Thursday, 27 October 2022

आकाशवाणी औरंगाबाद दिनांक 27.10.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date  –  27 October  2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २७ ऑक्टोबर २०२   सायंकाळी ६.१०

****

·      पाकिस्तानच्या अवैधरित्या ताब्यात असलेला भूभाग परत घेण्यासाठी सरकार वचनबद्ध - संरक्षणमंत्री राजनाथ सिंह.

·      उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाचे नेते आमदार आझम खान यांना चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी तीन वर्ष तुरुंगवास आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा.

·      लातूरचे माजी राज्यमंत्री भाई किशनराव देशमुख यांचं निधन.

·      टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा नेदरलँडवर ५६ धावांनी विजय तर दक्षिण आफ्रिकेकडून बांगलादेश १०४ धावांनी पराभूत.

आणि

·      पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना समान मानधन देण्याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची घोषणा.

****

पाकव्याप्त काश्मीरमध्ये लोकांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार होत असून पाकिस्तानच्या अवैधरित्या ताब्यात असलेला भूभाग परत ताब्यात घेण्यासाठी संसदेत पारित झालेला १९९४ च्या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्यास सरकार वचनबद्ध असल्याचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये शौर्य दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या समारंभामध्ये ते बोलत होते. भारतीय वायू सेना आजच्या दिवशी म्हणजे, २७ ऑक्टोबर १९४७ रोजी श्रीनगरमध्ये पोहोचली होती. याच घटनेचं स्मरण म्हणून शौर्य दिन साजरा केला जातोय. केंद्र सरकारनं जम्मू, काश्मीर आणि लडाखमध्ये विकासाची यात्रा सुरू केली आहे. काश्मीरसंबंधित असलेले ३७० कलम रद्द केल्यानंतर या ठिकाणच्या लोकांबद्दल असलेला भेदभाव संपल्याचं राजनाथ सिंह म्हणाले. आता हे राज्य सफलता, शांती आणि समृद्धीकडे वाटचाल करत असल्याचं ते म्हणाले.

****

उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाचे नेते आमदार आझम खान यांना चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी न्यायालयानं आज तीन वर्षांच्या तुरुंगवासाची आणि २५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान आझम खान यांनी चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी न्यायालयानं आज आझम खान यांना दोषी ठरवत त्यांना ही शिक्षा ठोठावली. या शिक्षेमुळे आझम खान यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द होण्याची शक्यता आहे.

****

लातूर जिल्ह्यातील माजी राज्यमंत्री भाई किशनराव देशमुख यांचं आज पहाटे वृद्धापकाळानं लातूर इथल्या खासगी रुग्णालयात निधन झालं. ते ९० वर्षांचे होते. अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचं त्यांनी तीन वेळा प्रतिनिधीत्व केलं. १९७८ ते ८० या काळात राज्य मंत्रीमंडळात त्यांनी महसूल आणि नियोजन खात्याचं राज्यमंत्रीपद भूषवलं. मराठवाडा विकास आंदोलन समितीचे अध्यक्ष, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड संस्थाचालक संघाचे संस्थापक अध्यक्ष, विचार विकास मंडळाचे अध्यक्ष, लोकायत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य, अशा विविध पदावर त्यांनी काम केलं आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत तसंच गोवा विमोचन लढ्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. यासाठी त्यांनी दोन वेळा तुरुंगवास भोगला आहे. त्यांच्या पार्थिवावर नांदुरा खुर्द इथं या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

****

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार विद्युत सहाय्यक संवर्गातील उमेदवारांच्या जारी करण्यात आलेल्या सुधारित निवड यादीप्रमाणे येत्या २९ आणि ३० ऑक्टोबर रोजी प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. निवड झालेल्या तसंच प्रतिक्षा यादीवरील उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची परिमंडलनिहाय पडताळणी केली जाईल. महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक या संवर्गाची रिक्त पदे भरण्याकरिता ३ वर्षांच्या निश्चित कालावधीकरिता कंत्राटी पद्धतीनं उमेदवारांची निवड करण्यात येत आहे यासाठी एप्रिल आणि जुलै २०१९ मध्ये विद्युत सहाय्यक या पदांच्या भरतीबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.

****

ऊर्जा दक्षता ब्युरो आणि महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण यांच्यातर्फे पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या दोन उत्कृष्ट चित्रांसह डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट बीस स्टुडंट्स अवॉर्ड डॉट इन या संकेतस्थळावर ३१ ऑक्टोबरपर्यंत नाव नोंदणी करायची आहे. पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे राष्ट्रीय पातळीवर १ लाख रुपये, ५० हजार आणि ३० हजार रुपये रोख पारितोषिकं तसंच राज्यस्तरीय पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे ५० हजार, ३० हजार आणि २० हजार रुपये रोख पारितोषिक दिलं जाणार आहे. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी ५० उत्कृष्ट चित्रांची निवड करून स्पर्धकांना बालदिनी १४ नोव्हेंबरला स्पर्धास्थळी चित्र काढण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धेचे विषय आणि अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्यावी तसंच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं या स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन महाऊर्जाचे विभागीय महाव्यवस्थापक वैभवकुमार पाथोडे यांनी केलं आहे.

****

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात भारतानं नेदरलँडवर ५६ धावांनी विजय मिळवला तर दक्षिण आफ्रिकेनं बांगलादेशला १०४ धावांनी पराभूत केलं. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित २० षटकांत दोन बाद १७९ धावा केल्या. कर्णधार रोहीत शर्मानं ५३ धावा केल्या तर, सूर्यकुमार यादव ५१ आणि विराट कोहली ६२ धावांवर नाबाद राहिले. प्रत्युत्तरात नेदरलँडचा संघ निर्धारित २० षटकांत ९ बाद १२३ धावांच करू शकला. अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेलनं प्रत्येकी दोन गडी बाद केले.

दक्षिण आफ्रिकेनंही नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करतांना निर्धारीत २० षटकांत पाच बाद २०५ धावा केल्या. प्रत्युत्तरात बांग्लादेशचा संपूर्ण संघ १६ षटकं तीन चेंडूत १०१ धावा करुन सर्वबाद झाला.

सध्या पाकिस्तान आणि झिम्बांब्वे यांच्यात सामना सुरू आहे. झिम्बाब्वेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तोपर्यंत झिम्बांब्वेनं १९ षटकांत सात बाद १२० धावा केल्या होत्या.

****

पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना समान मानधन देण्याची घोषणा आज भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं केली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. करारबद्ध महिला आणि पूरूष क्रिकेटपटूंसाठी वेतनामध्ये लैंगिक समानता आणण्याच्या दृष्टीकोनातून हे पाऊल उचलले असल्याचं शाह यांनी सांगितलं. कसोटी सामन्यांसाठी १५ लाख रुपये, एकदिवसीय सामन्यांसाठी ६ लाख रुपये आणि टी-ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी ३ लाख रुपये मानधन देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

****

१७ वर्षांखालील महिला फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या प्रचारासाठी मुंबईत फुटबॉल प्रचार रथ तयार करण्यात आला आहे. नवी मुंबई परिवहन -एनएमएमटीच्या सध्या वापरात नसलेल्या जुन्या बसचे चित्ररथात रुपांतर करण्यात आलं आहे. यात महिला फुटबॉलचा प्रसार आणि महिला सक्षमीकरणाचा प्रसार करण्यावर भर देण्यात आला आहे. रविवारी नवी मुंबईतल्या नेरुळ इथं या स्पर्धेतील अंतिम सामना होणार आहे.

****

परभणी जिल्ह्यात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनानिमित्त सोमवारी विशेष दौडचं आयोजन करण्यात आलं आहे. या उपक्रमाअंतर्गत परभणीत सोमवारी प्रियदर्शनी इंदिरा गांधी जिल्हा क्रीडा संकुल येथून सकाळी ७ वाजता या एकता दौडला सुरुवात होईल. विसावा कॉर्नर, गांधी पार्क, शिवाजी चौक, महात्मा फुले पुतळामार्गे जिल्हा क्रीडा संकुलापर्यंत ही दौड जाईल. असं जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी सांगितलं.

लातूरमध्येही सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ३१ तारखेला जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्ह्यातील एकविध क्रीडा संघटनेच्या संयुक्त विद्यमाने सकाळी साडेसात वाजता राष्ट्रीय एकता दौडचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हा क्रीडा संकुल इथून सकाळी साडेसात वाजता दौडला सुरुवात होणार असून आदर्श कॉलनी, राजीव गांधी चौक मार्गे जिल्हा क्रीडा संकुल इथं दौडचा समारोप हेाणार आहे. तरूणांनी या दौडमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केलं आहे.

****

नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीनं बाधित सिन्नर तालुक्यातील सोनारी गावाची आज राज्याचे माजी पर्यावरण आणि पर्यटन मंत्री शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार सचिन अहिर, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी तसंच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर होते.

****

No comments: