Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 October 2022
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ ऑक्टोबर
२०२२ दुपारी १.०० वा.
****
अतीवृष्टीमुळे
नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज
नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. परतीच्या पावसाच्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर
करायला सांगितले आहेत. ते निकषात बसोत अथवा न बसोत, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार
असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या नियमापेक्षा
कितीतरी पटीने जास्तीची नुकसानभरपाई दिलेली असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान,
गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड इथं अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागात पोलिसांसोबत दिवाळी
साजरी करण्यासाठी मुख्यमंत्री नागपूरहून रवाना झाले. दिवाळी सारख्या सणाला आपल्या घरापासून
दूर राहणाऱ्या ,आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस दलासोबत दिवाळी साजरी
करणं समाधानाची बाब असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
****
राज्यात
सर्व शहरांमधून आज सायंकाळी सुर्यास्तावेळी खंडग्रास सुर्यग्रहण अनुभवता येणार आहे.
दिवाळी निमित्त पृथ्वीवर दीपोस्तवाची रोषणाई सोबतच आकाशातही सूर्यग्रहणाची सुंदर रोषणाई
पहायला मिळणार असल्याची माहिती, एमजीएम विद्यापीठातल्या एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ
विज्ञान केंद्राचे संचालक, श्रीनिवास औंधकर यांनी दिली आहे. या सूर्यग्रहणाला साधारण
सायंकाळी चार वाजून पन्नास मिनिटांनी सुरुवात होणार आहे. मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यात
वेगवेगळ्या वेळी हे ग्रहण खंडग्रास स्थितीत दिसणार आहे. ग्रहण मध्य संध्याकाळी पाच
वाजून ४२ मिनिटांनी होईल. त्यावेळी चंद्रबिंब सूर्यबिंबाचा ३६ टक्के भाग झाकून टाकणार
आहे. पश्चिम आकाशात सुर्यास्तावेळी हे सुंदर दृश्य पाहता येणार आहे. नंतर ग्रहण सुटण्याआधीच
संध्याकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी ग्रहणातच सूर्यास्त होतांनाचं सूंदर दृष्य दिसणार
असल्याचं औंधकर यांनी सांगितलं.
****
संरक्षण
दलप्रमुख जनरल अनिल चौहान यांनी जम्मू आणि काश्मीरमधल्या राजौरी भागात सीमेवरील सैन्य
तळाला भेट दिली आणि कर्तव्य बजावण्यासाठी तैनात असलेल्या सैनिकांसोबत दिवाळी साजरी
केली. व्हाईट नाइट कॉर्प्स कमांडर लेफ्टनंट जनरल मनजिंदर सिंग यावेळी उपस्थित होते.
सीडीएस चौहान यांनी नौशेरा सेक्टरमधल्या युद्धस्मारक नमन स्थळावर पुष्पहार अर्पण करुन
देशसेवेसाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या शूरवीरांना आदरांजली वाहिली.
****
देशात कोविड
प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २१९ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल २३ हजार ७९१
नागरिकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत २१९ कोटी ५६ लाख ६५ हजार ५९८ मात्रा देण्यात
आल्या आहेत.
दरम्यान,
काल देशात ८६२ नव्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर एक हाजर ५०३ रुग्ण
बरे झाले. देशात सध्या २२ हजार ५४९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी येत्या रविवारी ३० ऑक्टोबरला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून
देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ९४वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या
सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम सुरु होईल.
****
प्रत्येक
बालक सशक्त असण्याबरोबरच या मुलांना सक्षम आणि कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यासाठी महिला
आणि बालविकास विभाग प्रयत्नशील असल्याचं या खात्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी
म्हटलं आहे. मुंबईत माटुंगा इथल्या द बेहेरामजी जीजीभॉय होम फॉर चिल्ड्रेन आणि श्रद्धांनंद
बालगृह या संस्थांना भेट देऊन लोढा यांनी तिथल्या बालकांसोबत दिवाळी साजरी केली, त्यावेळी
ते बोलत होते. राज्यातल्या प्रत्येक बालकाला निरामय आरोग्य लाभावं, यासाठी महिला आणि
बालविकास विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबवण्यात येत आहेत, बालकांचा सर्वांगिण
विकास हेच ध्येय ठेवून शासन यापुढे नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेणार असल्याचं लोढा यांनी
सांगितलं.
****
तीन लाख
८० हजार ५०० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी पंढरपूर डाक विभागातल्या पोस्ट अधिकाऱ्यांसह
पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. ‘पंढरीची वारी’या नावाने पोस्टकार्ड छपाईचा अधिकार
नसताना एका खासगी कंपनीकडून ती करून घेणं, त्या कार्डांच्या विक्रीद्वारे जमा झालेले
पैसे, झालेली छपाई यामध्ये साधर्म्य नसल्याने आर्थिक अपहार केल्याप्रकरणी ही कारवाई
करण्यात आली. सन २०१९ पासून पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला
होता. मात्र गुन्हा दाखल न झाल्याने पंढरपूर न्यायालयात खासगी फिर्याद दाखल करण्यात
करण्यात आली होती.
****
फ्रान्स
खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत सुरवातीच्या फेरीत आज भारताच्या लक्ष्य सेन
आणि किदांबी श्रीकांत यांच्यात सामना होणार आहे. महिला एकेरीत सायना नेहवालचा सामना
जर्मनीच्या यवोने ली सोबत होणार आहे.
****
No comments:
Post a Comment