Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 October 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ ऑक्टोबर २०२२ सायंकाळी
६.१०
****
·
मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग नोव्हेंबर महिन्यात सुरू करण्याचे
मुख्यमंत्र्यांचे संकेत.
·
भामरागड तालुक्यात तैनात पोलिसांसोबत मुख्यमंत्र्यांकडून दिवाळी
साजरी.
·
खगोलप्रेमींनी अनुभवलं या वर्षातलं अखेरचं खंडग्रास सूर्यग्रहण.
आणि
·
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना मुख्यालयी राहणं सक्तीचं करणाऱ्या
निर्णयाविरोधातल्या याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाची राज्यशासनाला नोटीस.
****
मुंबई
नागपूर समृद्धी महामार्ग नोव्हेंबर महिन्यात सुरू करण्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे यांनी दिले आहेत. ते आज नागपूर विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते. नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं काम जवळपास पूर्ण
होत आलं आहे. हा टप्पा लवकरात लवकर सुरु करण्याचा प्रयत्न असून येत्या नोव्हेंबरपर्यंत
हा मार्ग सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिवाळीतच या पहिला टप्प्याचं लोकार्पण होणार असल्याचं वृत्त
होतं. मात्र, आता पुढच्या महिन्यात समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी
सांगितलं. पंतप्रधानांच्या हस्ते हे लोकार्पण होणार असल्याची शक्यता याबाबतच्या बातमीतून
वर्तवण्यात येत आहे.
****
दरम्यान,
मुख्यमंत्री शिंदे यांनी आज गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यात धोडराज तपासणी नाक्यावर
तैनात पोलिसांसोबत दिवाळी साजरी केली. गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यापासून
इथल्या पोलिसांसोबत दिवाळी साजरी करण्याची आपली प्रथा आहे, मुख्यमंत्री झाल्यावरही
त्यामध्ये कुठलाही फरक पडला नसल्याचं, शिंदे यांनी सांगितलं. जिल्ह्यातला नक्षलवाद
आता हळूहळू संपत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. दिवाळी सारख्या सणाच्या दिवसातही
घरापासून दूर राहून, स्वत:चा जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांसोबत दिवाळी
साजरी करणं ही समाधानाची बाब असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
****
अमेरिकेचे
राष्ट्रपती जो बायडन यांनी जगभरातल्या एक अब्जाहून जास्त हिंदू, जैन, शीख आणि बौद्ध
धर्मियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या वर्षी पहिल्यांदाच अमेरिकेच्या व्हाईट
हाऊसमध्ये दिवाळी उत्सव साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. या समारंभाचं यजमानपद,
ही आपल्यासाठी सन्मानाची बाब असल्याचंही बायडन यांनी यावेळी सांगितलं. उपराष्ट्रपती
कमला हॅरिस यांच्यासह अनेक मान्यवर या समारंभात सहभागी झाले.
****
ब्रिटनच्या
पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल ऋषी सुनक यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन
केलं आहे. जागतिक समस्या आणि वर्ष २०३० पर्यंतच्या आराखड्याची अंमलबजावणी, यासंदर्भात
एकत्र काम करण्यास आपण उत्सुक असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या याबाबतच्या संदेशात म्हटलं
आहे. भारत आणि ब्रिटनदरम्यानचा दुवा असणाऱ्या ब्रिटनमधल्या भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छाही
पंतप्रधानांनी या ट्विट संदेशातून दिल्या आहेत.
दरम्यान,
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी ३० ऑक्टोबरला आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या
कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ९४वा भाग असेल.
आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित
होईल.
****
अयोध्येमध्ये
श्रीराम जन्मभूमी मंदिर उभारणीचं काम युद्धपातळीवर सुरू असून, मंदिर उभारणीचं काम पन्नास
टक्के पूर्ण झालेलं आहे. २०२४ च्या मकर संक्रांतीपासून भाविक गाभाऱ्यापर्यंत जाऊन रामललांचं
दर्शन घेऊ शकतील, असं श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाचे सदस्य डॉक्टर
अनिल मिश्र यांनी म्हटलं आहे. या मंदिर निर्माण कामाची माहिती देण्यासाठी आज विश्वस्तमंडळानं
पत्रकारपरिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते. दहा तासात अडीच लाख भाविक दर्शन घेऊ शकतील
अशा पद्धतीची सोय करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
महाराष्ट्र,
आंध्रप्रदेश, कर्नाटकसह इतरही राज्यातल्या भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या, सातारा
जिल्ह्यातल्या म्हसवड इथं, सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांच्या विवाह सोहळ्याची सुरुवात
उद्या पाडव्याच्या मुहूर्तावर होणार आहे. येत्या पाच नोव्हेंबरला हा विवाह सोहळा होणार
असून देवदिवाळीला, म्हणजे चोवीस नोव्हेंबरला सिद्धनाथ आणि जोगेश्वरी यांची रथयात्रेतून
वरात काढल्यानंतर या सोहळ्याची सांगता होईल.
****
देशव्यापी
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून सुमारे ३१ हजार नागरिकांचं लसीकरण झालं.
त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१९ कोटी ५६ लाखाच्या
वर गेली आहे. त्यात २१ कोटी ८८ लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांनी खबरदारीची लसमात्रा
घेतली आहे.
राज्यात
आज सकाळपासून सुमारे ५६३ नागरिकांचं लसीकरण झालं. राज्यात आत्तापर्यंत लाभार्थ्यांना
दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १७ कोटी ७४ लाखांच्या वर गेली आहे. त्यात ९३ लाख २५
हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे.
****
सध्या
संवादाचं महत्त्वाचं माध्यम असलेली व्हॉटसअपची सेवा आज दोन तासांपेक्षा जास्त वेळ बंद
राहिली. दुपारी बाराच्या सुमाराला जगभरात बंद झालेली ही सेवा दोन वाजेच्या सुमारास
पूर्ववत झाली.
****
या
वर्षातलं अखेरचं खंडग्रास सूर्यग्रहण आज झालं. सायंकाळी चार वाजून पन्नास मिनिटांनी
चंद्राची छाया पृथ्वीवर पडून ग्रहणाला प्रारंभ झाला. सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास
ग्रहणमध्य अनुभवता आला. त्यानंतर सहा वाजून नऊ मिनिटांनी ग्रहणावस्थेतच सूर्यास्त झाल्याचं
पहायला मिळालं. या ग्रहणात चंद्रामुळे ३६ टक्के सूर्यबिंब झाकोळलं गेल्याची माहिती
औरंगाबाद इथल्या एमजीएम विद्यापीठातल्या एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे
संचालक, श्रीनिवास औंधकर यांनी दिली. औरंगाबाद इथं शहरातल्या गणेश टेकडीवर खगोलप्रेमीसांठी
सामुहिक ग्रहण निरीक्षण करण्यात आलं, त्यावेळी औंधकर मार्गदर्शन करत होते. तब्बल ७०
वर्षानंतर सूर्यास्तावेळी ग्रहण आल्याचं औंधकर यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या
जिल्हा परिषद शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना मुख्यालयाच्या ठिकाणीच राहणं सक्तीचं करणाऱ्या
शासन निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद
खंडपीठानं शासनाला नोटीस बजावत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. राज्य प्राथमिक शिक्षक
समितीचे उस्मानाबाद शाखेचे जिल्हाध्यक्ष विलास कंटेकुरे यांनी दाखल केलेल्या या याचिकेवरच्या
आज झालेल्या सुनावणीत न्यायालयानं राज्याचा वित्त विभाग तसंच ग्रामविकास विभागाचे सचिव,
संबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि
शिक्षणाधिकारी यांना ही नोटीस बजावली. जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा दुर्गम ग्रामीण
भाग, वस्ती, तांडा अशा ठिकाणी असून शिक्षकांना त्यांच्या कुटुंबांच्या गरजांच्या दृष्टीनं
कामाच्या ठिकाणी राहणं अशक्य आहे, असं या याचिकेत म्हटलं आहे.
****
राज्याच्या
शिक्षण विभागामार्फत विविध श्रेणीतल्या विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येत असलेल्या शिष्यवृत्ती
योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली असून, विद्यार्थ्यांना आता या
योजनांसाठी येत्या एकतीस ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील. यामध्ये, राष्ट्रीय
आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती, दिव्यांग तसंच अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीच्या मॅट्रिक
पूर्व शिष्यवृत्ती, अल्पसंख्याक विद्यार्थिनींसाठीची बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती,
या योजनांचा समावेश आहे.
****
सोलापूर
इथे ऊस दर संघर्ष समितीच्या वतीनं आज गांधीगिरी आंदोलन करण्यात आलं. ऊस वाहतूक करणारे
ट्रॅक्टर ड्रायव्हर आणि ट्रॅक्टर मालक यांना हार घालून त्यांच्या पाया पडून आंदोलनाला
सुरुवात करण्यात आली. ऊसाला पहिली उचल अडीच हजार रुपये आणि अंतिम दर प्रतिक्विंटल एकतीसशे
रुपये मिळाल्याशिवाय ऊस वाहतूक करू नये, अशी विनंती त्यांना करण्यात आली. हे पैसे मिळायच्या
आधी वाहतूक सुरू केली तर तीव्र परिणाम होतील, असा इशाराही या समितीनं यावेळी ट्रॅक्टर
ड्रायव्हर आणि ट्रॅक्टर मालक यांना दिला.
दरम्यान,
पंढरपूर इथे झालेल्या ऊस परिषदेत शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी केलेली अडीच हजार रुपये
प्रतिटन पहिली उचल देण्याची मागणी जनहित शेतकरी संघटनेला अजिबात मान्य नसून, पहिली
उचल तीन हजार रुपये असावी अशी आमची मागणी आहे, असं जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर
देशमुख यांनी म्हटलं आहे. ही मागणी मान्य न केल्यास सहकार मंत्र्यांच्या निवासस्थानासमोर
आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देशमुख यांनी दिला आहे.
****
नदीचं
प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीनं सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यातल्या तुरची या
गावाच्या ग्रामपंचायतीनं एक अभिनव ठराव केला आहे. गावालगतच्या येरळा नदीचं पाणी प्रदूषित
होऊ नये, यासाठी या नदीत अस्थिविसर्जन न करण्याचा ठराव या ग्रामपंचायतीनं केला आहे.
****
No comments:
Post a Comment