Thursday, 29 September 2022

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 29.09.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२९ सप्टेंबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं औपचारिक उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अहमदाबाद इथं होणार आहे. ३६ क्रीडा प्रकारांमध्ये होणारी ही स्पर्धा गुजरातमधल्या सहा शहरांमध्ये आयोजित करण्यात आली आहे. पंतप्रधान यावेळी देशभरातल्या खेळाडूंशी संवादही साधणार आहेत. सुमारे १५ हजार खेळाडू, प्रशिक्षक आणि अधिकारी या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

****

वरिष्ठ विधीज्ञ आर. वेंकटरमाणी यांची नवीन ऍटर्नी जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कायदा आणि न्याय मंत्रालयानं याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. राष्ट्रपतींनी वेंकटरमाणी यांची नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती तीन वर्षांसाठी असेल, असं अधिसूचनेत नमूद करण्यात आलं आहे.

****

राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात अधिकृत ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यासाठी केंद्रीय नागरी विमान उड्डाण महासंचालनालयानं मान्यता दिली आहे. विद्यापीठाचे कुलगुरू पी जी पाटील यांनी ही माहिती दिली. ही परवानगी मिळालेलं हे देशभरातल्या कृषी विद्यापीठातलं पहिलंच केंद्र आहे.

****

महिलांना कायदेविषयक तसंच आरोग्याविषयक मार्गदर्शन आणि सहकार्याच्या उद्देशाने महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीने राज्यभरात जिल्हास्तरावर स्त्री हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. लातूर इथं माजी मंत्री दिलीप देशमुख यांच्या हस्ते या हेल्पलाईनचं लोकार्पण करण्यात आलं. १८०० २० ३० ५८९ या क्रमांकावर महिलांना या हेल्पलाईनचा लाभ घेता येईल.

****

मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातला आरोपी अबू सालेम आणि परवेझ आलम या दोघांना बनावट पारपत्र प्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्युरो - सीबीआयच्या लखनौ विशेष न्यायालयानं तीन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अबु सालेम आणि त्याच्या पत्नीने मोहम्मद परवेज आलम याच्याकडून हा पासपोर्ट तयार करून घेतला होता.

****

पालघर जिल्ह्यात वसई तालुक्यातल्या चंद्रपाडा ग्रामपंचायतीच्या हद्दीत सीओएस पॉवर या कंपनीत हाड्रोजन सिलेंडरचा स्फोट झाल्यानं, ३ जणांचा मृत्यू झाला तर, ८ जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांना तातडीनं उपचारासाठी जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कलवलं आहे.

//*********//

 

No comments: