Wednesday, 26 October 2022

आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक : २६ ऑक्टोबर २०२२ सकाळी ७.१० मि.

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 26 October 2022

Time 07.10 AM to 07.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २६ ऑक्टोबर २०२२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·      मुंबई - नागपूर समृद्धी महामार्ग नोव्हेंबर महिन्यात सुरू करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संकेत

·      मुख्यमंत्र्यांची गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांसोबत तर मुंबईत शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी

·      वीस विद्यार्थ्यांपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद होणार असल्याच्या बातम्या निराधार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचं स्पष्टीकरण

·      जिल्हा परिषद शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना मुख्यालयाच्या ठिकाणीच राहणं सक्तीचं करणाऱ्या शासन निर्णयाला, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान

·      नांदेडच्या सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारात हल्लाबोल उत्साहात साजरा

      आणि

·      टी २० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाकडून  श्रीलंकेचा सात गडी राखून पराभव

****

सविस्तर बातम्या

नागपूर इथं येत्या १९ डिसेंबरपासून होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. आतापर्यंत केवळ एकाच महामंडळाचं अध्यक्षपद जाहीर करण्यात आलं असून, लवकरच काही आमदार तसंच पक्षाच्या नेत्यांची महामंडळावर देखील नियुक्ती केली जाणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.

****

मुंबई - नागपूर समृद्धी महामार्ग नोव्हेंबर महिन्यात सुरू करण्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ते काल नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते. नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं काम जवळपास पूर्ण होत आलं आहे. हा टप्पा लवकरात लवकर सुरु करण्याचा प्रयत्न असून, येत्या नोव्हेंबरपर्यंत हा मार्ग सुरु करण्यात येणार असल्याची माहिती, मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिवाळीतच या पहिला टप्प्याचं लोकार्पण होणार असल्याचं वृत्त होतं, मात्र, आता पुढच्या महिन्यात समृद्धी महामार्गाचं लोकार्पण होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी काल गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यात, धोडराज तपासणी नाक्यावर तैनात पोलिसांसोबत, दिवाळी साजरी केली. गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री असल्यापासून इथल्या पोलिसांसोबत दिवाळी साजरी करण्याची आपली प्रथा आहे, मुख्यमंत्री झाल्यावरही त्यामध्ये कुठलाही फरक पडला नसल्याचं, त्यांनी सांगितलं. जिल्ह्यातला नक्षलवाद आता हळूहळू संपत असून, नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी पोलीस दल सक्षम असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान या दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे यांनी स्थानिकांशी संवाद साधला. गडचिरोली जिल्ह्यात नवीन उद्योग आणि विविध योजनांद्वारे नागरिकांच्या हाताला काम देण्याच्या अनुषंगाने राज्य शासनानं पावलं उचलली असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी आदिवासी नागरिकांना ब्लँकेट, फवारणी संच आणि बालकांना मिठाई तसंच शाळेसाठी दप्तरांचं वितरणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं.

काल सायंकाळी मुख्यमंत्र्यांनी मुंबईत वर्षा या शासकीय निवासस्थानी राज्यभरातून आलेल्या काही शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. यंदा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी त्यांना धीर दिला. ते म्हणाले,

शेवटी शेतकरी हा बळीराजा आहे, अन्नदाता आहे. हा अडचणीत असतो तेव्हा सरकारने त्याच्या मागे उभं रहायचं असतं. आणि शेवटी आपलं जे काही जीवन आहे, हे आपल्या कुटुंबापुरतं मर्यादित नसतं, आपण इतरही लोकांसोबत काम करत असतो, सगळ्यांसाठी काम करत असतो. त्यामुळे प्रत्येक माणसाने, शेतकर्याने, कुठल्याही अशा संकट समयी, बघा आमच्यावर पण किती संकटं आली, आपण धीराने तोंड दिलं ना, आणि यशस्वी झालो आपण. बरोबर की नाही? तशी आपली जिद्द आपल्याला कायम ठेवायची आहे. 

मुख्यमंत्र्यांनी सर्व शेतकऱ्यांचं सपत्निक औक्षण करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि कपडे तसंच दिवाळी फराळाचं वाटप केलं. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

भूविकास बॅकेच्या संदर्भात जेष्ठे नेते शरद पवार यांनी केलेलं वक्तव्य राजकीय हेतूने असून, यापूर्वी सर्व सतास्थाने ताब्यात असताना सुद्धा भूविकासच्या कर्जदार  शेतकऱ्यांचे सातबारा त्यांना  कोरे करता आले नाहीत, अशी टीका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर इथं ते काल बोलत होते. शिंदे - फडणवीस सरकार राज्यात शेतकरी हिताचे निर्णय घेत असून, शेतकरी हाच आमचा प्राधान्यक्रम असल्याचं त्यांनी नमूद केलं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकार बरखास्तीबाबत केलेलं वक्तव्य हे प्रसिद्धी मिळवण्याचा एक भाग असून, नाना पटोले यांनी बैठक बोलावून प्रदेश काँग्रेस कार्यकारणी बरखास्त करण्याचा ठराव मांडावा, असा सल्ला विखे पाटील यांनी दिला.

****

वीस विद्यार्थ्यांपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद होणार असल्याच्या बातम्या निराधार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं आहे. अशा शाळांबाबत केंद्राकडून विचारणा झाल्यामुळे त्यांची माहिती घेण्याचं काम सुरु केलं, मात्र या शाळा बंद करण्याबाबत कसलाही निर्णय घेतलेला नाही, असं केसरकर यांनी सांगितलं. ते म्हणाले...

कुठलाही शिक्षक अतिरिक्त झाला की त्याची नोकरी जात नाही, त्यांना अन्य ठिकाणी नोकरी दिली जाते, आणि त्याच्यासाठी वेगळा कायदा अस्तित्वात आहे महाराष्ट्रात. असं असताना आंदोलनं करणे हे मुळातच चुकीचं आहे. आम्ही जर शिक्षकांना कुठेच बेरोजगार करत नसू तर मग नेमकं याच्यामध्ये कशामुळे हे सगळे एसएमएस निघत आहेत, कशामुळे ही सगळी स्टेटमेन्ट्स निघत आहेत, हे तपासून बघायला लागेल. आणि तपासून बघितलं नाही, तर हा प्रकार महाराष्ट्रामध्ये नेहमीच चालु राहील. आणि त्याच्यामुळे भरती शंभर टक्के होणार. काही क्वेरीज काढल्या आहेत, त्यावरुन कोणी अफवा उठवू नयेत, एवढीच माझी नम्र विनंती आहे.

या शाळांमधल्या शिक्षकांच्या नोकऱ्या जाणार नाहीत, अशी ग्वाही केसरकर यांनी दिली. तसंच, याबाबत दिशाभूल करणारी, चुकीची माहिती पसरवणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

****

राज्यातल्या जिल्हा परिषद शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना मुख्यालयाच्या ठिकाणीच राहणं सक्तीचं करणाऱ्या शासन निर्णयाला, आव्हान देणाऱ्या याचिका प्रकरणी, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं, शासनाला नोटीस बजावत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे उस्मानाबाद शाखेचे जिल्हाध्यक्ष विलास कंटेकुरे यांनी दाखल केलेल्या या याचिकेवरच्या, काल झालेल्या सुनावणीत न्यायालयानं, राज्याचा वित्त विभाग तसंच ग्रामविकास विभागाचे सचिव, संबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हापरिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना ही नोटीस बजावली. जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा दुर्गम ग्रामीण भाग, वस्ती, तांडा अशा ठिकाणी असून शिक्षकांना त्यांच्या कुटुंबांच्या गरजांच्या दृष्टीनं कामाच्या ठिकाणी राहणं अशक्य आहे, असं या याचिकेत म्हटलं आहे.

****

राज्यात बत्तीस जिल्ह्यांमधल्या एकूण तीन हजार तीस गावांमध्ये कालपर्यंत जनावरांच्या लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतल्या एकूण एक लाख ४३ हजार ८९ पशुधनापैकी ९३ हजार १६६ पशु उपचारानंतर रोगमुक्त झाले आहेत, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह यांनी ही माहिती दिली. औरंगाबाद, बीड, जालना, हिंगोली, जळगांव, अहमदनगर, धुळे, अकोला, कोल्हापूर, सांगली, वाशिम, नंदुरबार आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमधल्या पशुधनाचं लसीकरण पूर्ण झाल्याची, तसंच सत्त्याण्णव टक्के गोवंशीय पशुधनाचं लसीकरण पूर्ण झाल्याची माहितीही सिंह यांनी दिली.

दरम्यान, पशुपालकांनी लंपीग्रस्त जनावरांना विलगीकरणात ठेवण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

****

या वर्षातलं अखेरचं खंडग्रास सूर्यग्रहण काल झालं. सायंकाळी चार वाजून पन्नास मिनिटांनी चंद्राची छाया पृथ्वीवर पडून ग्रहणाला प्रारंभ झाला. सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास ग्रहणमध्य अनुभवता आला. त्यानंतर सहा वाजून नऊ मिनिटांनी ग्रहणावस्थेतच सूर्यास्त झाल्याचं पहायला मिळालं. या ग्रहणात चंद्रामुळे ३६ टक्के सूर्यबिंब झाकोळलं गेल्याची माहिती, औरंगाबाद इथल्या एमजीएम विद्यापीठातल्या एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक, श्रीनिवास औंधकर यांनी दिली. औरंगाबाद इथं शहरातल्या गणेश टेकडीवर खगोलप्रेमीसांठी सामुहिक ग्रहण निरीक्षण करण्यात आलं, त्यावेळी औंधकर मार्गदर्शन करत होते. तब्बल ७० वर्षानंतर सूर्यास्तावेळी ग्रहण आल्याचं त्यांनी सांगितलं.

खंडग्रास सूर्यग्रहणानिमित्त औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथं गोदावरी गंगेत स्नान करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. सूर्यग्रहणामुळे गोदाकाठचं संत एकनाथ महाराजांचं मंदीर भाविकांसाठी खुलं ठेवण्यात आलं होतं.

****

लातूर विज्ञान केंद्रानं उपलब्ध करून दिलेल्या, सूर्यग्रहण पाहण्याच्या सुविधेला लातूरच्या नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. केंद्रानं केशवनगर परिसरात वैज्ञानिक पद्धतीनं कालचं सूर्यग्रहण पाहण्याची संधी निर्माण करून दिली होती. चाळणीच्या माध्यमातून, प्रकाश परिवर्तन करून कृत्रिम पडद्यावर मिळवलेल्या सावलीत हे खंडग्रास सूर्यग्रहण दाखवल्याचं या केंद्रानं कळवलं आहे.

****

बलिप्रतिपदा अर्थात दिवाळीचा पाडवा आज साजरा होत आहे. व्यापारी वर्गाचं नवं वर्ष आजपासून सुरू होतं. उत्तर भारतीयांमध्ये आज गोवर्धन पूजा केली जाते. यानिमित्ताने अन्नकूट हा भगवान विष्णूंना विविध पदार्थांचा नैवेद्य अर्पण करण्याचा सोहळाही साजरा केला जातो. बहीण भावाच्या नात्याचा स्नेह अधिक वृद्धिंगत करणारा भाऊबीजेचा सणही आज साजरा होत आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात २०२२ च्या खरीप हंगामातल्या पीक नुकसान भरपाईपोटी ४९४ कोटी रुपयांहून जास्त अशी विक्रमी रक्कम मिळणार असल्याची माहिती, आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी दिली आहे. काल उस्मानाबाद तालुक्यातल्या तावरजखेडा, जागजी, आरणी, पाटोदा आणि करजखेडा या गावातल्या बाधित क्षेत्राची पाहणी करून त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करताना ही माहिती दिली. या हंगामात पिकांच्या झालेल्या प्रचंड नुकसानापोटी एक लाख ऐंशी हजार हेक्टर क्षेत्रासाठी सुमारे सव्वादोन लाख शेतकऱ्यांना दोनशे पंचेचाळीस कोटी त्रेपन्न लाख रुपये अनुदान वितरित करण्यात आलं असून, अधिकच्या एक कोटी ऐंशी लाख हेक्टर बाधित क्षेत्राच्या सुमारे अडीच लाख शेतकऱ्यांची यादी मंजुरीसाठी शासनाकडे पाठवल्याचं त्यांनी सांगितलं. या मंजुरीनंतर जिल्ह्याला, आतापर्यंतचं सर्वाधिक, विक्रमी अनुदान प्राप्त होणार असल्याचं राणा जगजीतसिंह पाटील यांनी म्हटलं आहे.

****

राज्याच्या शिक्षण विभागामार्फत विविध श्रेणीतल्या विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येत असलेल्या शिष्यवृत्ती योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली असून, विद्यार्थ्यांना आता या योजनांसाठी येत्या एकतीस ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील. यामध्ये, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती, दिव्यांग तसंच अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीच्या मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती, अल्पसंख्यक विद्यार्थिनींसाठीची बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती, या योजनांचा समावेश आहे.

****

औरंगाबाद शहरातल्या छत्तीस शिवभोजन केंद्रांपैकी पस्तीस केंद्रांची मागच्या बुधवारी, म्हणजे एकोणीस ऑक्टोबरला अचानक तपासणी करण्यात आली. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या निर्देशांनुसार झालेल्या तपासणीत, दोन केंद्रं ही निकृष्ट दर्जाचं अन्न पुरवणारी आणि केंद्राशिवाय इतरत्र स्वयंपाक करणारी असल्याचं आढळून आलं. या बाबींना अतिगंभीर दोष समजून या दोन केंद्रांवर कारवाई करण्यात येणार आहे. या सीसीटीव्ही न बसवलेल्या पाच शिव भोजन केंद्रांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

****

नांदेड इथल्या सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा इथं दिवाळीनिमित्त काल हल्लाबोल उत्साहात साजरा झाला. गुरुद्वारा गेट क्रमांक एकपासून सुरु झालेली हल्लाबोल मिरवणुकीचा पुन्हा गुरुद्वारात येऊन समारोप झाला. उद्या गुरु ता गद्दी सोहळ्यानिमित्त नगर किर्तन मिरवणूक नगीनाघाट ते मुख्य सचखंड गुरुद्वारा साहिब या मार्गावरुन काढण्यात येणार आहे.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर इथल्या दुर्गा फाउंडेशनने अंध, अपंग आणि निराधार महिलांना साडी चोळी, फटाके तसंच फराळाचं वाटप करून दिवाळी साजरी केली. युवा उद्योजक ओंकार अमाने हे दुर्गा फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी याच पद्धतीने दिवाळी साजरी करत असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

ऑस्ट्रेलियातल्या सुरु असलेल्या टी २० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल ऑस्ट्रेलियानं  श्रीलंकेचा सात गडी राखून पराभव केला. श्रीलंकेनं २० षटकात ६ गडी गमावून १५७ धावा केल्या तर ऑस्ट्रेलियानं ३ गडी गमावून १६ पूर्णांक ३ षटकात १५८ धावा करत श्रीलंकेवर विजय मिळवला.

आज या स्पर्धेत इंग्लंड विरुद्ध आयर्लंड आणि न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान हे सामने होणार आहेत. तर भारताचा दुसरा सामना उद्या नेदरलँड सोबत होणार आहे.

****

महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटकसह इतरही राज्यातल्या भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या, सातारा जिल्ह्यातल्या म्हसवड इथे, सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरी यांच्या विवाह सोहळ्याची सुरुवात आज पाडव्याच्या मुहूर्तावर होणार आहे. येत्या पाच नोव्हेंबरला हा विवाह सोहळा होणार असून देवदिवाळीला, म्हणजे चोवीस नोव्हेंबरला सिद्धनाथ आणि जोगेश्वरी यांची रथयात्रेतून वरात काढल्यानंतर या सोहळ्याची सांगता होईल.

****

नदीचं प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीनं सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यातल्या तुरची या गावाच्या ग्रामपंचायतीनं एक अभिनव ठराव केला आहे. गावालगतच्या येरळा नदीचं पाणी प्रदूषित होऊ नये, यासाठी या नदीत अस्थिविसर्जन न करण्याचा ठराव या ग्रामपंचायतीनं केला आहे. मृताच्या अस्थी संबंधित कुटुंबाच्या शेतात पुरून त्यावर झाड लावावं, याशिवाय, नदीत कचरा तसंच मयत जनावरं टाकू नयेत, असे ठरावही या गावानं केले आहेत.

****

नांदेड रेल्वे विभागातल्या बदनापूर ते दिनेगाव रेल्वे स्थानकांदरम्यान उद्या सत्तावीस ऑक्टोबर ते बावीस नोव्हेंबरदरम्यान रेल्वेमार्गाच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामाकरता तीन तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे या कालावधीत औरंगाबाद ते हैदराबाद ही एक्सप्रेस गाडी दर मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी औरंगाबाद इथून, नेहमीच्या दुपारी सव्वाचार या वेळेऐवजी, संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुटेल. त्याचप्रमाणे या काळात काचीगुडा ते रोटेगाव डेमू गाडी, दर मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी, परभणी ते जालना दरम्यान सत्तर मिनिटं उशिरा धावेल, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेनं दिली आहे.

****

पावसानं काहीशी उघडीप दिल्यानंतर राज्यात आता थंडीची चाहूल लागत आहे. नाशिक जिल्ह्यात थंडी जाणवण्याला सुरुवात झाली आहे. काल सकाळी नाशिक इथं तेरा पूर्णांक चार अंश सेल्शियस तापमान नोंदवलं गेलं.

****

No comments: