Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
: 28 September 2022
Time
07.10 AM to 07.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २८ सप्टेंबर २०२२ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत करणाऱ्या पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेवर
पाच वर्षांची बंदी
· शिवसेनेच्या चिन्हासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला स्थगिती
देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
· आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक आरक्षणासंदर्भातला न्यायालयाचा निकाल राखीव
· मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरीत महाराष्ट्र या तिन्ही विकास मंडळांचं पुनर्गठन
करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
· दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ चित्रपट अभिनेत्री आशा पारेख यांना जाहीर
· राज्यातल्या सहकार क्षेत्रातल्या निवडणुकांसंबंधीचे स्थगन आदेश राज्य शासनाकडून
मागे
आणि
· भारत आणि दक्षिण आफ्रिका संघादरम्यान आजपासून टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेला सुरवात
सविस्तर बातम्या
दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत तसंच अन्य बेकायदेशीर कारवाया केल्याप्रकरणी
पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडिया - पीएफआय या संघटनेवर केंद्र सरकारनं पाच वर्ष बंदी घातली
आहे. केंद्रीय गृह मंत्रालयानं यासंदर्भातला आदेश जारी केला आहे. पीएफआयशी संबंधित
इतर संघटनांवर देखील बंदी घालण्यात आली आहे.
दरम्यान, पीएफआय या वादग्रस्त संस्थेवर राष्ट्रीय तपास यंत्रणा - एनआयएनं काल
पुन्हा एकदा कारवाई केली. महाराष्ट्रासह आठ राज्यांमध्ये सुमारे २०० ठिकाणी एनआयएनं
छापे मारुन १७० जणांना अटक केली आहे. राज्यात औरंगाबादमधून १३, मराठवाड्यातल्या इतर
जिल्ह्यातून सात, ठाणे इथून चार, नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावातून दोन, तर सोलापुरातून
एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. पीएफआयवर पहिल्या कारवाईत अटक केलेल्या हस्तकांच्या
चौकशीतून समोर आलेल्या माहितीवरुन ही कारवाई केल्याचं एनआयएकडून सांगण्यात आलं.
पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या आंदोलनात 'पाकिस्तान जिंदाबाद'
ची घोषणाबाजी केल्याप्रकरणी पोलिसांनी 'पीएफआय'च्या सहा कार्यकर्त्यांना काल ताब्यात
घेतलं. या संघटनेवर, सामाजिक तेढ निर्माण करणं आणि देशविघातक कारवायांसाठी कट रचणं
असे आरोप ठेवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, पीएफआयच्या संभाव्य कारवायांच्या
पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत.
****
शिवसेनेच्या चिन्हासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला स्थगिती
देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाबाबतचा
निर्णय घेण्याचा आयोगाचा मार्ग मोकळा झाला. न्यायालयाच्या घटनापीठासमोर काल ही सुनावणी
झाली. शिंदे गटानं निवडणूक आयोगाकडे अर्ज करत, धनुष्यबाण या चिन्हावर दावा केला आहे.
याबाबत आयोगाची कार्यवाही स्थगित करण्याची मागणी ठाकरे गटानं केली होती, ती मागणी न्यायालयानं
फेटाळून लावली.
दरम्यान, राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत पुढील सुनावणीपर्यंत
कोणताही निर्णय घेऊ नये, असा आदेश न्यायालयानं शिंदे - फडणवीस सरकारला दिला आहे.
****
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक - ई डब्ल्यू एस आरक्षणासंदर्भातला निकाल सर्वोच्च
न्यायालयानं राखीव ठेवला आहे. या आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सरन्यायाधीश
उदय लळित यांच्या अध्यक्षतेखालच्या पाच सदस्यीय घटनापीठानं गेले सात दिवस ही सुनावणी
घेतली.
सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठांच्या कामकाजाच्या थेट प्रसारणाला कालपासून
सुरवात झाली. शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाच्या प्रकरणाची सुनावणीही देशभरात थेट
पाहता आली. वेबकास्ट डॉट जीओव्ही डॉट आय एन स्लॅश एस सी इंडिया या लिंकवर सर्वोच्च
न्यायालयाच्या कामकाजाचं प्रसारण पाहता येईल.
****
राज्यातल्या मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरीत महाराष्ट्र या तीनही विकास मंडळांचं
पुनर्गठन करण्याचा निर्णय काल राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. पोलीस शिपाई संवर्गातली
२०२१ मधली सगळी रिक्त पदं भरण्यासाठी पदभरती निर्बंधामधून सूट देण्याचा, तसंच एकूण
वीस हजार पदं भरण्यालाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
इतर मागास प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी दहावीनंतरच्या शिक्षणासाठी बहात्तर
वसतीगृहं सुरू करणं, तसंच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास
प्रवर्गातल्या गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठीची शिष्यवृती दरवर्षी
पन्नास विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
राज्यात फोर्टिफाईड तांदुळाचं दोन टप्प्यात वितरण करण्यास मंत्रिमंडळानं मान्यता
दिली आहे. या योजनेच्या एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ पर्यंतच्या टप्प्यात नंदुरबार, वाशिम,
गडचिरोली, उस्मानाबाद या चार आकांक्षित जिल्ह्यांमध्ये, तसंच परभणी, जालना, नांदेड, औरंगाबाद, आणि हिंगोलीसह
अन्य तेरा जिल्ह्यात हा गुणसंवर्धित तांदूळ वितरीत करण्यात येणार आहे.
उच्च शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी सुधारित शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत
शिष्यवृत्तीची रक्कम पन्नास हजार रुपयांपर्यंत वाढवणं, वन विभागाचे अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचा
वणवा, तस्कर-शिकाऱ्यांच्या हल्ला अथवा वन्य प्राण्यांचा बचाव करतांना मृत्यू झाल्यास
किंवा कायमचं अपंगत्व आल्यास वारसांना लाभ देणं, राज्यातल्या शासकीय वैद्यकीय, दंत
आणि आयुर्वेद महाविद्यालयातल्या पूर्णवेळ ग्रंथपाल आणि शारिरीक शिक्षण निर्देशकांना
सातवा वेतन आयोग, तर दुय्यम न्यायालयातल्या न्यायिक अधिकाऱ्यांना दुसऱ्या राष्ट्रीय
न्यायिक वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार सुधारित वेतन लागू करणं, सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या
चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचं नाव देण्याचा निर्णय कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत
घेण्यात आला.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०२१, अभिमत विद्यापीठांमधील प्रवेश
तसंच शुल्क विनियमन विधेयक मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. हे
विधेयक दुरुस्तीसह पुन्हा लागू करण्यात येईल.
दरम्यान, शिवभोजन थाळी बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही, मात्र यासंदर्भात
ज्या तक्रारी आल्या आहेत त्यांची चौकशी केली जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
स्पष्ट केलं.
****
२०२० या वर्षासाठीचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ चित्रपट अभिनेत्री आशा
पारेख यांना जाहीर झाला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी काल ही
घोषणा केली. येत्या शुक्रवारी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण समारंभात राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार पारेख यांना प्रदान केला जाणार आहे. आशा
पारेख यांनी १९५२ साली बाल कलाकार म्हणून चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. त्यांचे, कटी
पतंग, घराना, बहारों के सपने, मेरा गांव मेरा देश यासह अनेक चित्रपट गाजले. आशा पारेख
यांना पद्मश्री पुरस्काराबरोबरच अनेक प्रतिष्ठित संस्थांच्या जीवनगौरव पुरस्कारांनीही
गौरवण्यात आलं आहे.
****
यंदाच्या नवरात्र उत्सवात एक ऑक्टोबर या दिवशीही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक
आणि ध्वनीवर्धक वापरण्यासाठी राज्य सरकारनं सूट दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेनंतर हा निर्णय घेतला. राज्यात तीन आणि
चार ऑक्टोबर या दोन दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक आणि ध्वनीवर्धक वापरण्याची
परवानगी यापूर्वीच देण्यात आली होती.
****
राज्यातल्या विविध सेवा सहकारी सोसायट्या, बॅंका, साखर कारखाने आदींसह सहकार
क्षेत्रातल्या निवडणुकांसंबंधीचे स्थगन आदेश राज्य शासनाने मागे घेतले आहेत. यासंदर्भात
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात काल झालेल्या सुनावणीत सहकार, पणन आणि
उद्योग विभागानं स्थगिती उठवणारं पत्र सादर केलं. त्यामुळे वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या
सहकार क्षेत्राच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
****
लम्पी आजाराच्या औषधोपचाराचा आणि लसीकरणाचा सगळा खर्च राज्य शासनामार्फत करण्यात
येत असल्याची माहिती, पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली. ज्या शेतकऱ्यांनी
लम्पी चर्मरोगाच्या उपचारासाठी खासगी दवाखान्यातून औषधं खरेदी केली आहेत, अशा पशुपालकांनी
त्याबाबतची माहिती पुराव्यासह सादर केल्यास, आलेला खर्च त्यांना परत देण्यात येईल,
असंही त्यांनी सांगितलं. राज्यात तीस जिल्ह्यात या रोगाचा प्रादुर्भाव झाला असून, राज्य
शासनानं तत्परतेनं त्याला आळा घालण्याच्या उपाय योजना सुरू केल्या आहेत.
औरंगाबाद जिल्ह्याच्या नऊ तालुक्यातल्या १०२ गावात ६९८ जनावरांना लम्पी आजाराची
लागण झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तीन लाख १७ हजार १३१ गोवंश जनावरांचं लसीकरण करण्यात
आलं असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागानं दिली आहे.
****
देशात काँग्रेस वंशवादाचं राजकारण करत असून, पंतप्रधान नरेंद्र यांना हा वंशवाद
संपवायचा असल्याचं, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. बीड इथं सेवा सप्ताहानिमित्त
बुद्धिजीवी वर्गासमोर भाषण करताना त्या काल बोलत होत्या. घराणेशाहीच्या वाईट प्रथांचा
त्यांनी यावेळी उल्लेख केला, मात्र आपणही घराणेशाहीचंच प्रतिक आहोत आणि जनतेत राहणार्या
अशा नेत्यांना बाहेर काढता येणार नाही, असं मुंडे यांनी नमूद केलं.
****
राष्ट्रीय स्वच्छता प्रीमियर लीग स्पर्धेत औरंगाबाद शहराने चमकदार कामगिरी केली
आहे. या स्पर्धेत निवड झालेल्या महानगरपालिकांना परवा ३० सप्टेंबर ला नवी दिल्ली इथं
सन्मानित केलं जाणार आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक आणि स्मार्ट सिटी चे मुख्य कार्यकारी
अधिकारी डॉ अभिजित चौधरी ह्यांच्या मार्गदर्शनाखाली, १६ आणि १७ सप्टेंबरला राबवलेल्या,
लोकसहभागातून स्वच्छता, या मोहिमेच्या यशाबद्दल महापालिकेला गौरवलं जाणार आहे.
****
जागतिक पर्यटन दिनानिमित्त काल उस्मानाबाद इथं जिल्हा पर्यटन विकास समितीच्या
वतीनं हातलाई मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या सोयगाव तालुक्याचा मराठवाडा वॉटर ग्रीडमध्ये समावेश
करण्यासंदर्भात अभ्यास करून व्यवहार्यता तपासण्यात येईल, असं पाणीपुरवठा आणि स्वच्छता
मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं आहे. यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत
ते काल बोलत होते. सोयगाव तालुक्यातल्या जुन्या निजामकालीन बांधाचं बॅरेजमध्ये रूपांतर
करण्याबाबतही पाहणी करण्यात येईल, असं सांगत, सोयगाव तालुक्याचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी
सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही पाटील यांनी दिली.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ४०८ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या
कोविड बाधितांची एकूण संख्या, ८१ लाख २० हजार ९ झाली आहे. काल या संसर्गानं दोन रुग्णांचा
मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक
लाख ४८ हजार ३३३ इतकी झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८५ शतांश टक्के आहे. काल ५४५
रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७९ लाख ६८ हजार १७४ रुग्ण या संसर्गातून मुक्त
झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक १३ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या
तीन हजार ५०२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल २८ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या
दहा, उस्मानाबाद आठ, जालना चार, लातूर तीन, बीड दोन तर हिंगोली जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा
समावेश आहे.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघादरम्यान टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेला आजपासून सुरवात
होत आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज तिरुवनंतपुरम इथं खेळला जाणार
आहे. संध्याकाळी सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल. मालिकेनंतर दोन्ही संघात तीन
एकदिवसीय सामन्यांची मालिकाही खेळवली जाणार आहे.
****
वीज मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी केल्याची एकशे सतराहून जास्त प्रकरणं औरंगाबाद
शहरात उघडकीस आली असून, या सर्वांवर विद्युत कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.
वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करून त्यांना वीजचोरीची बिलं देण्यात
आली असून, ही बिलं चोवीस तासात न भरल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असं
महावितरणनं सांगितलं आहे. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात महावितरणनं वीजचोरीविरोधात
मोहीम उघडली असून, यात अधिक हानी असलेल्या वीज वाहिन्यांवरच्या भागांमध्ये विशेष मोहीम
राबवली जात आहे.
****
बीड जिल्ह्यात सेवा पंधरवाडा निमित्त अंबाजोगाई इथं वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र
ठरलेल्या गुणवत्ताधारक ३५ मुला-मुलींचा सत्कार करण्यात आला. विविध क्षेत्रात कौतुकास्पद
कामगिरी करणाऱ्यांनाही यावेळी गौरवण्यात आलं. या सत्कार सोहळ्याला भाजपाच्या राष्ट्रीय
सचिव माजी मंत्री पंकजा मुंडे, खासदार डॉ प्रीतम मुंडे, आमदार नमिता मुंदडा यांच्यासह
अनेक मान्यवर उपस्थित होते.
****
आद्य कवयित्री महदंबा यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून बीड इथं काल “जागर-आद्य
कवयित्री महदंबेचा” हा कार्यक्रम झाला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत सांस्कृतिक कार्य
संचालनालयाकडून घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सतीश साळुंके
यांनी आपल्या व्याख्यानातून, कवयित्री महदंबा यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. यावेळी
झालेल्या गीत गायन तसंच कवी संमेलनाला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
****
राष्ट्रीय पोषण महिन्यानिमित्त उस्मानाबाद जिल्हा परिषद आणि महिला बालकल्याण
विभागाच्या वतीनं सुदृढ बालक बालिका स्पर्धा, रानभाज्या महोत्सव आणि पाककृती स्पर्धा
घेण्यात आल्या.
****
No comments:
Post a Comment