Sunday, 28 May 2023

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 28.05.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 28 May 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २८ मे २०२ सायंकाळी ६.१०

****

·      भारतासाठी लोकशाही ही संस्कार, कल्पना आणि परंपरा यांचा संगम, संसदेच्या नव्या वास्तूच्या उद्घघाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन.

·      लोकशाहीच्या नव्या मंदिरात सुवर्ण राजदंडाची पंतप्रधानांच्या हस्ते स्थापना, विविध धर्मगुरुंनी केली प्रार्थना.

·      स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त संसदेमध्ये पंतप्रधानांनी केलं अभिवादन, दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची आदरांजली.

·      मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचा किताब भारताच्या प्रणॉयनं पटकवला, अंतिम फेरीत चीनच्या वेंग हाँग यांग वर केली मात.

आणि

·      आयपीएलच्या विजेपदासाठी थोड्याच वेळात चेन्नई सुपर किंग्जची गुजरात टायटन्ससोबत लढत.

****

संसदेची नवी वास्तू केवळ इमारत नसून १४० कोटी भारतीयांच्या स्वप्न आणि आकांक्षांचं प्रतिबिंब असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. संसदेच्या नवनिर्मित इमारतीचं आज पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान म्हणाले की, भारताच्या विकासात काही क्षण अमर झाले असून त्यात आजचा दिवस सामील झाला आहे. भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे आजचा दिवस देशाच्या इतिहासात शुभ दिवस आहे. कारण देशातील लोकांनी लोकशाहीला एक इमारत भेट दिली आहे. नव्या संसद भवनात सर्वधर्मीय प्रार्थनाही झाली. पंतप्रधान म्हणाले –

साथियों नये रास्तों पर चलकर ही नये प्रतिमान गडे जाते हैं। आज नया भारत नये लक्ष तय कर रहा है। नये रास्ते गड रहा हैं। नया जोश है। नया उमंग है। नया सफर है। नई सोच है। दिशा नई है। दृष्टी नई है। संकल्प नया है। विश्वास नया है।

****

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी जुन्या संसद भवनात फलकाचं अनावरण करून देशाच्या नवीन संसदेचं उद्घाटन करण्यात आलं. पंतप्रधानांच्या हस्ते त्यानंतर सुवर्ण राजदंड - सेंगोलची लोकसभा अध्यक्षांच्या आसनाशेजारी स्थापना करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे देखील उपस्थित होते. नवीन संसद भवनाच्या बांधकामात महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या कामगारांचा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संसद भवनाची माहिती देणारी चित्रफित आणि संसद भवनात स्थापन करण्यात आलेल्या सेंगोलची माहिती असलेली चित्रफितही दाखवण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या शुभेच्छा संदेशाचं यावेळी वाचन करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७५ रुपयांचं नाणं आणि टपाल तिकिटही जारी केलं.

****

नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम अतिशय थाटामाटात आज पार पडला. मात्र, समारंभावर प्रमुख विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत उद्घाटन कार्यक्रमावरून केंद्र सरकारवर टीका केली. संसदेच्या उद्घाटनाचं आमंत्रण माझ्या हातात आलेलं नाही. कदाचित माझ्या दिल्लीतल्या निवासस्थानी ते गेलेलं असू शकेल, असं ते म्हणाले. एवढा मोठा कार्यक्रम घेताना सरकारनं विरोधकांशी कुठलीही चर्चा केली नाही, असा आरोपही त्यांनी केला.

****


स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुन्या संसद भवनात सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. दिल्ली इथं महाराष्ट्र सदनातही स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदरांजली वाहिली.

मुंबईत राजभवन इथही सावरकरांची जयंती साजरी करण्यात आली.

मुंबई इथं मंत्रालयात राज्याचे शालेय शिक्षण आणि मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर यांनी सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. राज्य पर्यटन विभागामार्फत ‘वीरभूमी परिक्रमा’ उपक्रमांतर्गत विविध ठिकाणी सावरकर विचार जागरण सप्ताह हे अभियान राबवण्यात येत आहे. राष्ट्रीय स्मारक पदयात्रेसह दिपोत्सवाचं आयोजनही मुंबईच्या सावरकर स्मारक इथं करण्यात आलं आहे. मुंबईत बोरीवली इथं राज्यपाल रमेश बैस, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, माजी केंद्रीय मंत्री आणि उतर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या चित्र प्रदर्शनाचं उद्धघाटन करण्यात आलं. औरंगाबाद शहरात योगासन वर्ग, सावरकरांचा पोवाडा, माझी माझी जन्मठेप देशभक्तीर गीतं यांसह १४० दिव्यांचा दिपोत्सव आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं.

****

धाराशिव शहरातही स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती उत्साहात साजरी झाली. जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं जयोस्तु प्रतिष्ठानतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं. तसंच यानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी गौरवण्यात आलं.

बीड इथं जिल्हाधिकारी कार्यालयात सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या ‘मन की बात’ कार्यक्रमात शिक्षण मंत्रालयानं सुरू केलेल्या युवासंगम या उपक्रमाचा उल्लेख करत यात सहभागी युवकांशी संवाद साधला.

आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमाचा हा १०१वा भाग होता.

वेगवेगळ्या राज्यांत उच्चशिक्षण घेणाऱ्या संस्थांमधील विद्यार्थी दुसऱ्या राज्यांमध्ये जाऊन तिथली संस्कृती, राहणीमान यांचा अनुभव घेतात. युवा संगमच्या पहिल्या फेरीत बाराशे युवकांनी देशाच्या २२ राज्यांना भेटी दिल्या असल्याचं मोदी यांनी सांगितलं. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातल्या शिवाजी डोले यांनी सैन्यातून निवृत्त झाल्यावर कृषी पदविका घेऊन २० जणांचं पथक तयार करून वेंकटेश्वरा को-ऑपरेटिव्ह पॉवर अँड अग्रो प्रोसेसिंग लिमिटेड या निष्क्रीय अशा सहकारी संस्थेचं पुनरूज्जीवन केलं. जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान या चारही सुत्रांचं शिवाजी डोले हे प्रतिबिंब असल्याचं मोदी म्हणाले. नाशिकच्या मालेगावमध्ये पथकाचे सदस्य ५०० एकर जमिनीत कृषी शेती करत असून त्यांनी लागवड केलेली द्राक्षं युरोपातही निर्यात केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

न्यायमूर्ती रमेश धनुका यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. राज्यपाल रमेश बैस यांनी न्यायमूर्ती रमेश धनुका यांना पद आणि गोपनीयतेची शपध दिली. धनुका हे मुंबई उच्च न्यायालयाचे ४६ वे मुख्य न्यायाधीश आहेत. २६ मे रोजी केंद्र सरकारनं धनुका यांच्या नियुक्तीची अधिसूचना जारी केली होती. दरम्यान, धनुका हे ३० मे रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे केवळ तीन दिवसांचा कालावधी त्यांना मुख्य न्यायाधीश म्हणून मिळणार आहे.

****

नांदेड-अमृतसर सचखंड एक्सप्रेससह, नांदेड - हजरत निजामुद्दीन मराठवाडा संपर्क क्रांती एक्सप्रेस या दोन्ही रेल्वे गाड्यांच्या मार्गात उद्या आणि परवा असे दोन दिवस तात्पुरता बदल झाला आहे. जळगाव-मनमाड दरम्यान नांदगांव रेल्वे स्थानकावर घेण्यात येणाऱ्या मेगाब्लॉकमुळे या गाड्या हिंगोली, अकोला, भुसावळ मार्गे धावणार असल्याचं विभागामार्फत कळवण्यात आलं आहे.

****

औरंगाबादच्या चिकलठाणा इथं आज आयुर्वेदिक आरोग्य शिबिर घेण्यात आलं. केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालया अंतर्गत चालणाऱ्या आयुष विभागाविषयी माहिती आणि यासंदर्भातील तपासण्यांविषयीची माहिती देण्यात आली. औरंगाबाद शहर आणि ग्रामीण परिसरातील महिला, पुरुष यांच्यासाठी संपूर्ण शरीराची तपासणी स्कॅनिंग पद्धतीनं आरोग्य शिबिराच्या माध्यमातून यावेळी करण्यात आली. या आयुष आरोग्य शिबिरात विविध आजारांबाबत रुग्णांना मार्गदर्शन आणि औषधोपचारही करण्यात आले.

****

पालघर जिल्हा पोलिसांना चाइल्ड हेल्पलाइन या संस्थेच्या माध्यमातून एक बाल विवाह रोखण्यात यश आलं आहे. या शहरात बालविवाह होणार असल्याच्या गुप्त माहितीची खात्री करुन, होणारा बाल विवाह पोलिसांनी थांबवला. विवाह होत असलेल्या मुलाचं वय १९ तर मुलीचं अठरा वर्षापेक्षा कमी वय होतं. दरम्यान, महिला बालकल्याण समितीच्या आदेशानंतर अल्पवयीन मुलीला सामाजिक संस्थेत पाठविण्यात आलं असून पोलिस पुढील कारवाई करत आहेत.

****

‘एका हातात शस्त्र आणि दुसऱ्या हातात शास्त्र’ ही राजमाता अहिल्यादेवींची प्रतिमा कायम राहावी, यासाठी सोलापूर विद्यापीठ परिसरात त्यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येईल. शासनानं ही मागणी मान्य केल्याची माहिती विधान परिषदेचे सदस्य गोपीचंद पडळकर यांनी आज सोलापूर इथं दिली. अहमदनगर शहराचं नाव बदलून लवकरच ‘अहिल्यानगर’ होईल, असंही ते म्हणाले. भगवा आखाडा युवा प्रतिष्ठानच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती मूर्ती वाटपाचा कार्यक्रम त्यांच्या हस्ते झाला, त्या वेळी ते बोलत होते.

****

मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीचा किताब भारताच्या एच.एस.प्रणॉय यानं जिंकला आहे. क्वालालंपूर इथं आज झालेल्या अंतिम लढतीत प्रणॉय यानं चीनच्या वेंग हाँग यांग याला २१-१९,१३-२१ आणि २१-१८ अशा फरकानं ९३ मिनिटं चाललेल्या या सामन्यात पराभूत केलं.

****

इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. संध्याकाळी साडे सात वाजता हा सामना सुरू होईल.

****

हवामान

धाराशिव इथं आज दुपारी पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. रोहिणी नक्षत्राच्या या पावसानं प्रचंड उष्णता सहन करणाऱ्या नागरिकांना अल्पसा दिलासा मिळाला. औरंगाबाद जिल्ह्यातील शिऊर परिसरातही वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे.

****

No comments: