Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
: 31 October 2022
Time
07.10 AM to 07.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२२ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
·
गुजरातमधे माच्छु नदीवरचा केबल पुल कोसळून झालेल्या दुर्घटनेत,
१४० जणांचा मृत्यू
· देशात सौर ऊर्जा वापरणारी गावांची मोठी लोक चळवळ लवकरच उभी राहील- पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांना विश्वास
· नागपूरमध्ये प्रस्तावित सॅफ्रन प्रकल्प राज्याबाहेर, विरोधी पक्षांची सरकारवर टीका.
· पुणे - औरंगाबाद प्रस्तावित नवा हरीत द्रुतगती मार्ग औरंगाबाद जवळ समृद्धी महामार्गाला
जोडणार- नितीन गडकरी
· अमरावती शहरातधोकादायक इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जण ठार
· देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र अभिवादन,
ठिकठिकाणी एकता दौडचे आयोजन
· विविध मागण्यांसाठी, उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांनी सुरु केलेलं उपोषण
मागे
आणि
· टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून पाच गडी राखून
पराभव
सविस्तर बातम्या
गुजरातमधे मोरबी इथं माच्छु नदीवरचा केबल पुल कोसळून झालेल्या दुर्घटनेत, १४०
जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनी काल रात्रक्षी
घटनास्थळी भेट देऊन बचाव कार्याची पाहणी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केलं असून, आजचा अहमदाबाद
इथला रोड शो रद्द केला आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय सहायता निधीमधून मृतांच्या कुटुंबियांना
प्रत्येकी दोन लाख, तर जखमींना प्रत्येक ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
गृहमंत्री अमित शाह यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.
****
सौरऊर्जेपासून वीज निर्माण करण्यात अग्रेसर देशांमध्ये भारताचा समावेश झाला
असून, प्रामुख्यानं सौर ऊर्जा वापरणारी गावंच्या गावं उभारण्याची मोठी लोक चळवळ लवकरच
देशात उभी राहील, असा विश्वास, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. आकाशवाणीवरच्या
‘मन की बात’ या कार्यक्रमात
ते काल बोलत होते. ‘सौर ऊर्जा’ हे सूर्यदेवतेचं वरदान असून, आज संपूर्ण जगाला सौर उर्जेत आपलं भविष्य दिसत
असल्याचं त्यांनी सांगितलं.
अंतराळ क्षेत्रातल्या भारताच्या प्रगतीमुळे अवघं जग आश्चर्यचकीत झालं आहे, काही
दिवसांपूर्वीच भारतानं एकाचवेळी ३६ उपग्रहांचं अंतराळात प्रक्षेपण केलं, ही घटना म्हणजे
युवकांनी देशाला दिलेली दिवाळीची विशेष भेट होती, असं ते म्हणाले. अंतराळ क्षेत्र,
आता खासगी क्षेत्रासाठीही खुलं झालं आहे, त्यामुळे या क्षेत्रात अनेक क्रांतिकारक बदल
होऊ लागले असल्याचं ते म्हणाले.
अलिकडच्या काळात देशभरात पर्यावरणाप्रती वाढलेल्या संवेदनशीलतेचा पुनरुच्चार
पंतप्रधानांनी यावेळी केला. पर्यावरण संवर्धनासाठी देशभरात व्यक्तीगत पातळीवर केल्या
जात असलेल्या अभिनव प्रयत्नांची उदाहरणंही त्यांनी दिली. केंद्र सरकारनं पर्यावरणाचं
नुकसान होऊ न देणारी जीवनशैली, या संकल्पनेवर आधारीत सुरू केलेल्या, मिशन लाईफ, या
अभियानाचा नागरिकांनी स्विकार करावा, असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.
****
मानसिकता बदलणं हा प्रगतीचा एक मुख्य पैलू असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी म्हटलं आहे. गुजरातमध्ये बडोदा इथं २२ हजार कोटी रुपयांच्या टाटा-एअरबस सी-टू
नाइन्टी फाईव्ह या विमान निर्मिती प्रकल्पाच्या कोनशिलेचं अनावरण काल पंतप्रधानांच्या
हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. सरकारनं गेल्या आठ वर्षात कौशल्य विकासावर भर दिल्यामुळे
आज उत्पादन क्षेत्रात देशानं मोठा टप्पा गाठला असल्याचं ते म्हणाले. 'मेक-इन-इंडिया'
आणि 'मेक-फॉर-वर्ल्ड' हा भारताचा दृष्टिकोन असुन, भविष्यात जगातली प्रवासी विमानंही
भारतात तयार होतील आणि त्यावर `मेड इन इंडिया` असं लिहिलं जाईल, असंही त्यांनी नमूद
केलं. आगामी काळात भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी संरक्षण आणि हवाई क्षेत्र हे दोन
महत्त्वाचे स्तंभ असतील, असं त्यांनी सांगितलं.
****
टाटा एअरबसचा सी-२९५ लष्करी विमान वाहतूक प्रकल्पापाठोपाठ आणखी एक नागपूरमध्ये
प्रस्तावित प्रकल्प हैदराबादला गेला आहे. फ्रान्सची बहुराष्ट्रीय कंपनी सॅफ्रन, ही
विमान इंजिन दुरुस्ती देखभालचा प्रकल्प नागपूरच्या मिहानमध्ये टाकणार होती. मात्र,
जमीन मिळवण्यास विलंब झाल्यामुळे हा प्रकल्प हैदराबादला गेला. यावरुन विरोधी पक्षांनी
राज्य सरकारवर टीकेची धार तीव्र केली आहे.
महाराष्ट्राची सातत्यानं दिशाभूल केली जात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सरकारनं जबाबदारीनं वागावं, असं त्या
माध्यम प्रतिनिधींशी बोलताना म्हणाल्या. प्रकल्प राज्याबाहेर जात असल्यानं आपल्याला
दुःख होत आहे. या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीय बैठक बोलवावी, तसंच पंतप्रधानांबरोबर
देखील या मुद्द्यावर चर्चा करण्याची गरज आहे, असंही सुळे यांनी नमूद केलं. काँग्रेसचे
प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही यावरुन सत्ता पक्षावर टीका केली.
****
पुणे आणि औरंगाबाद दरम्यानचा प्रस्तावित नवा हरीत द्रुतगती मार्ग औरंगाबाद जवळ
समृद्धी महामार्गावर औरंगाबादला जोडला जाईल, यामुळे पुणे ते नागपूर हे अंतर केवळ आठ
तासात गाठणं शक्य होईल, असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी
यांनी म्हटलं आहे. हा प्रस्तावित मार्ग भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीनं
बांधला जाईल, असं त्यांनी ट्.विट संदेशात सांगितलं आहे. या मार्गावरून पुणे आणि औरंगाबादमधलं
अंतर सव्वा दोन तासात, तर औरंगाबाद आणि नागपूरमधलं अंतर साडेपाच तासात गाठणं शक्य होईल,
असं गडकरी म्हणाले. हा नवा मार्ग १२८ किलोमीटरचा असेल, यापैकी ३९ किलो मीटरचा मार्ग
पुणे शहराभोवतीचा रिंग रोड असेल. यावर एकूण आठ मार्गिका असतील. राज्यातल्या अहमदनगर,
बीड आणि औरंगाबाद या जिल्ह्यांतून हा मार्ग जाईल. या नव्या मार्गामुळे पुणे - बंगळूरू
द्रुतगती मार्गावरून गोवा तसंच बंगळूरूसह कर्नाटकातले काही जिल्हे पुणे, औरंगाबाद आणि
नागपूरला जोडले जातील, आणि त्यापुढे ते मध्यप्रदेश आणि उत्तर भारतालाही जोडले जातील,
अशी माहिती गडकरी यांनी आपल्या संदेशात दिली आहे.
****
अमरावती शहरातल्या गजबजलेल्या प्रभात चौकात धोकादायक इमारत कोसळून झालेल्या
दुर्घटनेत पाच जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. काल दुपारी ही दुर्घटना घडली. बचाव
पथकाच्या कर्मचाऱ्यांनी ढिगाऱ्याखालून पाच जणांचे मृतदेह बाहेर काढलं असून, जखमींना
उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. हे सर्वजण कोसळलेल्या इमारतीच्या तळमजल्यावरील
दुकानात होते. ही इमारत धोकादायक असल्याचं महापालिकेनं जाहीर केलं होतं, काही महिन्यांपूर्वी
या इमारतीचा काही भागही पाडला होता. त्याचवेळी तळमजल्यावरील दुकानदारालाही जागा रिकामी
करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतू दुकानदारानं जागा रिकामी न करता तिथं डागडुजीचं
काम सुरू केलं, हे काम सुरू असतानाच ही दुर्घटना घडली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेत बळी पडलेल्यांच्या नजिकच्या नातेवाईकांना
पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींच्या उपचारांचा खर्च राज्य सरकार करेल,
असं त्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त
केला आहे. याची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
केंद्र आणि राज्य सरकारतर्फे पाच लाख रुपये अनुदानातून राज्यातल्या कामगारांसाठी
घरकुल बांधून देण्यात येणार असल्याची घोषणा, कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी केली.
सांगली जिल्ह्यातल्या मिरज इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या `मन की बात` कार्यक्रमांचं
थेट प्रेक्षपण, ‘मोदीजी की मन की बात कामगारोंके साथ’, हा कार्यक्रम काल झाला,
त्यावेळी ते बोलत होते. प्रत्येक जिल्ह्यात कामगारांसाठी रुग्णालय, कामगार भवन, आणि
कामगार क्रीडा भवन उभारण्यात येणार असल्याची माहिती खाडे यांनी दिली.
****
देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना
सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. हा दिवस देशभरात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा
केला जात असून, औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद आणि बीड
शहरात यानिमित्त एकता दौड होत आहे.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन
करण्यात येत आहे.
****
उद्यापासून राज्यात आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या मराठी राष्ट्रीय बातमीपत्राच्या
वेळांमधे काही बदल होणार आहेत. त्यानुसार, आकाशवाणी पुणे केंद्रावरुन प्रसारित होणारं
सकाळचं नऊ वाजून २० मिनिटांचं राष्ट्रीय बातमीपत्र, आता साडे आठ वाजता प्रसारित होईल.
आकाशवाणी मुंबई केंद्रावरून रात्री सव्वा नऊ वाजता प्रसारीत होणारं राष्ट्रीय बातमीप,त्र
आता रात्री आठ वाजता प्रसारित होईल.
****
पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित जमा करावी यासह विविध मागण्यांसाठी,
उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांनी सुरु केलेलं उपोषण काल अखेर मागे घेतलं. मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी
चर्चा केल्यानंतर आंदोलन मागे घेतल्याचं पाटील यांनी सांगितलं. गेली सहा दिवस हे उपोषण
सुरू होतं. विमा कंपनीसोबत बैठक घेऊ, तसंच सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीनं झालेल्या
नुकसानाचे पैसे लवकरात लवकर देऊ, असं आश्वासन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं. उस्मानाबाद
जिल्ह्याला नुकसान भरपाईचे २८२ कोटी रुपये येणं आहे. त्यातले अतिवृष्टीचे ५९ कोटी रुपये
दोन दिवसांत देण्याचं आश्वासन मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव असीम गुप्ता यांनी दिल्याचं
खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी या संदर्भात सांगितलं. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर
महिन्यात झालेल्या अतिवृष्टीची ६० कोटी रुपयांची नुकसानभरपाई आज जमा होणार आहे. सकारात्मक
निर्णय झाल्यानं आमदार पाटील यांनी उपोषण मागे घेतलं.
****
राज्यात लवकरच वारकऱ्यांची बँक उभारण्याचा मनोदय रोजगार हमी योजना मंत्री संदिपान
भुमरे यांनी व्यक्त केला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथं संत स्नेह मिलन कार्यक्रमात
ते काल बोलत होते. मठांच्या विकासाला निधी देणार तसंच पैठण इथल्या संतपीठाला पूर्ण
विद्यापीठाचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासनही भुमरे यांनी दिलं.
ते म्हणाले,
Byte….
आपल्या
वारकऱ्यांची एक बँक असली पाहिजे. तुम्ही जर पुढाकार घेतला माझी जी काही मदत असेल, ती
मदत मी तुम्हाला करेल. पण एक वारकऱ्यांची बँक जर असेल तर वेळोवेळी निश्चित मदत झाल्याशिवाय
राहत नाही. कोणाकडंही आपल्याला हात पसरवायचं काम पडणार नाही. आणि ज्यावेळेस आपल्याला
गरज पडेल त्यावेळेस आपल्या हक्काची, वारकऱ्यांची बँक राहीन.
****
जालना - तिरूपती साप्ताहिक विशेष रेल्वेला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब
दानवे यांनी काल हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. ही साप्ताहिक रेल्वे दर रविवारी आणि
परतीच्या प्रवासात दर मंगळवारी धावणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेनं दिली आहे.
मराठवाड्यातल्या जनतेला तिरुपती बालाजी दर्शनाला जाण्यासाठी दीर्घ काळापासून रेल्वे
गाडी सुरु करण्याची मागणी पूर्ण झाल्याचं दानवे यावेळी म्हणाले. परभणी, परळी, बिदर,
कलबुर्गी गुंटकल मार्गे ही रेल्वे तिरुपतीला जाईल.
****
हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यात लिंगी शिवारात पोलिसांनी काल ४६ हजार २००
रुपये किंमतीची गांजाची झाडं जप्त केली. केशव डांगरे यांच्या कापसाच्या पिकात गांजाची
झाडे असल्याच्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.
****
नांदेड जिल्ह्यात आजपासून सहा नोव्हेंबर पर्यंत “भ्रष्टाचार मुक्त भारत - विकसित
भारत” या संकल्पनेवर
आधारित दक्षता जनजागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज सकाळी ११ वाजता भ्रष्टाचार
निर्मूलनाची प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे. या सप्ताहात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्याचे
निर्देश विविध विभागांना देण्यात आले आहेत.
****
ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या विश्वचषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत काल झालेल्या
सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारताचा पाच गडी राखून पराभव केला. भारतानं विजयासाठी ठेवलेलं
१३४ धावांचं आव्हान दक्षिण आफ्रिकेनं शेवटच्या षटकात दोन चेंडू शिल्लक असताना साध्य
केलं. डेव्हीड मिलरनं नाबाद ५९ तर एडन मार्क्रमनं ५२ धावा केल्या. नाणेफेक जिंकून प्रथम
फलंदाजी स्वीकारलेल्या भारतीय संघानं सूर्यकुमार यादवच्या ६८ धावांच्या जोरावर नऊ बाद
१३३ धावा केल्या. भारतानं स्पर्धेतले या पुर्वीचे दोन सामने जिंकले आहेत. संघाचा या
स्पर्धेतला पुढचा सामना येत्या रविवारी बांगलादेशविरुद्ध होणार आहे.
अन्य सामन्यात बांगलादेशनं झिम्बाब्वेचा तीन धावांनी पराभव केला. बांग्लादेशनं
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत २० षटकांत सात बाद १५० धावा केल्या. सलामीवीर
नजमुल हुसेन शांतोनं सर्वाधिक ७१ धावा केल्या. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेचा संघ २० षटकांत
८ बाद १४७ धावाच करू शकला. काल झालेल्या आणखी एका सामन्यात पाकिस्ताननं नेदरलँड संघाचा
सहा गडी राखून पराभव केला.
या स्पर्धेत आज ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंड यांच्यात लढत होणार आहे.
****
नवी मुंबईत सुरू असलेल्या १७ वर्षाखालील महिला फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत
तिसऱ्या क्रमांकावर नायजेरियाचा संघ विजयी झाला आहे. नायजेरिया आणि जर्मनी या संघांमध्ये
तिसऱ्या क्रमांकासाठीच्या काल झालेल्या सामन्यात दोन्ही संघांना ३-३ गुण मिळाले. सामना
बरोबरीत झाल्यामुळे घेण्यात आलेल्या पेनल्टी शूटआऊट मध्ये नायजेरियाला ३ आणि जर्मनीला
२ गुण मिळाले.
****
जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातल्या जांब समर्थ इथल्या मूर्ती चोरी प्रकरणी
स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीनं काल पाचव्या आरोपीला हैदराबाद इथून ताब्यात घेतलं. चोरीला
गेलेल्या पाचही मूर्त्या देखील ताब्यात घेतल्याचं पोलिसांनी सांगितलं.
****
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काल उस्मानाबाद जिल्ह्यात
कौडगाव, आंबेजवळगा आणि कारी इथं अतिवृष्टीनं झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. त्यांनी कारी इथं आत्महत्या केलेले शेतकरी
वाघे यांच्या घरी भेट देऊन कुटुंबियांना आर्थिक मदत केली. मोठ्या प्रमाणात शेतकर्यांचं
नुकसान झालेलं असतानाही सराकरकडून एक रुपयाही मदत मिळाली नसल्याचा आरोप दानवे यांनी
यावेळी केला.
****
उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडीचा कडाका वाढत आहे. किमान
तापमानात घट झाली आहे, तर कमाल तापमानात चढ-उतार कायम आहे. रात्री आणि पहाटेच्या वेळी
थंडीचा कडाका अधिक जाणवू लागला आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात
लक्षणीय घट झाली आहे.
****
No comments:
Post a Comment