Sunday, 28 May 2023

आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक : २८ मे २०२३ सकाळी ७.१० मि.

 

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 28 May 2023

Time : 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २८ मे  २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      संसद भवनाच्या नव्या वास्तूचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण

·      २०४७पर्यंत भारताला विकसित देश बनवण्यासाठी समान दृष्टीकोन ठेवण्याचं पंतप्रधानांचं आवाहन

·      औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासर्व अभ्यासक्रमांना ‘निवड आधारित पत प्रणाली’ लागू

·      राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीच्या परीक्षा शुल्कात दहा टक्के वाढ

·      औरंगाबाद शहरात आंबा महोत्सवाला प्रारंभ

·      मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या एच.एस. प्रणॉयचा पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश, महिला एकेरीत पी. व्ही. सिंधूचा उपांत्य फेरीत पराभव  

आणि

·      आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात अंतिम सामना

****

 

 

नवी दिल्लीत उभारण्यात आलेल्या संसद भवनाच्या नव्या वास्तूचं लोकार्पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होत आहे. संसदेची ही नवी इमारत चार मजली असून, तिला सहा प्रवेशद्वार आहेत. या संसद भवनात लोकसभेचे ८८८ आणि राज्यसभेचे ३८४ खासदार बसू शकतील अशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. नव्या संसद भवनात प्रत्येकासमोर छोटे बाक असतील, तसंच या बाकांमध्ये हजेरी, मतदान तसंच भाषांतर ऐकण्यासाठी त्याधुनिक सुविधा असतील. याशिवाय या संसद भवनात १२० कार्यालयं आणि संग्रहालय देखील आहे.

संसदेची नवीन इमारत प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा, अशीच असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. या नवीन इमारतीची झलक दाखवणारी एक चित्रफित त्यांनी आपल्या टि्वटर खात्यावर जारी केली आहे. सर्वांनी हा व्हिडिओ प्रसारीत करावा आणि त्यावर आपल्या आवाजात प्रतिक्रीया द्याव्यात, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातूनही देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा एकशे एकावा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. तसंच आकाशवाणीच्या न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरून हा कार्यक्रम ऐकता येईल. या हिंदी कार्यक्रमाच्या प्रसारणानंतर लगेचच त्याचा प्रादेशिक भाषेत अनुवाद प्रसारीत केला जाईल.

****

२०४७ पर्यंत भारताला एक विकसित देश बनवण्यासाठी समान दृष्टीकोन ठेवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काल नवी दिल्ली इथं झालेल्या निती आयोगाच्या आठव्या बैठकीत ते बोलत होते. नागरिकांची स्वप्ने पूर्ण करणारे कार्यक्रम तयार करण्यासाठी राज्यांनी आर्थिकदृष्ट्या योग्य निर्णय घ्यावेत, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. या बैठकीत आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण आणि पायाभूत सुविधांच्या विकासासह अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

या बैठकी विषयी वार्ताहरांना दिल्लीत माहिती देताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांसोबत विकसित भारत २०४७चं व्हिजन, महिला सक्षमीकरण, आरोग्य, कौशल्य विकास, रोजगार, स्वयंरोजगार, पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि सूक्ष्म, मध्यम आणि लघु उद्योग यावर चर्चा झाली असल्याचं सांगितलं. समृद्धी महामार्ग, एमटीएचएल, मेट्रो, महिला सक्षमीकरण, मराठवाडा वॉटर ग्रीडसह अनेक मुद्दे या बैठकीत मांडल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. महिला सक्षमीकरणाबाबत माहिती देतांना मुख्यमंत्री म्हणाले -

 मेट्रोवर आम्ही काम करतोय. महिला सक्षमीकरण यावर देखील या बैठकीमध्ये भर दिला. ज्या पद्‍्‌धतीने महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे, त्यामध्ये आम्ही जो निर्णय घेतलेला आहे, की महिलांचं जे एक पर्सेंट जी स्टँप ड्युटी रजिस्ट्रेशन जे आहे त्याला माफ केलं. त्याचबरोबर आम्ही महिलांना एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली. त्याचबरोबर चार कोटी महिलांची आरोग्य तपासणी केली. महिला बचतगट सक्षमीकरण त्यावर देखील आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी भर दिला. त्याचबरोबर जे तरूण आहेत त्यांना स्कील डेव्हलपमेंट च्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभं केलं पाहिजे.”

मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या चर्चेसोबत २८ सिंचन प्रकल्पांना मान्यता दिल्याचं या बैठकीत सांगितल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले

“जे वाहून जाणारं पाणी, मराठवाडा वॉटर ग्रीड जे आहे, यावर देखील मी भूमिका मांडली आणि कोकणातलं समुद्राला वाहून जाणारं पाणी, दुष्काळी भागात ते वळवलं पाहिजे. म्हणजे त्यामुळे नद्याजोड प्रकल्प हे मोठे प्रकल्प आहेत. आणि मोठ्या प्रकल्पांना केंद्र सरकारची साथ, मदत याठिकाणी मिळाली तर मोठ्या प्रमाणामध्ये आपण राज्यामध्ये जनतेला दिलासा देऊ शकतो. जसं आम्ही गेल्या दहा महिन्यामध्ये २८ सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली.”

 

 

****

स्वराज्य संघटना २०२४ची विधानसभा निवडणूक लढवणार आहे, अशी घोषणा माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. पुण्यात स्वराज्य भवन या कार्यालयाचं काल त्यांच्या हस्ते लोकार्पण झालं. त्यावेळी ते बोलत होते. स्वराज्य संघटनेचं आता पक्षात रूपांतर करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले. स्वराज्य संघटना, शेतकरी, कामगार, सहकार, शिक्षण आणि आरोग्य या पंचसुत्रीच्या माध्यमातून सामान्य जनतेचा विकास करणार असल्याचंही संभाजीराजे यावेळी म्हणाले.

****

आगामी निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षानं लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या १० जागा सोडाव्यात अशी मागणी केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालच्या रिपब्लिकन पक्षानं केली आहे. तसा ठराव काल शिर्डी इथं आयोजित पक्षाच्या बैठकीत मंजूर झाल्याची माहिती आठवले यांनी दिली. रिपब्लिकन पक्ष लोकसभा निवडणूक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाशी युती करुन लढवणार आहे. रिपब्लिकन पक्षाला मान्यता मिळण्यासाठी महाराष्ट्रात लोकसभेच्या दोन जागा जिंकणं आवश्यक आहे, असं आठवले यांनी सांगितलं.

****

औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं सर्व पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून ‘निवड आधारित पत प्रणाली’ लागू करण्यात आली आहे. या अंतर्गत सर्व ४५८ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या एक लाख १० हजार विद्यार्थ्यांपैकी ३२ हजार विद्यार्थ्यांची माहिती आतापर्यंत प्रणालीमध्ये भरण्यात आली आहे. जी महाविद्यालयं २०२०-२०२१ आणि २०२१-२०२२ या दोन वर्षाप्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक पत माहिती - अकॅडमिक बॅक ऑफ क्रेडीट सादर करणार नाहीत, त्या महाविद्यालयांचे  निकाल घोषित होणार नाहीत, असं परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ संचालक डॉ.भारती गवळी यांनी परिपत्रकाद्वारे कळवलं आहे. काही कारणास्तव मध्येच अभ्यासक्रम सोडावा लागणाऱ्या विद्यार्थ्याला, कालावधीनुसार प्रथम वर्ष उत्तीर्ण झाल्यावर प्रमाणपत्र, द्वितीय वर्ष उत्तीर्ण पदविका आणि तीन वर्षे किंवा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर पदवी प्रदान केली जाणार असल्याचंही पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. 

****

 

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं बारावीच्या परीक्षा शुल्कात दहा टक्के वाढ केली आहे. जुलै २०२३च्या पुरवणी परीक्षेपासून ही वाढ येणार आहे. आता ४४० रूपये एवढं परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना द्यावं लागणार आहे. याबरोबरच प्रशासकीय शुल्क, गुणपत्रिका शुल्क प्रात्यक्षिक परीक्षा शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. पुर्नपरीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी हेच शुल्क लागू होणार असून श्रेणी सुधारण्यासाठी अ श्रेणी सुधार योजनेत सहभागी नियमित तसेच पुनर्परिक्षार्थीसाठी ८८० रूपये आकारण्यात येणार असल्याचं मंडळानं कळवलं आहे. 

****

औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात भरवण्यात आलेल्या आंबा महोत्सवाचं काल आमदार हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते उद्धाटन झालं. महानगरपालिकेच्या सहकार्यानं कृषी उत्पन्न बाजार समितीनं औरंगाबाद शहरातल्या विविध भागात आंबा महोत्सव सुरु करावा, तसंच आंब्यासोबतच अंजीर, सफरचंद यासारख्या इतर फळ उत्पादकांना इथं बोलावून त्या फळांचा महोत्सव घेण्यात यावा अशा सूचना बागडे यांनी यावेळी केली. शेतकरी ते थेट ग्राहक योजनेअंतर्गत मराठवाड्यातले केशर आंबा उत्पादक शेतकरी, कोकणातील देवगड, सिंधुदुर्ग, चिपळूण इथले आंबा उत्पादक शेतकरी या महोत्सवात सहभागी झाले आहेत. उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समिती आणि महाराष्ट्र पणन मंडळाच्या वतीनं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या विज्ञान विभागाच्या परीक्षा ३१ मे तर वाणिज्य शाखेच्या परीक्षा सहा जून पासून तसंच कला आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा १३ जून पासून सुरु होणार आहेत, अशी माहिती परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ संचालक डॉक्टर भारती गवळी यांनी दिली. औरंगाबाद ३१, बीड २१ तर जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी १३ केंद्रावर ही परीक्षा होणार असल्याचं परीक्षा विभागातील उपकुलसचिव डॉ.गणेश मंझा यांनी सांगितलं.

****

खेळाडूंनी आपल्या जिल्ह्यासह राज्य आणि देशाचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचवावं, असं आवाहन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. जालना इथं जिल्हा क्रीडा संकुलात उभारण्यात येत असलेल्या दोन कोटी ९१ लाख रुपयांच्या विविध सुविधांच्या कामांचं भूमीपूजन दानवे यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा क्रीडा विभागानं जिल्ह्यात राज्य पातळीवरील विविध खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यासाठी प्रयत्न करावेत यासाठी सामाजिक दायित्त्व फंडातून निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी ग्वाही दानवे यांनी यावेळी दिली.

****

नांदेड जिल्ह्यात हदगाव तालुक्यातील तळणी-हदगाव रस्ता आणि पुलाचं भूमिपूजन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते काल करण्यात आलं. ऊर्ध्व पैनगंगा, नदीवरील सात उच्च पातळी बंधाऱ्यांच्या प्रकल्पामुळे दहा हजार सहाशे दहा हेक्टर सिंचन क्षेत्र ओलिताखाली येणार असून यासाठी प्रति वर्षी पाचशे कोटी रुपये निधी देण्यात येणार असल्याचं खासदार शिंदे यांनी सांगितलं. वसमत इथं हळद संशोधन केंद्रासाठी केंद्र शासनानं शंभर कोटी रुपयांची मान्यता दिली असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यात काल छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती रोजगार शिबिर घेण्यात आलं. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य, रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. शिक्षण आणि अभ्यासक्रम तसंच, भविष्यातील रोजगाराच्या संधी, नवीन तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण, शैक्षणिक कर्ज प्रक्रिया आदी विषयावर तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं.

****

औरंगाबादमध्ये मराठवाडा ऍक्सिलरेटर फॉर ग्रोथ आणि इन्क्युबेशन कौन्सिल -मॅजिक या संस्थेतर्फे आयोजित मॅजिक स्टार्ट अप विकेंडया दोन दिवसीय उपक्रमाचं केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते काल उद्घाटन करण्यात आलं. आत्मनिर्भर भारतासाठी स्टार्ट अप्सची भूमिका आणि योगदान अत्यंत महत्वाचं आहे. शहरात नाविन्यता आणि उद्योजकता विकासाला पोषक वातावरण असून मोठे उद्योग येण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असल्याची माहिती डॉ. कराड यांनी यावेळी दिली.

****

भारताचा बॅटमिंटनपटू एच.एस. प्रणॉय यानं मलेशिया मास्टर्स स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे, मात्र पी. व्ही. सिंधू हिला स्पर्धेतील एकेरीच्या उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला आहे. विजेतेपदासाठी प्रणॉयचा अंतिम सामना चायनीज तैपेईच्या लिन चू यी किंवा चीनच्या वेंग हाँग यांगशी होईल. दरम्यान, उपांत्य फेरीत पी. व्ही. सिंधूला इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मारिस्का तुनजुंग हिनं २१-१४, २१-१७ ने पराभूत केलं. 

****

इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. संध्याकाळी साडे सात वाजता हा सामना सुरु होईल.

****

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीदिनानिमित्त आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यपाल रमेश बैस, पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा, माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांच्या उपस्थितीत बोरीवली इथं स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या चित्र प्रदर्शनाचं उद्घघाटन करण्यात येणार आहे.

औरंगाबाद शहरात योगासन वर्ग, सावरकरांचा पोवडा, माझी जन्मठेप सोहळा, देशभक्तीपर गीते, १४० दिव्यांचा दिपोत्सव इत्यादी कार्यक्रमांचं आयोजन यावेळी करण्यात आलं आहे, असं स्वांतत्र्यवीर सावरकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष विधिज्ञ आशुतोष डंख आणि निमंत्रक भाऊ सुरडकर यांनी सांगितलं.

****

जालना शहरातल्या क्रिस्टल बिझनेस सेंटरमध्ये पासून तीन दिवसीय विज्ञान छंद शिबिराला सुरुवात झाली. जालना एज्युकेशन फाउंडेशनच्यावतीनं जुलै महिन्यात विज्ञान शोध वाटिका -सायन्स सेंटर सुरू करण्यात येणार आहे. या शोध वाटिकेतील अभ्यासक्रमासह दैनंदिन जीवनातील वैज्ञानिक तत्त्व विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत समजावं या उद्देशानं हे शिबीर घेण्यात येत आहे.

****

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी खासदार देविदास पिंगळे अध्यक्षपदी तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उत्तम खांडबहाले उपसभापतीपदी बिनविरोध निवडून आले आहेत. या पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्यामुळे त्यांच्या बिनविरोध निवडीची निवडणूक निर्णय अधिकारी नितिन मुंडावरे यांनी केली.

****

नांदेड रेल्वे विभागातून धावणाऱ्या नांदेड- अमृतसर सचखंड एक्सप्रेस आणि नांदेड - हजरत निजामुद्दीन मराठवाडा संपर्क क्रांती एक्सप्रेस या गाड्यांच्या मार्गात उद्या आणि परवा तात्पुरता बदल करण्यात आला आहे. जळगांव-मनमाड दरम्यान नांदगांव रेल्वे स्थानकावर घेण्यात येणाऱ्या मेगाब्लॉकमुळे या गाड्या हिंगोली, अकोला, भुसावळ मार्गे धावणार असल्याचं विभागामार्फत कळवण्यात आलं आहे.

****

No comments: