Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date : 26 May 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २६ मे
२०२३ दुपारी १.०० वा.
****
नव्या संसद भवनाचं उद्घघाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करावं,
याबाबत दाखल जनहित याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. ही याचिका सुनावणी
घेण्यायोग्य नाही असं न्यायालयानं म्हटलं असून, त्यानंतर
याचिकाकर्त्यांच्या वकीलानं ही याचिका मागे घेतली आहे.
दरम्यान, नवीन संसद भवनाचं उद्घाटन परवा २८ तारखेला होणार
असून, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी ७५
रुपयांचं नाणं देखील जारी करणार आहेत. या उद्घाटन
समारंभात विरोधी पक्षांनी सहभागी व्हावं, असं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. नवीन संसद भवन हे भारताची लोकशाही आणि १४० कोटी नागरिकांच्या अपेक्षांचं
शक्तिशाली मूर्त स्वरूप आहे, त्यामुळे ज्या
राजकीय पक्षांनी नव्या संसद भवनाच्या उद्गघाटन समारंभावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय
घेतला त्यांनी पुर्नविचार करावा,
असं त्यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.
***
२०२२-२३
या वर्षासाठी प्रमुख पिकांच्या उत्पादनाचा
तिसरा आगाऊ अंदाज कृषी मंत्रालयानं जारी केला. या चालू कृषी
वर्षात तीन हजार ३०५ लाख टन अन्नधान्य उत्पादनाचा अंदाज यात
वर्तवण्यात आला आहे. तांदूळ, गहू, मका, सोयाबीन, आणि उसाचं विक्रमी उत्पादन होईल, असं मंत्रालयानं म्हटलं आहे. लाखो शेतकऱ्यांचे कठोर परिश्रम, शास्त्रज्ञांचं प्राविण्य सरकारच्या शेतकरी अनुकूल धोरणांमुळे कृषी
क्षेत्र दिवसेंदिवस विकसित होत असल्याचं कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी
ट्विट संदेशात म्हटलं आहे.
***
नवीन संकल्पना अंमलात आणून यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करावा असं आवाहन
सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं. मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात काल झालेल्या गणेशोत्सव पूर्वतयारी बाबत
बैठकीत ते बोलत होते. सांस्कृतिक कार्य विभागाकडून यंदाही गणेशोत्सवात स्पर्धा घेण्यात येणार असल्याचं मुनगंटीवार यांनी स्पष्ट
केलं.
***
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रवेश परीक्षेचा
डाटा हॅक करणा-या तरुणाला नवी मुंबई पोलिसांच्या सायबर
विभागानं पुणे इथून अटक केली आहे. हा तरूण डार्कनेटवरील काही हॅकर्स सोबत संपर्कात असल्याचं आढळून आल्याचं, नवी मुंबईचे
पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं.
या हॅकर्सकडून त्याला प्रवेश पत्र आणि पश्नपत्रिका हॅक करण्यासाठी
४०० डॉलरची सुपारी मिळाल्याचं देखील तपासात
समोर आल्याचं त्यांनी सांगितलं.
***
आषाढी
वारीसाठी शेगाव इथून संत गजानन महाराजांच्या पालखीचं आज पंढरपूरकडे
प्रस्थान झालं. या पालखीचं यंदाचं हे ५४ वं वर्ष आहे. एका महिन्याच्या
प्रवासानंतर २७ जून रोजी ही पालखी पंढरपूरला पोहचेल.
***
औरंगाबाद शहरातील मौलाना आजाद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मजहर फारुखी यांची नियुक्ती केंद्र सरकारच्या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सदस्यपदी
झाली आहे. यानिमित्त काल औरंगाबाद इथं त्यांचा जाहीर सत्कार करण्यात
आला.
***
धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा तालुक्यासाठी महत्वपुर्ण
असलेल्या ८५ गांव वॉटरग्रीड योजनेचं
भुमिपुजन काल आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते झालं.
केंद्र सरकारच्या जलजीवन मिशनअंतर्गत २७४ कोटी रुपयांच्या निधीतून ही योजना साकारली जात आहे.
***
गडचिरोली जिल्ह्यातल्या चामोर्शीचे पोलिस निरीक्षक राजेश खांडवे
यांना न्यायाशीधांना धमकावल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलं आहे. चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीदरम्यान माजी सभापती अतुल पवार यांना मारहाण केल्याप्रकरणी खांडवे
यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एन. डी. मेश्राम यांनी दिले होते. त्यानंतर खांडवे यांनी न्यायाधीशांच्या बंगल्यावर जाऊन त्यांना शिवीगाळ करून
हुज्जत घातली होती.
***
नांदेड - जम्मू तावी एक्सप्रेस
ही रेल्वेगाडी आज आठ तास उशिरा धावणार आहे. ही रेल्वेगाडी नांदेड रेल्वे स्थानकावरुन
तिच्या निर्धारित वेळेऐवजी संध्याकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी सुटणार
असल्याचं दक्षिण मध्य रेलवेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.
***
क्वालालंपूर मध्ये सुरु असलेल्या मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत, भारताच्या
पी. व्ही. सिंधू आणि
एच. एस. प्रणॉय यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आज झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत सिंधूनं चीनच्या झांग यीमान हिचा २१ - ११,
२१ - १४ असा पराभव केला. तर प्रणॉयनं जपानच्या के निशिमोतो याचा २५ - २३, १८ - २१,
२१ - १३ असा पराभव केला. पुरुष एकेरीच्या अन्य एका सामन्यात किदांबी श्रीकांतचा इंडोनेशियाच्या
सी. एदिनाता याच्याकडून पराभव पत्करावा लागला.
***
इंडियन प्रीमिअर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज बाद फेरीतला अखेरचा
सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स संघात होत आहे. अहमदाबाद
इथं नरेंद्र मोदी क्रीडा संकुलावर होणाऱ्या या सामन्यातला पराभूत संघ स्पर्धेतून बाहेर
पडेल, तर विजेत्या संघाचा परवा अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्जसोबत
सामना होणार आहे.
//***********//
No comments:
Post a Comment