Saturday, 29 October 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 29.10.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 29 October 2022

Time 07.10 AM to 07.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २९ ऑक्टोबर २०२२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येण्याचं परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचं आवाहन

·      सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी राज्यात समर्पित सायबर गुप्तचर विभाग स्थापन करण्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

·      आगामी २०२३ या शैक्षणिक वर्षापासून मराठी भाषेतून वैद्यकीय शिक्षण सुरू करण्यात येणार

·      टाटा एअरबस प्रकल्पावरुन, सत्ताधारी आणि विरोधी पक्षात आरोप - प्रत्यारोप सुरुच, आमदार प्रसाद लाड यांचे माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यावर टक्केवारीचा आरोप, तर बालिश आरोप असल्याचं सांगत पुरावे देण्याचं देसाई यांचं आव्हान.  

·      झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांची पोलिसांकडून चौकशी

·      जांब समर्थच्या प्राचीन मूर्तींच्या चोरी प्रकरणात दोन संशयितांना अटक, अकरापैकी पाच मुर्त्याही मिळाल्या

·      विधानसभा आणि लोकसभा यासारख्या निवडणुका न लढवण्याचा विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार हरीभाऊ बागडे यांचा निर्णय

आणि

·      ऑस्ट्रेलियातल्या विश्वचषक टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत पावसामुळे कालचे दोन्ही सामने रद्द, आज न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात लढत

 

सविस्तर बातम्या

दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी सर्व देशांनी आपापसातले राजकीय मतभेद विसरून एकत्र आलं पाहिजे, असं आवाहन, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केलं आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद विरोधी समितीची विशेष बैठक काल मुंबईत झाली, त्यावेळी ते बोलत होते. दहशतवादी कारवायांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता येऊ नये या दृष्टीनं अभिनव उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित केली असून, आज दिल्लीत ही बैठक होणार आहे. समितीच्या सदस्यांनी काल बैठक सुरू होण्यापूर्वी २६/११ च्या मुंबई हल्ल्यात बळी पडलेल्यांना आदरांजली वाहिली. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी –

 

Byte…

आपल्या उद्‌घाटनपर भाषणात परराष्ट्रमंत्री डॉ एस. जयशंकर यांनी सांगितलं की, भारताला सीमापार दहशतवाद्यांच जास्त फटका बसला आहे. दहशतवाद्यांचे तळ आणि प्रशिक्षण केंद्रांना मिळणारा राजकीय आणि वैचारिक पाठिंबा या सर्वांवर कारवाई करण्यासाठी आंततराष्ट्रीय सहकार्य आणि एकत्रित प्रयत्नांची गरज भारताने यावेळी व्यक्त केली. दहशतवादी कारवायांसाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. हे रोखण्यासाठी नवी दिल्लीत होण्याऱ्या परिषदेत अभिनव उपाय सुचवण्याचं आवाहनही डॉ.एस. जयशंकर यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला केलं.

आकाशवाणी बातम्यांसाठी मुंबईहून जीवन भावसार

 

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीच्या या विशेष बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, दहशतवाद विरोधातली लढाई सामुहिकपणे लढण्याची गरज व्यक्त केली. ते  म्हणाले...

 

Byte

मी सर्वच युनायटेड नेशन्सचे मेंबर्स, त्यांचे सर्व पदाधिकारी यांचं मी मनापासून स्वागत करतो. त्यांना धन्यवाद देतो की मुंबईमध्ये, ताजमध्ये त्यांनी इंटरनॅशनल कॉन्फरन्सचं आयोजन केलं. त्यामध्ये आमचे परराष्ट्रमंत्री जयशंकरजी सहभागी होते. विविध देशांचे रिप्रेझेंटेटीव्ह होते. आणि आतंकवाद विरोधात लढाई जी आहे ती आपण सामुहिकपणे लढतोय आणि हे गरजेचं पण आहे. यासाठीच ही इंटरनॅशनल कॉन्फरन्स जी आहे अतिशय महत्वाची आहे.

****

सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी राज्यात समर्पित सायबर गुप्तचर विभाग स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते काल हरियाणा इथल्या सुरजकुंड इथं झालेल्या चिंतन शिबिरात बोलत होते. या माध्यमांतून सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जागतिक मॉडेल तयार करण्यात येणार आहे. सरकारी आणि खाजगी बँका, वित्तीय संस्था, सामाजिक माध्यमं, नियामक संस्था, सायबर पोलिस, तंत्रज्ञ यांना एकत्र आणून गतिमान प्रतिसादाची यंत्रणा उभारण्यात येणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.

****

आगामी २०२३ या शैक्षणिक वर्षापासून मराठी भाषेतून वैद्यकीय शिक्षण सुरू करण्यात येणार असल्याचं, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं. धुळे इथं प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी काल ही माहिती दिली. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेतून शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याचं, महाजन म्हणाले. मराठीतून शिक्षण घेणं ऐच्छिक असले, असंही त्यांनी स्पष्ट केल. अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांचं इंग्रजीतून मराठीत भाषांतर करण्याच्या सूचना, नागपूर, अमरावती आणि गडचिरोली या तीन विद्यापीठांना देण्यात आल्या असल्याचंही महाजन यांनी सांगितलं.

****

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अरुपांतरणीय कर्जरोखे - नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर काल मुंबई शेअर बाजारात, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत सूचीबद्ध झाले. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी २५ टक्के कर्जरोखे राखीव आहेत असं सांगून, एन व्ही आय टी च्या दुसऱ्या फेरीला सुरुवात झाल्यापासून, अवघ्या सात तासांत जवळपास सातपट अतिरिक्त मागणी नोंदवण्यात आली, अशी माहिती गडकरी यांनी दिली. ही गुंतवणूक सर्वात विश्वासार्ह असून, वार्षिक आठ पूर्णांक पाच शतांश टक्के इतके उत्पन्न देते, असं ते म्हणाले. या माध्यमातून किरकोळ गुंतवणूकदारांना राष्ट्र उभारणीच्या उपक्रमात सहभागी होण्याची संधी आपण देऊ शकलो, याचा आपल्याला मनापासून आनंद वाटत असल्याचं गडकरी यांनी सांगितलं.

****

एअरबसचं तंत्रज्ञान असलेला टाटाचा सी-२९५ या मालवाहू विमानांच्या निर्मितीचा प्रकल्प, गुजरातमध्ये बडोद्यात गेल्याच्या प्रकरणावरुन, सत्ताधारी आणि विरोधी पक्षात कालही आरोप - प्रत्यारोप सुरुच होते. भारतीय जनता पक्षाचे नेते प्रसाद लाड यांनी माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर टक्केवारी घेतल्याचा आरोप केला. त्यावर बोलताना देसाई यांनी असले आरोप सहन करणार नाही, असं सांगत, पुरावे देण्याचं आव्हान दिलं. लाड यांचे हे आरोप बालीश असल्याचं देसाई यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्ष स्वतःला घरात कोंडून घेतलं, त्यामुळे टाटा एअर बसचा प्रकल्प गुजरातला गेल्याचं भाजपनं म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या जनतेची माफी मागावी अशी मागणी पक्षानं ट्विटरवरुन केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी, टाटा एअरबसच्या प्रकल्पासंदर्भातले सर्व करार हे वर्षभरापूर्वी झाले आहेत. आता आगामी प्रकल्प महाराष्ट्रात यावेत यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं.

राज्यातून एका पाठोपाठ एक उद्योग गुजरातला जात आहेत, त्यामुळे राज्यातल्या युवकांचा रोजगार हिसकावला जात असल्याचं मत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही राज्यातलं सरकार हे गुजरातचं एजंट असल्याची कठोर टीका केली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रकरणी राज्य सरकारवर आरोप केले.

****

एज्युटेक कंपन्या आणि परदेशी शैक्षणिक संस्थांनी दिलेल्या ऑनलाइन पीएचडी पदव्या वैध नसल्याचं, विद्यापी  ठ अनुदान आयोगानं जाहीर  केला आहे .सूचनेद्वारे स्पष्ट केलं आहे. अशा पदवीच्या जाहिरातींना विद्यार्थ्यांनी बळी पडू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे. पीएचडीसाठी कुठेही प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांना २०१६ च्या पदवी अभ्यासक्रमाअंतर्गत मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करणं आवश्यक असल्याचं आयोगानं सांगितलं आहे.

****

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी काल शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांची चौकशी केली. त्यांना आजही चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. वरळी गोमाता जनतामध्ये किशोरी पेडणेकर यांच्या परिवाराने अर्धा डझन गाळे झोपडपट्टी वासियांच्या नावाने ढापले आहेत, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

****

जालना जिल्ह्यातल्या जांबसमर्थ इथल्या समर्थ रामदास स्वामी पूजन करत असलेल्या प्राचीन मूर्तींच्या चोरी प्रकरणातल्या दोन संशयितांना, जालना पोलिसांनी सोलापूर जिह्यातल्या बार्शी इथून ताब्यात घेतलं. शेख राजू शेख हुसेन, महादेव चौधरी अशी या संशयितांची नावं आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या अकरा मूर्त्यांपैकी पाच मूर्त्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणात अन्य एका संशयिताला लवकरच ताब्यात घेण्यात येईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ.अक्षय शिंदे यांनी काल वार्ताहरांशी बोलताना दिली.

दरम्यान, या मुर्ती सापडल्यामुळे जांब गावात समर्थ भक्तांनी काल घरोघरी देवासमोर दिवा लावून आणि साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला. या शोध कार्यात सहभागी असलेल्या प्रशासनातल्या सर्व तपास अधिकाऱ्यांचे समर्थ भक्तांनी आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ९४ वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शन वरच्या सर्व वाहिन्यावरून सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम प्रसारीत होईल.

****


सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सांवत यांनी काल उस्मानाबाद जिल्ह्यातल्या परंडा, वाशी, इंदापूर आणि कळंब या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन, अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली. परंडा इथल्या आत्महत्या केलेल्या शेतकरी दाम्पत्याच्या कुटुंबातल्या मुलांना दत्तक घेऊन, त्यांना पाच लाख रूपयांची तात्काळ मदतही त्यांनी या दौऱ्यात दिली. गावांतर्गत रस्त्यांच्या विकासाकरता पस्तीस कोटी रूपयांचा निधी मंजूर केला असल्याचंही सावंत यांनी यावेळी सांगितलं.

****

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीनं येत्या चार आणि पाच नोव्हेंबर रोजी शिर्डी इथं राज्यातल्या प्रमुख कार्यकर्त्यांसाठी ‘राष्ट्रवादी मंथन : वेध भविष्याचा, या दोन दिवसीय अभ्यास शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी ही माहिती दिली. या शिबिरात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासह कृषी, विज्ञान, अर्थ, संरक्षण, पत्रकारिता आदी क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

****

हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीनं मदत द्यावी या मागणीसाठी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं, काल जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे जयप्रकाश दांडेगावकर, काँग्रेसच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव, आमदार राजू नवघरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसंच शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. यावेळी विविधर मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना देण्यात आलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यातले भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार हरीभाऊ बागडे यांनी, यापुढे विधानसभा आणि लोकसभा यासारख्या निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा आपला वैयक्तिक निर्णय असून पक्षाचा निर्णय नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. फुलंब्रीत दीपावली मिलन कार्यक्रमात बोलताना आमदार बागडे यांनी ही घोषणा केली. भाजप पक्षाकडून जो आदेश येईल, त्याप्रमाणे पुढील काळात काम करणार असल्याचं ते म्हणाले. ७७ वर्षीय आमदार बागडे आतापर्यंत चार वेळा विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले आहेत.

****

उस्मानाबादचे शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी, २०२०चा पीक विमा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बजाज अलायन्स कंपनीनं तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा, यासह इतर मागण्यांसाठी, आमरण उपोषण सुरु केलं आहे. मात्र अद्याप कोणताही तोडगा निघाला नसल्यामुळे  शिवसैनिकांनी आंदोलनाचे वेगवेगळे मार्ग स्वीकारले आहेत. जिल्हाभरात या आंदोलनास मोठा पाठिंबा मिळत असून, काही शिवसैनिकांनी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढून आंदोलन केलं. तर, पाडोळी इथं काही शेतकऱ्यांनी पाण्यात उतरुन पीक विमा नुकसान भरपाईची मागणी केली. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उस्मानाबाद शहर शिवसेना शाखेकडून आज उस्मानाबाद शहर बंदचं आवाहन करण्यात आलं आहे.

****

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तान आणि आयर्लंड तसंच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाणारा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. यामुळे चारही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. या स्पर्धेत आज न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात सामना होणार आहे.

****

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त येत्या सोमवारी बीड जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी साडे सात वाजता राष्ट्रीय एकता दौडचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख यांनी ही माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराज चौक- बस स्टँड- शाहीर अणाभाऊ साठे चौक- जालना रोड मार्गे जिल्हा क्रीडा संकुल इथं या दौडचा समारोप होणार आहे.

****

एकता दिवस आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीनं ३१ ऑक्टोबर पर्यंत चित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. शहागंज इथल्या सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळ्याजवळ हे प्रदर्शन भरवण्यात आलं असून, नागरिकांनी या चा लाभ घ्यावा असं आवाहन महानगरपालिका प्रशासक डॉ अभिजीत चौधरी यांनी केलं आहे.

****

हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी इथल्या बंजारा समाजाचं आराध्य दैवत श्री रामचंद्र सात महाराज मंदिर परिसरामध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीने आयोजित भाऊबीज महोत्सवाला बंजारा समाजाच्या बांधवांनी मोठी गर्दी केली होती. कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्या पुढाकारातून दरवर्षी हा उत्सव होतो. या उत्सवाला खासदार श्रीकांत शिंदे, खासदार हेमंत पाटील, कृषी मंत्री अब्दुल सत्तार, आमदार बालाजी कल्याणकर, उपस्थित होते.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या धोकादायक निजामकालीन शाळांच्या इमारतींचं नुतनीकरण करण्यासाठी शिक्षण विभागांनी नियोजन करावं, अशी सूचना, कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी यासंदर्भात काल झालेल्या बैठकीत केली. यासाठी राज्याकडून ९०टक्के निधी देण्यात येणार असून, उर्वरित १० टक्के निधी लोकप्रतिनिधींनी देऊन शाळा दुरुस्ती करावी असं त्यांनी सांगितलं.

****

प्रवाश्यांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड विभागातून केरळ ला जाण्याकरता नांदेड ते एर्नाकुलम दरम्यान नोव्हेंबर ते जानेवारी २०२३ दरम्यान विशेष गाडीच्या ३६ फेऱ्या करण्याचा निर्णय घेतला आहे. नांदेड ते एर्नाकुलम ही गाडी चार नोव्हेंबर पासून दर शुक्रवारी नांदेड इथून दुपारी तीन वाजता सुटेल आणि निझामाबाद, सिकंदराबाद, रेणीगुंठा, कोईम्बतूर, थ्रीशूर मार्गे एर्नाकुलम इथं शनिवारी रात्री सव्वा दहा वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी पाच नोव्हेंबर पासून दर शनिवारी रात्री ११ वाजून २५ मिनिटांनी एर्नाकुलम इथून सुटेल आणि नांदेड इथं सोमवारी सकाळी साडे सात वाजता पोहोचेल.

****

No comments: