Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 October 2022
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९
ऑक्टोबर २०२२ दुपारी १.०० वा.
****
दिल्ली-
बंगळुरू विमान दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने
दिले आहेत. दिल्ली विमानतळावरून उड्डाण करताना इंडिगो कंपनीच्या या विमानाच्या इंजिनला
आग लागल्याची घटना घडली. मात्र वेळीच बाब लक्षात आल्याने सुदैवाने मोठा अपघात टळला.
विमानातले १७७ प्रवासी आणि ७ कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली असून, हे प्रवाशी
दुसऱ्या विमानाने बंगळुरूला रवाना झाले.
****
जागतिक स्तरावरील
बदलतं युद्धतंत्र लक्षात घेऊनच अहमदनगर इथल्या आर्मर्ड कोर सेंटर आणि स्कूलमध्ये वरिष्ठ
लष्करी अधिकाऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे विशेष प्रशिक्षण दिलं जात आहे.
या केंद्रातील प्रशिक्षण आणि अन्य युद्धतंत्राविषयी माहिती देण्याच्या हेतूनं प्रसार
माध्यमांच्या प्रतिनिधींच्या अभ्यास दौऱ्यात ही माहिती देण्यात आली. प्रामुख्यानं रणगाड्याच्या
बांधणीपासून ते प्रत्यक्ष युद्धभूमीवरील कारवाईपर्यंतच्या अभ्यासाचा या विशेष प्रशिक्षणात
समावेश आहे. अत्याधुनिक दळणवळण यंत्रणेचा प्रत्यक्ष युद्धभूमीवर कसा प्रभावी वापर करायचा,
याबद्दलही संबंधित रेजिमेंटच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं जात आहे.
****
झोपडपट्टी
पुनर्वसन प्राधिकरण घोटाळ्याप्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही तसंच आपण कोणत्याही चौकशीला
जाणार नसल्याचं, शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलं आहे. पेडणेकर यांनी
प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना संबंधित इमारतीच्या परिसरात नेऊन वस्तुस्थिती मांडली.
भाजप नेते किरीट सोमय्यांकडून करण्यात येणारे आरोप हा दबाव तंत्राचा भाग असून त्याला
आपण बळी पडणार नाही, असंही पेडणेकर म्हणाल्या . मुंबई पोलिसांनी काल पेडणेकर यांची
चौकशी केली. त्यांना आजही चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.
****
लाचलुचपत
प्रतिबंधक विभागाच्या वतीनं ३१ ऑक्टोबर ते सहा नोव्हेंबर दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताह
पाळण्यात येणार आहे. याअतंर्गत ३१ ऑक्टोबरला सर्व सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांमध्ये
भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत शपथ घेवून राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांनी दक्षता जनजागृती
सप्ताहानिमित्त दिलेला संदेश वाचून दाखवण्यात येईल. लाचलुचपत प्रतिबंधक औरंगाबाद विभागाचे
उप अधिक्षक मारुती पंडित यांनी ही माहिती दिली. औरंगाबाद परिक्षेत्रातील बीड, जालना
आणि उस्मानाबाद जिल्ह्यात शहर आणि ग्रामीण परिसरात सार्वजनिक ठिकाणी, शासकीय कार्यालयात,
भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत फलक लावून जनजागृती करण्यात येणार आहे.
****
पंढरपूरमध्ये
कार्तिकी वारीच्या निमित्तानं दर्शनासाठी होणारी वाढती गर्दी लक्षात घेऊन श्रीविठ्ठल-रुक्मिणीचं
दर्शन १३ नोव्हेंबरपर्यंत २४ तास सुरु ठेवण्यात येणार आहे. कार्तिक शुद्ध एकादशीचा
मुख्य सोहळा चार नोव्हेंबर रोजी होत असून यात्रा कालावधीत पंढरपुरात सुमारे आठ ते १०
लाख भाविक येण्याची शक्यता आहे
****
अहमदनगर
जिल्ह्यात राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कडधान्य सुधार प्रकल्पानं
विकसित केलेली तुरीची दोन वाणं राष्ट्रीय पातळीवर लागवडीसाठी अधिसूचित करण्यात आली
आहेत. नवी दिल्लीमध्ये नुकत्याच झालेल्या केंद्रीय वाण प्रसार समितीच्या बैठकीत हा
निर्णय घेण्यात आला. फुले तृप्ती आणि फुले कावेरी अशी या दोन वाणांची नावं आहेत. ही
वाणं अधिक उत्पादनक्षम, लवकर तयार होणारी आणि मर तसंच वांझ रोगाचा प्रतिकार करण्याची
क्षमता विकसित केलेली आहेत. राज्यात खरीप हंगामात
तूर हे महत्त्वाचं पीक असून या पिकाखाली असलेल्या राज्यातल्या सुमारे १२ लाख हेक्टर
क्षेत्रामधून सुमारे साडेबारा लाख टन उत्पादन मिळतं.
****
३२ व्या
किशोर किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेला आज सातारा जिल्ह्यातल्या फलटणमध्ये
प्रारंभ होत आहे. दोन नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धांमध्ये राज्यातून महाराष्ट्राच्या
संघाव्यतिरिक्त विदर्भ आणि कोल्हापूरचे संघ सहभागी होत आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते
अजित पवार यांच्या हस्ते आज दुपारी या स्पर्धांचं उद्घाटन होईल . महाराष्ट्राच्या किशोर
गटाचा सलामीचा सामना झारखंड तर किशोरी गटाचा सलामीचा सामना उत्तराखंडबरोबर होणार आहे.
****
फ्रेंच खुल्या
बॅटमिंटन स्पर्धेत भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी जोडीने पुरुष
दुहेरी गटात उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आज झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत सात्विक
चिराग जोडीने गेल्या वेळच्या विजेत्सर जपानच्या ताकुरा होकी आणि युगो कोबायाशी जोडीचा
२३-२१, २१-१८ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. उपांत्य फेरीचा सामना उद्या होणार आहे.
****
ऑस्ट्रेलियात
सुरू असलेल्या टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात
सामना होणार आहे. काल अफगाणिस्तान आणि आयर्लंड तसंच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही
सामने पावसामुळे रद्द करावे लागले. या सर्व संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला.
भारताचा पुढचा सामना उद्या दक्षिण आफ्रिका संघासोबत होणार आहे.
****
No comments:
Post a Comment