Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 May 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ मे २०२३ सायंकाळी
६.१०
****
·
संसदेच्या
नूतन इमारतीचं २८ मे रोजी उद्घाटन, पंतप्रधानांच्या हस्ते होणार ऐतिहासिक सुवर्ण राजदंडाची
प्रतिष्ठापना.
·
शेतकरी
हिताच्या विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश.
·
राज्य
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा उद्या निकाल.
·
समृद्धी
महामार्गावर चालकाला डुलकी लागल्यानं अपघात, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू.
आणि
·
आयपीएलच्या
बाद फेरीत आज मुंबई इंडियन्सचा लखनऊ सुपर जायंटस् सोबत सामना.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २८ मे रोजी नूतन संसद भवनाचं
उद्घाटन करणार आहेत. यावेळी ते लोकसभा अध्यक्षांच्या आसना शेजारी ऐतिहासिक सुवर्ण राजदंड
सेंगोलची प्रतिष्ठापना करतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार
परिषदेत ही दिली. सेंगोल हा सुवर्ण राजदंड १४ ऑगस्ट १९४७ रोजी देशाचे पहिले पंतप्रधान
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ब्रिटनच्या अधिकाऱ्यांकडून सत्तेच्या हस्तांतरणाचं प्रतिक
म्हणून स्वीकारला होता. भारतात चोला संस्थानच्या राजांनी सुमारे ८०० वर्षे राज्य केलं
होतं. या चोला राजवटीत एका राजाकडून दुसऱ्या राजाकडे सत्तांतरण केलं जाताना हा सेंगोल
प्रदान केला जात असे.
****
दरम्यान, देशातल्या १९ विरोधी पक्षांनी संसदेच्या नूतन
इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे. संसदीय व्यवहार कार्यमंत्री प्रल्हाद
जोशी यांनी सर्व राजकीय पक्षांना ससंदेच्या नूतन वास्तूच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित
राहण्याचं आवाहन केलं आहे. काही विरोधी पक्षांनी संसदेच्या नव्या वास्तुच्या उद्घाटन
कार्यक्रमावर बहिष्कार घातला आहे, त्यावर जोशी यांनी नाराजी व्यक्त केली. देशासाठी
हा एक ऐतिहासिक प्रसंग आहे. राजकारण करण्याची ही वेळ नाही, असं ते म्हणाले.
****
दोन हजार रुपयांच्या नोटा परत करण्याची संपूर्ण प्रक्रिया
सोपी आणि अडचणरहित असेल याचा पुनरुच्चार रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी
केला आहे. नवी दिल्लीत एका कार्यक्रमात आज ते बोलत होते. गेल्यावर्षीचा जीडीपी सकल
राष्ट्रीय उत्पन्न ७ टक्क्यांपेक्षा अधिक राहिल्यास नवल वाटणार नाही, असंही त्यांनी
स्पष्ट केलं. कृषी क्षेत्र अत्यंत चांगली कामगिरी करीत असल्याचं यावरून सिद्ध होतं,
असंही ते यावेळी म्हणाले.
****
‘हील बाय इंडिया-हील इन इंडिया’ अंतर्गत भारतातून जगाच्या
कानाकोपऱ्यात काम करणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकांच्या गतीशीलतेला ‘वसुधैव कुटुंबकम्’
या संकल्पनेशी अनुरुप बनवण्याकरिता काम सुरू असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण
मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी सांगितलं आहे. जिनेव्हा इथे शहात्तराव्या जागतिक आरोग्य
संमेलनात प्रमुख भाषण करताना मांडविया बोलत होते. भारतात हील इंडियाच्या माध्यमातून
समायोचित आणि व्यापक उपचार प्रदान करणं हा आरोग्य विभागाचा प्राधान्यक्रम असल्याचंही
त्यांनी स्पष्ट केलं.
****
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान स्थलांतर, गतिशीलता भागीदारी
आणि ग्रीन हायड्रोजन टास्क फोर्स या विषयांवर आज सामंजस्य करार करण्यात आले. सिडनी
इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्या द्विपक्षीय
बैठकीनंतर या करारांवर स्वाक्षरी झाली. या बैठकीत व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण आणि
सुरक्षा, अक्षय ऊर्जा, हरित हायड्रोजन, खनिजे, शिक्षण, स्थलांतर, गतिशीलता आणि लोकसंपर्क
यासह अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली.
****
आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध उपाययोजना
करण्यात आल्या आहेत. त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करतानाच शेतकऱ्यांना दर्जेदार बी
- बियाणे, खते मिळण्यासाठी कृषी विभागानं दक्ष राहावं, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ
शिंदे यांनी दिले आहेत. ते आज मुंबईत राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत बोलत
होते. यंदाच्या मॉन्सूनवर अल- निनोचा प्रभाव होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशा
परिस्थितीत शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये. पुरेसा पाऊस आणि जमिनीत ओल पाहूनच
पेरण्यांचा निर्णय घ्यावा असंही मुख्यमंत्री म्हणाले. बँकांनी पीक कर्जाचा पुरवठा वेळेत
करावा, शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यासाठी पुढाकार घ्यावा, शेतकऱ्यांनीही पारंपरिक
शेतीबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा. शेतीपूरक व्यवसाय, कृषी पर्यटनावर भर
द्यावा अशा सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिल्या.
****
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी
परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. उद्या दुपारी दोन वाजता हा निकाल जाहीर होईल.
तत्पूर्वी विद्यार्थ्यांना मंडळाच्या महारिझल्ट डॉट एनआईसी डॉट इन या संकेतस्थळावर
हा निकाल पाहता येणार आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक,
लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळाच्या मार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती.
****
नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर आज सकाळी झालेल्या एका
अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला. जालन्याहून शिर्डीकडे जाणाऱ्या वाहनाच्या
चालकाला डुलकी लागून वाहन रस्त्याच्या कठड्याला धडकलं. या अपघातात श्रीनिवास गौड, कृष्णा
गौड, संजीव गौड यांचा मृत्यू झाला. तर सुरेश गौड आणि भार्गव गौड हे या अपघातात जखमी
झाले आहेत.
****
ताकीद दिलेली असतानाही पदपथावर करण्यात आलेलं अतिक्रमण
न काढल्याबद्दल औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी शहरातल्या
तीन दुकानदारांना आज एकूण नऊ हजार रुपयाचा दंड ठोठावला. गेल्या आठवड्यात प्रशासक जी
श्रीकांत यांनी टीव्ही सेंटर भागातील पाहणी केल्यानंतर दुकानदारांनी पदपथाचा वापर व्यावसायिक
कामासाठी केल्यास कारवाई करण्यात येईल अशी ताकीद दिली होती. या तीनही दुकानदारांना
नागरी मित्र पथकामार्फत हा दंड ठोठावण्यात आला. पालिका आयुक्त शहरातील अतिक्रमणांवर
लक्ष देत असून यापुढे देखील दुकानांसमोरील कारवाई सुरू राहील असं जी श्रीकांत यांनी
स्पष्ट केलं आहे.
****
सोलापूर महानगर पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते कृष्णाहरि
दुस्सा यांचं आज सकाळी निधन झालं. कृष्णाहरि दुस्सा यांनी श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी
रुग्णालयाचे माजी उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या शेत रस्ते अतिक्रमण
मुक्ती चळवळीअंतर्गत जिल्ह्यातले ३०८ शेत रस्ते अतिक्रमण मुक्त झाले असून त्याचा लाभ
नऊ हजार ७०७ शेतकऱ्यांना झाला आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर ...
या योजनेत गाव पातळीवरील
शेतकरी, सरपंच, तंटामुक्ती समिती, मंडळ अधिकारी, बीट जमादार, तलाठी, ग्रामसेवक पोलीस
पाटील, कोतवाल यांच्यामार्फत अतिक्रमित शेत रस्ते मोकळे करण्याचे अभियान हाती घेण्यात
आले होते. यामध्ये अनेक शेत रस्ते मोकळे करून देण्यात आले आहेत. ऑक्टोबर २०२२ पासून
जिल्ह्यातील ३३४ किलोमीटर लांबीचे ३०८ शेत रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यात प्रशासनाला
यश आल्यामुळे जिल्ह्यातील नऊ हजार ७०७ शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
…देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, उस्मानाबाद
****
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या
प्र-कुलगुरूपदी सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे यांची नियुक्ती झाली
आहे. प्रभारी कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांनी आज याबाबतची घोषणा केली.
****
सदाभाऊ खोत हे घटक पक्ष जरी असले तरी पूर्णपणे सरकार त्यांच्या
पाठीशी आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन कटीबद्ध असून ज्या मागण्या सदाभाऊ खोत करतील
त्या सरकार पूर्ण करेल, असा विश्वास भाजपा विधान परिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी
व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष, माजी
मंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली कराड ते सातारा ‘शेतकरी वारी’ पदयात्रा सुरू
आहे. या पदयात्रेच्या दुसऱ्या दिवशी काल दरेकर यांनी शासनाचा प्रतिनिधी म्हणून भेट
दिली त्यावेळी ते बोलत होते.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण औद्योगिक केंद्राअंतर्गत
येणाऱ्या एका नामवंत कंपनीच्या उघोजकासह कंपनी व्यवस्थापकाला वारंवार धमक्या चार कोटी
रुपयांची खंडणी मागणाऱ्या इसमाला पैठण पोलिसांनी आज अटक केली. विष्णू आसाराम बोडखे
असं या इसमाचं नाव आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोडखे यानं आधीही
कंपनीच्या व्यवस्थापकाला धाक दाखवून त्याच्याकडून दीड लाख रुपये उकळल्याचं समोर आलं
आहे.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या बाद फेरीत मुंबई इंडियन्स
आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात आज चेन्नईच्या एम ए चिन्नास्वामी स्टेडिअमवर सामना
होणार आहे. सायंकाळी साडेसात हा सामना सुरू होईल.
****
No comments:
Post a Comment