Thursday, 27 October 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 27.10.2022 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 October 2022

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २७ ऑक्टोबर २०२ दुपारी १.०० वा.

****

भारतीय लष्कर आज शहात्तरावा पायदळ सेना दिवस साजरा करत आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या निमित्तानं देशातल्या शूर पायदळ सैनिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. भारताचं पायदळ अतुलनीय साहस आणि कौशल्याचं प्रतीक असून राष्ट्र त्यांचं साहस, बलिदान आणि सेवेला नमन करतं असं राजनाथ सिंह यांनी यासंदर्भातल्या आपल्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे. लष्करप्रमुख मनोज पांडेय यांनी देखील पायदळ सेनेचे सर्व जवान, अधिकारी तसंच माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुबियांना आजच्या पायदळ सेना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारताचं पायदळ कोणत्याही स्थितीचा मुकाबला करण्यास सदैव सज्ज असतं असं पायदळाचे महानिदेशक लेफ्टनंट जनरल ए के समांतारा यांनी आकाशवाणी शी केलेल्या विशेष चर्चेदरम्यान सांगितलं.

***

गुजरात ला प्रत्येक घरात पाणी पोहोचवणारं अर्थात हर घर जल असणारं राज्य म्हणून घोषित करण्यात आलं आहे. गुजरातच्या ग्रामीण भागातल्या सर्व घरांमध्ये नळांद्वारे स्वच्छ पिण्याचं पाणी पुरवण्यात येत आहे. शासकीय आकड्यांनुसार राज्यात ९१ लाख ७३ हजार ३७८ घरांमध्ये नळजोडणी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबद्दल गुजरात सरकारचं अभिनंदन केलं आहे.  हरियाणा आणि तेलंगणानंतर गुजरात हे देशातलं तिसरं जल जीवन मिशन पूर्ण करणारं राज्य ठरलं असल्याचं गुजरातचे गृह राज्य मंत्री हर्ष सांघवी यांनी यासंदर्भातल्या आपल्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे.

***

आंतरराष्ट्रीय शांती आणि सुरक्षेसाठी दहशतवाद हा मोठा धोका असल्याचं भारतानं म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद विरोधी समितीत भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी उद्यापासून दिल्ली आणि मुंबईत सुरु होत असलेल्या दोन दिवसीय विशेष बैठकीपूर्वी हे वक्तव्य केलं. दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी नवीन आणि आधुनिक तंत्रज्ञानावापर हा या बैठकीचा विषय आहे.

विविध देशांचे परराष्ट्र मंत्री या बैठकीत सहभागी होणार आहेत.

***

नाशिक जिल्ह्यातल्या वणी इथलं श्री सप्तश्रुंगी मातेचं मंदिर आजपासून येत्या १३ नोव्हेंबरपर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी २४ तास खुलं ठेवण्यात येणार आहे. सध्या सुट्ट्यांचा हंगाम सुरु असून भाविकांची होणारी संभाव्य गर्दी पाहता देवस्थाच्या विश्वस्त संस्थेनं हा निर्णय घेतला आहे.

***

सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुक्यातल्या वाखरी इथं ऊसदराच्या प्रश्नावरुन विविध शेतकरी संघटनाचं आंदोलन सुरु आहे. दोन दिवसांपूर्वीच शेतकरी संघटनांनी ऊसाचा दर कारखानदारांनी जाहीर केल्या शिवाय कारखाने सुरु करु देणार नाही असा इशारा दिला होता. याबाबतीत दखल घेतली न गेल्यामुळे हे आंदोलन करण्यात येत आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर्सची चाकं या आंदोलनकर्त्यांनी आज फोडली. सोलापूर जिल्ह्यातलं हे आंदोलन चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

***

ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी टि्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज दक्षिण आफ्रिकेनं बांग्लादेशवर १०४ धावांनी विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करतांना दक्षिण आफ्रिकेनं निर्धारीत २० षटकात पाच बाद २०५ धावा केल्या. प्रत्युत्तरात बांग्लादेशचा संपूर्ण संघ १६ षटकं तीन चेंडूत सर्वबाद झाला.

दरम्यान, भारताचा नेदरलँडसोबतचा सामना सुरु झाला असून भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतानं पाकिस्तान सोबत खेळलेला आपला संघ कायम ठेवला असून त्यात कोणताही बदल केला नाही.

शेवटचे वृत्त हाती आलं तेव्हा भारतानं तीन षटकात एक बाद १८ धावा केल्या होत्या. के. एल राहूल ९ धावावर बाद झाला, कर्णधार रोहीत शर्मा सात तर विराट कोहली एका धावेवर खेळत आहेत.

***

देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २१९ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल जवळपास १ लाख २२ हजार नागरिकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत २१९ कोटी ५८ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, देशात काल नव्या १ हजार ११२ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर एक हजार ८९२ रुग्ण बरे झाले. देशात सध्या २० हजार ८२१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

***

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं २०२३ मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर केलं असून, हे वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचं आयोगाचे सह-सचिव सुनिल अवताडे यांनी सांगितलं. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग, महाराष्ट्र, अराजपत्रित गट-ब आणि गट-क सेवा, नागरी सेवा, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यासह अभियांत्रिकी, कृषी, अन्न आणि औषध प्रशासकीय सेवा आदी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

***

 

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.08.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 14 August 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी ...