Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 31 October 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ ऑक्टोबर २०२२ सायंकाळी
६.१०
****
·
पुण्याजवळ रांजणगावमध्ये इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर तसंच सी डॅकचा
इलेक्ट्रॉनिक्स डिझाईनिंग प्रकल्प उभारण्याची
केंद्र सरकारची घोषणा.
·
वस्त्रोद्योग पार्कच्या मंजुरीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात.
·
महाविकास आघाडी सरकारच्या
काळात राज्याबाहेर गेलेल्या प्रकल्पाचे पाप आमच्या
माथी मारु नका, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन.
·
आमदार बच्चू कडू आणि
आमदार रवी राणा यांच्यातील वाद मिटला.
·
उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस आकड्यांचा खेळ करुन जनतेची दिशाभूल करत असल्याचा माजी मंत्री आदित्य
ठाकरे यांचा आरोप.
·
लोहपुरुष सरदार
वल्लभभाई पटेल यांची जयंतीनिमित्त देशभरात एकता दौड.
आणि
·
माजी पंतप्रधान
इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्वत्र अभिवादन.
****
पुण्याजवळ रांजणगावमध्ये इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर उभारण्याची
घोषणा केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर
यांनी केली आहे. या क्लस्टरमध्ये दोन
हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल तसंच यातून पाच हजार
रोजगार निर्मिती होईल, अशी अपेक्षा राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी व्यक्त
केली आहे. स्टार्ट-अपला प्रोत्साहन देण्यासाठी हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. याशिवाय सी डॅकचा एक इलेक्ट्रॉनिक्स
डिझाईनिंग प्रकल्पही राज्यात होणार असल्याचं चंद्रशेखर यांनी
सांगितलं. साधारण एक हजार कोटी रूपयांच्या गुंतवणुकीचा हा प्रकल्प
असणार आहे असं ते म्हणाले.
जवळपास
२९७ एकर जागेवर हे क्लस्टर उभारलं जाईल. या
प्रकल्पातंर्गत आयएफबी रेफ्रिजरेशन कंपनीनं ४५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. याशिवाय इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स, कन्झ्युमर
इलेक्ट्रॉनिक्स, सोलार पीव्ही मॅन्युफॅक्चरिंग, ई मोबिलिटी उत्पादक असे अनेक उद्योग या निमित्तानं राज्यात येतील, अशी
अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
****
राज्यात
इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर उभारण्याची घोषणा केल्याबद्दल
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र
सरकराचे आभार मानले आहेत. केंद्रानं राज्याला
ही भेट दिली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मुंबईत वार्ताहरांशी बोलतांना ते म्हणाले...
महाराष्ट्राला
इलेक्ट्रॉनिक्स हब म्हणून ते विकसित करतील. फ्यूचर - भविष्य हे इलेक्ट्रॉनिकमध्ये आहे.
सर्वाधिक गुंतवणूक आणि सर्वाधिक रोजगार हा इलेक्ट्रॉनिक्समध्ये आहे. त्यामुळे एक प्रकारे
केंद्र सरकानं दिलेली ही भेटच आहे. यासोबतच लवकरच मला अपेक्षा आहे. केंद्र सरकार टेक्सटाईल
पार्क देणार आहे. आणि टेक्सटाईल क्लस्टर त्यातून एक महाराष्ट्रामध्ये तयार होणार आहे.
याचं प्रपोजल अंतिम टप्प्यामध्ये आता सादर झालेलं आहे. नविन वर्षात त्या संदर्भात बजेट
पर्यंत याची घोषणा होण्याची शक्यता आहे किंवा बजेटच्या आधी देखिल ते घोषित होवू शकतं.
राज्याबाहेर जात असलेल्या प्रकल्पांबाबत बोलतांना उपमुख्यमंत्री
फडणवीस यांनी फॉक्सकॉनचा प्रकल्प राज्यात येणार नाही, असं तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई
यांनी स्पष्ट केलं होतं. ते म्हणाले...
पहिला फेक नरेटिव्ह हा फॉक्सकॉनचा तयार करण्यात आला की, आमचं सरकार आलं आणि फॉक्सकॉन गेलं. फॉक्सकॉन महाराष्ट्रात येणार नाही कोणाच्या काळात म्हटलं आहे. उद्धव ठाकरेजींच्याच काळात म्हटलं आहे. त्यानंतर टाटा एअरबस गुजरातला जाण्याचा निर्णय हा टाटा एअरबस करतय २०२१ ची गोष्ट आहे. हे चालले आहेत यांना थांबवलं पाहिजे परंतु कुठलीही कारवाई झाली नाही. एक साधं पत्रही गेलं नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार असतांना टाटा एअरबस हा प्रोजेक्ट महाराष्ट्रातनं गेलाय आणि त्याच्यावर कहर म्हणजे तर सॅफ्रॉन २०२१ मध्ये गेला त्याची फॅक्ट्री तयार झाली आहे. आणि त्यांची फॅक्ट्री तयार होवून तिचं उद्धाटन झालं. आणि इथं मात्र फेक नरेटिव्ह चालला आहे की, आमच्या सरकारच्या काळात ते गेलं.खोटं सांगावं तर त्याला काहीतरी लिमिट ठेवावी.
मेडिकल डिव्हाईस पार्क आणि बल्क ड्रग पार्क राज्याला देण्याचं केंद्र सरकारनं कधीही आश्वासन दिलं नव्हतं. मात्र तरीही केंद्र सरकारला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांना दोष दिला जात आहे,
असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. हे सगळे प्रकल्प आमच्या सरकारच्या
काळात गेलेले नाहीत. त्यामुळे त्यांचं पाप आमच्या माथी मारु नका,
असं आवाहनही फडणवीस यांनी यावेळी केलं.
नाणार
रिफायनरीचा प्रकल्प रद्द झालेला नसून हा प्रकल्प राज्यातच होणार असल्याचं फडणवीस यांनी
सांगितलं. यामध्ये ७५ टक्के हिस्सा केंद्र सरकारच्या कंपन्यांचा
आहे. १ लाख थेट रोजगार, ५ लाखांपर्यंत इतर रोजगार निर्मिती
होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
****
प्रहार संघटनेचे आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू आणि अमरावतीचे
आमदार रवी राणा यांच्यातील वाद मिटला असल्याचं उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या
उपस्थितीत कडू आणि राणा यांच्यासोबत चर्चा झाली. आमदार
कडू आणि राणा यांची समजूत काढण्यात आली असून दोघांनीही रागा- रागात आपण बोलल्याचं
मान्य केलं आहे. त्यामुळे आता हा विषय संपला असल्याचं फडणवीस
म्हणाले.
****
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आकड्यांचा खेळ करुन जनतेची दिशाभूल करण्याचा
प्रयत्न करत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे
नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते. उपमुख्यमंत्री फडणवीस सांगत असलेले
फॉक्सकॉन प्रकल्प हा दुसराच असल्याचं सांगत, २०२० मध्ये
राज्याबाहेर गेलेला फॉक्सकॉन प्रकल्प हा मोबाईल कंपनीशी संबंधित होता आणि आता
गेलेला प्रकल्प हा सेमिकंडक्टरशी संबंधित असून वेदांता फॉक्सकॉन आणि फॉक्सकॉन हे
दोन्ही वेगवेगळे प्रकल्प असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्र्यांसोबत
समोरासमोर चर्चा करण्यासाठी आपण तयार असल्याचं ठाकरे यावेळी म्हणाले. याबाबतीत मुख्यमंत्र्यांकडून उत्तर अपेक्षित होते असंही ते यावेळी म्हणाले.
****
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची आज १४७ वी जयंती. यानिमित्तानं देशभरात आज
एकता दिवस साजरा करत सर्वत्र एकता दौड काढण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीत पटेल
चौकातील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर आज सकाळी पुष्पांजली
अर्पण केली. यानंतर गृहमंत्री शहा यांनी मेजर ध्यानचंद मैदानावर आयोजित एकता
दौडीचा शुभारंभ केला.
गुजरातमधल्या केवाडिया इथं आयोजित एकता दौड संचलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी
उपस्थित होते. राष्ट्रीय छात्र सेनेच्या हम एक है,
हम श्रेष्ठ हे आणि एक भारत, श्रेष्ठ भारत या
कार्यक्रमात ते सहभागी झाले आणि त्यांनी विद्यार्थ्यांना
एकतेची शपथ दिली.
तत्पूर्वी पंतप्रधानांनी केवाडिया मधल्या 'स्टॅचू ऑफ
युनिटी' इथं सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली वाहिली.
राज्यातही आज सर्वत्र एकता दौड काढण्यात आली. औरंगाबादमध्ये आयोजित एकता दौडला
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं.
विभागीय क्रीडा संकुल ते गजानन महाराज मंदीर या मार्गावर ही एकता दौड झाली. यावेळी
राष्ट्रीय एकतेची शपथ घेऊन देशातली एकता आणि एकात्मता जोपासण्याचा संकल्प करण्यात
आला.
लातूर इथं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनय गोयल यांच्या
उपस्थितीत एकता दौड काढण्यात आली. देशाची अखंडता, एकता आणि अंतर्गत सुरक्षा कायम
राखणं ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी असून, यासाठी सर्वांनी
योगदान देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
अहमदनगर,
धुळे, नंदुरबार, वाशिम, भंडारा, यवतमाळ, जळगाव, सोलापूर, बुलडाणा, वर्धा इथं एकता दौड
निघाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.
****
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या ३८ साव्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना
सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह
पक्षाच्या अन्य नेत्यांनी दिल्लीत शक्ति स्थळ या इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळी
पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी, १४ बँकांचे राष्ट्रीयकरण, पहिली अणुचाचणी असे धाडसी
निर्णय घेऊन देशाला प्रगतीपथावर नेणाऱ्या इंदिरा गांधी यांना पुण्यतिथी दिनी
अभिवादन, असं ट्विट करत आदरांजली वाहिली
आहे.
****
No comments:
Post a Comment