Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 26 May
2023
Time : 7.10
AM to 7.25 AM
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २६ मे २०२३
सकाळी
७.१० मि.
****
ठळक
बातम्या
· बारावीचा
निकाल यंदा ९१ पूर्णांक २५ टक्के;मुलांच्या तुलनेत मुली उत्तीर्ण होण्याचं प्रमाण साडे
चार टक्क्यांनी अधिक
· इंधनावरचा
खर्च कमी करण्यावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
· शासन
आपल्या दारी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर
· जायकवाडी
धरणात पाणी उपसा संच उभारणीच्या कामाची, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड
यांच्याकडून पाहणी
· हिंगोली
जिल्ह्यात दोन ट्रकच्या अपघातात चौघांचा मृत्यू;दीडशे मेंढ्याही दगावल्या
· परभणी
जिल्ह्यात वाळू तस्करांवर कारवाईसाठी जाणारे तलाठी नदीपात्रात बेपत्ता
आणि
· आयपीएल
क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स संघात बाद फेरीतला अखेरचा सामना
सविस्तर
बातम्या
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी
परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. या परीक्षेत ९१ पूर्णांक २५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
झाले. मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी काल पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती
दिली. ते म्हणाले...
Byte..
ओव्हरऑल
निकाल नियमित विद्यार्थ्यांचा ९१ पूर्णांक २५ टक्के एवढा सक्सेस रेट आहे. मागच्या वर्षी
पेक्षा जरी दोन पूर्णांक ९७ टक्के जरी कमी झाला असला तरी एकूण परिस्थिती बघता २०२०
ची तुलना केली, ज्यावेळी रेग्युलर परीक्षा
झाली होती त्याचा विचार करता हा निकाल शून्य पूर्णांक ५९ टक्क्याने जास्त आहे.
सर्व नऊ विभागीय मंडळांतून ९३ पूर्णांक ७३ टक्के विद्यार्थिंनी
उत्तीर्ण झाल्या असून, ८९ पूर्णांक १४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलांच्या
तुलनेत विद्यार्थिनींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण टक्केवारी, चार पूर्णांक ५९ टक्क्यांनी
जास्त असल्याची माहितीही गोसावी यांनी दिली.
कोकण विभागात सर्वाधिक ९६, तर मुंबई विभागात सर्वात कमी
८८ पूर्णाक १३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. औरंगाबाद विभागात ९१ पूर्णांक
८५, लातूर ९० पूर्णांक ३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पुणे विभागात ९३ पूर्णांक
३४ टक्के, नागपूर ९० पूर्णांक ३५, अमरावती ९२ पूर्णांक ७५, कोल्हापूर ९३ पूर्णांक २८
आणि नाशिक विभागात ९१ पूर्णांक ६६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्व शाखांमधून
३५ हजार ५८३ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. खासगी विद्यार्थी म्हणून
नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ३६ हजार ४५४ एवढी असून त्यांच्या निकालाची
टक्केवारी ८२ पूर्णांक ३९ असल्याचं गोसावी यांनी सांगितलं.
दरम्यान, बारावी परीक्षेतल्या यशासाठी सगळ्या उत्तीर्ण
विद्यार्थ्यांचं अभिनंदन आणि त्यांना भावी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा, असं मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. या परीक्षेत यंदा मुलींनी आणि दिव्यांगांनी लक्षणीय
यश मिळवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचं विशेष अभिनंदन केलं. विरोधी पक्ष नेते अजित
पवार यांनीही उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं असून, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी
निराश न होता पुन्हा जोमानं प्रयत्न करावेत, असं म्हटलं आहे.
****
इंधनावरचा खर्च कमी करण्यावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. काल मुंबईत हरित हायड्रोजन परिषदेचं
उद्घघाटन केल्यानंतर, ते बोलत होते. जीवाश्म इंधन आयात आणि प्रदूषण, ही देशासमोरची
दोन मोठी आव्हानं आहेत, असं सांगत, भारताला ऊर्जा निर्यात करणारा देश बनवण्याचं स्वप्न
पूर्ण करायचं आहे, असं गडकरी म्हणाले. एकूण प्रदूषणापैकी सुमारे चाळीस टक्के प्रदूषण
हे परिवहनामुळे होतं. या दृष्टीनं, इथेनॉल, बायो-सीएनजी, बायोइथेनॉल आणि हायड्रोजनचे
एकशे पस्तीस प्रकल्प प्रक्रियेत असल्याची माहिती त्यांनी दिली. भविष्यकालीन तंत्रज्ञानाच्या
दृष्टीनं हरित हायड्रोजन परिषदेचं आयोजन प्रेरणादायी असल्याचा आनंद आहे, अशी भावनाही
गडकरी यांनी यावेळी व्यक्त केली.
****
नव्या संसद भवनाच्या उद्धाटन सोहळ्यावर बहिष्कार घालणं
म्हणजे लोकशाहीला नाकारणं असल्याची टीका, उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते
देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते काल मुंबईत बोलत होते. आधीच्या काळात झालेल्या
अशा कार्यक्रमांचा संदर्भ देत, या उद्धाटन सोहळ्यावर बहिष्कार घालणं हा विरोधी पक्षांचा
दुटप्पीपणा असल्याची टीकाही फडणवीस यांनी यावेळी केली.
****
राज्यात सर्व लाभार्थ्यांना शासनाच्या योजनांचे सगळे लाभ
मिळावेत, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी काल
रत्नागिरी इथं `शासन आपल्या दारी` या उपक्रमामध्ये मार्गदर्शन केलं, त्यावेळी बोलतांना ते म्हणाले
Byte…
हे शेतकऱ्यांचं, बळीराजाचं,
माता-भगिनींचं, विद्यार्थ्यांचं, ज्येष्ठांचं, सगळ्यांचं सरकार या राज्यात आलेलं आहे.
आणि म्हणूनच आपल्याला हे नवीन नवीन पाहायला मिळतंय. या नवीन योजना डायरेक्ट आपल्या
दाराजवळ येतायत. याचं कारणच एवढं आहे, हे सरकार तुमचं आहे. या राज्यातल्या सगळ्या लाभार्थ्यांना
जेव्हा हे शासनाचे लाभ मिळतील, तोच दिवस आमच्यासाठी खऱ्या अर्थाने समाधानाचा असणार
आहे.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर
येत आहेत. सकाळी पावणे बारा वाजेदरम्यान त्यांचं चिकलठाणा विमानतळावर आगमन होईल, त्यानंतर
ते हेलिकॉप्टरने कन्नडकडे प्रयाण करतील. कन्नड तालुक्यात अंधानेर इथं आयोजित शासन आपल्या
दारी कार्यक्रमाला उपस्थित राहून दुपारनंतर मुख्यमंत्री अहमदनगर जिल्ह्यात जेऊर कडे
प्रस्थान करणार आहेत. शासन आपल्या दारी या अभियानात शासकीय योजनांच्या लाभांचे प्रमाणपत्र
तसंच आवश्यक कागदपत्रं एकाच ठिकाणी मिळणार आहेत.
****
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर - मुंबई समृद्धी
महामार्गाच्या शिर्डी ते भरवीर या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज होणार आहे. ऐंशी किलोमीटरचा हा
टप्पा आहे. समृद्धी महामार्गावरच्या नागपूर ते शिर्डी या ४८० किलोमीटरच्या पहिल्या
टप्प्याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी ११ डिसेंबरला केलं होतं.
****
मोसमी पावसाच्या आगमनाची वेळ जवळ आल्यानं बँकांनी शेतकऱ्यांना
बियाणं तसंच रासायनिक खतांच्या खरेदीसाठी पीक कर्ज वेळेत द्यावं, असे निर्देश राज्याचे
सहकार आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिले आहेत. काल मुंबईत सहकार
विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज पुरवठा
करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत, त्यानुसार सहकार विभागानं कार्यवाही
करावी, असे निर्देशही सावे यांनी दिले.
****
आम आदमी पक्षाचे नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद
केजरीवाल यांनी आपल्या मुंबई भेटीत काल दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे
अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. केंद्र सरकार विरोधी पक्षांना धमकावत असल्याचा आरोप
केजरीवाल यांनी या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. दिल्लीच्या लोकनियुक्त
सरकारचे अधिकार काढून घेऊन ते केंद्र सरकारकडेच ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं अध्यादेश
काढला असून, ही देशासाठी घातक स्थिती असल्याची टीका त्यांनी केली. शरद पवार यांनी यावेळी
बोलताना, प्रत्येक बाबीमध्ये केंद्र सरकारचा हस्तक्षेप होणं, हा लोकशाहीवर आघात आहे,
अशी टीका केली. या विधेयकाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा केजरीवाल यांना पाठिंबा
असल्याचं, पवार यांनी यावेळी जाहीर केलं.
****
१६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर लवकरात लवकर निर्णय
घ्यावा, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिष्टमंडळानं काल विधानसभा
अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. आपल्या मागणीचं निवेदन या शिष्टमंडळानं नार्वेकर
यांना सादर केलं. याबाबत लवकरात लवकर सुनावणी होईल, अशी खात्री असल्याची प्रतिक्रिया,
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या भेटीनंतर दिली.
****
संजय गांधी निराधार अनुदान योजनेतंर्गत ४४५ कोटी, आणि श्रावणबाळ
सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतंर्गत ७५२ कोटी रुपयांचा निधी, सगळ्या जिल्हाधिकारी
कार्यालयांना वितरीत करण्यात आला आहे. लाभार्थ्यांना दरमहा वेळेवर अनुदान मिळावं, यासाठी
हा निधी देण्यात आला असून, तो लाभार्थ्यांना तत्काळ वाटप करण्याची सूचना, सामाजिक न्याय
आणि विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.
****
येत्या अट्ठावीस तारखेला मॉरिशस इथं स्वातंत्र्यवीर सावरकर
विश्व संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे तेजस्वी विचार
पुढच्या पिढीत नेण्याचं कार्य अव्याहतपणे सुरू रहावं, म्हणून हे आयोजन केलं जातं. यावेळी
मॉरिशसच्या राजधानीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरणही होणार
आहे.
****
जायकवाडी धरणातल्या नव्या पाणी उपसा संच उभारणीच्या कामाचा,
केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी काल भेट देऊन आढावा घेतला. अमृत
अभियानाअंतर्गत औरंगाबाद शहराच्या पाणी पुरवठा योजनेसाठी हा संच तयार होत आहे. कराड
यांनी यावेळी पाणी पुरवठा योजनेतल्या संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधून आवश्यक त्या
सूचना केल्या.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात उमरगा तालुक्यातल्या मुरूम कृषी उत्पन्न
बाजार समितीच्या सभापतीपदी, महाविकास आघाडीच्या बापूराव पाटील यांची, तर उपसभापतीपदी,
बसवराज कारभारी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच
अर्ज दाखल झाल्यामुळे या निवडी बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी बी.
व्ही. काळे यांनी केली.
****
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समितीची
निवड प्रक्रिया काल पार पडली. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे मारोतराव खांडेकर
यांची सभापती पदावर, तर उपसभापतीपदी कांग्रेसचे नितिन जिंतूरकर निवडून आले आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातल्या माळेगाव जवळ ट्रक
आणि मेंढ्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रक मध्ये झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला
तर सुमारे दीडशे मेंढ्या दगावल्या. काल सकाळी हा अपघात झाला. रस्त्यावर उभ्या असलेल्या
ट्रकला मेंढ्या घेऊन जाणाऱ्या ट्रकनं पाठीमागून जोराची धडक दिल्यामुळे हा अपघात झाला.
या अपघातातल्या तिघा जणांना हिंगोली इथल्या जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं असता डॉक्टरांनी
तपासून मृत घोषित केलं. चौथ्या गंभीर जखमी व्यक्तीचा नांदेड इथं उपचार सुरू असताना
मृत्यू झाला.
****
परभणी जिल्ह्यात नदीपात्रात वाळू माफियांना पडकण्यासाठी
गेलेले डिग्रस सज्जाचे तलाठी सुभाष होळ नदीपात्रात बुडाल्याची गटना काल घडली. जिंतूर
तालुक्यातल्या मौजे डिग्री इथं, नदीपात्राच्या दुसऱ्या किनाऱ्यावर वाळूमाफिया ट्रॅक्टरमध्ये
वाळू भरत असल्याचं होळ यांच्या निदर्शनास आलं, त्यांना पकडण्यासाठी ते पाण्यातून पोहत
जात असताना ते नदीपात्रात अचानक बेपत्ता झाले. काल संध्याकाळपर्यंत त्यांचा शोध लागला
नसल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
इंडियन प्रीमिअर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज बाद
फेरीतला अखेरचा सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स संघात होत आहे. अहमदाबाद इथं
नरेंद्र मोदी क्रीडा संकुलावर होणाऱ्या या सामन्यातला पराभूत संघ स्पर्धेतून बाहेर
पडेल, तर विजेत्या संघाचा परवा अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्जसोबत सामना होणार आहे.
****
लखनौ
इथं खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालं. खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धांमुळे
खेळांचं नवं युग सुरू झालं असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नाव मोठं होत असल्याचं
पंतप्रधान यावेळी म्हणाले. ही स्पर्धा तीन जून पर्यंत उत्तर प्रदेशात वाराणसी, गोरखपूर,
लखनौ आणि गौतम बुद्ध नगर इथं होणार आहे. या स्पर्धांमध्ये २०० हून जास्त विद्यापीठांमधले
चार हजारांपेक्षा जास्त खेळाडू सहभागी झाले आहेत.
****
क्वालालांपूर इथं सुरू असलेल्या मलेशिया खुल्या बॅडमिंटन
स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधू, किदंबी श्रीकांत आणि एच एस प्रणॉयनं उपांत्यपूर्व
फेरीत प्रवेश केला आहे. सिंधुनं जपानच्या अया ओहोरीला २१-१६,२१-११ असं हरवलं. पुरुष
एकेरीच्या स्पर्धेत किदंबीनं थायलंडच्या खेळाडूचा, तर प्रणॉयनं चीनच्या खेळाडूचा पराभव
केला.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात श्रीक्षेत्र तुळजापूर इथं तुळजाभवानी
माता छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाचं १०८ फूट उंचीचं शिल्प उभारण्याचा
निर्णय घेण्यात आला आहे. याचं संकल्प चित्र बनवण्यासाठी संकल्पना स्पर्धा आयोजित करण्यात
आली आहे. यामध्ये निवड झालेल्या अद्वितीय कलाकृतीस एक लाख रुपयाचं बक्षीस देण्यात येणार
असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. या शिल्प समूहाचं संकल्पचित्र पाठवण्याची मुदत एक जून पर्यंत आहे.
****
शासकीय योजनांची जत्रा अंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात आरोग्य
शिबीरं घेण्यात येत आहेत. यात काल शहरातल्या सिल्क मिल्क कॉलनी परिसरात शासकीय योजना
सुलभीकरण अभियानाअंतर्गत मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आलं. यावेळी नेत्र रोग तपासणी,
मोफत चष्माचे नंबर, मोतिबिंदू निदान, स्त्री रोग तपासणी आणि दातांची तपासणी करण्यात
आली. या शिबीरामध्ये १४८ जणांची तपासणी केल्याची माहिती महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी
डॉ.पारस मंडलेचा यांनी दिली.
****
नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली पंचायत समितीमध्ये काल पाणी
आणि स्वच्छता अभियानाअंतर्गत महिला मेळावा घेण्यात आला. जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त
सुरू असलेल्या, `आम्ही कटिबद्ध आहोत`, या विशेष जनजागृती सप्ताहानिमित्त हा कार्यक्रम
घेण्यात आला. समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर स्मिता पाटील यांनी, मासिक पाळी व्यवस्थापन,
याविषयावर यावेळी मार्गदर्शन केलं.
****
संत भगवानबाबा शासकीय वसतीगृह योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यातल्या
बीड, गेवराई, केज, पाटोदा, परळी वैजनाथ आणि माजलगाव तालुक्यांच्या ठिकाणी, स्थलांतरित
उसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी, बारा वसतीगृहं सुरू करण्यात आली आहेत. २०२३-२४ या
शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता पाचवीपासून पुढच्या पात्र आणि गरजू विद्यार्थ्यांनी या वसतीगृहांमध्ये
प्रवेश घ्यावा, असं आवाहन समाज कल्याण विभागाच्या सह आयुक्तांनी केलं आहे.
****
No comments:
Post a Comment