Thursday, 25 May 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 25.05.2023 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 25 May 2023

Time : 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : २५ मे  २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी हिताच्या विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश;बँकांनी पीककर्ज देताना सीबीलची अट लावल्यास कारवाईचा इशारा

·      हरित हायड्रोजनचा भविष्यातील इंधन म्हणून उद्योगांनी विचार करावा-नितीन गडकरी यांचं आवाहन

·      माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा आज निकाल

·      डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांची अद्ययावत यादी ३१ मे रोजी प्रसिध्द होणार

·      परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीसाठी बोलावलेली सभा संचालकांअभावी तहकूब

·      समृद्धी महामार्गावर वाहन रस्त्याच्या कठड्याला धडकून चार भावांचा मृत्यू

 

आणि

 

·      आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा लखनऊ सुपर जायंटस्‌वर ८१ धावांनी विजय


सविस्तर बातम्या

आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करतानाच शेतकऱ्यांना दर्जेदार बी - बियाणे, खते मिळण्यासाठी कृषी विभागानं दक्ष राहावं, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ते काल मुंबईत राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत बोलत होते. यंदाच्या मॉन्सूनवर एल- निनोचा प्रभाव होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये. पुरेसा पाऊस आणि जमिनीत ओल पाहूनच पेरण्यांचा निर्णय घ्यावा असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले ...

Byte..

बोगस बियाणं, बोगस खताचं जे कुणी अशा प्रकारचं कृत्य करेल, बळीराजाच्या जीवाशी खेळण्याचं  काम करेल, त्याच्या वर कडक कारवाई करण्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत.   जर समजा अल निनो मुळे पाऊस पुढे गेला त्या प्रकारचा देखील मार्गदर्शन कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठं करतील .  दुबार पेरणीची पाळी वेळ शेतकऱ्यावर येऊ नये, अशा प्रकारचं देखील नियोजन करण्याच्या देखील सूचना यामध्ये दिलेल्या आहेत.

 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना सरकारच्या निर्णयांची माहिती देताना, सीएम फेलो योजनेचा दुसरा टप्पा सुरू करत असल्याचं सांगितलं. बँकांनी शेतकऱ्यांना पीककर्ज देताना सीबीलची अट लावल्यास, कारवाईचा इशारा फडणवीस यांनी दिला. ते म्हणाले...

Byte…

सीएम फेलो हा जो प्रोग्राम मागच्या पाच वर्षा मधे अतिशय चांगल्या प्रकारे आपण राबवला, त्याचा दुसरा टप्पा आपण सुरू केलेला आहे. या दुसऱ्या टप्प्यामधे सीएम फेलोजला काम करत असतांना आय आय टी बॉम्बे आणि आय आय एम नागपूर, या दोन संस्था ऑन द जॉब ट्रेनिंग देखील देणार आहेत. कृषी कर्जाकरता सिबिल ची अट लागू होत नाही बहुतांश बँका ते मान्य करतात, पण काही बँका आडमुठे धोरण घेतात, अशा प्रकारे जर ते वागणार असतील तर त्याच्यावर एफआयआर दाखल करा, अशा सूचना मी दिलेल्या आहेत. बँका जर ऐकणार नसतील तर आम्हाला टोकाची भूमिका घ्यावीच लागेल.

****

आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणं, खतं, शेती अवजारांची खरेदी तसंच बँकेकडून कर्ज मिळवण्याच्या कामात संबंधित अधिकाऱ्यांनी मदत करावी असे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. ते काल मुंबईत राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत बोलत होते. सरकारनं यावर्षीच्या खरीप हंगामात विक्रमी उत्पादन घेण्याचं लक्ष्य ठेवलं आहे, असंही ते म्हणाले. राज्यात यावर्षी जून ते सप्टेंबर याकाळात ९६ टक्के पाऊस होणार असल्याची माहिती हवामान विभागाचे अधिकारी के एस होसाळीकर यांनी या बैठकीत दिली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात ९ जूनच्या सुमारास मोसमी पावसाचं आगमन होईल, असं त्यांनी सांगितलं.

****

आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी गुंतवणूक करणे ही केवळ नैतिक जबाबदारी नाही, तर आर्थिक गरज असल्याचं, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी म्हटलं आहे. जी 20 च्या आपत्ती जोखीम कमी करण्यासंदर्भातल्या कार्यगटाच्या दुसऱ्या बैठकीचं उदघाटन डॉ. पवार यांच्या हस्ते मुंबईत झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. कोविडच्या संकटाने विविध विकास आणि वित्त धोरणांच्या केंद्रस्थानी असण्याची, आपत्कालीन सज्जतेची आवश्यकता अधिक ठळक झाली, असंही पवार यांनी नमूद केलं.

****


पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २८ मे रोजी नूतन संसद भवनाचं उद्घाटन करणार आहेत. यावेळी ते लोकसभा अध्यक्षांच्या आसना शेजारी ऐतिहासिक सुवर्ण राजदंड सेंगोलची प्रतिष्ठापना करतील. सेंगोल हा सुवर्ण राजदंड १४ ऑगस्ट १९४७ च्या रात्री, देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ब्रिटनच्या अधिकाऱ्यांकडून सत्तेच्या हस्तांतरणाचं प्रतिक म्हणून स्वीकारला होता. भारतात चोल संस्थानच्या राजांनी सुमारे ८०० वर्षे राज्य केलं होतं. या चोल राजवटीत एका राजाकडून दुसऱ्या राजाकडे सत्तांतरण केलं जाताना हा सेंगोल प्रदान केला जात असे.

दरम्यान, देशातल्या १९ विरोधी पक्षांनी संसदेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार घालत असल्याचं सांगितलं आहे. संसदीय व्यवहार कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सर्व राजकीय पक्षांना ससंदेच्या नूतन वास्तूच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहण्याचं आवाहन केलं. देशासाठी हा एक ऐतिहासिक प्रसंग आहे, राजकारण करण्याची ही वेळ नाही, असं जोशी यांनी म्हटलं आहे.

****

विविध उद्योगांमध्ये क्रांती घडवू शकणाऱ्या हरित हायड्रोजनचा भविष्यातील इंधन म्हणून विचार करण्याचं आवाहन रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. ते काल नवी दिल्लीत भारतीय उद्योग महासंघाच्या वार्षिक अधिवेशनात बोलत होते. रसायन, पोलाद आणि औषधनिर्माण यांसारख्या क्षेत्रांमध्ये हरित हायड्रोजनच्या वापराला प्राधान्य द्यावं अशी सूचना गडकरी यांनी केली. रस्त्याच्या कडेला पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी औद्योगिक क्लस्टर आणि लॉजिस्टिक पार्क विकसित करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं  गडकरी यांनी सांगितलं.

****

एखाद्या जमिनीवर बांधकाम परवानगी अथवा रेखांकन मंजुरी देण्यात आली असताना, स्वतंत्रपणे अकृषिक परवानगीची गरज नसल्याचं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे - पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

महसूल आणि वन विभागामार्फत परवा २३ मे रोजी काढण्यात आलेल्या शासन निर्णयात याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत असं त्यांनी सांगितलं.

****


आम आदमी पक्षाचे प्रमुख तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल मुंबईत माजी मुख्यमंत्री तथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मानही यावेळी उपस्थित होते. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत केंद्र सरकारच्या निर्णयांवर तसंच धोरणांवर टीका केली.

****

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे.  दुपारी दोन वाजता हा निकाल जाहीर होईल. विद्यार्थ्यांना मंडळाच्या महारिझल्ट डॉट एनआईसी डॉट इन या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे. गुण पडताळणीसाठी उद्या २६ तारखेपासून येत्या ५ जून पर्यंत तर उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी उद्यापासून येत्या १४ जूनपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळाच्या मार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती.

****

राज्यात शाळाबाह्य मुलामुलींचे प्रमाण अधिक आहे. सुमारे १५ हजारांहून अधिक मुले-मुली शाळा बाह्य असल्याचे शासकीय आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना मुख्यप्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी शालेय शिक्षण मंत्री यांना पत्र लिहिलं आहे.

****

औरंगाबाद इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांची मान्यताप्राप्त अभ्यासक्रम आणि प्रवेशासाठी मान्य जागांसह यादी येत्या ३१ मे रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी तसंच क्षमतेशिवाय जास्त जागांना प्रवेश दिल्यास मान्यता मिळणार नाही, असे आदेश कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी दिले आहेत. विद्यापीठांशी संलग्नित तेहतीस महाविद्यालयांना प्रथम वर्ष प्रवेशासाठी नुकतंच अपात्र ठरवण्यात आलं असून, अनेक महाविद्यालयांमध्ये अनियमितता आढळल्यानं आर्थिक दंडही सुनावण्यात आला आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे रणजीत गायकवाड तर उपसभापतिपदी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तात्यासाहेब गायकवाड यांची निवड झाली आहे. कळंब कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतिपदी महाविकास आघाडीचे शिवाजी कापसे तर उपसभापती म्हणून श्रीधर  भवर हे निवडून आले आहेत. तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी भाजप चे सचिन पाटील तर उपसभापती म्हणून संतोष बोबडे यांची बिनविरोध निवड झाली.

परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवड प्रक्रियेसाठी बोलावलेल्या सभेला एकही संचालक हजर नसल्याने ही सभा तहकूब करण्यात आली. यावेळी महाविकास आघाडी तसंच महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचं वृत्त आहे. पोलिसांना यात हस्तक्षेप करावा लागला. दरम्यान, महाविकास आघाडीच्या सदस्यांना धमकावून पळवून नेल्याचा आरोप, माजी आमदार राहुल मोटे आणि ज्ञानेश्वर पाटील यांनी केला, मात्र जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. काल होऊ न शकलेली विशेष सभा आता उद्या होणार आहे.

****

लातूर जिल्ह्यातल्या चाकूर बाजार समितीच्या सभापतिपदी भाजपचे नीळकंठ मिरकले तर उपसभापतिपदी मंगल दंडिमे यांची निवड झाली. काल ही निवड प्रक्रिया पार पडली.

****

नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर काल सकाळी झालेल्या एका अपघातात चार भावांचा मृत्यू झाला. जालन्याहून शिर्डीकडे जाणाऱ्या वाहनाच्या चालकाला डुलकी लागून वाहन रस्त्याच्या कठड्याला धडकलं. या अपघातात श्रीनिवास गौड, कृष्णा गौड, संजीव गौड आणि सुरेश गौड यांचा मृत्यू झाला. तर  भार्गव गौड हे या अपघातात जखमी झाले आहेत.

****

लातूर जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावर आवश्यकतेनुसार गतिरोधक, रॅम्बलर ट्रिप बसवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी दिल्या आहेत, ते काल जिल्हाधिकारी कार्यालयात रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत बोलत होते.

****

इंडियन प्रीमिअर लीग-आयपीएल क्रिकेट स्पर्धेत प्ले- ऑफ फेरीत मुंबई इंडियन्सनं लखनऊ सुपर जायंटस संघावर ८१ धावांनी विजय मिळवत, बाद फेरीच्या पुढच्या सामन्यात प्रवेश मिळवला. मुंबई इंडियन्सनं प्रथम फलंदाजी करत निर्धारीत षटकात ८ गडी बाद १८२ धावा केल्या. १८३ धावांचं लक्ष्य साधण्यासाठी फलंदाजीला आलेल्या लखनऊ सुपर जायंटस्‌चा संघ १६ षटक तीन चेंडूंत १०१ धावांवर सर्वबाद झाला. या स्पर्धेतलं लखनऊ सुपर जायंटसचं आव्हान संपुष्टात आलं आहे.

दरम्यान, प्ले- ऑफ गटातला निर्णायक सामना उद्या मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. अहमदाबाद इथं नरेंद्र मोदी क्रीडा संकुलात हा सामना खेळवला जाईल. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाद होईल, तर विजेत्या संघाचा येत्या रविवारी चेन्नई सुपर किंग्स सोबत अंतिम फेरीसाठीचा सामना होईल.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या शेत रस्ते अतिक्रमण मुक्ती चळवळीत जिल्ह्यातले ३०८ शेत रस्ते अतिक्रमण मुक्त झाले असून त्याचा लाभ नऊ हजार ७०७ शेतकऱ्यांना झाला आहे., याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर ...

Byte…

या योजनेत गाव पातळीवरील शेतकरी, सरपंच, तंटामुक्ती समिती, मंडळ अधिकारी, बीट जमादार, तलाठी, ग्रामसेवक पोलीस पाटील, कोतवाल यांच्यामार्फत अतिक्रमित शेत रस्ते मोकळे करण्याचे अभियान हाती घेण्यात आले होते. यामध्ये अनेक शेत रस्ते मोकळे करून देण्यात आले आहेत. ऑक्टोबर २०२२ पासून जिल्ह्यातील ३३४ किलोमीटर लांबीचे ३०८ शेत रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यात प्रशासनाला यश आल्यामुळे जिल्ह्यातील नऊ हजार ७०७ शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.  

****

पदपथावर करण्यात आलेलं अतिक्रमण न काढल्याबद्दल औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी शहरातल्या तीन दुकानदारांना एकूण नऊ हजार रुपयाचा दंड ठोठावला. गेल्या आठवड्यात प्रशासक जी श्रीकांत यांनी टीव्ही सेंटर भागातील पाहणी केल्यानंतर दुकानदारांनी पदपथाचा वापर व्यावसायिक कामासाठी केल्यास कारवाई करण्यात येईल अशी ताकीद दिली होती. या तीनही दुकानदारांना नागरी मित्र पथकामार्फत हा दंड ठोठावण्यात आला. पालिका आयुक्त शहरातील अतिक्रमणांवर लक्ष देत असून यापुढे देखील दुकानांसमोरील कारवाई सुरू राहील असं जी श्रीकांत यांनी स्पष्ट केलं आहे.

****

राज्यात सफाई कर्मचाऱ्यांसोबत घडणाऱ्या दुर्घटनेबाबत संघटनांनी राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या संपर्कात राहून तत्काळ माहिती द्यावी, अशी सूचना आयोगाचे अध्यक्ष एम व्यंकटेशन यांनी केली आहे. ते काल परभणी इथं यासंदर्भातल्या बैठकीत बोलत होते.

****

No comments: