Sunday, 2 October 2022

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 02.10.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 October 2022

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०२ ऑक्टोबर २०२ दुपारी १.०० वा.

****

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या औचित्यानं नवी दिल्लीतल्या महात्मा गांधीजींच्या राजघाट इथल्या समाधीस्थळावर आज सर्वधर्म प्रार्थना सभा घेण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी गांधीजींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती तसंच पंतप्रधानांनी नवी दिल्लीतल्या विजयघाट इथं माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या समाधीवरही पुष्पांजली अर्पण केली.

***

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५३व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. यावर्षी राष्ट्र आजादी का अमृत महोत्सव साजरा करत असल्यानं महात्मा गांधींच्या जयंतीला विशेष महत्व असल्याचं त्यांनी आपल्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे. गांधीजींना आदरांजली वाहण्यासाठी प्रत्येकानं त्यांच्या आदर्शांवर वाटचाल करावी तसंच खादी आणि हातमागावर तयार केलेली उत्पादनं विकत घ्यावीत असं आवाहनही पंतप्रधानांनी केलं आहे.  पंतप्रधान मोदी यांनी देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांना ही त्यांच्या आजच्या ११८व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. लालबहादूर शास्त्री यांचा साधेपणा आणि निर्णायकता देशभरात प्रशंसली जाते, प्रतिकूल परिस्थितीत शास्त्रीजींनी देशाचं केलेलं नेतृत्व सदैव सर्वांच्या स्मरणात राहिल असं त्यांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटलं आहे. दिल्लीतल्या प्रधानमंत्री संग्रहालयातील शास्त्रीजींची काही छायाचित्रंही मोदी यांनी आपल्या संदेशात प्रसारित केली असून नागरिकांनी या संग्रहालयाला भेट देण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.

***

औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीनंही आज राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं. शहागंज इथल्या महात्मा गांधी यांच्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. तद्नंतर मनपा मुख्यालय इथं लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पारस मंडलेचा यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी अधिकारी - कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

शहरातल्या महात्मा गांधी सर्वोदय भवन इथं सर्वधर्म प्रार्थना आणि महात्मा गांधीजींच्या स्मृतींना वंदन करण्यात आलं. तसंच मोहन ते महात्मा गांधीजींच्या जीवनकार्याविषयी चित्रमय प्रदर्शनही भरवण्यात आलं आहे. 

****

मुंबईतल्या उरण इथल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण बंदरातून दुबईतील जेबेल अली बंदरात निर्यात करण्यात आलेल्या संशयित कंटेनरमधून अडीच कोटी रुपये किमतीचं तीन मेट्रीक टन रक्तचंदन सीमा शुल्क विभागाच्या दक्षता पथकानं जप्त केलं आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण बंदरातून दुबईत निर्यात करण्यात आलेल्या मालाच्या कंटेनर बाबत सीमा शुल्क विभागाला संशय होता. त्यामुळे केंद्रीय गुन्हे पथकानं हा कंटेनर दुबईवरून परत मागवला होता. या कंटेनरची तपासणी केल्यावर त्यामध्ये निर्यात करण्यात आलेलं सुमारे तीन मेट्रिक टन रक्तचंदन आढळलं. दोन आठवड्यापूर्वी उरण परिसरातील कंटेनर फ्रेट स्टेशन- सीएफएस गोदामातून अशाच प्रकारे सुमारे तीन मेट्रिक टन रक्तचंदन जप्त करण्यात आलं होतं. या प्रकरणाचा तपास करत असताना समोर आलेल्या माहिती वरून सीमा शुल्क विभागानं हा निर्यात झालेला संशयित कंटेनर परत मागवला होता.

***

महसूल विभागाच्या गुप्तचर यंत्रणेनं काल नवी मुंबईत १ हजार ४०० कोटी रुपयांहून अधिक मूल्याचं १९८ किलोग्रॅम वजनाचं मेथाम फेटामाईन आणि नऊ किलो कोकेन जप्त केलं. आतापर्यंत जप्त करण्यात आलेल्या नशेच्या साठ्यातली ही देशभरातली सर्वाधिक मूल्य असलेली जप्ती आहे. प्राप्त सूचनेनुसार यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी परवा रात्री उशीरा संत्री घेऊन जाणाऱ्या एका ट्रकला मुंबईतल्या वाशीजवळ अडवून तपासणी केली. या ट्रक मधून मोठ्या प्रमाणावर नशेच्या बेकायदेशीर पदार्थांचा साठा आढळून आला. ट्रकचालकाला ताब्यात घेण्यात आलं असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.

***

औरंगाबाद शहरामधील आधार संलग्न न केलेल्या शिधापत्रिकाधारकांसाठी जिल्ह्यातील रास्त भाव दुकानामार्फत सेवा पंधरवाड्या अंतर्गत आज विशेष शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे. काही अपरिहार्य कारणास्तव शिधापत्रिकाधारकांचं आज आधार संलग्निकरण न झाल्यास त्यांनी १५ ऑक्टोबरपर्यंत संलग्नीकरण करुन घेण्याचं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले यांनी केलं आहे. शिधापत्रिकेवरील निधन झालेल्या लाभार्थ्यांचं नाव मृत्यू प्रमाणापत्रासह कळण्याचं आवाहनही जिल्हा पुरवठा अधिकारी भोसले यांनी केलं आहे.

***

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्यावतीनं आज आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण समारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे. तापडिया नाट्यमंदिरात आज दुपारी २ वाजता हा कार्यक्रम होईल. प्रत्येक वर्षी तालुक्यातून एक असे जिल्ह्यातील एकूण नऊ आदर्श ग्रामसेवक निवडण्यात येतात. गेल्या दोन वर्षांपासून हे पुरस्कार प्रदान करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे मागील पाच वर्षातील तब्बल ४५ ग्रामसेवकांना यावेळी पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.

//**********//

 

No comments: