आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२८ ऑक्टोबर २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातल्या जांब समर्थ इथल्या श्री समर्थ रामदास स्वामी
मंदीरातल्या मूर्ती चोरी प्रकरणी तब्बल दोन महिन्यानंतर जालना स्थानिक गुन्हे शाखेनं
कर्नाटक राज्यातून दोघांना ताब्यात घे तलं आहे.
चोरलेल्या मुर्त्या देखील हाती लागल्याची माहिती प्राप्त होत आहे. स्थानिक गुन्हे शाखेचं
पथक आरोपींना घेऊन निघालं असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
देशाच्या विविध भागात आजपासून छट पूजेला प्रारंभ होत आहे. चार दिवसांचा हा उत्सव
आज पारंपरिक नहाय खाय या विधीपासून सुरू होईल. छट पूजेदरम्यान सूर्य देव आणि छटी मैय्या
यांची आराधना केली जाते. येत्या सोमवारी उगवत्या सूर्याला अर्घ्य अर्पण करून छट पूजेची
सांगता होणार आहे.
छठ पूजेसाठी उत्तर मुंबईच्या सागरी किनाऱ्याचा खासदार गोपाळ शेट्टी यांनी काल आढावा
घेतला. त्यांनी मालाडचा मार्वे समुद्र किनारा इथून अनेक अधिकार्यांसह अक्सा समुद्रकिनाऱ्याला
प्रत्यक्ष भेट दिली, तसंच उपस्थित अधिकाऱ्यांना महत्त्वाची माहिती आणि सूचना दिल्या.
****
पायदळ दिनानिमित्त काल पुण्याच्या राष्ट्रीय युद्ध स्मारकात, दक्षिण विभागाचे पायदळ
प्रमुख लेफ्टनंट जनरल जय सिंग यांनी, पायदळ जवानांनी दिलेल्या बलिदानाबद्दल त्यांना
आदरांजली वाहिली. लेफ्टनंट जनरल आर. व्ही. कुलकर्णी यांनीही पुष्पचक्र अर्पण केलं.
जयसिंग यांनी पायदळाच्या सर्व सदस्यांच अभिनंदन केलं. आपल्या अतुलनीय साहसामुळे पायदळ
हे महत्वाचं दल आहे असंही ते म्हणाले.
****
सातारा जिल्ह्यात कोयना परिसरामध्ये आज सकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास भूकंपाचा
सौम्य धक्का जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू हेळवाक गावाच्या नैऋत्येस पाच किलोमीटर अंतरावर
असून भूकंपाची तीव्रता दोन पूर्णांक आठ रिश्टर स्केल इतकी असल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यात वणी इथलं श्री सप्तशृंगी मातेचं मंदिर आजपासून येत्या १३ नोव्हेंबरपर्यंत
भाविकांच्या दर्शनासाठी २४ तास खुलं ठेवण्यात येणार. सध्या सुट्ट्यांचा हंगाम सुरु
असून भाविकांची होणारी संभाव्य गर्दी पाहता देवस्थानच्या विश्वस्त संस्थेनं हा निर्णय
घेतला.
****
No comments:
Post a Comment