Thursday, 29 September 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 29.09.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  29 September  2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २९ सप्टेंबर २०२   सायंकाळी ६.१०

****

·      भारत एका नव्या आत्मविश्वासानं जागतिक क्षितीजावर उदयास येत आहे - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन.

·      घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर जोडणीवर आता वर्षभरात १५ सिलेंडर देण्यात येणार.

·      सर्व महिलांना सुरक्षित, कायदेशीर गर्भपाताचा अधिकार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट.

आणि

·      ‘पीएफआय’च्या औरंगाबाद कार्यालयाला पोलिसांनी टाळे ठोकले.

****

भारत एका नव्या आत्मविश्वासानं जागतिक क्षितीजावर उदयास येत असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. भारतीय परराष्ट्र सेवेतल्या अधिकारी प्रशिक्षणार्थींच्या गटानं आज त्यांची राष्ट्रपती भवनामध्ये भेट घेतली, त्यावेळी मुर्मू बोलत होत्या. अशा या काळात हे अधिकारी परराष्ट्र सेवेतील त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात करत असल्यानं हे अधिक उल्हासदायक ठरणार आहे. जगही भारताकडे नव्या कौतुकानं पाहत आहे, असं त्या म्हणाल्या. भारताच्या मजबूत स्थितीसाठी इतर घटकांसह आर्थिक कामगिरी देखील महत्वपूर्ण आहे. भारताची अर्थव्यवस्था सर्वात वेगवान विकास दर असलेल्या अर्थव्यवस्थांपैकी एक बनली आहे. जागतिक पटलावर भारताला हे स्थान मिळण्याचं दुसरं कारण म्हणजे इथली नीतिमूल्यं असल्याचं त्यांनी नमूद केलं. वेगानं बदलणाऱ्या जगात, अनेक संधी आणि धोक्यांमुळं भारतीय परराष्ट्र सेवेतल्या अधिकाऱ्यांची भूमिका पूर्वीपेक्षा अधिक महत्त्वाची बनली आहे, असं त्या म्हणाल्या. हे अधिकारी प्रशिक्षणार्थी देशवासीयांच्या हितासाठी भविष्यातील आव्हानांना शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने उत्तर देतील, असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला.

****

घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलेंडर जोडणीवर आता वर्षभरात १५ सिलेंडर देण्यात येणार तसंच एका महिन्यात एका जोडणीवर दोन सिलेंडर देण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. या संदर्भात नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. त्यामुळं ग्राहक एका जोडणीवर एका महिन्यात दोनपेक्षा जास्त सिलेंडर घेऊ शकणार नाही. आत्तापर्यंत घरगुती विनाअनुदानित गॅस जोडणी असलेल्या ग्राहकांना वर्षभरात अमर्यादित सिलेंडर मिळत होते. अनुदानित घरगुती गॅस सिलेंडरसाठी नोंदणी केलेल्यांना या दरानं वर्षभरात फक्त १२ सिलेंडर मिळणार आहेत. यापेक्षा जास्त सिलेंडरची गरज असल्यास ग्राहकांना अनुदान नसलेलं सिलेंडर घ्यावं लागेल. याची तातडीनं अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी या निर्णयावर टीका केली आहे. घरगुती गॅस सिलेंडर वापरावर बंधन घालून केंद्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं थेट नागरिकांच्या जेवणावर तसंच मुलभूत हक्कांवरच बंधनं घातली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

****

देशातल्या सर्व महिलांना सुरक्षित, कायदेशीर गर्भपाताचा अधिकार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. अविवाहित महिलांनाही वैद्यकीय गर्भपात कायद्यांतर्गत गर्भपात करण्याचा अधिकार असल्याचं न्यायालयानं आज यासंदर्भातच्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान स्पष्ट केलं. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या खंडपीठानं हा निर्णय दिला आहे. यापूर्वी, २० आठवड्यांपेक्षा जास्त आणि २४ आठवड्यांपेक्षा कमी गर्भधारणेचा गर्भपात करण्याचा अधिकार आतापर्यंत फक्त विवाहित महिलांनाच होता. आता हा अधिकार अविवाहित महिलांनाही देण्यात आला आहे. समाजातल्या संकुचित पितृसत्ताक रूढींच्या आधारे कोणत्याही कायद्याचा फायदा उचलू नये, यामुळे कायद्याचा उद्देश संपून जाईल, असंही न्यायालयानं म्हटलं आहे.

****

चारचाकी वाहनांमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य करण्याचा प्रस्ताव शासनानं १ ऑक्टोबर २०२३ पर्यंत पुढं ढकलला आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज सामाजिक संपर्क माध्यमातील एका संदेशाद्वारे ही माहिती दिली आहे. जागतिक पुरवठा साखळीच्या संकटानंतर वाहन उद्योगासमोर उभ्या राहिलेल्या आव्हानांमुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचं गडकरी यांनी म्हटलं आहे.

****

सध्या ‘पोषण माह’ सुरू असून, महिला आणि बालविकास मंत्रालयानं जलशक्ती मंत्रालयासह विविध स्तरांवर, जल व्यवस्थापन उपक्रमांवर अधिक भर दिला आहे. या मोहिमेत पहिल्या दोन आठवड्यांमध्ये ‘जल व्यवस्थापन’शी संबंधित झालेल्या दहा लाखांहून अधिक उपक्रमांची नोंद झाली आहे. पाण्याचा पुरेसा वापर, दूषितमुक्त वातावरण मानवी शरीराला चांगलं कार्य करण्यास मदत करतं. यामुळं खाल्लेल्या अन्नाचं पौष्टिक मूल्य टिकून राहतं. महिला आणि बालविकास मंत्रालयानं यासाठी सर्व राज्यं - केंद्रशासित प्रदेशांनी अंगणवाड्यांच्या परिसरात हवामानाचा विचार करुन पावसाचं पाणी साठवावं अशी विनंती केली आहे. याशिवाय महिलांच्या, जल संधारण आणि व्यवस्थापनातील भूमिकेला विशेषतः ग्राम आरोग्य पोषण आणि स्वच्छता समित्यांच्या माध्यमातून अधोरेखित केलं आहे. यात पोषण पंचायत आणि माता समुहांचाही समावेश आहे.

****

नंदुरबार तालुक्यात धानोरा ते ईसाईनगर गावा दरम्यानचा रंका नदीवरचा पूल आज सकाळी सव्वानऊ वाजेच्या दरम्यान कोसळला. धानोरा गावामार्गे गुजरात राज्याला जोडणाऱ्या या राज्यमार्ग क्रमांक सहावरील पुलावर मोठी वर्दळ असते. सकाळच्या टप्प्यातली वाहनं गेल्यानंतर हा पूल कोसळल्यानं या दूर्घटनेतली जीवितहानी टळली.

****

पोलिसांनी आज औरंगाबाद इथं जिन्सी भागामध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया- ‘पीएफआय’च्या कार्यालयाला टाळं ठोकलं. ‘पीएफआयच्या’ कार्यालयाला टाळं लावण्यात येण्याची राज्यातली ही पहिलीच कारवाई आहे. औरंगाबादचे पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता यांच्या स्वाक्षरीनं ही टाळेबंदी करण्यात आली आहे. या संदर्भात कार्यालयाला नोटीस देण्यात आली असून केंद्रीय तपास यंत्रणांशिवाय स्थानिक पोलिसही ‘पीएफआय’विरुद्ध कारवाई करत आहेत. कार्यालयाभोवती कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यापूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणा – ‘एनआयए’ आणि दहशतवाद विरोधी पथकानं औरंगाबादच्या अनेक भागात छापे टाकून ‘पीएफआय’ च्या १३ सदस्यांना अटक केली होती. औरंगाबादमध्ये ‘पीएफआय’चं मोठं जाळं असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं ‘पीएफआय’शी संबंधित लोकांची वेगवेगळ्या भागात पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

****

महाराष्ट्र राज्य सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कंत्राटी कर्मचारी संघटना – ‘एनटीईपी’ तर्फे विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून दोन दिवस औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. बिनशर्त शासकीय सेवेत सामावून घ्यावं, अशी यातली प्रमुख मागणी आहे. येत्या तीन ऑक्टोबरला मुंबईच्या आझाद मैदानावरही आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली आहे.

****

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला टेनिस संघानं आज दिल्लीवर दोन - शून्य असा सहज विजय मिळवला. वैष्णवी आडकरनं पहिला सामना जिंकून एक शून्य अशी आघाडी मिळवून दिल्यानंतर ऋतुजा भोसलेनंही दुसरा सामना जिंकून महाराष्ट्राचा विजय निश्चित केला. अन्य सामन्यांत महाराष्ट्राच्या रुद्रांश पाटील आणि आर्या बोरसेनं १० मीटर एअर रायफलमध्ये अंतिम फेरीतला प्रवेश निश्चित केला. दूरदर्शन राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करत आहे.

****

पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांना शासनानं पदावरून दूर केलं आहे. गुरव यांनी केवळ तोंडी आदेशाद्वारे श्री विठ्ठल मंदिरातल्या भजन-कीर्तनावर बंदी घातली होती. त्यामुळे हिंदू जनजागृती समिती आणि वारकरी संप्रदायानं या संदर्भात केलेल्या मागणीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

****

No comments: