Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date : 29 May 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २९ मे
२०२३ दुपारी १.०० वा.
****
भारतीय
अंतराळ संशोधन संस्था - इस्त्रोनं, एन व्ही एस वन या दिशादर्शक उपग्रहाचं आज प्रक्षेपण केलं. श्रीहरीकोटा
इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन, जीएसएलव्ही एफ 12 या उपग्रह प्रक्षेपकाद्वारे, हा उपग्रह अवकाशात झेपावला. या उपग्रहाचं
प्रक्षेपण यशस्वी झाल्याचं इसरोकडून सांगण्यात आलं.
***
पंचाहत्तराव्या संयुक्त राष्ट्र शांती रक्षक दिनाच्या स्मरणार्थ, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी, आज दिल्लीत राष्ट्रीय युद्ध स्मारकावर, पुष्पहार अर्पण
करुन हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. पीस बिईंग विथ मी, ही शांतीरक्षक दिनाच्या पंचाहत्तराव्या वर्धापन दिनाची संकल्पना आहे.
***
कोणत्याही ओळखीच्या पुराव्याशिवाय दोन हजार रुपयांच्या
नोटा बदलून देण्याच्या रिझर्व्ह बँकेच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका, दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे.
मुख्य न्यायाधीश सतीशचंद्र शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं ही याचिका फेटाळण्याचे
आदेश दिले. उच्च न्यायालयानं २३ मे रोजी याबाबतचा निकाल राखून
ठेवला होता. याच दिवशी रिझर्व्ह बँकेचे वकील पराग त्रिपाठी यांनी ही याचिका कायम ठेवण्यायोग्य
नसल्याचं सांगितलं होतं. भाजप नेते आणि वकील अश्विनी उपाध्याय यांनी ही याचिका दाखल
केली होती.
***
केंद्रीय दक्षता आयोगाचे आयुक्त म्हणून प्रवीणकुमार श्रीवास्तव
यांनी आज शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात
झालेल्या समारंभात, त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. श्रीवास्तव
हे १९८८ च्या तुकडीचे आसाम मेघालय केडरचे भारतीय प्रशासकीय सेवेचे सेवानिवृत्त अधिकारी
आहेत.
***
खाण उद्योगातल्या स्टार्ट अप्स परिषदेला आज मुंबईत सुरुवात
झाली. केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते
या परिषदेचं आणि प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. या प्रदर्शनात खाण उद्योगातील नवकल्पना
आणि आधुनिक तंत्रज्ञान दर्शवण्यात आलं आहे.
***
दापोली
इथल्या साई रिसॉर्ट प्रकरणी आपल्यावर खोटे आरोप केल्याचं, ठाकरे गटाचे नेते अनिल परब
यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. याप्रकरणी सक्तवसुली संचालनालय
- ईडीनं आणखी दोन गुन्हे दाखल केल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. हे गुन्हे खोटे
असून, याप्रकरणी आपली नाहक बदनामी होत आहे, आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी
माफी मागावी, असं परब यांनी म्हटलं आहे.
***
केंद्रातल्या
भारतीय जनता पक्ष प्रणित सरकारला आज नऊ वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त पक्षाच्या ज्येष्ठ
नेत्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन, सरकारच्या कामाची माहिती दिली. केंद्रीय मंत्री
निर्मला सीतारामन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. आधीच्या संयुक्त
पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात अनेक घोटाळे झाले, मात्र मोदी सरकारवर एकही डाग नाही,
असं फडणवीस यावेळी म्हणाले. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा त्यांनी दाखला दिला.
***
पुणे जिल्ह्यातल्या संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज पालखी
मार्गावर आरोग्यदूतांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय टँकरमधल्या पाण्याची आणि
खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडील पाण्याची तपासणी केली जाणार असल्याचं, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानं सांगितलं आहे.
दरम्यान, श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा, १८ ते २३ जून या कालावधीत सातारा जिल्ह्यातून मार्गक्रमण
करणार आहे. पालखी सोहळ्यासाठी सर्व सुविधा योग्य पद्धतीनं उपलब्ध करून देण्यासह, खंडाळा आणि फलटण तालुक्यातल्या सर्व यंत्रणांनी समन्वयानं
काम करावं, अशा सूचना साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काल दिल्या.
***
शेतीच्या मशागतीचा खर्च वाढल्यानं ट्रॅक्टर खरेदीसाठी राज्य शासनातर्फे दिल्या
जाणाऱ्या अनुदानाची मागणी वाढली असल्याचं, कृषी आयुक्त
सुनिल चव्हाण यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या १५ लाख, २९ हजार
शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे ट्रॅक्टरसाठीचे अनुदान मागणी अर्ज दाखल केले आहेत. शासनाकडून
खुल्या प्रवर्गातल्या शेतकऱ्यांना एक लाखांचं, तर मागासवर्गीय,
दिव्यांग, महिला, अल्प,
अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सव्वालाख रुपयांचं अंशदान दिलं जातं.
***
ओडिशातल्या प्रतिष्ठित बिरसा मुंडा हॉकी मैदानावर झालेल्या तेराव्या पुरुष कनिष्ठ गटाच्या, राष्ट्रीय हॉकी स्पर्धेच्या अंतीम फेरीत, काल उत्तर प्रदेशनं ओडिशा संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावलं. दरम्यान, हरियाणानं मध्य प्रदेश संघाचा पराभव करत या स्पर्धेत तिसरं स्थान मिळवलं
आहे.
***
इंडियन
प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज अहमदाबाद इथं गुजरात टायटन्स
आणि चेन्नइ सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. संध्याकाळी साडे सात वाजता सामन्याला सुरुवात
होईल. हा सामना काल होणार होता, मात्र तो पावसामुळे रद्द करण्यात आला.
//*********** //
No comments:
Post a Comment