Wednesday, 26 October 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 26.10.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date –  26 October    2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २६ ऑक्टोबर २०२   सायंकाळी ६.१०

****

·      अतिवृष्टीबाधित शेतीच्या पंचनाम्यासाठी ई-पीक पाहणीची अट तात्पुरती रद्द.

·      दिवाळीचा पाडवा पारंपरिक पद्धतीनं साजरा; भाऊबीजेनिमित्त सर्वत्र उत्साह.

·      जागतिक स्तरावर कोविड-19 विरुद्ध लढण्यात भारताची भूमिका महत्त्वपूर्ण-अमेरिकेच्या व्हाईट हाऊस प्रतिनिधींचे गौरवोद्‌गार.

आणि

·      जालना ते छपरा साप्ताहिक रेल्वे गाडीला आजपासून प्रारंभ.

****

राज्यातील अतिवृष्टीबाधित झालेल्या शेतीच्या पंचनाम्यासाठी असलेली ई-पीक पाहणीची अट राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तात्पुरती रद्द केली आहे. विखे पाटील यांनी तीन दिवस अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे रखडले असल्याचं निदर्शनास आणून देत, शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीची अट रद्द करण्याची मागणी केली होती. या मागणीनुसार विखे पाटील यांनी यावर्षी ई-पीक पाहणीची अट तात्पुरती रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी स्थानिक पातळीवर तलाठी, कृषी सहाय्यक यांना प्रत्यक्ष शेतात जाऊन पंचनामे करावे लागणार आहेत. या प्रक्रियेत कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असं विखे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

****

बलिप्रतिपदा अर्थात दिवाळीचा पाडवा आज सर्वत्र पारंपरिक पद्धतीनं साजरा होत आहे. विक्रम संवत २०७९ आजपासून सुरु झालं. व्यापारी वर्गाच्या नव्या वर्षाचा हा पहिला दिवस साडेतीन शुभ मुहूर्तपैकी अर्धा मुहूर्त मानला जातो. उत्तर भारतीय समाजात आज गोवर्धन पूजा करण्याचा प्रघात आहे. भगवान विष्णूंना विविध नैवेद्य अर्पण करण्याचा ‘अन्नकूट’ सोहळाही पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला.

दिवाळीच्या पाडव्याला पत्नीने पतीला तसंच मुलींनी वडिलांना औक्षण करण्याचा प्रघात आहे. बहीण भावाच्या नात्याचा भाऊबीज हा सणही आज सर्वत्र साजरा होत आहे. आज बहिणीने भावाला औक्षण करण्याची आणि भावाने बहिणीला ओवाळणी देण्याची प्रथा आहे. सायंकाळच्या सुमारास घरोघरी हा औक्षणाचा सुखद सोहळा साजरा होत आहे.

****

औरंगाबाद शहरातून आज हेल्यांची मिरवणूक सगर काढण्यात आली. या सगर मिरवणुकीची १०६ वर्ष जुनी परंपरा आहे. अहिर गवळी समाजाच्या वतीनं ही मिरवणूक काढण्यात येते. आकर्षक रंग, मोरपीसं, घंटा, माळा यांनी सजवलेल्या हेल्यांची बँड, हलगीच्या ठेक्यावर शहरातल्या राजाबाजार, नवाबपुरा भागातून ही मिरवणूक निघाली. यावेळी हेल्याच्या मालकांना मानाची टोपी आणि उपरणे देऊन स्वागत करण्यात आलं. शहराचं ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपती मंदिराजवळ ही मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.

****

सत्यशोधक कष्टकरी ग्रामीण सभेच्या वतीने आज नंदुरबार जिल्ह्यात दुधाळे इथं बळीराजा पूजन करण्यात आलं. यावेळी पारंपारीक आदिवासी नृत्यासह बळीराजाची मिरवणूक काढण्यात आली. तर कार्यक्रम स्थळी पाच शेतकऱ्यांचं विविवत पूजन देखील करण्यात आले.

दरम्यान, नंदुरबार इथं दरवर्षी बलिप्रतिपदेला गवळी समाजामार्फत म्हशी आणि रेडे मालक आपल्या पशुंना सजवून वाजत गाजत त्यांची मिरवणूक काढतात. आजही ही सगर मिरवणूक काढण्यात आली.

****

वाशिम जिल्ह्यात उंबर्डा इथं आज गोवर्धन पूजेनिमित्त गोधनाची वाजतगाजत मिरवणूक काढण्याची परंपरा आजही कायम आहे. आज हा सोहळा पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

****

माजी मंत्री आमदार अशोक उईके यांनी यवतमाळ जिल्ह्याच्या पांढरकवडा तालुक्यात सखी कोलाम पोडावर भाऊबीज साजरी केली. परिसरातील महिला सरपंचांनी उईके यांना औक्षण केलं. आदिवासी बांधवांनी पारंपरिक दंडार नृत्य यावेळी सादर केलं. आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्या योजना दुर्गम भागात पोहोचविणाऱ्या ग्रामसाथी तसंच सरपंचांचा यावेळी सत्कार करण्यात आला. आदिवासी बांधवांना फराळ तसंच भेटवस्तू वितरित करण्यात आल्या. आदिवासींचे जीवनमान उंचवावे याकरिता पोडांचा विकास करावा अशी मागणी महिलांनी आमदार उईके यांचेकडे केली.

****

काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतली. काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह खासदार राहुल गांधी, महासचिव प्रियंका गांधी यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. भारतात भूक, प्रदूषण वाढत आहे, रुपया घसरत आहे, मात्र सरकार झोपलं असल्याचं टीका खरगे यांनी यावेळी केली.

****

गुन्हे अन्वेषण विभाग- सीबीआय न्यायालयानं फेटाळलेल्या जामीन अर्जाच्या विरोधात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात येत्या ११ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाच्या प्रकरणात उच्च न्यायालयानं यापूर्वीच जामीन मंजूर केला आहे. याच धर्तीवर देशमुख यांनी सीबीआयनं त्यांच्याविरोधात दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांतही जामीन मिळवण्यासाठी विशेष सीबीआय न्यायालयाकडे अर्ज केला होता, हा अर्ज फेटाळल्यानंतर देशमुख यांनी उच्च न्यायालयात या विरोधात अपील दाखल केलं आहे.

****

जागतिक स्तरावर कोविड-19 विरुद्ध लढण्यात भारताची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे गौरवोद्‌गार अमेरिकेच्या व्हाईट हाऊसचे कोरोना विषाणू रिस्पॉन्स कोऑर्डिनेटर डॉ. आशिष झा यांनी काढले आहेत. यासंदर्भात माध्यमांशी बोलताना झा यांनी, जागतिक स्तरावर कोरोना विरुद्ध लढण्यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा पुरवठा करण्यात भारताने महत्त्वाची भूमिका बजावल्याचं सांगितलं. भारताच्या मोठ्या उत्पादन क्षमतेमुळे जागतिक पातळीवर भारत हा कोरोना प्रतिबंधक लसींचा प्रमुख निर्यातदार ठरल्याचं झा यांनी नमूद केलं.

दरम्यान, देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेची २२० कोटी लसीकरणाकडे वाटचाल सुरू आहे. कालपर्यंत देशभरात कोविड लसीच्या २१० कोटी ५७ लाख ६२ हजारांवर मात्रा देण्यात आल्या.

****

पुण्याचे माजी आमदार विनायक निम्हण यांचं आज हृदययविकाराच्या धक्क्याने निधन झालं. ते ५९ वर्षांचे होते. निम्हण हे १९९९ ते २०१४ या काळात शिवाजीनगर मतदार संघातून पहिली दहा वर्ष शिवसेनेचे आणि नंतरचे पाच वर्षे शिवाजी नगर मतदार संघातून काँग्रेसचे आमदार होते.

****

नाशिक इथले हुतात्मा सैनिक संतोष गायकवाड यांच्या पार्थिव देहावर आज नाशिक तालुक्यात लहवित या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. गायकवाड यांचं सिक्कीम इथं कर्तव्यावर असताना परवा दिवाळीच्या दिवशी निधन झालं. ते दहा महिन्यांनी सेवानिवृत्त होणार होते.

****

जालना ते छपरा साप्ताहिक रेल्वे गाडीला आजपासून प्रारंभ होत आहे. जालना रेल्वे स्थानकावर रात्री साडे नऊ वाजता रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे या विशेष गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. दर बुधवारी ही गाडी जालना रेल्वे स्थानकावरुन रात्री साडे अकरा वाजता सुटेल, ती शुक्रवारी पहाटे साडे पाच वाजता छपरा इथं पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी छपरा रेल्वे स्थानकावरुन दर शुक्रवारी रात्री सव्वा दहा वाजता सुटेल, असं दक्षिण मध्य रेल्वे ‍विभागाच्या जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे. या गाडीमुळे मराठवाड्यातल्या जनतेला उत्तर भारतातील महत्त्वाच्या प्रयागराज, वाराणसी, गाझीपूर आणि छपरा या शहरांना थेट जाण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

****

राज्यातील सत्तांतराच्या वेळी आपण पैसे घेतल्याच्या केलेल्या आरोपांबाबत येत्या १ नोव्हेंबरपर्यंत पुरावे द्यावे अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. ते आज अमरावतीत वार्ताहरांशी बोलत होते. अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी आमदार कडू यांच्याविरोधात सत्तातांराच्या काळात पैसे घेतल्याचा आरोप केला होता. या दोन्ही आमदारांमधील वाद विकोपाला पोहोचला आहे. याप्रकरणी कडू यांनी पोलिस ठाण्यात राणा यांच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे.

****

अंगणवाडी सेविकांचा मानधन वाढीचा संघर्ष आता कायमचा दूर होण्याची चिन्हं आहेत. त्यांच्या मानधनात आता सुमारे दोन हजार रुपयांची वाढ प्रस्तावित आहे. अंगणवाडी सेविकांना दिवाळीत भाऊबीज म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये दिले जातात. त्यांचं मानधन वाढवून कायमचा दिलासा देण्यासाठी महिला आणि बालकल्याण विभागाकडून प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. काही दिवसांत त्यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०२३ या वर्षांत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. हे वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती आयोगाचे सहसचिव सुनिल अवताडे यांनी दिली आहे.

****

फ्रेंच ओपन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला केला आहे. त्यांनी फ्रान्सच्या ख्रिस्तो पापोव्ह आणि तोमा पापोव्ह या जोडीचा १९-२१, २१-९, २१-१३ असा पराभव केला.

महिला एकेरीत सायना नेहवाल हिचं, महिला दुहेरीत त्रिसा आणि गायत्री जोडीचं तर मिश्र दुहेरीत ईशान भटनागर आणि तनिषा क्रास्तो जोडीचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे.

****

ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी टि्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पहिल्या गटात इंग्लंड आणि आर्यलंड यांच्यात झालेल्या सामन्यात, डकवर्थ लुईस नियमानुसार आयर्लंडनं इंग्लंडवर ५ धावांनी विजय मिळवला. आर्यलंडनं १९ षटकं आणि दोन चेंडूत सर्वबाद १५७ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडची सुरवातच अडखळत झाली. पावसानं व्यत्यय आणल्यामुळे खेळ थांबावावा लागला तेव्हा इंग्लंडच्या १४ षटकं आणि ३ चेंडूत ५ बाद १०५ धावा झाल्या होत्या. पाऊस न थांबल्यामुळे पंचांनी डकवर्थ लुईस नियमानुसार आयर्लंड संघाला विजयी घोषित केलं.

अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड संघात आजचा नियोजित सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.

या स्पर्धेत भारताचा उद्या नेदरलंडसोबत सामना होणार आहे.

****

No comments: