरात दाखल झाल्या. यावेळी मूर्तीला पंचामृताचा महाभिषेक करण्यात आला. पहाटे चार
वाजता मंदिर संस्थांचे पदाधिकारी आणि मानाचे महंत तुकोजी बुवा यांच्या उपस्थितीत महाआरती
करण्यात आली. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी राज्यातील
भाविक मोठ्या संख्येनं तुळजापुरात दाखल झाले आहोत.
***
शारदीय नवरात्रोत्सवाच्या
निमित्तानं आजपासून राज्याच्या आरोग्य विभागामार्फत माता सुरक्षित तर घर सुरक्षित विशेष
अभियान राबवण्यात येत आहे. घरातील माता निरोगी राहावी, जागरूक राहावी आणि समाजात तिच्या
आरोग्याबद्दल संवेदनशीलता निर्माण व्हावी या उद्देशानं हे अभियान राबवण्यात येत आहे. ५ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या अभियानात राज्यातील
सर्व माता, भगिनींनी आपल्या आरोग्याची आवश्य तपासणी करून घ्यावी अस आवाहन मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. या अभियानातर्गंत प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी ९ ते
दुपारी २ या वेळेत १८ वर्ष वयावरील महिला, माता यांच्या सर्वांगीण तपासण्या केल्या
जाणार आहेत. रक्त तपासण्या, जननी सुरक्षा योजना प्रधानमंत्री मातृ वंदना योजने अंतर्गत
पात्र लाभार्थ्यांचं नवीन बँक खातं उघडणं, गरोदर मातांचं आधारकार्ड जोडणं यांचा यात
समावेश असल्याची माहितीही आरोग्य विभागानं दिली आहे.
***
औरंगाबाद
शहरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या वर्षी १५ ऑगस्टला विश्व विक्रमी एक
लाख १८ हजार वृक्ष लावण्याचा संकल्प पूर्ण झाल्यानिमित्त औरंगाबाद शहरातील या उपक्रमात
सहभागी विविध पर्यावरण प्रेमी संस्था, नागरिकांना केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अश्विनीकुमार
चौबे यांच्या हस्ते औरंगाबाद इथं वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया बुक संस्थेचं प्रमाणपत्र आज
प्रदान करण्यात आलं. एका शहराला वृक्ष लागवडीच्या विक्रमाबद्दल पहिल्यांदाच गौरवण्यात
येत असल्याचं वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया बुक संस्थेचे अध्यक्ष पवन सोळंकी यांनी यावेळी
सांगितलं.
***
९६ वावं
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या फेब्रुवारी महिन्यात वर्धा इथं होणार आहे.
आयोजनाबाबत काल झालेल्या बैठकीत संमेलनाची पूर्वतयारी आणि आगामी आयोजनाबाबत माहिती
देण्यात आली. तसंच या सभेत विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी आयोजनाबाबत सूचनावजा प्रस्ताव
मांडले. वर्धा इथं तब्बल ५३ वर्षांनंतर हे संमेलन होणार आहे
***
देशात कोविड
प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २१७ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल ११ लाख ६७ हजारांहून
अधिक नागरिकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत
या लसीच्या २१७ कोटी ६८ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत.
देशात काल
नव्या चार हजार कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर पाच हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले. देशात सध्या
४३ हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
***
औरंगाबाद
शहराचं ग्रामदैवत असलेल्या कर्णपुरा इथं तुळजा भवानी देवीच्या मंदिरात विधानपरिषदेचे
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या हस्ते घटस्थापना आणि महापूजा करण्यात आली. कर्णपुरा
मंदिर विद्युत रोषणाई, हार, फुलं पताक्यांनी सजवण्यात आलं आहे.मंदिर परिसरात नऊ दिवसात
जागरण गोंधळ तसंच विविध कार्यक्रम होणार आहे.
***
साडेतीन
शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूर इथल्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात सकाळी
साडेआठ वाजता मानाच्या तोफेची सलामी झाल्यानंतर घटस्थापना करण्यात आली. आज पहाटेपासून
देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
नवरात्रोत्सावाच्या
पार्श्वभूमीवर पंढरपूर इथल्या श्री विट्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिराला देखील फुलांची
आरास करण्यात आली आहे.
***
नांदेड जिल्ह्यात
लम्पी बाधित पशुधनाची संख्या शंभर झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५९ हजार ८७० पशुधनाचं
लसीकरण करण्यात आलं. लम्पी हा आजार गोठ्यातील अस्वच्छता, पशुधनाच्या अंगावरील गोचिड
आदी कारणांमुळं होण्याचा संभव असून याबाबत जिल्हा प्रशासनातर्फे ग्रामपातळीवर मोठ्या
प्रमाणात जनजागृती केली जात आहे.
***
No comments:
Post a Comment