Monday, 29 May 2023

TEXT - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 29.05.2023 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 May 2023

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २९ मे २०२ सायंकाळी ६.१०

****

·      नैसर्गिक आपत्तींचे वाढते प्रमाण लक्षात घेता विभागीय आयुक्तालयांमध्ये राज्य आपत्ती दल नेमण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना.

·      केंद्र सरकारच्या विविध योजनांमुळे महिला, दलित, अल्पसंख्याक, आदीवासींच्या आयुष्यात निर्णायक बदल झाल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचं प्रतिपादन.

·      श्रीहरीकोटा इथून दिशादर्शक उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण.

·      येत्या ४८ तासात जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा.

आणि

·      आयपीएलच्या विजेपदासाठी थोड्याच वेळात चेन्नई सुपर किंग्जची गुजरात टायटन्ससोबत लढत, पावसामुळे कालचा दिवस गेला वाया.

****

विविध नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण वाढत असून प्रत्येक विभागीय आयुक्तालयाच्या ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद दल नेमावं अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मुंबईत बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील पालिकांनी सुध्दा त्यांच्या स्तरावर आपत्तीत तत्काळ बचाव कार्य करणारी पथकं तयार करावी असं सांगत राज्य आपत्ती धोके व्यवस्थापन निधीचा प्रभावीपणे खर्च करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.

****

केंद्र सरकारच्या विविध योजनांमुळे महिला, दलित, अल्पसंख्याक आणि आदीवासींच्या आयुष्यात निर्णायक बदल झाल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी म्हटलं आहे. मागील नऊ वर्षात केंद्र सरकारकडून देशभरात साडे तीन कोटी पक्की घरं आणि जवळपास साडे अकरा लाख स्वच्छतागृहांची निर्मिती केली असल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्र सरकारला सत्तेत येऊन ९ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्या आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होत्या. सध्या देशात १२ कोटी लोकांना स्वच्छ जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा केला जात असल्यानं पाण्यातून होणाऱ्या आजारांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचंही त्या म्हणाल्या. सरकारच्या मोफत उज्वला गँस योजनेमुळे देशात ९ कोटी ६० लाख कुटूंबांना धुरापासून मुक्तता मिळाल्याचं सांगत या कुटूंबातील महिलांच्या आरोग्यात सुधारणा झाल्याचं त्या म्हणाल्या. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत देशात आतापर्यंत पाच लाख गरजूंना या योजनेचा लाभ झाला असून कोविड काळात पूर्ण युरोपच्या लोकसंखे इतक्या, म्हणजेच देशातील ८० कोटी जनतेला सरकारनं मोफत अन्नधान्य वितरित केल्याचं त्या यावेळी म्हणाल्या. या नऊ वर्षातील तीन वर्षे कोविड-१९, युक्रेन युद्ध अशा घटनांमुळे मोठी आव्हानंही उभी राहिली होती, असंही त्यांनी अधोरेखित केलं. त्या म्हणाल्या –

नौ साल उसमे तीन साल एकदम कोविड की वजह से सेकंड वेव्ह की वजह से और रशिया युक्रेन वॉर की वजह से अनसर्टनिटीज बहुत बढा। और स्ट्रीक्टली टू बी फेअर नौ साल मे ये तीन साल गिनना भी नही है। उतना चॅलेंजेस सिर्फ भारत के लिये नही पुरी दनिया मे हुआ।

****

एनव्हीएस 01 या दिशादर्शक उपग्रहाचं आज सकाळी श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन प्रक्षेपण करण्यात आलं. जीएसएलव्ही एफ 12 या उपग्रह प्रक्षेपकाद्वारे हा उपग्रह अवकाशात सोडण्यात आला. या उपग्रहाबरोबर पहिल्यांदाच स्वदेशी बनावटीचं आण्विक घड्याळ वापरलं जाणार आहे. हा उपग्रह भारतीय नक्षत्र दिशादर्शक मालिकेचा एक भाग असून, निरीक्षण आणि दिशादर्शक क्षमता प्रदान करणं हे याचं उद्दिष्ट आहे. दोन हजार २३२ किलोग्रॅम वजनाचा हा उपग्रह भारतीय नक्षत्र मालिकेमधला दुसऱ्या पिढीतला पहिला दिशादर्शक उपग्रह आहे. या उपग्रहाला येत्या दोन दिवसांत निर्धारित पातळीपर्यंत नेण्यासाठी कक्षा वाढवण्याच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. या उपग्रहाद्वारे गोळा केलेल्या माहितीचा वैयक्तिक आणि धोरणात्मक कामासाठी वापर केला जाईल. या मोहिमेमुळे केवळ नक्षत्र मालिकाच नव्हे तर स्वदेशी बनावटीचं रुबिडियम घड्याळ कार्यान्वित करणाऱ्या इतर तीन देशांच्या यादीत भारताचा समावेश होणार आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात येत्या खरिप हंगामासाठी आवश्यक बी-बियाणे आणि खतं मुबलक प्रमाणात उपलब्ध असून त्याचं वितरण आणि विक्री सुयोग्य पद्धतीनं व्हावी यासाठी कृषि विभाग, वितरक आणि संबंधित यंत्रणांनी सुक्ष्म नियोजन करावं अशा सूचना जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिल्या आहेत. आज जिल्हाधिकारी कार्यालयात कृषि विभागाच्या निविष्ठा सनियंत्रण समितीची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्यासोबत कृषी विभागाचे अधिकारी, खाजगी बियाणे कंपन्यांचे प्रतिनिधी तसंच प्रगतीशील शेतकरी उपस्थित होते.

****

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६३वा दीक्षांत सोहळा राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या उपस्थितीत २७ जूनला होणार असल्याची माहिती कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी दिली आहे. यामध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१ आणि मार्च-एप्रिल २०२२ या वर्षातील पदवीधारकांना पदवी प्रदान करण्यात येईल. तसंच १९ नोव्हेंबर २०२२ ते आजपर्यंत पीएच.डी प्राप्त करणाऱ्या संशोधकांना दीक्षांत समारंभात पदवी प्रदान करण्यात येईल. दीक्षात समारंभा संदर्भात कुलपती रमेश बैस यांची कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी १५ मे रोजी भेट घेऊन दीक्षांत सोहळयाचं निमंत्रण दिलं होतं. या निमंत्रणाचा स्विकार करुन सोहळयाची तारीख २७ जून निश्चित करण्यात आल्याचे राजभवनाच्यावतीने कळविण्यात आलं असल्याची माहिती कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी दिली आहे.

****

अहमदनगर जिल्ह्यात येत्या खरिप हंगामात नियमबाह्य विक्री करणाऱ्या कृषि केंद्रांवर कडक कारवाई करणार असल्याची माहिती अहमदनगरच्या जिल्हा अधीक्षक कृषि अधिकाऱ्यांनी दिली आहे. येत्या खरीप हंगामाच्या पूर्वतयारीच्या दृष्टीनं सर्व शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्वक आणि योग्य दरामध्ये बियाणे, खतं आणि औषधं उपलब्ध व्हावीत, यादृष्टीनं जिल्हास्तरावरून रँडम पध्दतीनं निवड करण्यात आलेल्या कृषि सेवा केंद्रांचं दुसऱ्या तालुक्यातील भरारी पथकामार्फत तपासणी करून तपासणीअंती त्रुटी आढळल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे. यावेळी विक्रेते, वितरक आणि उत्पादक कंपन्या यांच्याशी संबंधित सर्व दस्तऐवज खरेदी-विक्री व्यवहार नोंदी, साठा पुस्तकं आणि उगम प्रमाणपत्र अशी कागदपत्रं या भरारी पथकामार्फत तपासली जाणार आहेत.

****

औरंगाबाद मधील वाळूज परिसरात आज सायंकाळी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडला. ग्रामीण भागात वैजापूर शहर परिसरातही जोरदार पाऊस पडल्याचं वृत्त आहे. दरम्यान, येत्या ४८ तासात मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

****

चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती अचानक खालावल्यानं त्यांना विशेष एअर विमानानं दिल्लीच्या वेदांता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांना किडनी स्टोनचा त्रास होता. महिनाभरापूर्वी नागपूर इथं त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यातूनच यकृतावर सूज आल्यानं त्यांना तातडीनं उपचारासाठी दिल्लीला हलवण्यात आलं आहे.

दरम्यान, खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती स्थिर असल्याचं त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून कळवण्यात आलं आहे.

****

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सर्व शिक्षणक्रमाच्या सत्र आणि वार्षिक लेखी परीक्षा आजपासून सुरु झाल्या आहेत. महाराष्ट्रातील विविध ६४३ परीक्षा केंद्रांवर या परीक्षा सुरू असून एकूण ५ लाख ३५ हजार ३४३ विद्यार्थी या परीक्षा देत आहेत. परीक्षा नियंत्रक तथा प्रभारी कुलसचिव भटूप्रसाद पाटील यांनी आज ही माहिती दिली. या परीक्षा ऑफलाईन असून पूर्वीप्रमाणेच विवरणात्मक पद्धतीच्या असून त्या १६ जूनपर्यंत सुरु राहतील असं पाटील यांनी यावेळी सांगितलं.

****

वाळूचे वितरण सुटसुटीत, पारदर्श आणि स्वस्त दरात होण्यासाठी शासनाने नवीन वाळू धोरण आणले आहे. या धोरणानुसार नागरिकांना फक्त ६७२ रुपये प्रति ब्रास दराने वाळू उपलब्ध करून दिली जाणार आहे. तर घरकुलाच्या लाभार्थ्यांना वाळू विनामूल्य दिली जाणार आहे. या धोरणानुसार वर्धा जिल्ह्यात आजपासून जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांच्या हस्ते वाळू वितरणास सुरुवात करण्यात आली.

****

धुळे शहरातील नागरीकांना दहा दिवसाआड सुध्दा पाणी मिळत नसल्याच्या निषेधार्थ आज शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या वतीनं महानगरपालिका प्रशासन आणि पाणीपुरवठा विभाग यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली. या प्रेतयात्रेवर हंडे, बादली आणि कळशी अशी भांडी मांडण्यात आली होती. यावेळी महानगरपालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात महिला अणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आज अहमदाबाद इथं गुजरात टायटन्स आणि चेन्नइ सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. संध्याकाळी साडे सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.

****

No comments: