आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
३० मे २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
जम्मू-श्रीनगर
राष्ट्रीय महामार्गावर झज्जर कोटली परिसरात आज एक बस दरीत कोसळून दहा भाविकांचा मृत्यू
झाला असून, सोळा जण जखमी झाले आहेत. जखमींवर जम्मूच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
आणि रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही बस अमृतसरहून कटरा इथं जात होती, त्यावेळी हा अपघात
घडला.
***
चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. धानोरकर यांच्या निधनानं एक तरुण, तडफदार आणि लढवय्या लोकप्रतिनिधी आपण गमावला
असल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांनी, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. विधानसभेचे
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही धानोरकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करुन, श्रद्धांजली
वाहिली आहे.
धानोरकर यांचं आज पहाटे दिल्ली इथं निधन झालं, ते ४७ वर्षांचे
होते. त्यांचं पार्थिव विशेष विमानानं आज दुपारी
नागपूर विमानतळावर आणलं जाणार आहे. त्यानंतर त्यांचं पार्थिव
अंत्यदर्शनासाठी वरोरा इथल्या निवासस्थानी ठेवण्यात येईल. उद्या
सकाळी ११ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
***
पुण्यातल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४४ व्या
तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा आज पार पडला. सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थितीत
होते.
***
प्रसिद्ध क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांची राज्य शासनाच्या 'स्वच्छ मुख अभियाना'चे सदिच्छादूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आज मुंबईत यासंदर्भातला
सामंजस्य करार करण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री
गिरीष महाजन यावेळी उपस्थित होते. राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम
आणि जागतिक आरोग्य संघटनेनं नमूद केलेल्या, मौखिक आरोग्याबाबत कृती योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी, या वर्षापासून
हे अभियान राज्यात राबवलं जात आहे.
***
नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सर्व शिक्षणक्रमाच्या
सत्र आणि वार्षिक लेखी परीक्षा कालपासून सुरु झाल्या. राज्यातल्या विविध ६४३ परीक्षा
केंद्रांवर एकूण पाच लाख ३५ हजार ३४३ विद्यार्थी या परीक्षा देत आहेत.
//***********//
No comments:
Post a Comment