Wednesday, 1 March 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 01.03.2023 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 01 March 2023

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०१ मार्च २०२३ सकाळी ७.१० मि.

****

·      शेतकऱ्यांची प्रलंबित आर्थिक मदत येत्या ३१ मार्च पर्यंत देण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

·      नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी सुरू, निर्यातीवर बंदी नसल्याचं राज्य सरकारचं स्पष्टीकरण

·      उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातली पाण्याची तूट भरून काढण्यासाठी पाणलोट क्षेत्रातून पाणी उचलण्याचे परवाने दिले जाणार नाहीत- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·      राज्यातील सत्तासंघर्षांवरच्या सर्वोच्च न्यायालयातील याचिकांवरच्या सुनावणीत राज्यपालांच्या भूमिकेवर दोन्ही गटाकडून युक्तीवाद

·      मोकाट गुरांसंदर्भातल्या कायद्यात सुधारणा करणारं विधेयक विधानसभेत मंजूर

·      लेखक शाहू पाटोळे यांच्या 'खिळगा' पुस्तकाला मराठवाडा साहित्य परिषदेचा भगवंत देशमुख विशेष वाङ्मय पुरस्कार जाहीर  

आणि

·      भारत -ऑस्ट्रेलियात आजपासून बॉर्डर - गावसकर मालिकेतला तिसरा कसोटी क्रिकेट सामना

****

शेतकऱ्यांसाठीची प्रलंबित आर्थिक मदत येत्या ३१ मार्च पर्यंत देणार असल्याची घोषणा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ते काल विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते.

बीड जिल्ह्यात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसान भरपाईचा मुद्दा प्रकाश सोळंके यांनी उपस्थित केला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी राज्यभरात सहा हजार आठशे कोटी रुपये नियमित नुकसानापैकी सहा हजार कोटी रुपये तर सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानापोटी ७५५ कोटी रुपये वाटप झाल्याचं सांगितलं. तीन हजार ३०० कोटी रुपये अतिरिक्त नुकसा भरपाईची मागणी आली असून, त्याची वैधता तपासली जात असल्याचं ते म्हणाले. कर्जाची मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही अनुदान वाटप केलं जात असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याबाबत बोलताना, अजून फार मोठा वर्ग या अनुदानापासून वंचित असल्याचं सांगितलं. हे अनुदान देण्यासाठी कालमर्यादा जाहीर करावी, अशी मागणी पवार यांनी केली.

दरम्यान, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी काल दोन्ही सभागृहात आक्रमक भूमिका घेतली. सरकारने या प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे नाना पटोले यांनी विधानसभेत केली. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, सरकार कांदा उत्पादकांच्या पाठिशी असून, भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ -नाफेडद्वारे कांदा खरेदी सुरू झाल्याची माहिती दिली. दोन लाख अडोतीस हजार मेट्रिक टन कांदा आत्तापर्यंत खरेदी झाला असून, कांदा निर्यातीवर बंदी नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

विधानपरिषदेतही विरोधकांनी कांद्याचा मुद्दा उपस्थित करत स्थगन प्रस्ताव मांडला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर बोलताना, २०१७-१८ मध्ये ज्या पद्धतीनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत केली तशीच मदत आता करणार असून, कांदा खरेदी करण्यासाठी कृषी विभागामार्फत बाजार हस्तक्षेप ही योजना सरकार सुरू करत असल्याचं सांगितलं.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकनाथ खडसे यांनीही या मुद्द्यावर चर्चेची मागणी करत गदारोळ केला, त्यामुळे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सभागृहाचं कामकाज आधी पंधरा मिनिटांसाठी आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब केलं.

काल कामकाज सुरू होण्यापूर्वी देखील विरोधी पक्षनेते अजित पवार आणि दानवे यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी गळ्यात कांदा आणि कापसाच्या माळा घालून विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

****

पुण्यात भिडे वाड्याच्या स्मारकाचा प्रश्न छगन भुजबळ यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी याबाबत बोलताना, येत्या १० मार्चला न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी आहे, त्यापूर्वी या स्मारकाबाबतचे सर्व प्रश्न सोडवण्याची सूचना प्रधान सचिवांना केल्याची माहिती दिली.

बारावीच्या विद्यार्थ्यांच्या ५० लाखावर उत्तरपत्रिका तपासणीविना पडून असल्याचा मुद्दा आशिष शेलार यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी याबाबत तातडीने बैठक घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिली. ते म्हणाले...

“अध्यक्ष महोदय, सन्माननीय आशिषजींनी जो मुद्दा उपस्थित केलाय, बारावीच्या परीक्षेच्या संदर्भातला, नक्कीच शिक्षणमंत्री आज नाहीत, त्यांची तब्येत बरोबर नाही पण तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना मी सूचना देतो, एक बैठक लावू, त्याच्यामध्ये ज्या ज्या काही त्रुटी आहेत, अडचणी आहेत त्या दूर करून कुठल्याही परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचं भवितव्य आपल्याला महत्वाचं आहे, त्यामुळे जे जे काही उपाय करायला लागतील ते सर्व आपण करू.’’

दोन लाख अंगणवाडी सेविकांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या आंदोलनाकडे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सदनाचं लक्ष वेधलं. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात बोलताना, अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचं सांगितलं.

सीमाभागातल्या नागरिकांनी मुंबईत येऊन पुकारलेल्या आंदोलनाकडे छगन भुजबळ यांनी लक्ष वेधलं. सीमा भागातल्या नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभं असून त्यांच्यावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. सीमावर्ती भागातल्या तरुणांवर दाखल करण्यात आलेल्या केसेस मागे घ्यायला कर्नाटक सरकारला भाग पाडलं असल्याचंही त्यांनी सांगितलं.

****

धरणांच्या पाणलोट क्षेत्रातून पाणी देण्याची परवानगी देणं बंद करण्याची मागणी अशोक चव्हाण यांनी काल विधानसभेत केली. उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या अनुषंगानं त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर बोलताना, सध्या या प्रकल्पातून हिंगोलीसाठी राज्यपालांच्या सूचनेनुसार पाणी दिलं जात असल्याचं सांगितलं. मात्र उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातली पाण्याची तूट भरून काढण्यासाठी ठोस उपाय केले असून, यापुढे पाणलोट क्षेत्रातून पाणी परवाने दिले जाणार नसल्याचं ते म्हणाले. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेचा हा संक्षिप्त अंश…

 ‘‘कॅचमेंट एरियामध्ये वरच्या भागामध्ये पाणी देण्याची शासन स्तरावर अनेकवेळा परवानग्या दिल्या गेल्या. कॅनॉलची कामं धर्माबादपर्यंत गेली आहेत. आणि फक्त एकच जिल्हा नाहीये याच्यामध्ये यवतमाळ जिल्हा आहे, हिंगोली जिल्हा आहे, नांदेड जिल्हा आहे या तिन्ही चारही जिल्ह्याला याच्यामुळे होणारा जो दुष्परिणाम आहे, तो लक्षात घेता, वरच्या परिसरामध्ये म्हणजे कॅचमेंट एरियामध्ये आगामी काळामध्ये कुठल्याही नवीन परवानग्या देणार नाहीत हा माझा पहिला प्रश्न आहे, आणि दुसरं हे होत असतांना मागील ज्या परवागन्या देण्याची कामं झाली नसतील, सुरवात झाली नसेल, अशी कामं आपण थांबवणार का?’’

अशोक चव्हाण

 ‘‘राज्यपालांनी मागच्या काळामध्ये हिंगोली जिल्ह्याचा अनुशेष हा स्वतंत्रपणे काढला आणि तो स्वतंत्रपण काढून त्या ठिकाणी आपल्याला काही कामं घेण्याकरता बोलावलं ज्यातनं जांभरून इथल्या तलावाकरता पाणी उपलब्ध करून देण्याची आपल्याला जे काही आदेश आले, आणि त्यामुळे आता हा प्रश्न तयार झालेला आहे की, मोठ्या प्रमाणात अजून ही तूट वाढेल. आणि म्हणून ही तूट कमी करण्याच्या दृष्टीनं तीन ठिकाणांहून इंटरव्हेंशन आपण त्या ठिकाणी मंजूर केलंय. आता आपण जवळजवळ ७८१ द.ल.घ.मी. पाणी हे आपण त्याठिकाणी आणतो आहोत. मी आपल्याला आपण जो प्रश्न विचालाय त्या संदर्भात एवढंच सांगू इच्छितो की निश्चितपणे वरच्या भागामध्ये आत्ता जे एग्झिस्टींग कामं आहेत, किंवा एग्झिस्टींग जो काही पाणीसाठा आहे, त्याच्यावर परिणाम होईल अशा प्रकारची कुठलीही कामं आपण घेणार नाही आणि त्याकरता जे काही नियम कायदे करायचे असतील ते करायची निश्चितपणे आपली मानसिकता असेल.’’ 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

मोकाट गुरांसंदर्भातल्या कायद्यात सुधारणा करणारं विधेयक विधानसभेत काल मंजूर करण्यात आलं. आता पहिल्या अपराधासाठी मोकाट गुरांच्या मालकांना सरसकट दीड हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल, तर पुढील प्रत्येक अपराधासाठी पाच हजार रुपये इतका दंड आकारला जाणार आहे. पूर्वीच्या कायद्यातली कारावासाची तरतूद काढून टाकण्यात आली आहे.

****

विधानसभेत काल राज्यपालांच्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावावरच्या चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर टीका केली. राज्य सरकारची भरकटलेली दिशा राज्यपालांच्या अभिभाषणातून प्रकट झाली असून, राज्यासमोरच्या गंभीर प्रश्नांचा साधा उल्लेख सुध्दा राज्यपालांच्या अभिभाषणात नाही, असं ते म्हणाले.

****

शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी काल भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी पाटील यांना शुभेच्छा दिल्या.

****

राज्यातील सत्तासंघर्षांच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालच्या घटनापीठात कालपासून पुन्हा सुनावणी सुरु झाली. सलग तीन दिवस ही सुनावणी सुरु राहणार आहे. राज्यपालांकडून घटनात्मक मर्यादांचं उल्लंघन झालं का, राज्यपालांची ही भुमिका उद्धव ठाकरे सरकार उलथवून टाकण्याला कारणीभूत ठरली का, या मुद्यावर ठाकरे आणि शिंदे गटाच्या वकीलांनी युक्तीवाद केला. घटनेच्या दहाव्या अनुसूचीच्या तरतुदींची राज्यपालांनी दखल घेतली नाही, असं ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी नमूद केलं. तर, देवदत्त कामत यांनी पक्षप्रतोद निवडीच्या मुद्यावर युक्तिवाद केला. कामत यांचा युक्तिवाद संपल्यानंतर शिंदे गटाच्या बाजूनं नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद सुरू केला. हे प्रकरण याच आठवड्यात पूर्ण करण्याचे निर्देश धनंजय चंद्रचूड यांनी वकीलांना दिले.

****

G20 अंतर्गत W20 समूहाच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या प्रारंभिक बैठकीचा काल समारोप झाला. G20 सदस्य देश, अतिथी देश आणि विशेष आमंत्रित देशांच्या जवळापस दिडशे महिला प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाल्या होत्या.

या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना W20 च्या अध्यक्ष संध्या पुरेचा यांनी, भारतानं निर्धारित केलेल्या पाच प्राधान्य क्षेत्रांवर चर्चा झाल्याचं सांगितलं. सर्व प्रतिनिधी या प्रधान्य क्षेत्रांशी सहमत झाल्या असून, यासंदर्भात एक प्रारुप तयार करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. यावर येत्या १५ दिवसात G20 देशांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत विचार केला जाईल, आणि W20 च्या पुढच्या जयपूर इथं होणार्या बैठकीत हे विषय मांडले जातील, असं पुरेचा यांनी सांगितलं. या पाच प्राधान्य क्षेत्रांमध्ये उद्योजक महिला, तळागाळातील महिला नेतृत्व, डिजिटल लैंगिक समानता, शिक्षण आणि कौशल्य विकास आणि हवामान बदलावरच्या उपाययोजनेवर कृती समूहात महिला आणि मुलींचा परिवर्तनकर्त्या म्हणून समावेश, यांचा समावेश आहे.

छत्रपती संभाजीनगर या वारसा शहरासाठी महिलांनी दिलेलं योगदान अधोरेखित करणाऱ्या 'अवया' या कॉफी टेबल बुकचं प्रकाशन यावेळी करण्यात आलं.

दरम्यान, W20 प्रतिनिधींनी काल सकाळी औरंगाबाद लेणी, बिबी का मकबरा या ठिकाणी तर दुपारनंतर वेरुळ लेण्यांना भेट दिली. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाने या दोन दिवसीय प्रारंभिक परिषदेची सांगता झाली.

****

औरंगाबाद शहराचं छत्रपती संभाजी महाराज नामकरण करण्याच्या धर्तीवरच मुंबईचं छत्रपती शिवाजी राजे महानगर, पुण्याचं फुले नगर, नागपूरचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर आणि कोल्हापूरचे छत्रपती शाहूनगर असं नामकरण करण्याची मागणी छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलिल यांनी केली आहे. ते काल वार्ताहरांशी बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर हुकुमशाहीचा आरोप केला. न्यायालयात नामकरणाबाबत खटला सुरु असताना नामकरण केल्याचा आरोप त्यांनी केला. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आदर आहे, मात्र त्यांचा या शहराशी काहीही संबंध नसताना नामकरण करण्यात आल्याचं ते म्हणाले. बिहारमध्येही एक औरंगाबाद नावाचं शहर आहे, त्या शहराचे खासदार भारतीय जनता पक्षाचे असून त्याचं नामकरण करण्यात आलं नसल्याचं

ते म्हणाले. या मुद्यावर काही मंडळी हिंदू - मुस्लिम तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, यामध्ये माध्यमेही आघाडीवर असल्याचा आरोप जलील यांनी केला.

****

नांदेड इथं आजपासून बचत गटातल्या महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री मेळावा आयोजित करण्यात आला आहे. महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत आयोजित हा मेळावा नांदेड शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात होणार आहे. पाच दिवस चालणाऱ्या या मेळाव्यात पौष्टिक तृणधान्यांसह इतर खाद्यपदार्थ आणि अनेक वस्तूंचे विविध प्रकार उपलब्ध असून, या महोत्सवाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केलं आहे.

****

मराठवाडा साहित्य परिषदेचा यंदाचा भगवंत देशमुख विशेष वाङमय पुरस्कार साहित्यिक शाहू पाटोळे यांच्या 'खिळगा' या पुस्तकाला जाहीर झाला आहे. ११ हजार रुपये आणि स्मृतीचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप आहे. शाहू पाटोळे हे भारतीय माहिती सेवेतून निवृत्त झाले आहेत. 'भारत जोडो : उसवलेले दिवस', 'कुकनालिम', 'अन्न हे अपूर्ण ब्रह्म' ही त्यांची पुस्तके प्रकाशित आहेत. 'मसाप' चे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी या पुरस्काराची घोषणा केली. येत्या १९ मार्चला पाटोळे यांना हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

****

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान सुरु असलेल्या बॉर्डर - गावसकर मालिकेतला तिसरा कसोटी क्रिकेट सामना आजपासून इंदूर इथं सुरु होणार आहे. सकाळी साडे नऊ वाजता सामन्याला सुरुवात होईल. मालिकेतले पहिले दोन सामने जिंकून भारत दोन - शून्यनं आघाडीवर आहे.

****

राष्ट्रीय विज्ञान दिन काल साजरा झाला. २८ फेब्रुवारी १९२८ या दिवशी भारतीय शास्त्रज्ञ सी वेंकटरम यांनी रमण इफेक्ट या शोधाची घोषणा केली. त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्तानं राज्यभरातल्या शाळांमधून विविध कार्यक्रम घेण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ’वोखार्ड’मधले शास्त्रज्ञ डॉ.एम. के. साहिब यांचं, ’जागतिक स्वास्थासाठी विज्ञान’ या विषयावर व्याख्यान  झालं. वैज्ञानिक युगात तरुण संशोधकांनी स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेऊन नवनिर्मिती करावी, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. शहरात सरस्वती भुवन शाळेत विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे विविध प्रयोग सादर केले.

****

येत्या आठ मार्च ला साजऱ्या होणार्या जागतिक महिला दिनानिमित्त नांदेड जिल्हा परिषदच्या वतीने आजपासून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी काल ही माहिती दिली.  डिजिटल: लैंगिक समानतेसाठी नवकल्पना आणि तंत्रज्ञान, या संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या संकल्पनेप्रमाणे, जिल्हा परिषदेनं संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा ठरवल्याचं त्यांनी सांगितलं. या कालावधीत महिला अधिकारी आणि कर्मचारी मेळावा तसंच पुरस्कार वितरण सोहळा, जिल्ह्यातल्या नवनिर्वाचित महिला सरपंच मेळावा, महिला शिक्षिकांसाठी मेळावा, महिला आणि बाल विकास विभाग अंतर्गत नांदेड पंचायत समिती इथं अंगणवाडी कार्यकर्त्या आणि अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम, असे विवीध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याचं, घुगे यांनी सांगितलं.

****

No comments: