Wednesday, 31 May 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 31.05.2023 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 31 May 2023

Time : 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : ३१ मे  २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      शेतकऱ्यांना प्रतिवर्ष सहा हजार रुपयांचं अनुदान देणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्यात राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

·      औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यात मका संशोधन केंद्र स्थापन करण्याला मान्यता

·      राज्यातल्या औद्योगिक मार्गिकांच्या विकासाला प्राधान्यक्रम - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

·      शेंद्रा बिडकीन        औद्योगिक वसाहतीत येत्या काही वर्षात आणखी पन्नास उद्योगांचं उत्पादन सुरू होण्यासाठी शासनाचे प्रयत्न 

·      राज्य शासनाच्या स्वच्छमुख अभियानाचे भारतरत्न सचिन तेंडूलकर सदिच्छादूत

·      राज्यातल्या चारशे चौदा अंगणवाड्या दत्तक घेण्यासाठी चार सामाजिक संस्थांशी सामंजस्य करार

·      मनरेगा अंतर्गत, सव्वीस हजार दोनशे पन्नास टॅबच्या खरेदीच्या निविदेत घोटाळा झाल्याचा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आरोप

आणि

·      उस्मानाबादमध्ये धाराशीव नाट्य महोत्सवाला प्रारंभ

सविस्तर बातम्या

प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी , “नमो शेतकरी महासन्मान निधी  योजना राबवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. मुंबईत काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यासंदर्भात माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले…

 

Byte…

अतिशय महत्वाचे निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचे घेतलेले आहेत. पहिला निर्णय नमो शेतकरी सन्मान योजना. केंद्राची जी सहा हजार रूपयाची योजना शेतकऱ्यांसाठी होती, त्याच्या जोडीने राज्य सरकारकडून देखील सहा हजार रूपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला. म्हणजे सहा प्लस सहा म्हणजे बारा हजार रूपये शेतकऱ्यांना मिळतील. त्याचबरोबर जे पीक विम्याचा हप्ता जो शेतकरी भरत होता, तो देखील त्याच्या विम्याचा हिस्सा सरकार भरेल. शेतकऱ्यांने फक्त एक रूपया भरायचा. अशा प्रकारचे अतिशय ऐतिहासिक निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये झाले.

त्याचबरोबर प्रधानमंत्री किसान योजनेची कार्यपद्धती सुधारण्याचा निर्णयदेखील मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेला, २०२७-२८ पर्यंत मुदतवाढ देण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. ही योजना आणखी तीन जिल्ह्यामध्ये राबवण्यात येणार आहे.

 

कापूस उत्पादक क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी नव्या वस्त्रोद्योग धोरणालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. या धोरणामुळे २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित होणार आहे. तसंच पुढच्या पाच वर्षांत पाच लाखांपर्यंत रोजगारनिर्मिती करण्याचा उद्देश आहे. वस्त्रोद्योगाच्या वाढीसाठी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग विकास महामंडळ स्थापन करण्याचाही या धोरणात समावेश आहे.

 

कामगारांची सुरक्षा, आरोग्य, आणि कामाच्या स्थितीबाबत नवीन कामगार नियमांनाही राज्य मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. केंद्र शासनानं सर्व २९ कामगार कायदे एकत्र करून चार कामगार संहिता तयार केल्या असून, व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची स्थिती संहिता २०२० या चौथ्या संहितेला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे.

 

औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यात मौजे कोटनांद्रा आणि डोईफोडा इथं मका संशोधन केंद्र स्थापन करण्याला, तसंच त्यासाठीच्या बावीस कोटी अठरा लाख रुपयांच्या खर्चालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. या मका संशोधन केंद्रासाठी आवश्यक २१ पदे आणि बाह्यस्त्रोताद्वारे १८ पदे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीच्या मान्यतेच्या अधिन राहून निर्माण करण्यात येतील.

 

महिलांना पर्यटन व्यवसायात अधिकाधिक वाव मिळावा आणि त्यांचं सक्षमीकरण व्हावं, यादृष्टीनं “आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत “आई हे महिला केंद्रीत पर्यटन धोरण राबवण्यास, काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. याअंतर्गत काही पर्यटन स्थळांवर महिला बाईक- टॅक्सी सेवा सुरु करण्यात येणार आहे. याशिवाय, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एक ते आठ मार्च या कालावधीत, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सगळ्या रिसॉर्ट्समध्ये, महिला पर्यटकांना ऑनलाईन बुकिंगमध्ये पन्नास टक्के सूट देण्यात येणार आहे.

 

बृहन्मुंबईमध्ये समूह पुनर्विकासाला प्रोत्साहन मिळावं यादृष्टीनं अधिमूल्यात पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णयही, मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. 

नवीन माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरणालाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली असून, या धोरणामुळे राज्य माहिती तंत्रज्ञानात देशात आघाडीवर राहण्याला, तसंच यातून पंचाण्णव हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित करण्याला मदत होणार आहे.

राज्यातल्या अभियांत्रिकी तसंच औषधनिर्माण महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची एकशे पाच पदांची निर्मिती करण्याला, तसंच बुलढाणा जिल्ह्यातल्या नांदुरा इथल्या जिगाव प्रकल्पाला गती देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाच्य बैठकीत घेण्यात अला.

****

राज्यातल्या औद्योगिक मार्गिकांच्या विकासाला प्राधान्यक्रम दिला असून, तिथली विकास कामं गतीनं व्हावीत यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय औद्योगिक मार्गिकांच्या विकास आणि अंमलबजावणीबाबत, शिखर संनियंत्रण समितीच्या बैठकीत ते काल दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. या बैठकीला दिल्लीहून अर्थमंत्री निर्मला सीतारामन, वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय मंत्री सर्वांनंद सोनोवाल उपस्थित होते. केंद्र सरकारनं देशभरात उद्योग समूहांसाठी वितरित केलेल्या दोनशे एकोणचाळीस भूखंडांपैकी, दोनशे भूखंड राज्यातल्या शेंद्रा बिडकीन इथं असल्याची माहिती, मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. या प्रकल्पात सध्या सत्तावीस उद्योगांनी प्रत्यक्ष उत्पादन सुरू केलं असून, येत्या काही वर्षात आणखी पन्नास उद्योगांचं उत्पादन सुरू होण्यासाठी शासन प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले.

औरंगाबाद-पैठण रस्त्याच्या रूंदीकरणाचं काम वेळेवर पूर्ण करावं, औरंगाबाद-पुणे हरित महामार्गासाठी भूसंपादन लवकर व्हावं, या मार्गावर रेल्वेमार्गासाठी अतिरिक्त जागेचं भूसंपादन करावं, औरंगाबाद जिल्ह्यातल्या करमाड रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे सायडिंग आणि मालाची चढउतार करण्याची व्यवस्था करावी, यासह अन्य मागण्या मुख्यमंत्री  शिंदे यांनी या बैठकीच्या माध्यमातून केंद्राकडे केल्या. त्यावर, केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेल्या महाराष्ट्राच्या प्रस्तावांमध्ये लक्ष घालून ते मंजूर करण्यात येतील, अशी हमी वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांनी दिली.

****

केंद्रातल्या मोदी सरकारला नऊ वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे देशभर महाजनसंपर्क अभियान राबवण्यात येत आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान राबवलं जाणार असून, या अभियानाच्या अखेरीस मोदी सरकारच्या नऊ वर्षातल्या कामगिरीची पुस्तिका घरोघरी पोहोचवली जाणार असल्याची माहिती तावडे यांनी दिली. ते म्हणाले....

Byte..

केंद्रातल्या मोदी सरकारला ९ वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्त उद्या ३१ मे ला माननिय पंतप्रधानांची अजमेरला जाहीर सभा होऊन, महाजनसंर्पक अभियान सुरू होइल, ते ३० जूनपर्यंत चालेल. या संपूर्ण अभियानाच्या अंतर्गत सुमारे ८० कोटी लोकापर्यंत पोहचवण्याची योजना आखली आहे. सुमारे २२७ नेते या अभियानात सहभागी होतील.

****

मौखिक आरोग्यासाठी राज्य शासनानं सुरु केलेल्या स्वच्छ मुख अभियानाचे सदिच्छादूत म्हणून काम करण्यासाठी भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्याशी काल मुंबईत सामंजस्य करार करण्यात आला. वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्यं विभागाच्या वतीनं हा करार करण्यात आला. मुंबईत झालेल्या या समारंभात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

नव्या पिढीच्या सवयी सुधारुन त्यांच्या आयुष्यात चांगला बदल घडवण्यासाठी या अभियानामार्फत योगदान देता येत असल्याबद्दल तेंडुलकर यांनी समाधान व्यक्त केलं. ते म्हणाले,

 

Byte…

मला वाटलं की हा इनिशिएटिव्ह एवढा चांगला आहे, की ह्याचाबरोबर मी अटॅच व्हायला हवच. आणि जर काय मी काही माझ्या कॅपेसिटीनुसार माझं कॉन्ट्रिब्यूशन करू शकतो, यंगस्टर्स नाही म्हणार पण वेगवेगळ्या जनरेशन वरती, त्यांच्या हॅबिट चेंज करण्यासाठी, त्यांची तब्येत चांगली होण्यासाठी, तर मी म्हणेन की माझा एक हा सक्सेसफूल व्हेंचर असू शकतो आणि असोसिएशन असू शकतो.

****

राज्यातल्या चारशे चौदा अंगणवाड्या दत्तक घेण्यासाठी चार सामाजिक संस्थांशी सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती, महिला आणि बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे. काल मुंबईत यासंदर्भातल्या बैठकीनंतर ते बोलत होते. शासनाच्या अंगणवाडी दत्तक धोरणाअंतर्गत गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरपासून आतापर्यंत, विविध एकशे छप्पन्न सामाजिक संस्थानी, चार हजार आठशे एकसष्ठ अंगणवाड्या दत्तक घेतल्या असल्याची माहिती त्यांनी दिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शासनानं राज्याच्या प्रत्येक ग्रामपंचायतींमधल्या दोन कर्तबगार महिलांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही लोढा यांनी यावेळी दिली.

दरम्यान, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कारासाठी नांदेड जिल्ह्यातल्या दोन हजार सहाशे वीस महिलांची निवड झाल्याची माहिती, नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी दिली आहे. या पुरस्कारांचं आज गावपातळीवर वितरण करण्यात येणार आहे. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पाचशे रुपये, असं या पुरस्कारांचं स्वरूप आहे.

****

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना- मनरेगा अंतर्गत, शासनानं सव्वीस हजार दोनशे पन्नास टॅबच्या खरेदीसाठी काढलेल्या निविदेत घोटाळा झाला असल्याचा आरोप, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. सदर निविदा प्रक्रिया रद्द करून विशेष तपास पथकामार्फत चौकशी करावी, तसंच दोषी आढळणाऱ्या कंपन्यांना काळ्या यादीत टाकावं, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे. शासन निर्णयानुसार पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या निविदा काढण्यासाठी, उच्चाधिकार समितीची परवानगी घेणं आवश्यक असताना, या टॅब खरेदीसाठी परवानगी का घेतली नाही, तसंच सचिवांना एक ते पाच कोटी रुपयांच्या मर्यादेत निविदा काढण्याचे अधिकार असताना, सत्तर कोटींची निविदा काढण्यात आल्याचा आरोप  दानवे यांनी या पत्रात केला आहे.

****

औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा आजपासून सुरू होत आहेत तर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा सहा जूनपासून सुरू होणार आहेत. परीक्षा विभागाचे उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनी ही माहिती दिली. चार जिल्ह्यातल्या ७८ केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. यामध्ये सर्वाधिक ३१ केंद्र औरंगाबाद जिल्ह्यात, बीड जिल्ह्यात २१, तर जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी १३ केंद्र आहेत.

****

उस्मानाबाद शहरात धाराशीव नाट्य महोत्सवाचं काल सिने अभिनेता उमेश जगताप यांच्या हस्ते उद्घाटन झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नाट्यशास्त्र विभाग, आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेची उस्मानाबाद शाखा यांच्यावतीनं संयुक्तपणे, हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातच आपली जडणघडण झाली असल्याचं सांगत, जगताप यांनी, नाट्य कलावंत तयार व्हावेत यासाठी या नाट्यशास्त्र विभागाकडून होत असलेल्या प्रयत्नांचं कौतुक केलं. विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात विद्यापीठ उपकेंद्र परिसरात खुला रंगमंच उभारण्यासाठी, वीस कोटी रुपयांची तरतूद झाली असून, त्याचं काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती, विद्यापीठाचे सिनेट सदस्य देविदास पाठक यांनी यावेळी दिली.

****

जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या औचित्यानं शासनानं आखलेल्या विशेष प्रचार कार्यक्रमांतर्गत आज परभणीच्या जिल्हा रुग्णालयात विविध कार्यक्रम होणार आहेत. यावर्षी या दिनासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं ठरवलेल्या, “आम्हाला अन्न हवे, तंबाखू नको, या संकल्पनेवर आधारित, प्रसार फेरी, रांगोळी स्पर्धा आणि पोस्टर स्पर्धा असे कार्यक्रम परभणी शहरात यानिमित्तानं होणार आहेत.

औरंगाबाद शहरातही काल तंबाखू विरोधी दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचं बक्षिस वितरण जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांच्या हस्ते करण्यात आलं.

****

चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी ११ वाजता वरोरा इथं अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांचं पार्थिव काल दुपारी दिल्लीहून आणलं, त्यानंतर वरोरा इथं त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवलं होतं. 

धानोरकर यांचं काल दिल्ली इथं निधन झालं, ते ४७ वर्षांचे होते.

****

राज्य सरकारच्या शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात अनेक उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली आहे. यामध्ये, दिव्यांग कल्याण आणि पुनर्वसन योजनेतून, सहाशे सोळा लाभार्थ्यांना मदत दिली जाणार आहे. त्रेचाळीस मागासवर्गीय गुणवंत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार असून, पासष्ट लाभार्थ्यांना गाय किंवा म्हैस खरेदीसाठी अनुदान देण्यात येणार आहे. याशिवाय, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राकडून दहा अंध विद्यार्थ्यांना स्मार्ट केन, दहा दिव्यांगांना चाकाच्या खुर्च्या आणि दहा दिव्यांगांना तीन चाकी सायकलींचं प्रातिनिधिक वाटप होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे तात्यासाहेब चिमणे, तर उपसभापतीपदी मीराबाई वराडे यांची बिनविरोध निवड झाली. काल झालेल्या निवड प्रक्रियेत सभापती आणि उपसभापती पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याचं ही निवडणूक बिनविरोध झाली.

****

शिक्षकांनी उच्च विचार आणि मोठे आदर्श डोळ्यांसमोर ठेवून काम करणं गरजेचं आहे, असं मत औरंगाबाद महानगरपालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी केलं आहे. येत्या पंधरा जूनला सुरू होत असलेल्या नव्या शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर, शाळापूर्व प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन श्रीकांत यांच्या संकल्पनेतून काल करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. आमदार संजय शिरसाट आणि आमदार हरिभाऊ बागडे या कार्यक्रमाला उपस्थित होते. या शैक्षणिक वर्षापासून औरंगाबाद महानगरपालिकेच्या सगळ्या मराठी आणि उर्दू शाळांचं माध्यम सेमी इंग्लिश होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

****

No comments: