Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 30 October 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० ऑक्टोबर २०२२ सायंकाळी
६.१०
****
· मानसिकता बदलणं हा प्रगतीचा
मुख्य पैलू - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन.
· `ग्रीन एक्सप्रेस-वे`मुळं
औरंगाबाद ते पुणे अंतर अडीच तासांत शक्य होणार - नितीन गडकरी.
· राज्यात वारकऱ्यांची बँक
उभारण्याचा मंत्री संदीपान भुमरे यांचा मनोदय.
आणि
·
टीट्वेंटी
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारताचा डाव कोसळला.
****
मानसिकता बदलणं हा प्रगतीचा
एक मुख्य पैलू असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांच्या हस्ते
आज गुजरातमध्ये बडोदा इथं २२ हजार कोटी रुपयांच्या विमान निर्मिती प्रकल्पाच्या कोनशिलेचं
अनावरण झालं, त्यावेळी मोदी बोलत होते. सरकारनं गेल्या आठ वर्षात कौशल्य विकासावर भर
दिल्यामुळं आज उत्पादन क्षेत्रात देशानं मोठा टप्पा गाठला असल्याचं मोदी यावेळी म्हणाले.
'मेक-इन-इंडिया' आणि 'मेक-फॉर-वर्ल्ड' हा भारताचा दृष्टिकोन असेल आणि भविष्यात जगातली
प्रवासी विमानंही भारतात तयार होतील आणि त्यावर `मेड इन इंडिया` असं लिहिलं जाईल, असंही
पंतप्रधान यावेळी म्हणाले. आगामी काळात भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी संरक्षण आणि
हवाई क्षेत्र हे दोन महत्त्वाचे स्तंभ असतील, असं त्यांनी नमुद केलं. उद्या सरदार वल्लभभाई
पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिनानिमित्त गुजरातमधल्या केवडिया जिल्ह्यात `स्टॅच्यू
ऑफ युनिटी` इथं पंतप्रधान सरदार पटेल यांना आदरांजली अर्पण करतील.
****
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला
औरंगाबाद जवळ `ग्रीन एक्सप्रेस-वे` नी जोडण्यात येणार असल्याचं केंद्रीय परिवहन आणि
महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. यामुळं पुणे - औरंगाबाद प्रवास अडीच
तासांत करता येणं शक्य होणार असून नागपूर ते पुणे प्रवास आठ तासात होईल, असं त्यांनी
सांगितलं. पुणे-अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर स्थानिक वाहतूक आणि औद्योगिक वाहतुकीमुळं
अतीभार झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर या रस्त्याचा उपयोग होईल. दक्षिण भारतातून गोवा,
बंगळुरू आणि कर्नाटकातले अन्य जिल्हे पुणे - बंगळुरू महामार्गे पुढे औरंगाबाद, नागपूर
आणि पुढं मध्यप्रदेश आणि उत्तर भारतापर्यंत जोडलेला असेल. पुणे ते औरंगाबाद दरम्यान
१२० किलो मीटर प्रतितास वेगानं सर्वाधिक आर्थिक आणि वेगवान मालवाहतूक करणारं क्षेत्र
विकसित केलं जाणार आहे. यामुळं या भागातल्या आर्थिक विकासाला चालना मिळणार असल्याचं
प्रशासनानं कळवलं आहे.
****
राज्यात लवकरच वारकऱ्यांची
बँक उभारण्याचा मनोदय रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांनी व्यक्त केला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथं आज संत स्नेह मिलन कार्यक्रमात त्यांनी ही माहिती
दिली. मठांच्या विकासाला निधी देणार तसंच पैठण इथल्या संतपीठाला पूर्ण विद्यापीठाचा
दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासनही भुमरे यांनी यावेळी दिलं. ते म्हणाले...
आपल्या
वारकऱ्यांची एक बँक असली पाहिजे. तुम्ही जर पुढाकार घेतला माझी जी काही मदत असेल, ती
मदत मी तुम्हाला करेल. पण एक वारकऱ्यांची बँक जर असेल तर वेळोवेळी निश्चित मदत झाल्याशिवाय
राहत नाही. कोणाकडंही आपल्याला हात पसरवायचं काम पडणार नाही. आणि ज्यावेळेस आपल्याला
गरज पडेल त्यावेळेस आपल्या हक्काची, वारकऱ्यांची बँक राहीन.
****
केंद्र आणि राज्य सरकारच्या
वतीनं पाच लाख अनुदानातून राज्यातल्या कामगारांसाठी घरकुल बांधून देण्यात येणार असल्याची
घोषणा कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी केली आहे. सांगली जिल्ह्यातल्या मिरज इथं पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमांचं थेट प्रेक्षपण ‘मोदीजी की मन की बात
कामगारोंके साथ’ हा कार्यक्रम झाला, त्यावेळी ते बोलत होते. प्रत्येक जिल्ह्यात कामगारांसाठी
रुग्णालय, कामगार भवन, आणि कामगार क्रीडा भवन उभारण्यात येणार असल्याची घोषणाही कामगार
मंत्री सुरेश खाडे यांनी यावेळी केली. यावेळी एक हजाराहून जास्त कामगार सहभागी झाले
होते.
****
सातत्यानं महाराष्ट्राची
दिशाभूल केली जात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे
यांनी केली आहे. त्यांनी आज माध्यम प्रतिनिधींशी बोलताना, सरकारनं जबाबदारीनं वागावं,
असा सल्ला दिला आहे. प्रकल्प राज्या बाहेर जात असल्यानं आपल्याला दुःख होत आहे. या
मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीय बैठक बोलवावी. पंतप्रधानांबरोबर या मुद्द्यावर
चर्चा करण्याची गरज आहे, असंही सुळे यांनी म्हटलं आहे.
****
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रीय पोलीस स्मारकाला भेट देत देशासाठी प्राणांचे बलिदान
देणाऱ्या वीर जवानांना श्रध्दांजली वाहिली. पोलीस संग्रहालयासही राज्यपांलानी भेट दिली.
संग्रहालयात मांडण्यात आलेल्या सुरूवातीपासून आतापर्यंतच्या पोलीस व्यवस्थेतील बदलांची
त्यांनी यावेळी माहिती घेतली. राज्यपालांनी यावेळी पोलीसांच्या स्मृतीला नमन करुन आदार
व्यक्त केला.
****
प्रसिद्ध तमिळ कवी सुब्रमण्यम
भारती यांच्या जयंतीनिमित्तं ११ डिसेंबर रोजी भारतीय भाषा उत्सव साजरा करण्याचा निर्णय
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या भारतीय भाषा समितीनं घेतला आहे. याबाबतचं परिपत्रक आणि
संकल्पनापत्र संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. या अनुषंगानं विद्यापीठ अनुदान
आयोगाने उच्च शिक्षण संस्थांमध्ये भारतीय उत्सव साजरा करण्याचे निर्देश देशातल्या सर्व
विद्यापीठं आणि महाविद्यालयांना दिले आहेत.
****
येत्या एक नोव्हेंबरपासून,
राज्यातून प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातमीपत्राच्या वेळांमधे काही बदल होणार
आहेत. त्यानुसार, आकाशवाणी पुणे केंद्रावरुन प्रसारित होणारं सकाळचं राष्ट्रीय बातमीपत्र
सकाळी ९ वाजून २० मिनिट ते साडे नऊ ऐवजी सकाळी साडे आठ ते ८ वाजून ४० मिनिटे या वेळेत
प्रसारित होईल.
****
पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या
खात्यावर त्वरित जमा करावी यासह विविध मागण्यासाठी उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील
यांनी गेल्या सहा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर सुरु केलेलं उपोषण आज मागं
घेतलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा
केल्यानंतर आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांची आज सकाळी
उपोषणस्थळी भेट घेतल्यानंतर त्यांनी हे आंदोलन मागं घेतलं. विमा कंपनीसोबत बैठक घेऊ,
तसंच सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानाचे पैसे लवकरात लवकर देऊ,
असं आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिलं.
****
जालना - तिरूपती साप्ताहिक विशेष रेल्वेला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज हिरवा झेंडा दाखवून या गाडीला रवाना केलं. ही साप्ताहिक रेल्वे दर रविवारी आणि परतीच्या प्रवासात
दर मंगळवारी धावणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेनं दिली आहे.
****
ऑस्ट्रेलियात
सुरू असलेल्या टीट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आज दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या
सामन्यात भारतीय संघानं २० षटकांत नऊ बाद १३३ धावा केल्या. सूर्यकुमार यादवनं ६८ धावा
केल्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या भारतीय संघाच्या डावाची सुरुवातच
डळमळीत झाली होती. दहा षटकांमध्ये संघानं पाच फलंदाज गमावून केवळ साठ धावा केल्या होत्या.
आज सकाळच्या सत्रात झालेल्या अन्य सामन्यात बांगलादेशनं झिम्बाब्वेचा तीन धावांनी पराभव
केला. बांग्लादेशनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत २० षटकांत सात गडी बाद
१५० धावा केल्या. सलामीवीर नजमुल हुसेन शांतोनं सर्वाधिक ७१ धावा केल्या. प्रत्युत्तरात
झिम्बाब्वेचा संघ २० षटकांत ८ गडी गमावून १४७ धावाच करू शकला.
****
अमरावती
शहरातल्या मुख्य बाजारपेठेतील
एक इमारत कोसळून आज पाच जणांचा मृत्यू झाला. आज दुपारी ही दूर्घटना झाली. या ठिकाणी
बचाव पथकानं चौघांचे मृतदेह इमारतीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढले आहेत. मदत कार्य सुरू
आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. ही इमारत मोडकळीस आली होती,
अशी माहिती प्रशासनानं दिली आहे.
****
हिंगोली
जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यात लिंगी शिवारात आज हाटा पोलीस पथकानं शेतात छापा टाकुन
४६ हजार २०० रुपयांच्या किंमतीची गांजाची झाडं जप्त करण्याची कारवाई केली. याप्रकरणी
शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसमत तालुक्यातील लिंगी शिवारात शेतकरी
केशव डांगरे यांच्या कापसाच्या पिकात गांजाची झाडे संगोपन करण्यात आल्याच्या मिळलेल्या
माहीतीवरून ही कारवाई करण्यात आल्याचं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
सरदार
वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त उद्या औरंगाबादमध्ये विभागीय क्रीडा संकुल ते गजानन
महाराज मंदीर या मार्गावर एकता दौड होणार आहे. सकाळी सात वाजता एकता दौड सुरू होईल.
****
No comments:
Post a Comment