Thursday, 1 September 2022

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०१ सप्टेंबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या वतीनं आजपासून ३० सप्टेंबरपर्यंत पाचवा राष्ट्रीय पोषण माह साजरा करण्यात ये आहे. महिला आणि आरोग्य, बालक आणि शिक्षण यावर लक्ष केंद्रीत करून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हा पोषण महिना साजरा करणं, हे त्याचं उद्दीष्ट आहे. आकांक्षित पोषण माह, हा सहा वर्षांखालील मुले, किशोरवयीन मुली, गर्भवती आणि स्तनदा माता यांच्या आरोग्यात सुधारणा करण्यासाठीचा केंद्र सरकरचा प्रमुख कार्यक्रम आहे.

****

गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्लीत केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या ई-आवास वेब पोर्टलचं उद्घाटन करणार आहेत. केंद्रीय राखीव पोलिस दल - सी आर पी एफ च्या कर्मचाऱ्यांसाठी गृहनिर्माणाचं प्रमाण वाढवण्याला सरकारनं प्राधान्य दिलं आहे. त्यामुळे घर वाटपाचं सुधारित धोण कार्यान्वित करण्यासाठी आणि वाटप प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी एक समान वेब पोर्टल म्हणून सीआरपीएफ ई - आवास विकसित करण्यात आलं आहे.

****

वर्तमान वित्त वर्षाच्या एप्रिल ते जून या तिमाहीमध्ये देशाच्या सकल स्थानिक उत्पादनात साडेतेरा टक्क्यांनी वाढ झाली आहे. केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं प्रकाशित केलेल्या अंदाजानुसार या तिमाहीत कृषि, वानिकी आणि मत्स्योद्योग क्षेत्रात साडे चार टक्के वाढ नोंदवण्यात आली. या तिमाहीतील प्रत्यक्ष सकल उत्पादन ३६ लाख ८५ हजार कोटी रुपये राहण्याचा अंदाज मंत्रालयानं व्यक्त केला आहे.

****

जम्मू आणि काश्मीर मधल्या बारामुल्ला जिल्ह्याच्या सोपोर परिसरातल्या बोमई गावात काल संध्याकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांदरम्यान झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले. पोलिस, संरक्षण दल, केंद्रीय राखीव पोलिस दल, यांच्या संयुक्त कारवाईदरम्यान ही चकमक झाली.

****

औरंगाबाद, जालना तसंच बीड जिल्ह्यात काल पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. औरंगाबाद शहरात तसंच बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्यात चांगला पाऊस झाला, केज तालुक्यात वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले.

दरम्यान, येत्या दोन दिवसात राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जना आणि वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे.

//********//

 

No comments: