Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 October 2022
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३०
ऑक्टोबर २०२२ दुपारी १.०० वा.
***
युवकांसाठी
भारतीय अंतराळ क्षेत्र आता खुलं करण्यात आलं असून, या क्षेत्रात अनेक क्रांतीकारक
बदल होत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की
बात या कार्यक्रमात आज ते बोलत होते. इन-स्पेस या आधुनिक तंत्रज्ञानाच्या
माध्यमातून बिगर सरकारी कंपन्यांना देखील आपापले पे-लोड्स आणि उपग्रह यांचं
प्रक्षेपण करण्याची सोय उपलब्ध झाली असून अधिकाधिक स्टार्ट अप उद्योजक आणि
संशोधकांनी अंतराळ क्षेत्रात निर्माण होत असलेल्या या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन
त्यांनी केलं. भारत स्वातंत्र्याचा शतक महोत्सव साजरा करेल तेव्हा युवा
वर्गाची शक्ती, त्यांचे कष्ट, त्यांचे
श्रम, त्यांची प्रतिभा भारताला नव्या उंचीवर घेऊन जाईल, असं ते म्हणाले.
आजच्या
छठ पूजेच्या पंतप्रधानांनी जनतेला
शुभेच्छा दिल्या. उद्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशाच्या
कानाकोपऱ्यात आयोजित होणाऱ्या एकता दौडमध्ये सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं.
येत्या १५ नोव्हेंबरला भगवान बिरसा मुंडा यांची जयंती म्हणजे आदिवासी गौरव
दिनाच्या शुभेच्छा देत रांची इथल्या भगवान बिरसा मुंडा यांच्या वस्तु संग्रहालयाला
भेट देण्याचं आवाहन त्यांनी केलं. ८ नोव्हेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या गुरु
नानकजी यांच्या प्रकाश पर्वाच्याही पंतप्रधानांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या.
***
पंतप्रधान
नरेंद्र मोदी आज गुजरातमध्ये वडोदरा इथं २२ हजार कोटी रुपयांच्या विमान निर्मिती
प्रकल्पाचं कोनशिला अनावरण करतील. या प्रकल्पात टाटा-एअरबस सी-टू नाइन्टी फाईव्ह
या लष्करी वाहतूक करणाऱ्या विमानांची निर्मिती करण्यात येणार आहे. उद्या राष्ट्रीय एकता दिनाच्या औचित्यानं
गुजरातमधल्या केवडिया जिल्ह्यात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यु ऑफ युनिटी
इथं पंतप्रधान पटेल यांना आदरांजली वाहतील. आरंभ ४ पूर्णांक शून्य च्या
सत्त्याण्णवव्या कॉमन फाउंडेशन अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना ते
मार्गदर्शन करतील. त्यानंतर बनासकांठा जिल्ह्यातल्या ५६० कोटी रुपयांच्या विविध
विकास कामांचं कोनशिला अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येईल. या
दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी अहमदाबाद इथल्या २ हजार ९०० कोटी रुपयांच्या रेल्वे
प्रकल्पाचं लोकार्पण करणार आहेत.
***
टाटा
एअरबसचा सी-२९५ लष्करी विमान वाहतूक प्रकल्पापाठोपाठ आणखी एक नागपूरमध्ये
प्रस्तावित प्रकल्प हैदराबादला गेला आहे. फ्रान्सची बहुराष्ट्रीय कंपनी सॅफ्रन ही
विमान इंजिन दुरुस्ती देखभालचा प्रकल्प नागपूरच्या मिहानमध्ये टाकणार होती. मात्र,
जमीन मिळवण्यास विलंब झाल्यामुळं हा प्रकल्प हैदराबादला गेला आहे. यावरुन विरोधी
पक्षांनी राज्य सरकारवर टीकेची धार तीव्र केली आहे.
सत्तेच्या
हव्यासापोटी भारतीय जनता पक्ष आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
महाराष्ट्रातील वातावरण अस्थिर केलं असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे
यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सरकारवर
टीका केली. महाराष्ट्रात जे काही चाललं आहे ते बघून दु:ख वाटत असल्याचे सुळे
म्हणाल्या.
***
पीक
विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित जमा करावी यासह विविध मागण्यासाठी
उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांनी गेल्या सहा दिवसांपासून जिल्हाधिकारी
कार्यालया समोर सुरु केलेलं उपोषण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्ष प्रमुख
उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर मागे घेतलं. विमा कंपनीसोबत बैठक घेऊ,
तसंच सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीचे पैसे लवकरात लवकर
देऊ, असं आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिलं. विधान परिषदेचे विरोधी
पक्षनेते अंबादास दानवे यांनीही आज सकाळी आमदार पाटील यांची उपोषणास्थळी जाऊन भेट
घेतली.
उस्मानाबाद
जिल्ह्याला नुकसान भरपाईचे २८२ कोटी रुपये येणे आहे. त्यातील अतिवृष्टीचे ५९ कोटी
रुपये दोन दिवसात देण्याचं आश्वासन मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव असीम गुप्ता
यांनी दिल्याचं खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी सांगितलं. ऑगस्ट, सप्टेंबर,
ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा ६० कोटी रुपयांची नुकसानभरपाईचा
सोमवारपर्यंत जमा होणार आहे. सकारात्मक निर्णय झाल्यानं आमदार पाटील उपोषण मागे
घेत असल्याचं खासदार निंबाळकर यांनी सांगितल आहे.
***
केंद्रीय
राखीव पोलीस बलाच्या वृक्षारोपण अभियानाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा
केली असून सीआरपीएफ चा हा प्रयत्न संपूर्ण देशासाठी आदर्श असल्याचं पंतप्रधान मोदी
यांनी म्हटलं आहे. या अभियानाअंतर्गत विश्वनाथ धाम आणि ज्ञानवापी च्या सुरक्षेसाठी
तैनात असणाऱ्या सीआरपीएफच्या तुकडीतल्या जवानांनी ७५ हजार वृक्ष लागवड केली आहे.
***
No comments:
Post a Comment