Sunday, 30 October 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 30.10.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 30 October 2022

Time 07.10 AM to 07.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : ३० ऑक्टोबर २०२२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      रुग्णालयं आणि दवाखान्यांच्या परिसरात सर्वांनी मास्क वापरण्याची राज्याच्या आरोग्य विभागाची सूचना

·      आदिवासी समाजाच्या विकासासाठी ११ हजार १९९ कोटी रुपयांची तरतूद- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

·      कृषी आणि उद्योग क्षेत्राच्या होत असलेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर या खात्याच्या मंत्र्यांनी राजीनामा देण्याची युवासेना प्रमुख माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची मागणी

·      महाराष्ट्रातून गुजरातमध्ये प्रकल्प जाऊ दिल्याचा आरोप जनतेची दिशाभूल करणारा- उद्योग मंत्री उदय सामंत

·      राज्यातली पोलिस भरती प्रक्रिया प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलली

·      साखरेच्या निर्यातीवरील बंदी ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत वाढली

·      जांब समर्थ मंदिरातील मूर्ती चोरी प्रकरणातल्या मुख्य संशयितासह आणखी एकास अटक  

आणि

·      टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा दक्षिण आफ्रिका संघासोबत सामना

 

सविस्तर बातम्या

रुग्णालयं तसंच दवाखान्यांच्या परिसरात सर्वांनी मास्क वापरण्याची सूचना राज्याच्या आरोग्य विभागानं केली आहे. कोविड संदर्भात जारी पत्रकात ही सूचना करण्यात आली आहे. राज्यात काल कोविडचे ३१९ नवे रुग्ण आढळले तर ४०६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. सध्या राज्यात कोविडचे दीड हजारावर सक्रीय रुग्ण आहेत. कोविडच्या एक्सबीबी या नव्या स्वरुपातले ३६ रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. यामध्ये सर्वाधिक २१ रुग्ण पुण्यात, १० रुग्ण ठाण्यात, नागपूरमध्ये दोन, तर अकोला, अमरावती आणि रायगड इथं प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. यापैकी ३२ रुग्ण घरी विलगीकरणात कोविडमुक्त झाले तर चार रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

****

राज्यातील आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासन कटीबद्ध असून त्यांच्या प्रगतीकरता आदिवासी विकास विभागासाठी यावर्षी ११ हजार १९९ कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. नंदुरबार इथं नगर परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. आदिवासी समाजाच्या विकासासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नंदुरबार नगर परिषदेचा थकीत ७ कोटी २८ लाख रुपयांचा निधी त्वरित मंजूर करुन दिला.

या कार्यक्रमाला आदिवासी विकास मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावीत, तसंच गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार, दादाजी भुसे, हे मंत्री, स्थानिक खासदार, आमदार आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यात येऊ घातलेले प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याबाबत सुरु असलेल्या वादावर वार्ताहरांशी बोलतांना मुख्यमंत्री शिंदे यांनी भविष्यात राज्यात मोठे उद्योग आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील तरुणांना रोजगार द्यायचा आहे असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राज्यात नवे उद्योग देण्याचं आश्वासन दिल्याचं स्पष्ट केलं.

****

राज्यात अतिवृष्टीमुळे एकीकडे शेतीचं तर दुसरीकडे मोठमोठे उद्योग राज्याबाहेर जात असल्यानं उद्योग क्षेत्राचं नुकसान होत असून, या पार्श्वभूमीवर कृषी मंत्री तसंच उद्योग मंत्री यांनी राजीनामे द्यावेत, अशी मागणी युवासेना प्रमुख माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. ते काल मुंबईत शिवसेना भवनात पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले...

 

Byte

कुठेही बांधावर आपले मंत्री दिसत नाहीत. परवा मी दानवे साहेब आणि मी विचारत होतो शेतकरी बांधवांना की कृषी मंत्र्यांना बघितलं का? कृषी मंत्र्यांचं नाव माहिती आहे का? कोणाला त्यांचं नाव माहिती नव्हतं. कोणी त्यांना बघितलं नाही. कृषीमंत्री राजीनामा देणार का? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे त्यांचा राजीनामा घेणार का? आणि दुसरा विषय हाच आहे की चौथा मोठा प्रकल्प हातातून निघून गेल्यानंतर उद्योगमंत्री सप्टेंबर मध्ये एखाद्या चॅनलवर जाऊन हमखासपणे सांगतात, छाती ठोकून सांगतात, की आम्ही केंद्राकडे जाऊ आणि केंब्रस टाटा आणू आमच्याकडे. मिहान मध्ये आणणार आम्ही. मग तो निघून कसा गेला? एक तर उद्योगमंत्री खोटं बोलत होते किंवा इतर काय घडलं पडद्यामागचे आम्हाला माहिती नाही. तुम्ही उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घेणार का?

 

राज्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं झालेलं नुकसान पाहता ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यावेळी उपस्थित होते.

****

टाटा-एअरबस सी-टू नाइन्टी फाईव्ह हा लष्करी वाहतूक करणाऱ्या विमान निर्मितीचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाऊ दिल्याचा आरोप करून विरोधक फक्त जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. ते मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. या प्रकल्पासाठी केंद्र आणि गुजरात सरकारमध्ये गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येच सामंजस्य करार झाल्याचा दावाही सामंत यांनी केला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते असताना महाविकास आघाडी सरकारला, या प्रकल्पासंदर्भात प्रस्ताव तयार करुन तो केंद्रापुढे मांडण्याची विनंती केली होती, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही, असंही ते म्हणाले. गेल्या तीन महिन्याच्या काळात राज्यात २५ हजार ३६८ कोटी रुपयांच्या दहा प्रकल्पांना सरकारनं मान्यता दिली आहे. या दहा प्रकल्पामुळे सात हजार ४३० जणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचं ते म्हणाले. राज्यातून जे प्रकल्प गुजरातला गेले, ते का आणि कुणामुळे गेले याबाबतची वास्तविकता जनतेसमोर यावी यासाठी लवकरच यासंदर्भात एक श्वेतपत्रिका काढणार असल्याचं उद्योगमंत्री सामंत यांनी सांगितलं.

****

राज्यातली पोलिस भरती प्रक्रिया प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली असून यासंदर्भातलं एक पत्रक काल पोलिस महासंचालक कार्यालयाकडून जारी करण्यात आलं आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात १४ हजार ९५६ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार होती. आता पोलिस भरतीसंदर्भातली नवी जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

****


साखरेच्या निर्यातीवरील बंदी ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत म्हणजे एक वर्षानं वाढवण्याची अधिसूचना परकीय व्यापार महासंचालनालयानं जारी केली आहे. देशातर्गंत साखरेच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारनं १ जूनपासून ३१ ऑक्टोबरपर्यंत साखर निर्यातीवर बंदी घातली होती. मात्र युरोपिय संघ आणि अमेरिकेत निर्यात केल्या जाणाऱ्या साखरेवर हे निर्बंध लागू नसतील, असं या अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान, तांदळाच्या निर्यातीबाबतच्या धोरणात सध्या कोणताही बदल होणार नसल्याचं, केंद्रीय वाणिज्य आणि अन्न मंत्री पीयूष गोयल यांनी काल हैदराबादमध्ये एका कार्यक्रमात बोलतांना स्पष्ट केलं.

****

मुख्यमंत्र्यांनी राजकीय द्वेषापोटी राज्यातील सर्व विरोधी नेत्यांची सुरक्षा काढल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून शिंदे सरकारच्या चुकीच्या धोरणांचा सातत्यानं विरोध करत असल्यामुळेच प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील तसंच पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांची सुरक्षा काढण्यात आली, यामागे राजकीय षडयंत्र आहे अशी टीकाही तपासे यांनी केल्याचं यासंबंधीच्या बातमीत म्हटलं आहे. येत्या ४ आणि ५ नोव्हेंबर रोजी शिर्डी इथं नियोजित शिबिरात सरकारला कोंडीत पकडण्याची रणनीती ठरवली जाईल असंही तपासे यांनी सांगितलं आहे.

****

राज्यात सरकारी खरेदी केंद्र सुरु नसल्यामुळे खासगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरु असून, सरकारनं पुरेशी कापूस आणि धान खरेदी केंद्र सुरु करावीत अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून केली आहे. धान खरेदीसाठी घातलेल्या ऑनलाईन नोंदणीच्या अटीमुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दुर्गम आदिवासी भागात ऑनलाईन नोंदणी नसल्यानं शेतकऱ्यांच्या मालाची अद्याप खरेदी झाली नाही. सरकारनं या ऑनलाईन नोंदणीची अट रद्द करून तात्काळ पुरेशी केंद्र सुरु करावीत असं पटोले यांनी या पत्रात म्हटलं आहे.

****

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण घोटाळ्याप्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही तसंच आपण कोणत्याही चौकशीला जाणार नसल्याचं, शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलं आहे. पेडणेकर यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना संबंधित इमारतीच्या परिसरात नेऊन वस्तुस्थिती मांडली. भाजप नेते किरीट सोमय्यांकडून करण्यात येणारे आरोप हा दबाव तंत्राचा भाग असून त्याला आपण बळी पडणार नाही, असंही पेडणेकर यांनी स्पष्ट केलं. मुंबई पोलिसांनी शुक्रवारी पेडणेकर यांची चौकशी केली. त्यांना कालही चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं.

****

गुजरात सरकारनं विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात समान नागरी कायदा लागू  करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव काल मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजूर झाल्याचं गृहराज्यमंत्री हर्ष संघवी यांनी सांगितलं. उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायधीशाच्या नेतृत्वाखाली स्थापन केल्या जाणाऱ्या  या उच्चस्तरीय समितीत तीन ते चार सदस्य असतील, असं केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी गांधीनगर  इथं वार्ताहर परिषदेत सांगितलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ९४ वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शन वरच्या सर्व वाहिन्यावरून सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम प्रसारीत होईल.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी पीकविमा आणि अतिवृष्टी अनुदानासाठी सुरु केलेलं आंदोलन स्थगित करावं असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केलं आहे. ते काल पत्रकारांशी बोलत होते. जिल्ह्यात खरीप हंगाम २०२० मधील उर्वरीत पिक विम्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाचं विमा कंपनीनं दिलेल्या मुदतीत पालन न केल्यामुळे विमा कंपनीच्या विरोधात अवमान याचिका दाखल करणार असल्याचं, जिल्हाधिकारी ओंबासे यांनी सांगितलं. कंपनीनं दिलेले २०१ कोटी रुपये येत्या मंगळवार पर्यंत शेतकऱ्यांना वाटप करणार असल्याचंही ते म्हणाले. 

सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी २७४ कोटी रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे असंही जिल्हाधिकारी म्हणाले. पीक विमा आणि अनुदान मिळावं यासाठी विमा कंपनीला कडक शब्दांत इशारा दिला असून, या विमा कंपनीचं पुण्यातलं कार्यालय जप्त करावं अशा सूचना पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना केल्याची माहिती जिल्हाधिकारी ओंबासे यांनी यावेळी दिली.

दरम्यान, आमदार कैलास पाटील यांचं काल सहाव्या दिवशीही उपोषण सुरुचं होतं. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरु राहणार असल्याचं त्यांना सांगितलं. या उपोषणाच्या समर्थनार्थ काल शिवसेनेच्या वतीनं उस्मानाबाद शहरामध्ये बंद पाळण्यात आला. अत्यावश्यक सेवा वगळता शहरात हा बंद पाळला गेला.

****

जालना जिल्ह्यात जांब समर्थ इथल्या श्रीराम मंदिरातून चोरीला गेलेल्या राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमानाच्या मूर्ती हस्तगत करण्यात पोलिस प्रशासनाला यश मिळालं आहे. या चोरी प्रकरणातल्या मुख्य संशयितासह आणखी एकाला गजाआड करण्यात आलं असून, जिलानी सय्यद पाशा शेख आणि पाशा मिया मशाकसाब शेख अशी त्यांची नावं आहेत. या दोघांना पोलिसांनी कर्नाटक राज्यातल्या गुलबर्गा आणि बिदर जिल्ह्यातून अटक केली. जिलानी सय्यद शेख याने पाशामिया शेख याला, राम, लक्ष्मण, सीता, हनुमान, श्रीकृष्ण या मूर्ती ८७ हजार रुपयांत विकल्याचं, तपासात समोर आलं आहे.

दरम्यान, पोलिसांनी पाशामिया शेख याच्याकडे असलेल्या पाच मूर्तीही हस्तगत केल्या आहेत. या प्रकरणात जालना पोलिसांनी आतापर्यंत चार संशयितांना अटक केली असून, एकूण दहा मूर्ती हस्तगत केल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी दिली.

****

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीनं उद्यापासून सहा नोव्हेंबरपर्यंत दक्षता जनजागृती सप्ताह पाळण्यात येणार आहे. याअतंर्गत उद्या सर्व सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांमध्ये भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत शपथ घेऊन राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांनी दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त दिलेला संदेश वाचून दाखवण्यात येईल. लाचलुचपत प्रतिबंधक औरंगाबाद विभागाचे उप अधिक्षक मारुती पंडित यांनी ही माहिती दिली. औरंगाबाद परिक्षेत्रातील बीड, जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण परिसरात सार्वजनिक ठिकाणी, शासकीय कार्यालयात, भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत फलक लावून जनजागृती करण्यात येणार आहे

परभणी जिल्ह्यातही भ्रष्टाचारमुक्त भारत-विकसित भारत' ही संकल्पना घेऊन दक्षता जनजागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे, असं पोलीस उप अधीक्षक किरण बिडवे यांनी सांगितलं.

****


ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा दक्षिण आफ्रिका संघासोबत सामना होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी ४ वाजता सामना सुरु होईल. आकाशवाणीवरुन या सामन्याचं धावतं समालोचन श्रोत्यांना ऐकता येणार आहे.

दरम्यान काल झालेल्या सामन्यात न्यूझीलंडनं श्रीलंकेवर ६५ धावांनी विजय मिळवला. न्यूझीलंडनं प्रथम फलंदाजी करत निर्धारित २० षटकांत सात बाद १६७ धावा केल्या. श्रीलंकेचा संघ विसाव्या षटकांत १०२ धावांवर सर्वबाद झाला. ६४ चेंडूत १०४ धावा करणारा ग्लेन फिलिप्स् सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

****

जालना - तिरूपती साप्ताहिक विशेष रेल्वे आजपासून सुरू होणार आहे.   आज दुपारी साडेतीन वाजता रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे  हिरवा झेंडा दाखवून या विशेष गाडीला रवाना करतील. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

****

जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातल्या सोनकपिपळगावचे सरपंच शंकर धुमाळ यांचा काल संध्याकाळी झालेल्या अपघातात मृत्यु झाला. ते ३८ वर्षांचे होते. आपल्या चारचाकीने अंबडहून सोनकपिंपळगाव कडे जात असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला गाडी धडकल्यानं हा अपघात झाला. सरपंच धुमाळ यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 02 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...