Monday, 31 October 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.10.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 October 2022

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – 31 ऑक्टोबर २०२ दुपारी १.०० वा.

****

एकता आणि ऐक्यभावना भारताच्या जनमानसात आणि प्रत्येक अंतर्मनात खोलवर रुजलेली असून, देशाच्या कोणत्याही आपत्तीच्या प्रसंगी त्याचा प्रत्यय दिसून येतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज गुजरातमधल्या केवाडिया इथं आयोजित एकता दौड संचलनाला उपस्थित राहून पंतप्रधानांनी राष्ट्रीय छात्र सेनेच्या हम एक है, हम श्रेष्ठ हे आणि एक भारत, श्रेष्ठ भारत या कार्यक्रमात सहभागी झाले आणि त्यांनी विद्यार्थ्यांना एकतेची शपथ दिली. त्यानंतर ते बोलत होते. भारताच्या एकतेसमोर आव्हानं उभ्या करणाऱ्या शक्ती आजही कार्यरत आहेत, अशा शक्तींना भारतमातेची अपत्यं म्हणून आपण एकजुटीनं प्रत्युत्तर दिलं पाहिजे, असं ते म्हणाले. धर्म, जात, भाषेच्या आधारावर देशाचं विभाजन करणार्या नकारात्मक प्रवृत्तींपासून सावध राहण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.

तत्पूर्वी पंतप्रधानांनी केवाडिया मधल्या 'स्टॅचू ऑफ युनिटी' इथं सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली वाहिली.

वल्लभभाई पटेल यांची जयंती आज देशभरात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी केली जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नवी दिल्लीत 'एकता दौड'ला रवाना केलं.

स्वातंत्र्याच्या शतकमहोत्सवी वर्षात भारत यशोशिखरावर उभा असेल अशा दृष्टीनं प्रत्येक भारतीयानं संकल्प करून तसा प्रयत्न करणं, हीच सरदार पटेल यांना खरी आदरांजली ठरेल, असं शहा यावेळी म्हणाले. 

राज्यातही आज सर्वत्र एकता दौड काढण्यात आली. औरंगाबादमध्ये आयोजित एकता दौडला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. विभागीय क्रीडा संकुल ते गजानन महाराज मंदीर या मार्गावर ही एकता दौड झाली. यावेळी राष्ट्रीय एकतेची शपथ घेऊन देशातली एकता आणि एकात्मता जोपासण्याचा संकल्प करण्यात आला.

लातूर इथं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनय गोयल यांच्या उपस्थितीत एकता दौड काढण्यात आली. देशाची अखंडता,  एकता आणि अंतर्गत सुरक्षा कायम राखणं ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी असून, यासाठी सर्वांनी योगदान देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

धुळे, नंदुरबार, वाशिम, भंडारा, यवतमाळ इथं एकता दौड निघाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.

****

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह पक्षाच्या अन्य नेत्यांनी शक्ति स्थळ या इंदिरा गांधी यांच्या समाधीवर पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.

****

ट्विटरनं आपल्या वापरकर्त्यांच्या पडताळणी प्रक्रियेत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. एलन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर ही माहिती दिली. ट्विटर खात्याच्या वापरकर्त्याची ओळख पटवल्यानंतर ट्विटरकडून त्याला ब्ल्यू टिक दिली जाते, यासाठी आता शुल्क आकारण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

****

कोरडा आणि ओला कचऱ्याबाबत जागरुकता निर्माण करण्याची मोहिम गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयातर्फे राबवली जात आहेत. या मोहिमेत ४५ हजार शाळांमधले ७५ हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. कचरा वर्गीकरण मोहीम स्वच्छ भारत अभियनाअंतर्गत ३२ राज्यांतल्या साडेतीन हजार शहरी भागात आणि केंद्र शासित प्रदेशांत राबवली जात आहे.

****

दिवाळीमुळे गेल्या आठ दिवसांपासून बंद असलेल्या नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्या आज पासून सुरू झाल्या. त्यामुळे शेतमालाची आवक वाढण्याची शक्यता आहे. दरवर्षी दिवाळीमध्ये बाजार समित्यांचं कामकाज बंद असतं. ते सुरू झाल्यानंतर शेतमालाची आवक वाढते. सध्या कांद्याला चांगले भाव असले तरी मर्यादित स्वरूपातच कांदा बाजारात आणावा असा आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आला आहे.

****

औरंगाबाद ते पुणे महामार्गावर औरंगाबाद मधल्या नगरनाका ते ए एस क्लब रस्त्यावरची जड वाहतूक ३१ डिसेंबर पर्यंत बंद करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. या महार्मावरील पुणे, अहमदनगर ते जालना, बीड कडे जणारी जड वाहतूक महानुभाव आश्रम, जुना बीडनाका, झाल्टा फाटा, केंब्रीज चौक मार्गे वळवण्यात आली आहे. तर औरंगाबाद शहरात येणारी आणि जाणारी जड वाहतूक साजापूर फाटा, नगरनाका या मार्गाने वळवण्यात आली आहे.

****

फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पुरुष दुहेरीचं अजिंक्यप पटकावलं आहे. पॅरिस इथं झालेल्या अंतिम सामन्यात या जोडीनं चायनीज तैपेईच्या जोडीचा २१ - १३, २१ - १९ असा पराभव केला.

****

१७ वर्षाखालच्या महिलांच्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचं विजेतेपद स्पनेनं पटकावलं आहे. काल झालेल्या अंतिम लढतीत स्पनेनं कोलंबियाचा एक - शून्य असा पराभव केला.

****

No comments: