Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 25 May 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ मे २०२३ सायंकाळी
६.१०
****
·
राज्यातल्या
लाभार्थ्यांना शासनाच्या सर्व योजनांचे लाभ मिळावेत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
·
बियाणं,
रासायनिक खतांच्या खरेदीसाठी पीक कर्ज वेळेत उपलब्ध व्हावं - सहकारमंत्री अतुल सावे
यांचे निर्देश
·
बारावीमध्ये
औरंगाबाद विभागाचा निकाल ९१ पूर्णांक ८५ शतांश तर लातूर विभागाचा निकाल ९० पूर्णांक
३७ शतांश टक्के
आणि
·
औरंगाबादमध्ये
दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये लाच घेताना दोन फौजदारांना अटक
****
राज्यात सर्व लाभार्थ्यांना शासनाच्या योजनांचे सगळे लाभ
मिळावेत, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी आज रत्नागिरी
इथं ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमामध्ये मार्गदर्शन केलं, त्यावेळी शिंदे बोलत होते.
ते म्हणाले –
हे शेतकऱ्यांचं, बळीराजाचं, माता-भगिनींचं, विद्यार्थ्यांचं,
ज्येष्ठांचं, सगळ्यांचं सरकार या राज्यात आलेलं आहे. आणि म्हणूनच आपल्याला हे नवीन
नवीन पाहायला मिळतंय. या नवीन योजना डायरेक्ट आपल्या दाराजवळ येतायत. याचं कारणच एवढं
आहे, हे सरकार तुमचं आहे. या राज्यातल्या सगळ्या लाभार्थ्यांना जेव्हा हे शासनाचे लाभ
मिळतील, तोच दिवस आमच्यासाठी खऱ्या अर्थाने समाधानाचा असणार आहे.
****
भारताला ऊर्जा निर्यात करणारा देश बनवण्याचं स्वप्न पूर्ण
करायचं आहे, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नीतिन गडकरी यांनी केलं आहे. त्यांच्या
हस्ते आज मुंबईत हरित हायड्रोजन परिषदेचं उद्घघाटन करण्यात आलं, त्यावेळी गडकरी बोलत
होते.जीवाश्म इंधन आयात आणि प्रदूषण, ही देशासमोरची दोन मोठी आव्हानं आहेत, असं सांगत,
इंधनावरचा खर्च कमी करण्यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे, असं मत त्यांनी व्यक्त
केलं. एकूण प्रदूषणापैकी सुमारे चाळीस टक्के प्रदूषण हे परिवहनामुळे होतं. या दृष्टीनं,
इथॅनॉल, बायो-सीएनजी, बायोइथॅनॉल आणि हायड्रोजनचे एकशे पस्तीस प्रकल्प प्रक्रियेत असल्याची
माहिती त्यांनी दिली. भविष्यकालीन तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं हरित हायड्रोजन परिषदेचं
आयोजन प्रेरणादायी असल्याचा आनंद आहे, अशी भावनाही गडकरी यांनी यावेळी व्यक्त केली.
****
मोसमी पावसाच्या आगमनाची वेळ जवळ आल्यानं बँकांनी शेतकऱ्यांना
बियाणं तसंच रासायनिक खतांच्या खरेदीसाठी पीक कर्ज वेळेत द्यावं, असे निर्देश राज्याचे
सहकार आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली
आज मुंबईत सहकार विभागाची आढावा बैठक झाली, त्यावेळी सावे बोलत होते. पीक कर्ज वेळेत
मिळावं याचा पाठ पुरावा सहकार विभागानं करुन अहवाल सादर करावा, अशी सूचना त्यांनी केली.
जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज पुरवठा करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेले
आहेत, त्यानुसार सहकार विभागानं कार्यवाही करावी, असे निर्देशही सावे यांनी यावेळी
दिले.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं
फेब्रुवारी- मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर केला.
या परीक्षेला बसलेल्या १४ लाख १६ हजार ३७१ विद्यार्थ्यांपैकी ९१ पूर्णांक २५ शतांश
टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात २ पूर्णांक
९७ शतांश टक्क्यांनी घट झाली आहे. उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांमध्ये, मुलांच्या
तुलनेत मुलींची टक्केवारी ४ पूर्णांक ५९ शतांश टक्क्यांनी जास्त आहे.यंदा बारावीच्या
परीक्षेत विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९६ पूर्णांक ०९ शतांश टक्के असून वाणिज्य शाखेचा
९० पूर्णांक ४२ शतांश टक्के, व्यवसाय अभ्यासक्रमाचा निकाल ८९ पूर्णांक २५ शतांश टक्के
तर कला शाखेचा निकाल ८४ पूर्णांक ०५ शतांश टक्के, इतका लागला आहे. औरंगाबाद विभागाचा
निकाल ९१ पूर्णांक ८५ शतांश टक्के तर लातूर विभागाचा निकाल ९० पूर्णांक ३७ शतांश टक्के
असा लागला आहे. दरम्यान, बारावी परीक्षेतल्या यशासाठी सग़ळ्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं
अभिनंदन आणि त्यांना भावी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा, अशा शब्दांत मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी बारावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे. या
परीक्षेत यंदा मुलींनी आणि दिव्यांगांनी लक्षणीय यश मिळवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी
त्यांचं विशेष अभिनंदन केलं आहे.विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनीही उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं
अभिनंदन केलं असून, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी निराश न होता पुन्हा जोमानं प्रयत्न
करावेत, असं म्हटलं आहे.
****
आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आपल्या मुंबई
भेटीच्या दुस-या दिवशी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट
घेतली. केंद्र सरकार विरोधी पक्षांना धमकावत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी या भेटीनंतर
घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. दिल्लीच्या लोकनियुक्त सरकारचे अधिकार काढून घेऊन
ते केंद्र सरकारकडेच ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं अध्यादेश काढला असून, ही देशासाठी
घातक स्थिती असल्याची टीका केजरीवाल यांनी केली. या संदर्भातलं विधेयक राज्यसभेत पारित
होऊ नये, यासाठी आपण विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेत असल्याचं सांगत, पवार यांनी
याबाबत आपल्याला पाठिंबा दिला आहे, असं केजरीवाल यांनी सांगितलं. शरद पवार यांनी यावेळी
बोलताना, प्रत्येक बाबीमध्ये केंद्र सरकारचा हस्तक्षेप होत असून हा लोकशाहीवर आघात
आहे, अशी टीका केली. या विधेयकाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा केजरीवाल यांना पाठिंबा
आहे, असंही पवार यांनी यावेळी जाहीर केलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता जगभरात वाढत
चालली असल्यामुळेच विरोधकांकडून सातत्यानं त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात
आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली
आहे. सोलापूरमध्ये नव्यानं बांधण्यात आलेल्या महसूल भवनाचं लोकार्पण फडणवीस यांच्या
हस्ते आज करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान मोदी यांची, वैश्विक नेता,
अशी प्रतिमा झाली असून, याचा सगळ्या भारतीयांना अभिमान वाटायला हवा, असं मतही फडणवीस
यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
नागपूर ते मुंबई हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी
महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या होणार आहे. ऐंशी किलो मीटरचा
हा टप्पा आहे. समृद्धी महामार्गावरच्या नागपूर ते शिर्डी या ४८० किलोमीटरच्या पहिल्या
टप्प्याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी ११ डिसेंबरला केलं होतं.
****
जायकवाडी धरणातल्या नव्या पाणी उपसा संच उभारणीच्या कामाला
भेट देऊन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी आज आढावा घेतला. अमृत अभियानाअंतर्गत
औरंगाबाद शहराच्या पाणी पुरवठा योजनेसाठी हा संच तयार होत आहे. डॉ.कराड यांनी यावेळी
पाणी पुरवठा योजनेतल्या संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधून सूचना केल्या.
****
औरंगाबाद इथं दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन पोलिस उपनिरीक्षकांना
आज लाच घेताना अटक करण्यात आली. सातारा पोलिस ठाण्याचा पोलिस उप निरीक्षक मच्छिन्द्र
ससाणे, याला २४ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं अटक
केली. त्यानं सातारा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी २५ हजार रुपयांची
लाच मागितली होती. त्यावरुन तक्रारदारानं केलेल्या तक्रारीनंतर अटकेची ही कारवाई करण्यात
आली. सिडको पोलिस ठाण्याचा उप निरीक्षक नितीन मोरे यालाही आज अटक करण्यात आली. त्यानं
गुन्हा दाखल न करण्यासाठी बारा हजार रुपयांची लाच मागितली होती.
****
शासकीय योजनांची जत्रा अंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात आरोग्य
शिबीरं घेण्यात येत आहेत. यात आज शहरातल्या सिल्क मिल्क कॉलनी परिसरात शासकीय योजना
सुलभीकरण अभियानाअंतर्गत मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आलं. यावेळी नेत्र रोग तपासणी,
मोफत चष्माचे नंबर, मोतिबिंदू निदान, स्त्री रोग तपासणी आणि दातांची तपासणी करण्यात
आली. या शिबीरामध्ये १४८ जणांची तपासणी करण्यात आल्याची माहिती महानगरपालिकेचे आरोग्य
अधिकारी डॉ.पारस मंडलेचा यांनी दिली आहे.
****
औरंगाबादमध्ये सेवापथ सोशल फाऊंडेशन या संस्थेतर्फे देण्यात
येणाऱ्या आदर्श सेवा गौरव, या वार्षिक पुरस्कारांचं वितरण आज करण्यात आलं. सहाय्यक
पोलीस आयुक्त बालाजी सोनटक्के यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. विविध सामाजिक
क्षेत्रात उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या समाजसेवकांना या पुरस्कारांनी गौरवण्यात
आलं.
****
No comments:
Post a Comment