Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
: 28 October 2022
Time
07.10 AM to 07.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २८ ऑक्टोबर २०२२ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
· सर्व राज्यांमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांची कार्यालयं सुरु करण्याची केंद्रीय
गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा
· संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीची आजपासून मुंबई
आणि दिल्लीत विशेष बैठक
· एअरबसचं तंत्रज्ञान असलेला सी-२९५ मालवाहू विमानांच्या निर्मितीचा प्रकल्प बडोद्यात
उभारणार, प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यावरुन राज्यात सरकारवर आरोप
· अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना लवकरच मदत, एकही
शेतकरी भरपाई आणि विम्यापासून वंचित राहणार नाही- कृषी मंत्री अब्दुल सत्तार
· नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुका, जानेवारी महिन्यात घेण्याच्या वृत्तात
तथ्य नसल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाचं स्पष्टीकरण
· राज्यात १४ हजार ९५६ पोलीस शिपायांची रिक्त पदं भरण्यासाठी एक नोव्हेंबर रोजी
जाहिरात प्रसिद्ध होणार
· माजी राज्यमंत्री भाई किशनराव देशमुख यांचं निधन
आणि
· टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत आणि दक्षिण आफ्रिका विजयी तर रोमहर्षक
लढतीत झिम्बाब्वेकडून पाकिस्तान एका धावेनं पराभूत
सविस्तर बातम्या
सर्व राज्यांमध्ये केंद्रीय तपास यंत्रणा - एनआयएची कार्यालयं स्थापन केली जातील,
अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे. हरियाणामधल्या सूरजकुंड इथं
गृह मंत्रालयाच्या वतीनं आयोजित दोन दिवसीय ‘चिंतन शिबिरा’त ते काल बोलत होते. आंतरराज्य
गुन्हे रोखणं ही केंद्र आणि राज्य सरकारांची संयुक्त जबाबदारी असून, असे गुन्हे रोखण्यासाठी
एक सामायिक धोरण तयार करावं लागेल, असं ते म्हणाले. कायदा आणि सुव्यवस्था ही प्रामुख्याने
राज्यांची जबाबदारी असली, तरी राज्यांच्या सीमांपलीकडून होणारे किंवा सीमा नसणारे गुन्हे
रोखणं हे एकत्रित प्रयत्नांमुळेच शक्य होऊ शकेल. त्यासाठी उपलब्ध साधनसामुग्रीचा सुयोग्य
वापर करण्यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे, असं शहा यांनी नमूद केलं.
****
आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेला दहशतवादापासून सर्वाधिक गंभीर धोका असल्याचं
भारतानं म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीची
विशेष बैठक आज आणि उद्या मुंबई आणि दिल्लीत होत आहे. त्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रांसाठी
भारताच्या स्थायी प्रतिनिधी आणि समितीच्या अध्यक्ष रूचिरा कंबोज यांनी वार्ताहरांसमोर
काल हे निवेदन दिलं. दहशतवादी कारवायांसाठी नव्या तंत्रज्ञानाच्या वापराचा मुकाबला,
ही या बैठकीमागची संकल्पना आहे. समाज माध्यमांसह इंटरनेट, आर्थिक व्यवहारांसाठीचं नवीन
तंत्रज्ञान, पैसा मिळवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धती आणि ड्रोनसारख्या मानवविरहीत
पद्धतींचा वाढता वापर दहशतवादी करत असल्यामुळे, त्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर या
बैठकीत भर दिला जाईल अशी माहिती त्यांनी दिली.
****
भारतीय रिझर्व्ह बँकेनं येत्या तीन नोव्हेंबरला पतधोरण आढावा समितीच्या अतिरीक्त
बैठकीचं आयोजन केलं आहे. निर्धारित वार्षिक वेळापत्रकात या बैठकीचा समावेश नव्हता.
यापूर्वी मे महिन्यात झालेल्या अतिरीक्त बैठकीत व्याजदरात चार दशांश टक्क्यांची वाढ
करण्यात आली होती. समितीच्या २८ ते ३० सप्टेंबर
दरम्यान झालेल्या बैठकीत व्याजदर अर्धा टक्क्यांनी वाढवून ५ पूर्णांक ९ दशांश टक्के
करण्यात आला होता.
****
भारतीय वायू दलासाठी आवश्यक असलेल्या एअरबसचं तंत्रज्ञान असलेल्या सी-२९५ या
मालवाहू विमानांच्या निर्मितीचा प्रकल्प, गुजरातमध्ये बडोद्यात उभारला जाणार आहे. संरक्षण
विभागाचे सचिव अजय कुमार यांनी काल ही माहिती दिली. येत्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचं भूमिपूजन होणार आहे.
दरम्यान, २२ हजार कोटी रूपयांचा हा प्रकल्प गुजरातमध्ये होणार असल्याच्या घोषणेनंतर
शिवसेनेचे नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
वेदांता फॉक्सकॉन प्रक्लप राज्यातून गेल्यानंतर हा प्रकल्प महाराष्ट्रात खेचून आणण्याचं
आश्वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिलं होतं. मात्र हा ही प्रकल्प राज्याबाहेत
गेला, त्यामुळे राज्य सरकार फक्त स्वत:साठी काम करत असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी
केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही हा प्रकल्प गुजरातला सुरु होणार असल्यावरुन सरकारवर
टीका केली आहे.
दरम्यान, यावर बोलताना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी, विरोधक टीका करण्यापलीकडे
आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यापलीकडे काहीही करत नाहीत, असा आरोप केला. २१ सप्टेंबर
२०२१ ला या प्रकल्पाचा केंद्र सरकारने सामंजस्य करार केला होता. त्यामुळे एक वर्षापूर्वीच
हा प्रकल्प गुजरातला नेण्याचा निर्णय कंपनीनं आणि संबंधित यंत्रणांनी घेतला होता, तरीदेखील
हा प्रकल्प महाराष्ट्रात उभारण्यासाठी प्रयत्न करू, असं आपण सांगितलं होतं, असं उदय
सामंत यांनी स्पष्ट केलं.
****
अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळेल,
एकही शेतकरी भरपाई आणि विम्यापासून वंचित राहणार नाही, असं आश्वासन, कृषी मंत्री अब्दुल
सत्तार यांनी दिलं आहे. परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातल्या मालेगाव परिसरात काल
नुकसानीची पाहणी केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. आपण स्वतः आणि अधिकारी बांधावर
जाऊन नुकसानीची पाहणी करुन माहिती गोळा करत असल्याचं ते म्हणाले. येत्या सात आठ दिवसांमध्ये
ही माहिती संकलित झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
घेतील, त्याचप्रमाणे केंद्र सरकारचंही पथक राज्यात पाहणीसाठी येणार आहे. केंद्र सरकार,
राज्य आणि पीक विमा अशी तीन प्रकारची मदत शेतकऱ्यांना दिली जाईल, असं कृषी मंत्री सत्तार
यांनी सांगितलं.
****
सरकारनं राज्यात ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे अशी आमची मागणी असून, अनेक ठिकाणी
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालं आहे, मात्र राज्य सरकार कडून ओला दुष्काळ
जाहीर करायला टाळाटाळ केली जात आहे, अशी टीका, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष
जयंत पाटील यांनी केली आहे. सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी इथं शेतकऱ्यांचा अभ्यास मेळावा
आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. जिथं जिथं लोकांचं नुकसान झालं, अशा
सर्व तालुक्यांमध्ये ओल्या दुष्काळाच्या उपाययोजना ताबडतोब सुरू केल्या पाहिजेत, अशी
मागणीही पाटील यांनी केली.
****
राज्यातल्या नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या आगामी निवडणुका, जानेवारी महिन्यात
घेण्यात येणार असल्याच्या वृत्तात तथ्य नसल्याचं स्पष्टीकरण, मुख्यमंत्री कार्यालयानं
दिलं आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून, अंतिम निकालानंतर राज्य
निवडणूक आयोग या निवडणुकांसंदर्भात निर्णय घेईल, असं मुख्यमंत्री कार्यालयानं सांगितलं
आहे.
मुदत संपलेल्या नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये प्रशासक नियुक्त केले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचं काम राज्य निवडणूक आयोगाचं आहे, त्यामुळे
राज्य शासन जानेवारी महिन्यात या निवडणुका घेणार आहे, असं प्रसारमाध्यमांमध्ये आलेलं
वृत्त तथ्यहीन असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयानं स्पष्ट केलं आहे.
****
राज्यात १४ हजार ९५६ पोलीस शिपाई पदं भरतीची जिल्हानिहाय जाहिरात एक नोव्हेंबर
रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तशा सुचना पोलीस महासंचालकाकडून राज्यातल्या पोलीस
आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना देण्यात आल्या आहेत. राज्य पोलीस मुख्यालयानं २०२१ मध्ये
रिक्त झालेल्या पदांची आरक्षण निहाय यादी जाहीर केली आहे. यामध्ये औरंगाबाद ग्रामीण
मध्ये ३९, नांदेड १५५, परभणी ७५, हिंगोली २१, तर औरंगाबाद लोहमार्ग विभागात १५४ रिक्त
पदं आहेत. रिक्त पदांमध्ये खुल्या प्रवर्गात पाच हजार ४६८ पदांचा समावेश आहे.
****
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्या एका पत्रावरुन माजी गृहमंत्री
अनिल देशमुख यांची सक्तवसुली संचालनालय - ईडी, सीबीआय, आयकर विभाग यांच्याकडून चौकशी
झाली. त्याच पद्धतीनं सत्तांतराच्या काळात कोणी कोणाला किती पैसे दिले किंवा घेतले,
याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे मुख्य प्रवक्ते,
अतुल लोंढे यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक आमदार रवी
राणा यांनी, राज्याचे माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्यावर,
पैसे घेऊन गुवाहाटीला गेल्याचे आरोप केले आहेत. हे आरोप अत्यंत गंभीर असल्याचं मतही
लोंढे यांनी व्यक्त केलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी ३० तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात
या कार्यक्रमात देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ९४ वा भाग असेल.
आकाशवाणी आणि दूरदर्शन वरच्या सर्व वाहिन्यावरून सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम प्रसारीत
होईल.
****
परभणी आणि लातूर जिल्ह्यात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनानिमित्त सोमवारी
विशेष दौडचं आयोजन करण्यात आलं आहे. या उपक्रमाअंतर्गत परभणीत सोमवारी प्रियदर्शनी
इंदिरा गांधी जिल्हा क्रीडा संकुल इथून सकाळी सात वाजता या एकता दौडला सुरुवात होईल.
विसावा कॉर्नर, गांधी पार्क, शिवाजी चौक, महात्मा फुले पुतळामार्गे जिल्हा क्रीडा संकुलापर्यंत
ही दौड जाईल. जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी ही माहिती दिली.
लातूरमध्येही जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि एकविध क्रीडा संघटनेच्या संयुक्त
विद्यमाने राष्ट्रीय एकता दौडचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हा क्रीडा संकुल इथुन सकाळी
साडेसात वाजता या दौडला सुरुवात होणार असून, आदर्श कॉलनी, राजीव गांधी चौक मार्गे जिल्हा
क्रीडा संकुल इथं दौडचा समारोप हेाणार आहे.
****
निसर्गाच्या लहरीपणासोबत कष्ट करून पिकवलेल्या शेतमालाला बाजारपेठेत योग्य भाव
न मिळाल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळत नाही. यावर उपाय म्हणून हिंगोली जिल्ह्यात
‘झेंडूची फुले अभियान’, माध्यमिक शिक्षक अण्णा जगताप यांच्या पुढाकारातून, गेल्या पाच वर्षांपासून
राबवण्यात येत आहे. हिंगोलीसह नांदेड, परभणी आणि लातूर जिल्ह्यात यशस्वी ठरत असलेल्या
या अभियानाविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर –
Byte …
नोकरीत लागलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांनी बाजारपेठेत थेट
शेतकऱ्यांकडून माल खरेदी करावा. त्यांच्याशी दर न ठरवता किमान भावात शेतकऱ्यांचा
माल खरेदी केल्यास त्यांना आर्थिक लाभ मिळेल, त्यांच्या कष्टाचे मोल होईल असा हा
अभियानाचा उद्देश आहे. हे अभियान यावर्षी दिवाळी सणात शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरले
आहे. सततच्या पावसामुळे यावर्षी झेंडूच्या फुलांची शेती नुकसानीत गेली होती. फुलांना
भाव नव्हता. पण या अभियानाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांना दिलासा
देणारा हा उपक्रम शेतकऱ्यांच्या इतर उत्पादनाबाबतही कार्यरत व्हावा अशी
शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम हिंगोली.
****
लातूर जिल्ह्यातले राज्याचे माजी राज्यमंत्री भाई किशनराव देशमुख यांचं काल
वृद्धापकाळानं निधन झालं, ते ९० वर्षांचे होते. अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचं त्यांनी
तीन वेळा प्रतिनिधीत्व केलं. १९७८ ते ८० या काळात राज्य मंत्रीमंडळात त्यांनी महसूल
आणि नियोजन खात्याचं राज्यमंत्रीपद भूषवलं. मराठवाडा विकास आंदोलन समितीचे अध्यक्ष,
विचार विकास मंडळाचे अध्यक्ष, लोकायत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, किसान शिक्षण
प्रसारक मंडळाचे सदस्य, अशा विविध पदावर त्यांनी काम केलं आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या
चळवळीत तसंच गोवा विमोचन लढ्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. यासाठी त्यांनी दोन वेळा
तुरुंगवास भोगला आहे. त्यांच्या पार्थिवावर नांदुरा खुर्द या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार
करण्यात आले.
****
ज्येष्ठ लेखिका मृणालिनी जोशी यांचं काल पुण्यातल्या त्यांच्या निवासस्थानी
वॄद्धापकाळानं निधन झालं. त्या ९५ वर्षांच्या होत्या. त्यांनी देशभक्त आणि अध्यात्मिक
व्यक्तींच चरित्रलेखन आणि काव्यलेखन केलं. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रेरणेनं मॄणालिनी
जोशी यांनी लिखाणाला सुरवात केली होती. ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ ‘वेणास्वामी’ ‘स्वस्तिश्री’ 'आलोक' 'इन्किलाब', 'अवध्य
मी! अजिंक्य मी!!' हे त्यांचे साहित्य प्रसिद्ध आहे. त्यांना २००६ मध्ये डॉ. वि.रा.
करंदीकर यांच्या हस्ते स्नेहांजली पुरस्कार प्रदान करण्यात आला.
****
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल झालेल्या
सामन्यात भारतानं नेदरलँडवर ५६ धावांनी विजय मिळवला तर झिम्बाब्वेनं पाकिस्तानचा एका
धावेनं पराभव केला. अन्य एका बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघ १०४
धावांनी विजयी झाला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित षटकांत दोन बाद १७९
धावा केल्या. सामनावीर सूर्यकुमार यादव ५१ आणि विराट कोहली ६२ धावांवर नाबाद राहिले.
कर्णधार रोहीत शर्मानं ५३ धावा केल्या. प्रत्युत्तरात नेदरलँडचा संघ निर्धारित २० षटकांत
९ बाद १२३ धावांच करू शकला.
पर्थ इथं झालेल्या रोमहर्षक सामन्यात पाकिस्तानला अवघ्या एका धावेनं पराभव पत्करावा
लागला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या झिम्बाब्वे संघानं २० षटकांत आठ बाद
१३० धावा केल्या. उत्तरादाखल पाकिस्तानच्या संघानं २० षटकांत आठ गड्यांच्या मोबदल्यात
१२९ धावा केल्या.
दक्षिण आफ्रिकेनंही नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करतांना निर्धारीत २० षटकांत
पाच बाद २०५ धावा केल्या. प्रत्युत्तरात बांग्लादेशचा संपूर्ण संघ १६ षटकं तीन चेंडूत
१०१ धावा करुन सर्वबाद झाला.
गुणतालिकेत दुसऱ्या गटात भारत अव्वल स्थानावर असून दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानावर
आहे.
या स्पर्धेत आज अफगाणिस्तान आणि आयर्लंड तसंच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात
सामने होणार आहेत.
****
प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड विभागातून नोव्हेंबर
आणि डिसेंबर महिन्यात, नांदेड - विशाखापट्टणम आणि पूर्णा - तिरूपती, या दोन विशेष साप्ताहिक
रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. नांदेड - विशाखापट्टणम ही गाडी दर शुक्रवारी
दुपारी सव्वा एक वाजता सुटेल आणि ती दुसऱ्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता विशाखापट्टणमला
पोहोचेल. परतीच्य प्रवासात शनिवारी संध्याकाळी साडेपाच वाजता विशाखापट्टणम इथून सुटेल
आणि दुसऱ्या दिवशी तीन वाजता नांदेडला पोहोचेल.
पूर्णा - तिरूपती ही गाडी दर सोमवारी १२ वाजून ४० मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या
दिवशी संध्याकाळी साडेसात वाजता तिरुपतीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात तिरूपतीहून दर
मंगळवारी रात्री सव्वा आठ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजता पूर्णेला
पोहोचेल.
****
औरंगाबाद जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या ‘वित्तीय समावेशनातून सशक्तीकरण’ मोहिमेतून ग्रामीण भागाचं
आर्थिक सशक्तीकरण करावं, असं आवाहन, केंद्रीय वित्त विभागाचे सहसचिव भूषण कुमार सिन्हा
यांनी केलं आहे. बँक अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी अस्तिककुमार
पाण्डेय, उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, जिल्हा अग्रणी बँकेचे अध्यक्ष मंगेश केदार यावेळी
यावेळी उपस्थित होते.
****
No comments:
Post a Comment