Wednesday, 31 May 2023

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 31.05.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 May 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ३१ मे २०२ सायंकाळी ६.१०

****

·      अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यादेवी नगर करणार, अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मगावी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा.

·      भाजप सरकारच्या काळात विकासाला गती आणि भ्रष्टाचाराला वेसण, पंतप्रधान मोदींनी राजस्थानच्या अजमेरमध्ये केला जनजागरण मोहिमेचा प्रारंभ.

·      औरंगाबादच्या पंतप्रधान आवास योजनेतील घोटाळ्यात ईडीची तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना चौकशीसाठी नोटीस.

·      अहमदनगरच्या उत्तर विभागाला सिंचनासाठी निळवंडे प्रकल्पाचं पाणी सोडलं.

आणि

·      चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.

****

अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून ते अहिल्यादेवी नगर करणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८व्या जयंतनिमित्त त्यांचे जन्मगाव चौंडी इथं राज्य सरकारच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना प्रारंभी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील घोषणा केली. अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यादेवीच्या नावाने ठेवण्याची येथील जनतेची अनेक दिवसांची मागणी होती. लवकरच या जिल्ह्याचे नाव अहिल्यादेवी नगर करण्यात येईल, असं फडणवीस म्हणाले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही उपमुख्यमंत्र्यांच्या घोषणेला दुजोरा दिला. आमच्या सरकारच्या काळात अहिल्यादेवी नगर नाव दिले जात आहे, हे आमचे भाग्य आहे, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले – (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि आदिल्यादेवी होळकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आम्ही राज्याचा कारभार करतोय. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या मनातली जी इच्छा आहे, या अहमदनगरचं नाव अहिल्यादेवी होळकर हे आपण करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे. आपल्या अहिल्यादेवींच्या भक्तांसाठी या सरकारने अहिल्यादेवी सहकारी तत्वावरच्या महामंडळाला दहा हजार कोटींची तरतूद केलेली आहे.

याआधी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केलं. आज अहिल्यादेवी यांची २९८ वी जयंती साजरी होत आहे.

****

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात सहकार व इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आमदार राजू नवघरे, सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव विठ्ठल भास्कर यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांनीही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. सहकारमंत्री सावे यांनी अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या.

****

भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या काळात देशाचा विकास अत्यंत वेगाने होत आहे. आपल्या सरकारच्या काळात भ्रष्टाचाराला थारा दिला जात नाही. सबका साथ सबका विकास हा आपला मूलमंत्र आहे. त्याचीच प्रचिती देशभरातील जनतेला येत आहे, असं प्रतिपादन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं. केंद्र सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं भारतीय जनता पक्षाच्या जनजागरण मोहिमेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानातील अजमेर इथल्या सभेनं केला. त्यावेळी ते बोलत होते. मोदी पुढे म्हणाले की, काँग्रेसने ५० वर्षांपूर्वी गरीबी हटविण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात काहीही केले नाही. काँग्रेसच्या काळात किती प्रचंड भ्रष्टाचार होत असे ते त्यांचे नेतेच स्वतः बोलून दाखवत असत. भाजपच्या सरकारमध्ये विकासाला गती मिळाली असून भ्रष्टाचाराला वेसण घातली आहे. भाजपचे देशभर चालणारे हे जनजागरण अभियान एक महिना चालणार आहे.

****

औरंगाबादच्या पंतप्रधान आवास योजना घोटाळ्यात ईडीनं तत्कालीन जिल्हाधिकारी तथा कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांना चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. पंतप्रधान आवास या घरकुल योजनेत एक हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर ईडीनं शहरात तब्बल १३ ठिकाणी छापे टाकले होते. या संदर्भात सक्त वसूली संचालनालयानं आतापर्यंत तत्कालीन महापालिका आयुक्त तसंच महापालिकेतील अधिकाऱ्यांची चौकशी केली आहे.

****

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला यंदा ३५० वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त उद्यापासून रायगड परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या शुक्रवारी या कार्यक्रमांचं उद्घघाटन होणार असून, त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचं प्रक्षेपण केलं जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय संस्कृती मंत्री जी. किशन रेड्डी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह शिवप्रेमी या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

****

रेल्वेच्या काही तांत्रिक कारणामुळे आज, ३१ मे रोजी हजूर साहिब नांदेड येथून सुटणारी गाडी क्रमांक ०७४२८ हजूर साहिब नांदेड - लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे उद्या दिनांक एक जून रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून सुटणारी गाडी क्रमांक ०७४२९ लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई - हजूर साहिब नांदेड एक्स्प्रेस देखील रद्द करण्यात आली आहे.

****

अहमदनगरच्या उत्तर विभागाला सिंचनाच्या दृष्ट्रीनं वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्प पाणी सोडण्याचा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील निळवंडे धरण जिल्ह्यातील दुष्काळी आणि जिरायत भागाला सुजलाम् सुफलाम् करणारा प्रकल्प ठरणार असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. धरणाचा डावा आणि उजवा कालवा तसंच उच्चस्तरीय पाईप कालवा आणि उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव आणि नासिकच्या सिन्नर तालुक्यातल्या १८२ गावांमधील ६८ हजार ८७८ हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

****

चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांच्या पार्थिवावर आज दुपारी एक वाजता शोकाकूल वातावरण आणि शासकीय इतमामात वरोरा इथल्या मोक्षधाम इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा मोठा मुलगा पारस यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या वतीनं जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी श्रद्धांजली वाहिली. अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, काँग्रेस संसदीय दलाच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी, काँगेस नेते राहुल गांधी यांच्या वतीनं मुकुल वासनिक आणि अशोक चव्हाण यांनी शोक संदेशाचं वाचन केलं.

****

औरंगाबादमध्ये कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुराण कथेचा धार्मिक कार्यक्रम उद्यापासून सात दिवस होणार आहे. शहरातल्या श्रीराम मंदिर मठ बालाजी ट्रस्ट पिसादेवी इथं हा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे एक जून ते सात जूनपर्यंत शहर वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. यामध्ये शहरातील आंबेडकर नगर चौक ते पिसादेवी जाणारा मार्ग आणि हर्सुल टी पॉंईट ते एन वन पर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहतूक वोखार्ड टी पाँईट ते नारेगाव मार्गाने आणि पिसादेवी टी पाँईट ते सावंगी बायपास, जकात नाका हर्सुल टी पाँईंट मार्गे आणि एन वन चौक ते चिश्तिया चौक, सेंट्रल नाका, आझाद चौक टी व्ही सेंटर मार्गे वळवण्यात आली असल्याची माहिती पोलिस आयुक्त कार्यालयाच्या वाहतूक शाखेनं दिली आहे.

****

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण-एमएमआरडीएनं पावसाळ्यासाठी आपत्कालीन नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. या नियंत्रण कक्षात २४ तास तक्रारींवर पाठपुरावा करून बृहन्मुंबई महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि रेल्वे यांसारख्या विविध संस्थाच्या आपत्ती नियंत्रण कक्षांसोबत संवाद साधला जाणार आहे. तसंच माहितीची देवाण घेवाण करण्यात येणार आहे. हे नियंत्रण कक्ष दिनांक १ जून २०२३ पासून ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत कार्यरत राहणार आहेत.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात २०१७ पासून पंतप्रधान मातृत्व वंदन योजनेचं काम सुरु असून आतापर्यंत ५० हजार ११० गर्भवती महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. निर्धारित उद्दिष्टाच्या हे १०५ टक्के असून या योजनेतून जिल्ह्यात मार्च २०२३ अखेर १९ कोटी ७२ लाख ३६ हजार रुपयांचा लाभ आरोग्य विभागानं या गर्भवती मातांना दिला आहे.

****

लखनौ इथं सुरू असलेल्या खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धांमध्ये पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठानं महिला टेनिस स्पर्धेत काल पहिलं सुवर्णपदक जिंकलं. त्यांनी गतविजेत्या उस्मानिया विद्यापीठाचा दोन - शून्य असा पराभव केला.

****

No comments: