Sunday, 25 September 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 25.09.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  25 September  2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २५ सप्टेंबर २०२   सायंकाळी ६.१०

****

·      आगामी सणांसाठी स्थानिक उत्पादनांच्या खरेदीचं अभियान गतिमान करावं-पंतप्रधानांचं आवाहन.

·      उद्यापासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवासाठी सर्वत्र जय्यत तयारी.

·      मराठवाडा रेल्वे विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा यांचं निधन.

आणि

·      अतिवृष्टीतून वगळलेल्या सर्व शेतकऱ्यांना १५ दिवसांत नुकसान भरपाई देण्याचं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचं आश्वासन.

****

आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक उत्पादनांच्या खरेदीचं अभियान गतिमान करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात देशवासियांना संबोधित करतांना आज ते बोलत होते. दोन ऑक्टोबरला गांधी जयंती आणि आगामी सणांच्या निमित्ताने खादी, स्थानिक हातमाग, हस्तकलेसह स्थानिक उत्पादनांच्या खरेदीवर जनतेनं भर दिला पाहिजे, असं सांगत, जनतेनं देशी उत्पादनांची विक्रमी खरेदी करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं.

 

जनतेनं प्लास्टिक वगळता अन्य साहित्यापासून बनवलेल्या पिशव्यांचा वापर करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. देशात कापडी, सुती, काथ्या आणि केळीच्या तंतूपासून तयार करण्यात येणाऱ्या पारंपारिक पिशव्यांचा वापर वाढत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

 

दिव्यांगांसाठी विकसित करण्यात आलेल्या ब्रेल लिपी या भारतीय सांकेतिक भाषेबद्दल आणखीन जागरुकता वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ७५ दिवस चाललेल्या ‘सुरक्षित सागर’ या मोहिमेची सांग़ता गेल्या १७ तारखेला, सागरी किनारा स्वच्छता दिनी झाली. या मोहिमेत लोकसहभागातून दिलेल्या योगदानाबद्दल पंतप्रधानांनी सर्वांचं अभिनंदन केलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व प्रकल्पांना गती मिळणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. माथाडी कामगारांचे नेते अण्णासाहेब पाटील यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त माथाडी कामगारांच्या मेळाव्यात ते आज मुंबईत बोलत होते. माथाडी कामगार महामंडळाने आपल्या कार्यकाळात ५० हजार उद्योजक तयार केले, असेच उद्योजक यापुढेही तयार व्हावेत यासाठी उद्योजक कर्जात वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

****

केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे उद्या औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तापडिया नाट्य मंदिरात आयोजित ‘एक लक्ष वृक्ष लागवड उपक्रमाच्या गौरव सोहळ्या’ला ते उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी साडे सहा वाजता विमानाने ते मुंबईकडे प्रयाण करतील.

****

औरंगाबाद मध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर हॉप ऑन हॉप ऑफ बससेवा सुरू करण्याची चाचपणी करण्याची सूचना पर्यटन विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनतर्फे आज दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत ते बोलत होते. औरंगाबादच्या पर्यटन प्रचारासाठी संस्थेची नेमणूक करणं, पर्यटनावर लघुपट महोत्सव आयोजित करणं, नव्या विमान सेवा सुरू करणं, विद्यार्थ्यांना पर्यटनाचे धडे देणं, पर्यटनाशी संबंधित छोटे छोटे अभ्यासक्रम तयार करणे, जायकवाडी इथं बोट क्लब तयार करणं आदी विषयांवर पर्यटन मंत्री लोढा यांच्यासोबत यावेळी चर्चा झाली.

****

हैदराबाद मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त औरंगाबाद इथल्या देवगिरी किल्ल्यावर आज सकाळी सात वाजता हेरिटेज वॉक आणि स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. स्वातंत्र्य सैनिकांनी निजामाच्या सैन्याला चकवा देऊन किल्ल्यावर तिरंगा फडकवला, त्याचा रोमांचक इतिहास जाणून घेण्याची संधी या मोहिमेत सहभागी झालेल्या नागरिकांना मिळाली.

****

शारदीय नवरात्रोत्सवाला उद्यापासून प्रारंभ होत आहे. मराठवाड्यात आदिशक्तीच्या साडे तीन शक्तिपीठांपैकी माहूर इथं रेणुका माता, तुळजापूर इथं तुळजाभवानी तसंच अंबाजोगाई इथल्या योगश्वरी देवीसह सर्वच ठिकाणच्या देवी मंदिरांमध्ये शारदीय नवरात्रोत्सवाची जोमानं तयारी सुरु आहे.

 

तुळजापूर इथं तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेची उद्या सांगता होऊन पहाटे देवी सिंहासनारूढ होईल, दुपारी १२ वाजता घटस्थापना होणार असून, येत्या १० ऑक्टोबरपर्यंत विविध विधी, होमहवनादी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली.

घटस्थापनेनिमित्त उद्या सोलापूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शासकीय सुटी जाहीर केली आहे.

 

नांदेड जिल्ह्यात माहूर इथं भाविकांच्या सुविधेसाठी देवस्थानच्या वतीनं चोख व्यवस्था करण्यात आली आहे.

 

अंबाजोगाई इथं उद्या सकाळी ९ वाजता घटस्थापना आणि महापूजा होऊन योगेश्वरी देवीच्या नवरात्रोत्सवास सुरुवात होणार आहे. सकाळी सहा ते रात्री ११ वाजेपर्यंत भाविकांना देवीचं थेट दर्शन घेता येणार आहे. सकाळी ६ ते दुपारी ११ वाजेपर्यंत देवीस अभिषेक करता येणार आहेत. महोत्सवाच्या कालावधीत दररोज संगीत भजन, गायन कीर्तन, जगदंबेचा गोंधळ होणार आहे.

 

औरंगाबाद जिल्ह्यातल्या दौलताबादजवळील शरणापूरच्या भांगसी माता गड तसंच कर्णपुरा देवीच्या नवरात्रोत्सवाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.

 

हिंगोली जिल्ह्यातही नवरात्रोत्सवाची तयारी सुरु असून उत्सवादरम्यान ठेवल्या जाणाऱ्या बंदोबस्तासंदर्भात आज पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.

****

मराठवाडा रेल्वे विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा यांचं आज औरंगाबाद इथं निधन झालं, ते ७५ वर्षांचे होते. मराठवाड्यात रेल्वे सेवेच्या विकासासाठी त्यांनी जवळपास चार दशकं अविरत योगदान दिलं. त्यांच्या प्रयत्नामुळे मराठवाड्यातून अनेक रेल्वेगाड्या कायमस्वरुपी तर अनेक रेल्वेगाड्या तात्पुरत्या स्वरुपात विविध मार्गांवर धावत आहेत. त्यांच्या या योगदानाबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेचा २०२० चा ‘पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार’ त्यांना प्रदान करण्यात आला होता. वर्मा यांच्या पार्थिव देहावर आज सायंकाळी औरंगाबाद इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.

****

येत्या पंधरा दिवसांच्या आत अतिवृष्टीतून वगळलेल्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम दिली जाईल, असं आश्वासन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिलं आहे. सोलापूर जिल्ह्यात बार्शी-लातूर मार्गावर आज शेतकरी संघटनेच्या आंदोलकांशी सावंत बोलत होते. अतिवृष्टीतून वगळलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि पिकविम्याची अग्रीम रक्कम मिळण्यासाठी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली या मार्गावर आंदोलन करण्यात आलं. सावंत यांनी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन तूर्तास मागे घेत असल्याचं गायकवाड यांनी सांगितलं.

****

अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील जनावरांचा लम्पी आजार नियंत्रणात असल्याचं पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. ते आज नांदेड इथं बोलत होते. राज्यातील ३० जिल्ह्यात या आजाराचा पशुधनात शिरकाव झाला आहे, मात्र पशुपालकांनी, शेतकऱ्यांनी घाबरून न जाता शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे आपल्या स्तरावर काळजी घ्यावी, असं आवाहन विखे-पाटील यांनी केलं. लम्पी आजारामूळे ज्या पशुपालकांनी आपली जनावरं गमावली आहेत त्यांच्यासाठी शासनातर्फे अर्थसहाय्य केले जात आहे. याव्यतिरिक्त जिल्हा परिषदेलाही सानुग्रह अनुदान देण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत, असं विखे-पाटील यांनी सांगितलं.

****

कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याच्या निषेधार्थ घरेलू मोलकरीण कामगार संघटना नवरात्रोत्सवात नवदुर्गा जागर आंदोलन करणार आहे. क्रांती असंघटित कामगार संघटनेच्या माध्यमातून हे आंदोलन केलं जाणार आहे. संघटनेच्या अध्यक्षा अनिता कोंडा यांनी अहमदनगर इथं सहाय्यक कामगार आयुक्त नितीन कौले यांना या आंदोलनाची नोटीस तसंच घरेलू मोलकरीण कामगारांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्याच्या मागणीचं निवेदन सादर केलं. उद्या घटस्थापनेला सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या स्वच्छतेने या आंदोलनाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर नवमीपर्यंत दररोज वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन केलं जाणार आहे.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 02 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 02 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...