आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२५ मार्च २०२३
सकाळी ११.०० वाजता
****
उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थींना प्रति
सिलिंडर दोनशे रुपये अनुदान देण्याचा
निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे. १४ किलो
२०० ग्रॅम वजनाच्या घरगुती वापराच्या वार्षिक १२ सिलिंडरसाठी हे अनुदान मिळणार आहे.
***
राजस्थानात पोखरण इथं काल सैन्य दलाच्या
तीन क्षेपणास्त्रांचा स्फोट झाला. नियमित अभ्यासादरम्यान झालेल्या या प्रकारात तीन क्षेपणास्त्र अचानक सक्रीय
झाली. यापैकी दोन क्षेपणास्त्रांचे अवशेष सापडले असून,
तिसऱ्या क्षेपणास्त्राचा शोध सुरू आहे. यामुळे
कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नसल्याचं सैन्य दलाकडून सांगण्यात
आलं.
***
देशातल्या सर्व राज्यांमध्ये खतांची पुरेशी
उपलब्धता असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. खतांच्या संदर्भात आता आपत्कालीन योजनेची
गरज नसून, खतांच्या
काळ्या बाजारीकरणाविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत राज्य सरकारांना अधिकार देण्यात
आले आहेत, अशी माहिती खत मंत्री मनसुख मांडविय यांनी काल लोकसभेत दिली.
***
राज्यातल्या सहकारी तसंच खासगी अशा सुमारे
२१० साखर कारखान्यांनी यंदाच्या गाळप हंगामात आतापर्यंत, एक हजार ३३ लाख टन उसापासून, १० कोटी दोन लाख टन साखरेचं उत्पादन केलं आहे. साखर हंगाम
आता अंतिम टप्प्यात आला असून, येत्या १५ एप्रिलपर्यंत साखर कारखान्यांची
धुराडी बंद होतील, अशी अपेक्षा साखर आयुक्तालयानं वर्तवली आली.
***
औष्णिक विद्युत प्रकल्पातल्या राखेच्या संदर्भात लवकरच धोरण तयार
करण्यात येत असल्याचं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल
विधान परिषदेत सांगितलं. या राख वाहतुकीच्या अनुषंगाने निविदा
काढण्यात येणार असून, ही राख स्थानिकांना व्यवसायासाठी सवलतीच्या
दराने उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
***
सात्विक साईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी
यांनी स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. या
द्वितीय मानांकित भारतीय जोडीनं काल डॅनिश जोडीचा २१-१५, १०-२१, १५-२१ असा पराभव केला. महिला एकेरीत
भारताच्या पी व्ही सिंधुला इंडोनेशियाच्या कुसुमा वारदानी हिच्याकडून
पराभव पत्करावा लागला.
//***********//
No comments:
Post a Comment