Friday, 28 October 2022

text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.10.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 October 2022

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २८ ऑक्टोबर २०२ दुपारी १.०० वा.

****

देशाच्या अमृत काळात पंच प्रण खूप महत्वाची भूमिका बजावतील आणि प्रशासकीय कारभार चांगला चालण्यासाठीही त्याचा खूप लाभ होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. हरियाणातल्या सूरजकुंड इथं गृहमंत्र्यांच्या चिंतन शिबिरात ते आज बोलत होते. कायदा आणि सुव्यवस्था विश्वसनीय असली पाहिजे आणि लोकांचा कायद्यावर विश्वास असणं महत्वाचं असल्याचं ते म्हणाले. गेल्या काही वर्षात केंद्र सरकारने अनेक कायद्यांमध्ये बदल केले असून, देशात कायदा आणि सूव्यवस्थेला मजबूत केल्याचं पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं.

****

भारतात टीबी अर्थात क्षयरोगाच्या रुग्णांचं प्रमाण वाढत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं प्रसिद्ध केलेल्या २०२२ च्या जागतिक क्षयरोग अहवालात नमूद करण्यात आलं आहे. भारतात टीबीचे २८ टक्के रुग्ण आढळतात आणि क्षयरुग्णांच्या एकूण संख्येपैकी दोन तृतियांश पेक्षा अधिक रुग्णसंख्या आढळणार्या आठ देशांमध्ये भारताचा समावेश होतो, असं या अहवालात म्हटलं आहे.

****

जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातल्या जांब समर्थ इथल्या श्री समर्थ रामदास स्वामी मंदीरातल्या मूर्ती चोरी प्रकरणी, तब्बल दोन महिन्यानंतर जालना स्थानिक गुन्हे शाखेनं कर्नाटक राज्यातून दोन जणांना, तर सोलापूर मधून एकाला ताब्यात घेतलं आहे. चोरलेल्या पाचही मुर्त्या देखील हाती लागल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे. याप्रकरणी जालना पोलिस दुपारी साडे तीन वाजता वार्ताहरांशी संवाद साधून सविस्तर माहिती देणार आहेत. या मूर्ती चोरीचा लवकर तपास लागलेला नव्हता त्यामुळे गावकरी तसंच समर्थांच्या वंशजांसह भक्तांच्या भावना तीव्र झाल्या होत्या.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी ३० तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ९४ वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शन वरच्या सर्व वाहिन्यावरून सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम प्रसारीत होईल.

****

प्रवाश्यांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड विभागातून केरळ ला जाण्याकरता नांदेड ते एर्नाकुलम दरम्यान नोव्हेंबर ते जानेवारी २०२३ दरम्यान विशेष गाडीच्या ३६ फेऱ्या करण्याचा निर्णय घेतला आहे. नांदेड ते एर्नाकुलम ही गाडी चार नोव्हेंबर पासून दर शुक्रवारी नांदेड इथून दुपारी तीन वाजता सुटेल आणि निझामाबाद, सिकंदराबाद, रेणीगुंठा, कोईम्बतूर, थ्रीशूर मार्गे एर्नाकुलम इथं शनिवारी रात्री सव्वा दहा वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी पाच नोव्हेंबर पासून दर शनिवारी रात्री ११ वाजून २५ मिनिटांनी एर्नाकुलम इथून सुटेल आणि नांदेड इथं सोमवारी सकाळी साडे सात वाजता पोहोचेल.  

****

सातारा जिल्ह्यात कोयना परिसरामध्ये आज सकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू हेळवाक गावाच्या नैऋत्येस पाच किलोमीटर अंतरावर असून भूकंपाची तीव्रता दोन पूर्णांक आठ रिश्टर स्केल इतकी असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

नाशिक जिल्ह्यात वणी इथलं श्री सप्तशृंगी मातेचं मंदिर आजपासून येत्या १३ नोव्हेंबरपर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी २४ तास खुलं ठेवण्यात येणार आहे. सध्या सुट्ट्यांचा हंगाम सुरु असून भाविकांची होणारी संभाव्य गर्दी पाहता देवस्थानच्या विश्वस्त संस्थेनं हा निर्णय घेतला आहे .

****

एकता दिवस आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त औरंगाबाद इथं महानगरपालिकेच्या वतीनं आजपासून ३१ ऑक्टोबर पर्यंत चित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. शहागंज इथल्या सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळ्याजवळ हे प्रदर्शन भरवण्यात आलं असून, नागरिकांनी या चित्र प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजीत चौधरी यांनी केलं आहे.

****

फेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीगटात भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीनं उपांत्यपूर्व फेरी प्रवेश केला आहे. त्यांनी पात्रता सामन्यात मलेशियाच्या जोडीचा २१ - १६, २१ - १४ असा पराभव केला. पुरुष एकेरीत किदांबी श्रीकांत आणि एच एस प्रणॉय या दोघांनाही उप- उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागल्यानं त्यांचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे.

****

२९ ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर या कलावधीत सातारा इथं राष्ट्रीय खो-खो स्पर्धा होणार आहेत. यासाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर झाला असून, मुलांच्या संघाचं नेतृत्व उस्मानाबादच्या राज जाधव याच्याकडे तर मुलींच्या गटाचं कर्णधार पद ठाण्याच्या धनश्री कंक हिच्याकडे सोपवण्यात आलं आहे. बीडचे प्रफुल्ल हाटवटे आणि ठाण्याचे अमित परब यांच्याकडे अनुक्रमे मुलांच्या आणि मुलींच्या गटाचे प्रशिक्षकपद सोपवण्यात आलं आहे.

****

हॉकी प्रो लीग स्पर्धेत आज भुवनेश्वर इथं भारताचा सामना न्यूझीलंडसोबत होणार आहे. संध्याकाळी सात वाजून दहा मिनिटांनी हा सामना सुरु होईल.

****

No comments: