Wednesday, 1 March 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद दिनांक 01.03.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 March 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०१ मार्च २०२ सायंकाळी ६.१०

****

·      खासदार संजय राऊत यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज बाधित.

·      दोन दिवसांत चौकशी करुन निर्णय देणार - विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर.

·      राज्यात दहावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरवात.

आणि

·      ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या इंदूर कसोटीत भारतीय फलंदाजी कोलमडली.

****

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज बाधित झालं. आज सकाळी कोल्हापूर इथं पत्रकारांशी बोलताना, राऊत यांनी, विधीमंडळ नव्हे चोरमंडळ असा उल्लेख केला. त्यावरून विधानसभेत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी राऊत यांच्यावर कारवाईची मागणी लाऊन धरली. विधीमंडळाच्या अवमानावर बोटचेपी भूमिका घेऊ नये, असं आवाहन आशिष शेलार यांनी केलं.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याबाबत बोलताना, पक्षीय मतभेद बाजूला ठेवून या प्रकरणाचा गांभीर्याने विचार व्हावा, तथ्य तपासून योग्य तो निर्णय विधीमंडळाने घ्यावा, असं मत व्यक्त केलं. नाना पटोले, अशोक चव्हाण यांच्यासह विरोधी पक्षातल्या नेत्यांनीही या विधानाबाबत नाराजी व्यक्त केली. सत्ताधारी पक्षाकडून अतुख भातखळकर तसंच भरत गोगावले यांनी हक्कभंगाची सूचना दाखल केली. सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी राऊतांवर कारवाईच्या मागणीसाठी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे सदनाचं कामकाज सुरवातीला चार वेळा आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित झालं होतं.

याप्रकरणी दोन दिवसांत चौकशी करुन निर्णय जाहीर करणार असल्याचं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं. ते म्हणाले –

प्रस्तूत सूचनेअन्वये उपस्थित करण्यात आलेली बाब अत्यंत गंभीर असून सार्वभौम सभागृहाच्या घटनात्मक कारवाईवर प्रतिकुल परिणाम करणारी तसेच विधीमंडळातील सन्माननीय सदस्यांचा, संपूर्ण सभागृहाचा व एकूणच महाराष्ट्रातील जनतेचा अपमान ठरत असल्याचे माझे प्राथमिक मत आहे. त्यामुळे या प्रकरणी सखोल चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे. सबब प्रकरणी दोन दिवसांत चौकशी करून बुधवार दिनांक आठ मार्च २०२३ रोजी मी सभागृहास याबाबतचा पुढचा निर्णय जाहीर करीन.

 

विधान परिषदेतही हा मुद्दा उपस्थित झाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच प्रवीण दरेकर यांनी कारवाईची मागणी केली. राऊत यांचं विधान हे विधीमंडळाचा अपमान करणारं असून सर्व सदस्यांनी याचा एकमताने निषेध करून असा अपमान खपवून घेणार नसल्याचा संदेश विधिमंडळानं देणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हे वक्तव्य समर्थनीय नसल्याचं सांगत हे वक्तव्य त्यांनी कोणत्या पार्श्वभूमीवर आणि कोणासाठी केलं हे तपासून पाहण्याची मागणी केली. मात्र विरोधकांना देशद्रोही म्हणणाऱ्यांवर काय कारवाई करणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यानंतर दोन्ही बाजूंनी गदारोळ वाढत गेल्यानं उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी सदनाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करत असल्याचं सांगत, यासंदर्भात योग्य तो निर्णय घेणार असल्याचं सांगितलं, मात्र संबंधितांना अटकेसंदर्भातला अधिकार राज्य सरकारचा आहे, त्यामुळे सदस्यांनी ती मागणी उपमुख्यमंत्र्यांकडे करण्याचा सल्ला उपसभापतींनी दिला. त्या म्हणाल्या –

एकूण सगळ्यांच्या भावना पाहिल्या. मी यामध्ये माझा निर्णय दिलेला आहे की मी तपासून घेते आणि उद्या सकाळी मी हक्कभंगाच्या संदर्भामधला माझा निर्णय जाहीर करते. हे देखील स्पष्ट केलेलं आहे, की अटक करण्याच्या संदर्भामध्ये तुम्ही माझ्याकडे बघून जी मागणी करताय ती तुम्ही माननीय गृहमंत्र्यांच्याकडे मागणी करू शकता. तो माझा अधिकार घेणं स्वतःच्या हातामध्ये एखाद्या खासदाराला मला योग्य वाटत नाही. पण हक्कभंगाबद्दलचा निर्णय मी घेईन.

****

राज्यात तालुका, जिल्हा आणि उच्च न्यायालयात ई-फायलिंग सक्तीला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषद पदाधिकारी आणि उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांच्यात नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ई फायलिंगमध्ये काहीच वकिलांचा एकाधिकार टाळण्यासाठी वरिष्ठ वकिलांनी देखील तंत्रज्ञान अवगत करत याबाबतचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

राज्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षा मार्फत गेल्या आठ महिन्यांत चार हजार ८०० रुग्णांना ३८ कोटी ६० लाख रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. मुख्यमंत्री कक्षाकडून ही माहिती देण्यात आली आहे. गेल्या आठ महिन्यांपैकी फेब्रुवारी महिन्यात १० कोटी २७ लाख रुपयांची सर्वाधिक मदत देण्यात आल्याची माहिती कक्षप्रमुख मंगेश नरसिंह चिवटे यांनी दिली.

****

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेकडून लवकरच राज्यभरात शिवधनुष्य यात्रा काढण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर मिळालेलं पक्षचिन्ह आणि पक्षाचं नावं हे राज्याच्या कानाकोपऱ्यात नेलं जाणार असून महाराष्ट्राचा स्वाभिमान, माझा धनुष्यबाण असं या यात्रेचं घोषवाक्य असणार आहे. या यात्रेदरम्यान, मार्च महिन्याच्या शेवटी अयोध्या इथं जाण्याची शिवसेनेची तयारी सुरू असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

 

राज्याच्या सत्तासंघर्षांच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालच्या घटनापीठात आज सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी झाली. सुनावणीचा उद्या अखेरचा दिवस आहे. हे प्रकरण याच आठवड्यात पूर्ण करण्याची न्यायालयाची इच्छा असल्याचे संकेत सरन्यायाधीशांनी कालच सुनावणीदरम्यान दिले आहेत.

****

जगातली सर्वात लांब नदीप्रवास करणारी पर्यटन नौका गंगा विलासनं काल आपली पहिली जलयात्रा पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. एक विशिष्ट प्रवास पूर्ण झाला असून गंगा विलास पर्यटनात यापुढे भारतासोबतच इतर देशातले अधिक पर्यटक सहभागी होतील असा विश्वास त्यांनी आपल्या ट्विट संदेशात व्यक्त केला आहे.

****

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणारी दहावीची परीक्षा उद्यापासून सुरु होत आहे. या परीक्षेसाठी राज्यातल्या २३ हजार १९ शाळांमधून एकूण १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. २५ मार्चपर्यंत चालणारी ही परीक्षा राज्यात ५ हजार ३३ मुख्य केंद्रांवर घेतली जाणार आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी ही माहिती दिली आहे.

****

बॉर्डर गावसकर कसोटी क्रिकेट मालिकेत इंदूर इथल्या तिसऱ्या कसोटीत आज पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियानं भारतावर पहिल्या डावात ४७ धावांची आघाडी घेतली आहे. आज सकाळी भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र भारताच्या फलंदाजांची फळी कोलमडून पडली. भारतीय संघ ३४व्या षटकांत १०९ धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर खेळण्यास उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने दिवसअखेरपर्यंत चार बाद १५६ धावा केल्या. मालिकेत पहिले दोन कसोटी सामने जिंकून भारत आघाडीवर आहे.

****

हिंगोली जिल्ह्यात औंढा तालुक्यात लिगो प्रकल्पासंदर्भात, केंद्रीय अंतराळ आणि अणुऊर्जा विभागाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्यासह पृथ्वीविज्ञान विभागाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन यांच्या भेटी संदर्भात सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या प्रकल्पा संदर्भात लवकरच बैठक बोलावली जाणार असल्याची माहिती, खासदार हेमंत पाटील यांनी दिली आहे. केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी यापूर्वीच तालुक्यात ३०० एकर जमीन संपादित केली असून यासाठीची सर्व शासकीय कार्यवाही पूर्ण झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशात उभारली जाणारी ही पहिलीच प्रयोगशाळा ठरणार आहे.

****

महावितरणने मागणी केलेली ३७ टक्के वीज दरवाढ पूर्णपणे रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी आज छत्रपती संभाजीनगर मधील वाळूज महानगर इथल्या मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर - मसिआच्या कार्यालयासमोर वीज दरवाढ प्रस्तावाची होळी करण्यात आली. महावितरण कंपनीनं ६७ हजार ६४४ कोटी रुपये तुटीच्या भरपाईसाठी प्रस्तावित केलेली वीज दरवाढ अन्यायकारक असून, त्यानं राज्याची उद्योग भरारी रोखली जाणार आहे. तसंच सर्व सर्वसामान्य घरगुती आणि व्यावसायिक वीज ग्राहकांचं कंबरडं मोडणारी ही दरवाढ असेल. प्रस्तावित दरवाढ रद्द करून दिलासा देण्याची मागणी मसिआच्यावतीनं करण्यात आली. महावितरणने प्रस्तावित केलेली सपूर्ण वीजदरवाढ रद्द होईपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

****

No comments: