Monday, 24 October 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 24.10.2022 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 October 2022

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २४ ऑक्टोबर २०२ सायंकाळी ६.१०

****

·      दीपोत्सवात आज लक्ष्मीपूजनानिमित्त सर्वत्र चैतन्यमय उत्साह;पंतप्रधानांची दिवाळी कारगील इथं सैनिकांसोबत साजरी.

·      समर्पण भावनेनं काम करणारे कोविड योद्धे आणि शिक्षकांना विशेष दिवाळी बोनस जाहीर.

·      भूविकास बँकेची कर्जमाफी फसवी-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची टीका.

आणि

·      स्थानिकांकडूनच स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचं केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांचं आवाहन.

****

दीपोत्सवाच्या मंगल पर्वा आज नरक चतुर्दशी पाठोपाठ लक्ष्मीपूजनाचा सण सर्वत्र चैतन्यमय वातावरणात उत्साहात साजरा होत आहे. आज संध्याकाळी घरोघरी, तसंच व्यापारी पेठांमध्ये पारंपरिक पद्धतीनं लक्ष्मी पूजन केलं जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दिवाळी हा पवित्र सण अंधारातून प्रकाश आणि तेजाकडे जाण्याचा संदेश देतो, यानिमित्ताने हे पर्व आपल्या कुटुंबीयांसोबत आनंदाने साजरं करा, असं त्यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.

 

पंतप्रधानांनी आज कारगिल इथं सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली, सीमेवर येऊन सैनिकांसोबत दिवाळी साजरी करणं ही आपल्यासाठी सन्मानाची गोष्ट असून, सर्व सैनिक सीमेवरील कवच असल्याचं ते म्हणाले. देशभक्ती ही देवाच्या भक्तिप्रमाणेच असते, असं नमूद करत पंतप्रधानांनी सशस्त्र दलांचं कौतुक केलं. भारतासाठी युद्ध हा कधीही पहिला पर्याय नव्हता, युद्ध ही आपल्यासाठी सदैव शेवटचा पर्याय आहे, तसे आपल्यावर संस्कार असल्याचं, पंतप्रधान म्हणाले. आपल्या सेनेकडे सामर्थ्य आहे, रणनीती आहे, कोणी आपल्याकडे नजर वाकडी करून पाहात असेल तर आपले सैनिक जशास तसे उत्तर देण्यास समर्थ असल्याचा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

****

राज्यशासनानं दिवाळीचं औचित्य साधून विविध लोकोपयोगी घोषणा केल्या आहेत. कोविड काळात समर्पण भावनेनं काम करणाऱ्या आरोग्य कर्मचारी, बीएसटीचे कर्मचारी आणि शिक्षक यांच्या सन्मानार्थ विशेष दिवाळी बोनस जाहीर केला आहे.

 ‘सिडको’ च्या नवीन महागृहनिर्माण योजनेची घोषणाही करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. नवी मुंबईतील उलवे नोडमधील बामणडोंगरी आणि खारकोपर इथं परवडणाऱ्या दरात ७ हजार ८४९ सदनिका  उपलब्ध होणार आहेत. इच्छुकांनी या सोडतीचा लाभ घेण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

****

गेल्या २५- ३० वर्षांपासून कार्यरत नसलेल्या भूविकास बँकेची राज्य सरकारनं केलेली कर्जमाफी ही फसवी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. पुणे जिल्ह्यात पुरंदर आणि सासवड भागात आज त्यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. गेल्या १० वर्षांत कुणाला भूविकास बॅंकेचं कर्ज मिळालेलं नाही, त्यापूर्वी कधीतरी घेतलेल्या कर्जाची वसुली आता होणार नाही. ही बाब लक्षात घेऊन सरकारने कर्ज माफ केल्याचं जाहीर केलं, असं पवार म्हणाले. देशाची आणि राज्याची सत्ता ज्यांच्या हातात आहे, अशी दोन्ही सरकारं ग्रामीण भागातल्या माणसांसाठी काहीही करीत नाहीत, अशी टीका पवार यांनी केली. अतिवृष्टीमुळे नुकसान झालं आहे. मात्र भूजल पातळी दोन वर्षांसाठी वाढणार आहे, ही बाब लक्षात घेऊन आजच नियोजन करण्याची गरज असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे.

****

साखर विक्रीचा किमान हमीभाव तीन हजार १०० रुपयांवरुन तीन हजार ५०० रुपये करावा, अशी मागणी ऊस दर संघर्ष समितीनं केली आहे. पंढरपूर इथं झालेल्या या ऊस परिषदेत यावर्षी उसाची पहिली उचल अडीच हजार रुपये मिळाली पाहिजे, असा ठराव घेण्यात आला. सर्व कारखान्याचे वजन काटे ऑनलाईन करावेत, शेतकऱ्यांना खाजगी काट्यावरून वजन करून आणण्याची मुभा द्यावी, आवश्यक तेवढीच साखर निर्मिती करावी बाकीची इथेनॉल निर्मिती करावी, आदी ठरावही या परिषदेत करण्यात आले.

****

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष, बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गट आणि शिक्षक परिषदेच्या वतीनं औरंगाबाद इथल्या तिरुपती शिक्षण संस्थेचं अध्यक्ष किरण पाटील यांना उमेदवारी जाहीर केली असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी दिली आहे. ते आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. किरण पाटील हे शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम आहेत. मराठवाड्यातील सर्व जिल्हे आणि तालुक्यात नोंदणी प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती डॉ. कराड यांनी यावेळी दिली. किरण पाटील हे लवकरच मराठवाडा शिक्षक मतदार संपर्क अभियान दौरा करणार असल्याचं डॉ कराड यांनी सांगितलं.

****

देशवासियांनी स्थानिक व्यापाऱ्यांकडूनच स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचं आवाहन डॉ.भागवत कराड यांनी केलं आहे. डॉ. कराड यांनी आज औरंगाबाद इथल्या बाजारपेठेत फेरफटका मारून दिवाळीनिमित्त स्थानिकांनी तयार केलेल्या वस्तू खरेदी केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वावलंबी भारत करण्यासाठी व्होकल फॉर लोकल अंतर्गत सर्व देशवासियांना स्थानिक व्यापाऱ्यांकडूनच स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचं आवाहन केलं आहे. सर्वांनी या अभियानात सामील व्हावं आणि देशाला स्वावलंबी करण्याचा संकल्प करण्याचं आवाहन डॉ.भागवत कराड यांनी यावेळी केलं.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना त्वरित मदत द्यावी या प्रमुख मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आमदार कैलास पाटील यांनी आमरण उपोषण पुकारलं आहे. अनेक पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींसह आमदार पाटील आज उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले. सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांच्या ढिगांसह हे आंदोलन केलं जात आहे. २०२० च्या पीक विम्याची पाचशे ३१ कोटी रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करण्यात यावी, २०२१ च्या मंजूर पिक विम्याचे उर्वरित ५० टक्के प्रमाणे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ३८८ कोटी रुपये तत्काळ जमा करावे, अतिवृष्टी ग्रस्तांना २४८ कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी, आदी मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.

****

मराठवाडा विभागाचा उत्तर भारतातील महत्त्वाच्या शहरांशी संपर्क वाढवण्यासाठी रेल्वे मंत्रालयानं जालना ते छपरा आणि छपरा ते जालना अशी साप्ताहिक विशेष गाडी चालण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीमुळे मराठवाड्यातील जनतेला उत्तर भारतातील महत्त्वाच्या प्रयागराज, वाराणसी, गाझीपूआणि छपरा या शहरांना थेट जाण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. येत्या बुधवारी २६ ऑक्टोबर रोजी जालना रेल्वे स्थानकावर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे रात्री साडे नऊ वाजता या विशेष गाडीला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करतील. दर बुधवारी ही गाडी जालना रेल्वे स्थानकावरुन रात्री साडे अकरा वाजता सुटेल, ती शुक्रवारी पहाडे साडे पाच वाजता छपरा इथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी छपरा रेल्वे स्थानकावरुन दर शुक्रवारी रात्री सव्वा दहा वाजता सुटेल, असं दक्षिण मध्य रेल्वे ‍विभागाच्या जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे. 

****

ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज बांग्लादेशानं नेदरलंडचा ९ धावांनी पराभव केला. नेदरलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. बांग्लादेशचा संघ २० षटकांत १४४ धावा करू शकला. प्रत्युत्तरादाखल १४५ धावांचा पाठलाग करणारा नेदरलंडचा संघ निर्धारीत २० षटकांमध्ये ९ बाद १३५ धावाच करू शकला.

दरम्यान काल पाकिस्तान संघाचा पराभव केल्यानंतर भारताचा पुढचा सामना येत्या गुरुवारी नेदरलंडसोबत होणार आहे.

या स्पर्धेत दक्षिण आफ्रिका आणि झिम्बॉब्वे संघातल्या सामना पावसामुळे रद्द करावा लागला. हा सामना प्रथम नऊ षटकांचा खेळवण्याचा निर्णय झाला, त्यानुसार झिम्बॉब्वे संघाने नऊ षटकांत चार बाद ८० धावा केल्या. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे दक्षिण आफ्रिका संघाला सात षटकांत ६४ धावांचं लक्ष्य देण्यात आलं. पावसामुळे सामना थांबवण्यात आला तेव्हा दक्षिण आफ्रिका संघाने तीन षटकांत एकही गडी न गमावता, ५१ धावा केल्या होत्या. अखेर पाऊस न थांबल्यामुळे सामना रद्द करण्यात आला. दोन्ही संघाना एक एक गूण देण्यात आला आहे.

****

यंदाची दिवाळी एक झाड लावून पर्यावरण संवर्धनाच्या माध्यमातून साजरी करावी, असं आवाहन माजी मंत्री अमित देशमुख यांनी केलं आहे. ते आज लातूर इथं दिवाळी पहाट कार्यक्रमात बोलत होते. अष्टविनायक प्रतिष्ठानच्या वतीनं घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात प्रसिध्द गायिका सावनी शेंडे यांच्या गायनाचा श्रोत्यांनी आनंद घेतला. याच कार्यक्रमात ग्रीन लातूर टीमच्या वतीनं उपस्थितांना फुलांची रोपटी वितरित करण्यात आली तसंच आपलं शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं.

****

दिवाळीनिमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात पिवळ्या आणि केरी झेंडूच्या फुलांची सुंदर आरास करण्यात आली आहे. सुमारे ७०० किलो पाना फुलांच्या वापरातून ही मनमोहक आरास साकारण्यात आली आहे.

****

सातारा जिल्ह्यात सज्जनगडावर दिवाळीची पहिली पहाट हजारो मशाली प्रज्वलित करून आज साजरी करण्यात आली. गडाच्या दोन्ही महाद्वार बुरुजावर विद्युत रोषणाई तसंच फुलांची तोरणं बांधण्यात आली. फुलांनी सजवलेल्या पालखीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चांदीच्या मूर्तीची ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.

****

औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसानं उघडीप दिली आहे. पैठणच्या जायकवाडी धरणात पाण्याची आवकही मंदावली आहे. त्यामुळे धरणाच्या विसर्गात घट करण्यात आली असून, धरणाचे दहा दरवाजे आता दोन फुटावरुन दीफूट उंचीवर स्थिर करण्यात आले आहेत. धरणातून आता २८ हजार २९६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

****

No comments: