Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 01 March 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०१
मार्च २०२३ दुपारी १.०० वा.
****
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याविरुद्ध
सत्ताधारी पक्षानं विधानसभेत आज हक्कभंग दाखल केला. याप्रकरणी चौकशी करुन निर्णय जाहीर
करणार असल्याचं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.
राऊत
यांच्या वक्तव्यावरून विधानसभेचं कामकाज आज बाधित झालं. आज सकाळी कोल्हापूर इथं पत्रकारांशी
बोलताना, राऊत यांनी, विधीमंडळ नव्हे चोरमंडळ असा उल्लेख केला. त्यावरून विधानसभेत
आशिष शेलार, अतुख भातखळकर यांनी राऊत यांच्यावर कारवाईची मागणी लाऊन धरली. विधीमंडळाच्या
अवमानावर बोटचेपी भूमिका घेऊ नये, असं आवाहन शेलार यांनी केलं.
विरोधी
पक्षनेते अजित पवार यांनी याबाबत बोलताना, पक्षीय मतभेद बाजूला ठेवून या प्रकरणाचा
गांभीर्यानं विचार व्हावा, तथ्य तपासून योग्य तो निर्णय विधीमंडळाने घ्यावा, असं मत
व्यक्त केलं. सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी राऊतांवर कारवाईच्या मागणीसाठी हौद्यात
उतरून घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे सदनाचं कामकाज सुरवातीला चार वेळा आणि नंतर दिवसभरासाठी
स्थगित झालं.
विधान
परिषदेतही हा मुद्दा उपस्थित झाला असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच प्रवीण
दरेकर यांनी कारवाईची मागणी केली. यावरून सुरू झालेल्या गदारोळामुळे विधानपरिषदेचं
कामकाजही दिवसभरासाठी स्थगित झालं.
***
नाशिकमधल्या
गोंदे औद्योगिक वसाहतीतील जिंदाल पॉलिफिल्म्स कंपनीत झालेल्या भीषण दुर्घटनेप्रकरणी,
कंपनीच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, तत्काळ अटकेची कारवाईचे आदेश
पोलिसांना देण्यात येतील, अशी माहिती, कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी आज विधानपरिषदेत
दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर
देत होते.
दरम्यान,
विधान परिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर चर्चेला सुरवात झाली.
प्रवीण दरेकर यांनी हा प्रस्ताव मांडला. प्राध्यापक राम शिंदे यांनी या आभार प्रस्तावाला
अनुमोदन दिलं.
***
भारतासारख्या वेगाने प्रगती करणाऱ्या देशासाठी
शहरी नियोजन ही काळाची गरज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
शहर नियोजन, विकास आणि स्वच्छता या विषयावरच्या अर्थसंकल्पपश्चात वेबिनारला ते आज संबोधित
करत होते. यंदाच्या अर्थसंकल्पात शहरी नियोजन आणि पायाभूत सुविधांच्या
विकासावर विशेष लक्ष केंद्रीत केल्याचं ते म्हणाले. शहरी नियोजनात वाहतूक तसंच पायाभूत सुविधांचं नियोजन आणि जलव्यवस्थापन ही महत्त्वाची क्षेत्रं असल्याचं पंतप्रधान
म्हणाले. शहराच्या विकासाबरोबरच मानवकेंद्री विकासही सुनिश्चित केला
पाहिजे यावर त्यांनी भर दिला.
***
जनावरांच्या लम्पी आजारावर भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था
- आय व्ही आर आय नं लम्पी प्रतिबंधक लस तयार केली असून, पुण्यातल्या पशुवैद्यकीय जैवउत्पादन
संस्था - आय व्ही बी पी संस्थेनं लस निर्मितीचं तंत्रज्ञान हस्तगत केलं
आहे. लस निर्मितीसाठी केंद्राकडून परवानगी मिळाल्यानंतर राज्याला आवश्यक असणाऱ्या
लसीचे दोन कोटी डोस उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. शासकीय संस्थेमार्फत लसनिर्मिती
करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचं पुणे पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त डॉ.
संतोष पंचकोट यांनी सांगितलं आहे.
***
राज्य
शासनानं औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांचं
नामांतर केल्यानंतर राज्य मार्ग परिवहन महामंडळानं देखील अधिकृतरित्या या दोन जिल्ह्यांची
नावं बदलली आहेत. महामंडळानं काल यासंदर्भात पत्रक जारी केलं असून, औरंगाबाद
आणि उस्मानाबाद मध्यवर्ती बसस्थानकांचं नाव आता छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव असं केल्याचं सांगितलं आहे. राज्यातल्या सर्व परिवहन
महामंडळांच्या विभाग नियंत्रकांनी ज्याठिकाणी औरंगाबाद आणि उस्मानाबाद
असं नावं असेल, त्याठिकाणी छत्रपती संभाजीनगर आणि
धाराशिव नाव देण्याचे निर्देश मंडळानं दिले आहेत.
***
राज्यातल्या शेतकऱ्यांना सगळ्या संकटांमधून बाहेर काढून स्वयंपूर्ण
करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. काल मुंबईत डाबर आणि टाफे या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत
ते बोलत होते. टाफे कंपनीतर्फे शेतकरी आणि विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना,
आधुनिक यंत्रांसोबत सेंद्रिय शेती आणि प्रगत शेती या संदर्भात प्रशिक्षण
दिलं जाणार आहे, तर, राज्यात सापडणाऱ्या
आयुर्वेदिक वनस्पतींचं संवर्धन करण्यासंदर्भात, शेतकऱ्यांना डाबर
कंपनीकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
***
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान बॉर्डर - गावसकर मालिकेअंतर्गत
इंदूर इथं तिसरा कसोटी क्रिकेट सामना सुरु झाला असून, भारताचा
पहिला डाव १०९ धावांवर संपुष्टात आला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या
भारतीय संघाला, मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. विराट कोहलीनं २२, शुभमन गील २१,
श्रीकर भारत आणि उमेश यादवनं प्रत्येकी १७, तर रोहीत शर्मानं १२ धावा केल्या.
//**********//
No comments:
Post a Comment