Tuesday, 30 May 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 30.05.2023 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date : 30 May 2023

Time : 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक : ३० मे  २०२ सकाळी ७.१० मि.

****

ठळक बातम्या

·      गेल्या नऊ वर्षात महिला, मागासवर्गीय, अल्पसंख्याक आणि आदिवासींच्या आयुष्यात निर्णायक बदल झाल्याचा, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचा दावा

·      केंद्र सरकारला नऊ वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त भाजपचं आजपासून विशेष संपर्क अभियान

·      ग्रामीण भागातल्या पाणंद रस्त्यांचं ग्रामीण मार्गात रुपांतर करण्याचा राज्य सरकारचा विचार

·      चंद्रपूरचे काँग्रेस पक्षाचे खासदार बाळू धानोरकर यांचं आज पहाटे निधन 

·      राज्यात प्रत्येक विभागीय आयुक्तालयाच्या ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद दल नेमण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना

·      महाराष्ट्रात निवडून येण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करण्याचं रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं आवाहन 

·      वीजबील आणि इतर देयकांपोटी दोन हजार रुपयांचं चलन ३० सप्टेंबर पर्यंत स्वीकारण्याचा महावितरणचा निर्णय

आणि

·      आयपीएल क्रिकेट स्पर्धेत शेवटच्या चेंडूवर चौकार मारत चेन्नई सुपर किंग्जला विजेतेपद

 

सविस्तर बातम्या

गेल्या नऊ वर्षात केंद्र सरकारनं महिला, मागासवर्गीय, अल्पसंख्याक आणि आदिवासींसाठी आणलेल्या विविध योजनांमुळे, या सर्वांच्या आयुष्यात निर्णायक बदल झाल्याचं, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी म्हटलं आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त, त्या काल मुंबईत बातमीदारांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या कामांची माहिती दिली. आज देशातल्या साडेतीन कोटी लोकांना पक्की घरं मिळाल्यामुळे त्यांना अभिमानानं जीवन जगता येत आहे, ११ कोटी ७२ लाख शौचालयांच्या बांधकामांमुळे माता भगिनिंना प्रतिष्ठा मिळाली, १२ कोटी लोकांना नळ पाणी योजनेचा लाभ मिळाल्यामुळे, पाण्यामुळे होणाऱ्या आजारांमध्ये लक्षणीयरित्या घट झाली, कोविड काळात ८० कोटी लोकांना मोफत शिधा मिळाल्यामुळे त्यांचं जगणं सुखकर झाल्याचं त्यांनी नमूद केलं.

या नऊ वर्षातले तीन वर्ष कोविड -19, युक्रेन युद्ध अशा घटनांमुळे मोठी आव्हानंही उभी राहिली होती, असंही सीतारामन यांनी अधोरेखित केलं. त्या म्हणाल्या...

Byte…

नौ साल उसमे तीन साल एकदम कोविड की वजह से सेकंड वेव्ह की वजह से और रशिया युक्रेन वॉर की वजह से अनसर्टनिटीज बहुत बढा। और स्ट्रीक्टली टू बी फेअर नौ साल मे ये तीन साल गिनना भी नही है। उतना चॅलेंजेस सिर्फ भारत के लिये नही पुरी दनिया मे हुआ।

 

आयुष्यमान भारत योजनेचा अनेक गरजुंनी लाभ घेतल्याचं सीतारामन म्हणाल्या. यावेळी उपस्थित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, आधीच्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात अनेक घोटाळे झाले, मात्र मोदी सरकारवर एकही डाग नसल्याचं सांगितलं.

****

दरम्यान, केंद्र सरकारला नऊ वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त आजपासून ३० जून पर्यंत भारतीय जनता पक्षाचं विशेष संपर्क अभियान होणार आहे. या आभियानात जिल्हा मंडळ, शक्ती केंद्र, बूथ स्तरावर विशेष कार्यक्रम होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी अजमेरमध्ये उद्या यानिमित्त होणाऱ्या रॅलीला संबोधित करून या अभियानाची सुरुवात करतील. सरकारची धोरणं आणि उपलब्धी जनतेपर्यंत पोहोचवणं हे या अभियानाचं उद्दिष्ट आहे. या दरम्यान भाजपा नेते वेगवेगळ्या राज्यांचे दौरे करून रॅली तसंच पत्रकार परिषदा घेणार आहेत.

****

एन व्ही एस वन, या दिशादर्शक उपग्रहाचं, काल सकाळी श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन प्रक्षेपण करण्यात आलं. जीएसएलव्ही एफ 12 या उपग्रह प्रक्षेपकाद्वारे, हा उपग्रह अवकाशात सोडण्यात आला. हा उपग्रह  भारतीय नक्षत्र दिशादर्शक मालिकेचा एक भाग असून, निरीक्षण आणि दिशादर्शक क्षमता प्रदान करणं हे याचं उद्दिष्ट आहे. दोन हजार २३२ किलोग्रॅम वजनाचा हा उपग्रह भारतीय नक्षत्र मालिकेमधला दुसऱ्या पिढीतला पहिला दिशादर्शक उपग्रह आहे. या उपग्रहाला येत्या दोन दिवसांत निर्धारित पातळीपर्यंत नेण्यासाठी कक्षा वाढवण्याच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. या उपग्रहाद्वारे गोळा केलेल्या माहितीचा वैयक्तिक आणि धोरणात्मक कामासाठी वापर केला जाईल. या मोहिमेमुळे केवळ नक्षत्र मालिकाच नव्हे तर स्वदेशी बनावटीचं रुबिडियम घड्याळ कार्यान्वित करणाऱ्या इतर तीन देशांच्या यादीत भारताचा समावेश होणार आहे.

****

येत्या तीन वर्षात औष्णिक कोळश्याची आयात शून्यावर आणण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचं, केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. ते काल भारतीय तंत्रज्ञान संस्था- आयआयटी मुंबईत खाण उद्योगातल्या स्टार्टअपच्या पहिल्या शिखर परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. खाण उद्योगामधून मिळणाऱ्या महसूलातून केंद्र सरकार समाजातल्या दुर्बल घटकांना मदत करेल, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. स्टार्टअपनं तयार केलेल्या उत्पादनांची खरेदी करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांनी काही ठरावीक निधी राखून ठेवावा, असं आवाहन त्यांनी केलं. गेल्या नऊ वर्षांत देशात चाळीस टक्क्याहून अधिक कोळशाचं  उत्खनन झाल्याची माहिती त्यांनी दिली. भारताच्या खनिज क्षेत्रात अमर्यादित संधी उपलब्ध असल्याचं खाण मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज यांनी यावेळी सांगितलं. या परिषदेत ८२ स्टार्ट अप आणि १४० प्रतिनिधी सहभागी झाले होते.

****

देशातल्या काही बॅंकांमधल्या कॉर्पोरेट गव्हर्नन्सबद्दल भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी चिंता व्यक्त केली आहे. ते काल भारतीय रिझर्व्ह बँकेनं मुंबईत आयोजित केलेल्या बँकांच्या संचालकांच्या परिषदेत बोलत होते. भारतीय रिझर्व्ह बँकेला काही बँकांच्या प्रशासनामध्ये तफावत आढळून आली असून, त्यामुळे बँकिंग क्षेत्रात अस्थिरता निर्माण होऊ शकते, असं ते यावेळी म्हणाले. बँकेच्या संचालक मंडळानं आणि व्यवस्थापकांनी ही तफावत निर्माण होणार नाही, याची दक्षता घेणं आवश्यक असल्याचं दास म्हणाले.

****

राज्यातल्या शेतकऱ्यांना शेतमाल वाहतुकीसाठी पाणंद रस्ते गरजेचे असल्यानं, या रस्त्यांना ग्रामीण मार्गात रुपांतरित करण्यासंदर्भात सरकार सकारात्मक विचार करत असल्याचं, ग्राम विकास आणि पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं. मुंबईत राज्यातल्या पाणंद रस्त्यांना ग्रामीण मार्गात रुपांतर करण्यासाठी आयोजित बैठकीत ते काल बोलत होते. यावेळी आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागातले अधिकारी उपस्थित होते. पावसाळ्यात रस्त्याच्या अभावामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होते, त्यामुळे येत्या काळात पाणंद रस्ते मोठ्या प्रमाणावर पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार असल्याचं महाजन यांनी यावेळी सांगितलं.

****

चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचं आज पहाटे दिल्ली इथं निधन झालं, ते ४७ वर्षांचे होते. धानोरकर यांची प्रकृती अचानक खालावल्यानं त्यांना काल विशेष विमानानं दिल्लीच्या वेदांता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तीन दिवसांपूर्वी बाळू धानोरकर यांच्या वडिलांचे निधन झालं. त्यावेळी तेही रुग्णालयात होते. वडिलांच्या अंतीम संस्कारासाठी ते भद्रावती येथे जाऊ शकले नाहीत. शुक्रवारी नागपूरमध्ये त्यांच्यावर मूतखड्याची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर गुंतागुंत निर्माण झाल्यानं त्यांना नवी दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते.

धानोरकर हे राज्यात काँग्रेसचे एकमेव खासदार होते. त्यापूर्वी ते २०१४ मध्ये वरोरा - भद्रावती विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले होते. २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. धानोरकर यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी वरोरा या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहे.

****

विविध नैसर्गिक आपत्तींचं प्रमाण वाढत असून, प्रत्येक विभागीय आयुक्तालयाच्या ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद दल नेमावं, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची काल मुंबईत बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातल्या महापालिकांनीसुद्धा त्यांच्या स्तरावर आपत्तीत तत्काळ बचाव कार्य करणारी पथकं तयार करावीत, असं सांगत, राज्य आपत्ती धोके व्यवस्थापन निधी प्रभावीपणे खर्च करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाबद्दल माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले..

 

Byte..

मोठ्या प्रमाणावर पाऊस असेल, सगळ्या नियोजनाच्या दृष्टीने त्याच्यावरही चर्चा झाली. आणि शेतकऱ्यांना देखील वेळेवर सगळे संदेश, त्यांना अलर्ट आणि माहिती गेली पाहिजे यासाठी सगळ्यांनी अलर्ट राहीलं पाहिजे. आणि कुठेही सकल भागात पाणी साचलं तर ताबडतोब त्या पाण्याचा निचरा झाला पाहिजे. एखाद्या गावाचा पुरामुळे जर संपर्क तुटला तर त्या ठिकाणी अन्नधान्य, औषधं सगळी जी काही अत्यावश्यक व्यवस्था आहे ती करण्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत.

 

****

महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट्स आणि गाईड्स या संस्थेच्या जुन्या नियमानुसार कामकाज करण्यासाठी सकारात्मक चर्चा करण्यात आल्याचं, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं. काल मुंबईत संस्थेच्या राज्य मुख्य आयुक्त पदाची निवडणूक घेण्याबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. संस्थेच्या नव्यानं तयार करण्यात आलेल्या नियमावलीला शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागानं मान्यता दिली असल्याचं, त्यांनी यावेळी सांगितलं. ही नियमावली नवी दिल्लीच्या भारत स्काऊट्स आणि गाइडच्या राष्ट्रीय कार्यालयाला पाठवण्यात आल्याचं महाजन म्हणाले.

****

नागालँडमध्ये रिपब्लिकन पक्षाचे आमदार निवडून येतात, मग महाराष्ट्रात का नाही, याचा विचार करून कार्यकर्त्यांनी निवडून येण्यासाठी काम करावं, असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. ते शिर्डी इथं आयोजित रिपाइंच्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलत होते. रिपाइं फक्त सत्तेबरोबर जाणारा पक्ष नसून, सत्ता हस्तगत करणारा पक्ष आहे. आम्ही ज्यांच्यासोबत उभे राहिलो तो पक्ष सत्तेत येतोच, मग तो काँग्रेस असो वा राष्ट्रवादी काँग्रेस, ही किमया फक्त आणि फक्त रिपाइं पक्षातच आहे, असं ते म्हणाले. सध्याच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्येही रिपाइंची भुमिका मसत्वाची असल्याचं त्यांनी नमूद केलं. कार्यकर्त्यांनी आपले आमदार निवडून येण्यासाठी शिस्तबद्ध काम करावं, असं आवाहन आठवले यांनी केलं. प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरे किंवा इतर ठिकाणी न जाता माझ्या सोबत भाजप कडे यावं, आम्ही दोघांनीही भाजपाशी युती केली तर समाजाला सत्तेचा मोठा लाभ मिळवून देता येईल, असं ते म्हणाले.

****

मुंबई मेट्रो मार्ग दोन अ आणि सात ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवासी विमा कवच लागू करण्याचा निर्णय, महा मुंबई मेट्रो संचालन महामंडळानं घेतला आहे. यानुसार मुंबई मेट्रो, या दोन मार्गांवरच्या सर्व प्रवाशांना वार्षिक सर्वसमावेशक विमा पॉलिसी देणार आहे. महा मुंबई मेट्रोचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी काल बातमीदारांना ही माहिती दिली. प्रवासादरम्यानच्या संभाव्य जोखमीचा तपशीलवार आढावा घेऊन ही योजना राबवली जाणार असल्याचं ते यावेळी म्हणाले. या विमा योजनेनुसार प्रवासा दरम्यानच्या अनपेक्षित दुर्घटनेमुळे बाधित प्रवासी रुग्णालयात दाखल झाल्यावर जास्तीत जास्त एक लाख रुपये, तर बाह्यरुग्णांसाठी १० हजार रुपयांपर्यंत भरपाई मिळेल.

****

औरंगाबाद जिल्ह्यात येत्या खरिप हंगामासाठी आवश्यक बी-बियाणे आणि खतं मुबलक प्रमाणात उपलब्ध असून, त्याचं वितरण आणि विक्री सुयोग्य पद्धतीनं व्हावी  यासाठी कृषि विभाग, वितरक आणि संबंधित यंत्रणांनी सुक्ष्म नियोजन करावं, अशी सूचना जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिली आहे. कृषि विभागाच्या निविष्ठा सनियंत्रण समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्यासोबत कृषी विभागाचे अधिकारी, खाजगी बियाणे कंपन्यांचे प्रतिनिधी तसंच प्रगतीशील शेतकरी उपस्थित होते.

****

औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६३ वा दीक्षांत सोहळा राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या उपस्थितीत २७ जूनला होणार आहे. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी काल ही माहिती दिली. यामध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१ आणि मार्च-एप्रिल २०२२ या वर्षातल्या पदवीधारकांना पदवी प्रदान करण्यात येईल. तसंच १९ नोव्हेंबर २०२२ ते आजपर्यंत पीएच.डी प्राप्त करणाऱ्या संशोधकांना दीक्षांत समारंभात पदवी प्रदान करण्यात येईल.

****

वीजबील आणि इतर देयकांपोटी दोन हजार रुपयांचं चलन ३० सप्टेंबर पर्यंत स्वीकारणार असल्याचं, महावितरणनं काल जाहीर केलं. ग्राहकाचं वीजबिल जेवढ्या रक्कमेचं राहिल तेवढ्या रक्कमेच्या दोन हजार रूपयांच्या नोटा महावितरण स्वीकारणार आहे. या दोन हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यासाठी कोणतंही बंधन राहणार नसल्याचं महावितरण कार्यालयानं स्पष्ट केलं आहे.

****

चेन्नई सुपर किंग्जनं गुजरात टायटन्सचा पाच गडी राखून पराभव करत पाचव्यांदा इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. चेन्नईला शेवटच्या दोन चेंडूत दहा धावांची गरज होती, रवींद्र जडेजानं षटकार आणि चौकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत चार गडी गमावून २१४ धावा केल्या. यानंतर पावसामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार चेन्नईला १५ षटकांत १७१ धावांचं लक्ष्य मिळालं. रवींद्र जडेजानं शेवटच्या चेंडूत रोमहर्षक विजय मिळवला.

****

औरंगाबाद जिल्ह्यात वाळूज परिसर तसंच वैजापूरसह ग्रामीण भागात काल सायंकाळी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडला. औरंगाबाद शहरातही काल संध्याकाळी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या येडशी इथं वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.

दरम्यान, येत्या ४८ तासात मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

****

नांदेड जिल्ह्यातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केंद्र आणि राज्‍य शासनाच्‍या योजनांची अंमलबजावणी परस्पर समन्‍वयानं करावी, असं आवाहन, जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक, वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलं आहे. जिल्‍हा परिषदेच्‍या समन्‍वय सभेत काल त्या बोलत होत्या. गावस्‍तरावर शासकीय योजनांची प्रचार-प्रसिद्धी करण्‍यासाठी, स्‍वयंसेवी संस्‍थेसह किर्तनकार, महाराज, मौलवी तसंच भंते आदींचा सहभाग घेतल्‍यास कामाला गती मिळेल असं त्या म्हणाल्या.

****

No comments: