Wednesday, 26 October 2022

आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र २६ ऑक्टोबर २०२२ सकाळी ११.०० वाजता

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२६ ऑक्टोबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

बलिप्रतिपदा अर्थात दिवाळीचा पाडवा आज साजरा होत आहे. विक्रम संवतचा हा पहिला दिवस साडेतीन मुहूर्तपैकी अर्धा मुहूर्त मानला जातो. व्यापारी वर्गाचं नवं वर्ष आजपासून सुरू होतं.

बहीण भावाच्या नात्याचा स्नेह अधिक वृद्धिंगत करणारा भाऊबीजेचा सणही आज साजरा होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यानिमित्त त्यांनी महिलांप्रती आदर आणि सुरक्षा सुनिश्चित करण्याचं आवाहन केलं आहे. 

****

दिवाळी पाडवा आणि भाऊबीजेनिमित्त पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात, सोळखांबी आणि सभामंडपात पिवळ्या आणि केरी झेंडू च्या फुलांची सुंदर आरास करण्यात आली आहे. सुमारे एक हजार किलो पाना फुलांचा वापर करुन मनमोहक आरास करण्यात करण्यात आली आहे.  श्री विठ्ठल - रुक्मिणीचं हे सजलेलं रुप पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक पंढरपूर इथं दाखल झाले आहेत. तर मंदिर समितीच्या संकेतस्थळावरुनही घरबसल्या भाविकांना दर्शन मिळत आहे.

****

अनुचित व्यावसायिक व्यवहारांबद्दल भारतीय स्पर्धा आयोगानं गूगलला ९३६ कोटी ४४ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. गूगलने प्ले-स्टोअर धोरणात आपल्या दबदब्याचा गैरवापर केल्याचं आयोगाचं म्हणणं आहे. गूगलने इतर युपीआय ॲपच्या तुलनेत दर, पारदर्शकता आणि सेवा वितरण या सर्वच बाबतीत अनुचित व्यवहार केला असून आपलं धोरण ताबडतोब बदलावं असं आयोगानं सांगितलं आहे. गेल्या आठवडाभरातली गूगलवरची ही दुसरी कारवाई आहे.

****

काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज काँग्रेस अध्यक्षपदाची सुत्रं हाती घेणार आहेत.  खरगे यांनी नुकत्याच झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शशी थरुर यांचा पराभव केला. २४ वर्षांनंतर गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीला काँग्रेसचं अध्यक्षपद मिळालं आहे.

****

मलेशिया इथं सुरु असलेल्या सुलतान जोहोर कप हॉकी स्पर्धेत भारतानं काल जपानचा पाच - एक असा पराभव करला. या स्पर्धेतला भारताचा चौथा सामना आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे.

****

No comments: