Saturday, 27 May 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 27.05.2023 रोजीचे सकाळी 11.00 वाजताचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२७ मे २०२ सकाळी ११.०० वाजता

****

संसदेची नवीन इमारत प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा, अशीच असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. या नवीन इमारतीची झलक दाखवणारा चित्रफित काल त्यांनी टि्वटर खात्यावर प्रसारित केली आहे. सर्वांनी ही चित्रफित समाजमाध्यमात प्रसारित करावी  आणि त्यावर आपल्या आवाजात प्रतिक्रीया द्याव्या, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

****

चारधाम फायबर कनेक्टीव्हीटी अर्थात संपर्कयंत्रणा प्रकल्पाअंतर्गत काल गंगोत्री इथं देशातली दोन लाखावी फाईव्ह जी साइट कार्यान्वित करण्यात आली आहे. संपर्क क्षेत्र आणि पर्यटनासाठी ही चांगली बातमी आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कामगिरीचं कौतुक केलं.

****

रेल्वे संरक्षण दलात हवालदार आणि उपनिरीक्षक पदांसाठी नऊ हजार जागांवर भरती होणार असल्याचा खोटा संदेश सध्या समाजमाध्यमांमध्ये फिरत आहे. रेल्वे संरक्षण दलाच्या किंवा मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा मुद्रित अथवा दृकश्राव्य माध्यमांवरून अशी कोणतीही अधिसूचना जारी केली नसल्याचं रेल्वे मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.

****

औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात आयोजित आंबा महोत्सवाचं उद्धाटन आमदार हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते आज झालं. शेतकरी ते थेट ग्राहक योजनेअंतर्गत मराठवाड्यातले केशर आंबा उत्पादक शेतकरी, कोकणातील देवगड, सिंधुदुर्ग, चिपळूण इथले आंबा उत्पादक शेतकरी या महोत्सवात सहभागी झाले आहेत.

****

महसूल गुप्तचर संचालनालय आणि अंमली पदार्थ प्रतिबंधक आयुक्तालय यांनी जप्त केलेल्या अंमली पदार्थांचा पदार्थांचा मोठा साठा काल राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या तळोजा वसाहतीत नष्ट करण्यात आला. या कारवाईत नष्ट करण्यात आलेल्या अंमली पदार्थांची एकूण किंमत जवळजवळ पंधराशे कोटी रुपये होती, अशी माहिती सीमा शुल्क विभागाच्या प्रधान आयुक्तांनी दिली आहे.

****

हवामान विभागानं काल मान्सूनचा सुधारित दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. त्यानुसार यंदा देशभरात दीर्घकालीन सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडेल. या अंदाजात चार टक्क्यांपर्यंत तफावत राहू शकते. जून महिन्यात मात्र, महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागात पाऊसमान कमी राहील असं या अंदाजात म्हटलं आहे.

****

No comments: