Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 05 October 2022
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०५
ऑक्टोबर २०२२ दुपारी १.०० वा.
****
देशभरात
आज विजयादशमी अर्थात दसर्याचा सण साजरा होत आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी
एक असलेला हा सण शौर्य, समृद्धी आणि सौहार्दाचा सण म्हणून साजरा
करण्याची परंपरा आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूरच्या आई तुळजाभवानी
देवीचा दसरा म्हणजे सीमोल्लंघन सोहळा आज पहाटे मोठ्या उत्साहात पार पडला.
औरंगाबाद मध्ये आज संध्याकाळी ठिकठिकाणी रावण दहन होणार आहे. सिडको एन-सात इथल्या रामलीला मैदानावर उत्तर भारतीय संघाच्या
वतीनं, मयूर नगर इथं नवरात्र दुर्गा महोत्सव समितीच्या वतीनं
आणि वरुड फाटा जालना रोड इथं इस्कॉन वैदिक शिक्षण आणि सांस्कृतिक केंद्राच्या वतीनं
रावणाच्या प्रतिकृतीचं दहन करण्यात येणार आहे.
****
विजयादशमीनिमित्त मुंबईत शिवसेनेचे दोन्ही गट आज वेगवेगळे मेळावे घेणार आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातला गट शिवाजी मैदानावर,
तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातला गट बांद्रा कुर्ला संकुलातल्या
मैदानात मेळावा घेणार आहे. त्यासाठी राज्याच्या विविध भागातून
हजारो बस मुंबईत दाखल झाल्या आहेत. शिवसेना आणि शिंदे गटाने विक्रमी गर्दी जमवण्यासाठी
गेल्या काही दिवसांपासून जोरदार प्रयत्न चालविले होते. मुंबईसह मुंबई बाहेरून मेळाव्यासाठी
दाखल झालेल्या कार्यकर्त्यांची चोख व्यवस्था ठेवण्यात आली आहे. राजकीय संघर्षाच्या
पार्श्वभूमीवर होणा-या दसरा मेळाव्यासाठी पोलिसांनी दोन्ही मैदानांवर कडक बंदोबस्त ठेवला आहे. बीकेसी इथं तीन लाख कार्यकर्त्यांची भोजनाची व्यवस्था केली असून, भव्य
किचन तयार करण्यात आलं आहे.
****
महिलांना
समानतेची वागणूक दिली पाहिजे, त्यांना स्वत:चे निर्णय घेऊ दिले पाहिजे, असं राष्ट्रीय
स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय
स्वयंसेवक संघाचा विजयादशमी सोहळा नागपुरात रेशीमबाग मैदानावर पार पडला, त्यावेळी
ते बोलत होते. एव्हरेस्ट शिखर दोनदा सर करणाऱ्या महिला गिर्यारोहक आणि
पद्मश्री संतोष यादव यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
आपल्या भाषणात भागवत यांनी, नवीन राष्ट्रीय शिक्षण नीती,
अर्थव्यवस्था, धार्मिक हिंसाचार या सर्व मुद्यांवर
भाष्य केलं. देशातले विद्यार्थी हे देशभक्त
आणि उत्तम नागरिक बनण्यासाठी शालेय, महाविद्यालयीन संस्कारासोबतच
घरातले तसंच सामाजिक संस्कार होणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं.
आरोग्य सेवेच्या परवडणाऱ्या गुणवत्तापूर्ण आणि नफेखोरीमुक्त अशा सुविधा उपलब्ध
करून द्याव्यात, असं संघाने सरकारला सुचवल्याचं भागवत यांनी सांगितलं. सरकारने उद्योगशीलतेला प्रोत्साहन
दिलं पाहिजे, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार
प्रशिक्षणाच्या विकेंद्रित योजना राबवण्यासह स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध
करून दिल्या पाहिजे, असं आवाहन त्यांनी सरकारला केलं.
जे सनातन संस्कृतीत जीवन जगतात त्यांच्यामध्ये सृजन भाव निर्माण होतो, ही संस्कृती चांगल्या आरोग्यासाठी प्रेरित करते असं
मत पद्मश्री संतोष यादव यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली तो धम्मचक्र प्रवर्तन
दिन आज साजरा होत आहे. नागपूर इथल्या दीक्षाभूमी मध्ये धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त
सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली आणि बाबासाहेबांनी
दिलेल्या २२ प्रतिज्ञांचं वाचन करण्यात
आलं. संध्याकाळी
धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे.
****
केंद्र
सरकारनं बेकायदेशीर कारवाया प्रतिबंध अधिनियमाअंतर्गत हिजबुल मुजाहिद्दीन आणि लष्कर
- ए - तय्यबा या संघटनांच्या दहा सदस्यांना दहशतवादी कारवायांमध्ये त्यांच्या भुमिकेसाठी
दहशतवादी घोषित केलं आहे. केंद्रीय गृह मंत्रालयानं यासंदर्भातली अधिसूचना जारी केली
आहे. हे दहशतवादी सध्या पाकिस्तानात असल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे.
****
निवडणुकीतल्या आश्वासनांची पूर्तता करताना उद्भवणाऱ्या आर्थिक बाबींची कल्पना मतदारांना
यावी, याकरता राजकीय पक्षांनी आवश्यक अधिकृत माहिती
दिली पाहिजे, असं केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. अशा आशयाचं
पत्र आयोगाने सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना लिहीलं आहे. निवडणूक जाहीरनाम्यात
आश्वासनांमधली सुसूत्रता आणि सुसंगती स्पष्ट व्हावी, यादृष्टीनं निवडणूक
आचारसंहितेत सुधारणा करण्याचा प्रस्तावही आयोगानं दिला आहे.
****
सोलापूर विभागातल्या
ट्रॅफिक ब्लॉकमुळे निझामाबाद-पुणे-निझामाबाद
या गाडीच्या तीन तर नांदेड-पुणे-नांदेड
एक्स्प्रेस गाडीच्या दोन फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यानुसार,
पुणे निझामाबाद गाडीच्या येत्या सतरा, अठरा आणि
एकोणीस आणि वीस या तारखांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय, नांदेड पुणे या रेल्वेगाडीच्या येत्या सोळा,
सतरा आणि अठरा या तारखांच्या दोन फेऱ्या रद्द करण्यात
आल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं दिली आहे.
//********//
No comments:
Post a Comment