Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 October 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ ऑक्टोबर २०२२ सायंकाळी ६.१०
****
·
रुग्णालयं तसंच दवाखान्यांच्या परिसरात सर्वांनी मास्क वापरण्याची
आरोग्य विभागाची सूचना.
·
आदिवासी विकासासाठी शासन कटीबद्ध; ११ हजार १९९ कोटीची तरतूद
- मुख्यमंत्र्यांची माहिती.
·
कृषी तसंच उद्योगमंत्र्यांनी राजीनामा देण्याची माजी मंत्री
आदित्य ठाकरे यांची मागणी.
आणि
·
जांब समर्थ इथून चोरीस गेलेल्या राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमानाच्या
मूर्ती हस्तगत करण्यात पोलिसांना यश.
****
रुग्णालयं
तसंच दवाखान्यांच्या परिसरात सर्वांनी मास्क वापरण्याची सूचना राज्याच्या आरोग्य विभागाने
केली आहे. कोविड संदर्भात जारी पत्रकात ही सूचना करण्यात आली आहे. राज्यात आज कोविडचे
३१९ नवे रुग्ण आढळले तर ४०६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. सध्या राज्यात कोविडचे दीड हजारावर
सक्रीय रुग्ण आहेत. कोविडच्या एक्सबीबी या नव्या स्वरुपातले आतापर्यंत ३६ रुग्ण आढळले
आहेत. यामध्ये सर्वाधिक २१ रुग्ण पुण्यात, १० रुग्ण ठाण्यात, नागपूरमध्ये दोन, तर अकोला,
अमरावती आणि रायगड इथं प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. यापैकी ३२ रुग्ण घरी विलगीकरणात
कोविडमुक्त झाले तर चार रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
****
राज्यातील
आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासन कटीबद्ध असून त्यांच्या उन्नतीकरता आदिवासी विकास
विभागासाठी यावर्षी ११ हजार १९९ कोटीची तरतूद केली असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे यांनी दिली आहे. नंदुरबार इथं नगर परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण
मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. आदिवासी समाजाच्या
विकासासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटीबद्ध
आहे. राज्यातील विकास कामांना गती आणि चालना देण्याचं काम आपलं सरकार करत असून हे सरकार
आदिवासी, शेतकरी, कष्टकरी, कामगार, वंचित-शोषित अशा सगळ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी
प्रयत्नशील असल्याचं शिंदे म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नंदुरबार नगर परिषदेची
थकीत ७ कोटी २८ लाख रुपयांचा निधी त्वरित मंजूर करुन दिला.
****
राज्यात
अतिवृष्टीमुळे एकीकडे शेतीचं तर दुसरीकडे मोठमोठे उद्योग राज्याबाहेर जात असल्याने
उद्योग क्षेत्राचं नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी
कृषी मंत्री तसंच उद्योग मंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ते आज मुंबईत
शिवसेनस भवनात पत्रकार परिषदेत बोजत होते. ते म्हणाले –
कुठेही
बांधावर आपले मंत्री दिसत नाहीत. परवा मी दानवे साहेब आणि मी विचारत होतो शेतकरी बांधवांना
की कृषी मंत्र्यांना बघितलं का? कृषी मंत्र्यांचं नाव माहिती आहे का? कोणाला त्यांचं
नाव माहिती नव्हतं. कोणी त्यांना बघितलं नाही. कृषीमंत्री राजीनामा देणार का? मुख्यमंत्री
आणि उपमुख्यमंत्री हे त्यांचा राजीनामा घेणार का? आणि दुसरा विषय हाच आहे की चौथा मोठा
प्रकल्प हातातून निघून गेल्यानंतर उद्योगमंत्री सप्टेंबर मध्ये एखाद्या चॅनलवर जाऊन
हमखासपणे सांगतात, छाती ठोकून सांगतात, की आम्ही केंद्राकडे जाऊ आणि केंब्रस टाटा आणू
आमच्याकडे. मिहान मध्ये आणणार आम्ही. मग तो निघून कसा गेला? एक तर उद्योगमंत्री खोटं
बोलत होते किंवा इतर काय घडलं पडद्यामागचे आम्हाला माहिती नाही. तुम्ही उद्योगमंत्र्यांचा
राजीनामा घेणार का?
गेल्या
काही महिन्यात अतिवृष्टीमुळे शेतीचं झालेलं नुकसान पाहता ओला दुष्काळ जाहीर करण्याची
मागणी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
****
टाटा-एअरबस
सी-२९५ हा लष्करी वाहतूक करणाऱ्या विमाननिर्मितीचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये
जाऊ दिल्याचा आरोप करून विरोधक फक्त नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत,
असा दावा, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. ते मुंबईत वार्ताहरांशी
बोलत होते. या प्रकल्पासाठी केंद्र आणि गुजरात सरकारमध्ये गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येच
सामंजस्य करार झाल्याचा दावाही सामंत यांनी केला.
उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते असताना महाविकास आघाडी सरकारला,
या प्रकल्पासंदर्भात प्रस्ताव तयार करुन तो केंद्रापुढे मांडण्याची विनंती केली होती,
मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही, असंही ते म्हणाले. महाराष्ट्रात नऊ लॉजिस्टिक पार्कसह
मोठी गुंतवणूक होईल आणि त्यामुळे तरुणांसाठी रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होतील,
असं आश्वासनही उदय सामंत यांनी यावेळी दिलं.
****
देशातील
व्यापारी समुदायाने देशात बनवलेल्या उत्पादनांना प्राधान्य देण्याचं आवाहन केंद्रीय
मंत्री पीयूष गोयल यांनी केलं आहे. हैदराबाद इथं अखिल भारतीय वैश्य महासंघाला ते आज
संबोधित करत होते. भारतात उद्योग आणि निर्मितीला चालना दिल्यास रोजगार वाढण्यास आणि
आपल्या नागरिकांच्या जीवनात समृद्धी आणण्यास मदत होईल, असं गोयल यांनी म्हटलं आहे.
****
उस्मानाबाद
जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार कैलाश पाटील यांनी पीकविमा आणि अतिवृष्टी
अनुदानासाठी सुरु केलेलं आंदोलन स्थगित करावं असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे
यांनी केलं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात खरीप हंगाम २०२० मधील उर्वरीत पिक विम्याबाबत
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचं पालन पिक विमा कंपनीने दिलेल्या मुदतीत न केल्यामुळे
विमा कंपनीच्या विरोधात अवमान याचिका दाखल करणार असल्याचं, जिल्हाधिकारी ओंबासे यांनी
सांगितलं. उस्मानाबाद इथं पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कंपनीने दिलेले २०१ कोटी रुपये
येत्या मंगळवार पर्यंत शेतकऱ्यांना वाटप करणार असंही ओंबासे यांनी सांगितलं. सप्टेंबर-ऑक्टोबर
महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी २७४ कोटी रुपयांची मागणी शासनाकडे केली
आहे असंही जिल्हाधिकारी म्हणाले. पीक विमा आणि अनुदान मिळावं यासाठी कंपनीला कडक शब्दांत
इशारा दिला असून, सदर विमा कंपनीचं पुण्यातलं कार्यालय जप्त करावं अशा सूचना पुण्याच्या
जिल्हाधिकाऱ्यांना केल्याची माहिती जिल्हाधिकारी ओंबासे यांनी दिली.
****
जालना
जिल्ह्यात जांबसमर्थ इथल्या श्रीराम मंदिरातून चोरीला गेलेल्या राम, लक्ष्मण, सीता
आणि हनुमानाच्या मूर्ती हस्तगत करण्यात पोलिस प्रशासनाला यश मिळालं आहे. या चोरी प्रकरणातल्या
मुख्य संशयितासह आणखी एकास गजाआड करण्यात आलं असून, जिलानी सय्यद पाशा शेख आणि पाशा
मिया मशाकसाब शेख अशी त्यांची नावं आहेत. या दोघांना पोलिसांनी कर्नाटक राज्यातल्या
गुलबर्गा आणि बिदर जिल्ह्यातून अटक केली. जिलाणी सय्यद शेख याने पाशामिया शेख यास श्रीराम,
लक्ष्मण, सीता, हनुमान, श्रीकृष्ण या मूर्ती ८७ हजार रुपयांत विकल्याचं, तपासात समोर
आलं आहे. दरम्यान, पोलिसांनी पाशामिया शेख याच्याकडे असलेल्या पाच मूर्तीही हस्तगत
केल्या आहेत. या प्रकरणात जालना पोलिसांनी आजपर्यंत चार संशितयांना अटक केली असून,
एकूण दहा मूर्ती हस्तगत केल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी दिली.
****
लाचलुचपत
प्रतिबंधक विभागाच्या वतीनं ३१ ऑक्टोबर ते सहा नोव्हेंबर दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताह
पाळण्यात येणार आहे. याअतंर्गत ३१ ऑक्टोबरला सर्व सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांमध्ये
भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत शपथ घेवून राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांनी दक्षता जनजागृती
सप्ताहानिमित्त दिलेला संदेश वाचून दाखवण्यात येईल. लाचलुचपत प्रतिबंधक औरंगाबाद विभागाचे
उपअधीक्षक मारुती पंडित यांनी ही माहिती दिली. औरंगाबाद परिक्षेत्रातील बीड, जालना
आणि उस्मानाबाद जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण परिसरात सार्वजनिक ठिकाणी, शासकीय कार्यालयात,
भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत फलक लावून जनजागृती करण्यात येणार आहे
****
‘भ्रष्टाचारमुक्त
भारत-विकसित भारत’ ही संकल्पना घेऊन परभणी जिल्ह्यात ३१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या
कालावधीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाद्वारे दक्षता जनजागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात
आलं आहे. भ्रष्टाचार निर्मूलनाच्या प्रतिज्ञेने या सप्ताहाची सुरुवात होईल. भ्रष्टाचार
निर्मूलन मोहिमेत जनतेला सहभागी करून घेण्यासाठी त्यांच्याकडे भ्रष्टाचारासंबंधी काही
माहिती असल्यास किंवा लाच मागणाऱ्या लोकसेवकाविरूद्ध तक्रार असल्यास नागरिकांनी प्रत्यक्ष
पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग परभणी यांना संपर्क करावा, असं अवाहन विभागाचे
पोलीस उप अधीक्षक किरण बिडवे यांनी केलं आहे.
****
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज न्यूझीलंडनं
श्रीलंकेवर ६५ धावांनी विजय मिळवला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी
करत निर्धारित २० षटकांत सात बाद १६७ धावा केल्या. श्रीलंकेचा संघ विसाव्या षटकांत
१०२ धावांवर सर्वबाद झाला. ६४ चेंडूत १०४ धावा करणारा ग्लेन फिलिप्स्
सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
या
स्पर्धेत भारताचा उद्या दक्षिण आफ्रिका संघासोबत सामना होणार आहे.
****
गुरूनानक
जयंतीनिमित्त नांदेड - बिदर - नांदेड विशेष रेल्वे चालवण्यात येणार आहे. सात नोव्हेंबर
रोजी सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी ही रेल्वे नांदेड इथून सुटून बिदरला संध्याकाळी
साडेसहा वाजता पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात ही गाडी बिदरहून दुपारी तीन वाजता सुटेल
तर नांदेड इथं त्याच दिवशी रात्री साडेअकरा वाजता पोहोचेल.
****
No comments:
Post a Comment