Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 May 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३० मे २०२३ सायंकाळी
६.१०
****
·
नमो शेतकरी महासन्मान योजनेत राज्य सरकारही शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देणार,
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय, औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यात मका
संशोधन केंद्रासही मंजुरी.
·
शेंद्रा बिडकीन प्रकल्पात सत्तावीस उद्योगांचे प्रत्यक्ष उत्पादन सुरू, केद्राच्या
शिखर संनियंत्रण बैठकीत मुख्यमंत्र्यांची माहिती.
·
शैक्षणिक अंकेक्षणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न ८३
महाविद्यालये नापास, कुलगुरुंनी प्रवेश क्षमता कमी करण्याचा घेतला निर्णय.
आणि
·
चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचं दिल्ली इथं निधन, उद्या सकाळी
होणार अंत्यसंस्कार.
****
नमो शेतकरी
महासन्मान निधी योजना राज्यात राबवण्याचा तसंच प्रधानमंत्री किसान योजनेची कार्यपद्धती
सुधारण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. याच बैठकीत नवीन कामगार नियमांना
मान्यता देण्यात आली. कामगारांची सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या स्थितीसंदर्भात हे नवीन
नियम लागू झाल्यानंतर राज्यातल्या लाखो कामगारांचं हित जपलं जाणार आहे. नमो शेतकरी
महासन्मान योजनेच्या निणर्णयाबाबत माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले –
अतिशय महत्वाचे निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचे घेतलेले आहेत. पहिला निर्णय नमो
शेतकरी सन्मान योजना. केंद्राची जी सहा हजार रूपयाची योजना शेतकऱ्यांसाठी होती, त्याच्या
जोडीने राज्य सरकारकडून देखील सहा हजार रूपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला. म्हणजे
सहा प्लस सहा म्हणजे बारा हजार रूपये शेतकऱ्यांना मिळतील. त्याचबरोबर जे पीक विम्याचा
हप्ता जो शेतकरी भरत होता, तो देखील त्याच्या विम्याचा हिस्सा सरकार भरेल. शेतकऱ्यांने
फक्त एक रूपया भरायचा. अशा प्रकारचे अतिशय ऐतिहासिक निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये झाले.
बृहन्मुंबईमध्ये
समूह पुनर्विकासाला प्रोत्साहन मिळावं यादृष्टीनं अधिमूल्यात पन्नास टक्के सवलत देण्याचा
निर्णयही यावेळी घेण्यात आला. औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यात मका संशोधन
केंद्र स्थापन करण्याला, तसंच त्यासाठीच्या बावीस कोटी अठरा लाख रुपयांच्या खर्चालाही
मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे.
नवीन माहिती
तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरणालाही आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली. या धोरणामुळे
राज्य माहिती तंत्रज्ञानात देशात आघाडीवर राहण्याला, तसंच यातून पंचाण्णव हजार कोटींची
गुंतवणूक आकर्षित करण्याला मदत होणार आहे.
कापूस उत्पादक
क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्याच्या दृष्टीनं मंत्रिमंडळानं नव्या वस्त्रोद्योग धोरणाला
मान्यता दिली. यातून पंचवीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचा प्रयत्न
आहे.
राज्यातल्या
अभियांत्रिकी तसंच औषधनिर्माण महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची एकशे पाच पदांची निर्मिती
करण्याला आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
बुलढाणा
जिल्ह्यातल्या नांदुरा इथल्या जिगाव प्रकल्पाला गती देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं
घेतला. त्यासाठीच्या अतिरिक्त एक हजार सातशे दहा कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात
आली.
****
राज्यातल्या
औद्योगिक मार्गिकांच्या विकासाला प्राधान्यक्रम दिला असून तिथली विकास कामं गतीनं व्हावीत
यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हटलं आहे. राष्ट्रीय औद्योगिक
मार्गिकांच्या विकास आणि अंमलबजावणीबाबत शिखर संनियंत्रण समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री
आज दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले. त्यात त्यांनी ही माहिती दिली. या बैठकीला
दिल्लीहून अर्थमंत्री निर्मला सीतारामन, वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय मंत्री
सर्वांनंद सोनोवाल उपस्थित होते. केंद्र सरकारनं देशभरात उद्योग समूहांसाठी वितरित
केलेल्या दोनशे एकोणचाळीस भूखंडांपैकी दोनशे भूखंड राज्यातल्या शेंद्रा बिडकीन इथं
असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. पंतप्रधान मोदी यांनी देशाला समर्पित केलेल्या
शेंद्रा बिडकीन प्रकल्पात सध्या सत्तावीस उद्योगांनी प्रत्यक्ष उत्पादन सुरू केल्याची,
तसंच येत्या काही वर्षात या प्रकल्पात पन्नास उद्योगांचं उत्पादन सुरू होण्यासाठी शासन
प्रयत्न करत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
****
डॉ.बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित ८३ महाविद्यालये ‘अॅकॅडमिक ऑडिट’ अर्थात शैक्षणिक
अंकेक्षणात ‘नो ग्रेड’ म्हणजेच नापास ठरली आहेत. चार जिल्ह्यातून १९ महाविद्यालयांना
ए, बी, सी, डी याप्रमाणे श्रेणी प्राप्त झाली. तर बीड जिल्हयात सर्वांधिक ३३ महाविद्यालये
नापास ठरली आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील २२, औरंगाबाद जिल्ह्यातील १९ आणि जालना जिल्ह्यातील
०९ महाविद्यालये नोग्रेड अर्थात नापास ठरली आहेत. या महाविद्यालयांची पायाभूत सुविधा
आणि मनुष्यबळ तपासून प्रथम वर्षांची प्रवेश क्षमता स्थगित करण्यात येणार आहे. किंवा
विद्यार्थी संख्याही घटविण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी
दिली आहे.
****
केंद्रातील
मोदी सरकारला नऊ वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे देशभर महाजनसंपर्क
अभियान राबवण्यात येणार आहे. याद्वारे ऐंशी कोटी लोकांपर्यंत मोदी सरकारची कामगिरी
पोहोचवली जाणार असल्याची माहिती भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी आज दिली.
ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा
यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या अभियानाच्या अखेरीस
मोदी सरकारच्या नऊ वर्षातल्या कामगिरीची पुस्तिका घरोघरी पोहोचवली जाणार असल्याची माहितीही
तावडे यांनी दिली.
****
चंद्रपूरचे
काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचं आज पहाटे दिल्ली इथं निधन झालं, ते ४७ वर्षांचे
होते. त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी वरोरा इथल्या त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात
येणार असून, उद्या सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
धानोरकर
हे राज्यात काँग्रेसचे एकमेव खासदार होते. २०१४ मध्ये ते वरोरा - भद्रावती विधानसभा
मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले होते. २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षात
प्रवेश केला होता. चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
ट्विट संदेशाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.
मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार,
काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनीही धानोरकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून, श्रद्धांजली
वाहिली आहे.
****
औरंगाबादच्या
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा
उद्यापासून सुरू होत आहेत. तर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा सहा जूनपासून सुरू
होणार आहेत. चार जिल्ह्यातील ७८ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. यामध्ये सर्वाधिक
३१ केंद्र औरंगाबाद जिल्ह्यात आहेत तर बीड जिल्ह्यातील २१ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा
होईल. जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रत्येकी १३ केंद्र आहेत, अशी माहिती परीक्षा
विभागातील उपकुलसचिव डॉ. गणेश मंझा यांनी दिली.
****
औरंगाबादमधील
हर्सूल ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर सलीम अली सरोवर जवळ राज्य परिवहन महामंडळाच्या
बसने आज अचानक पेट घेतला. चालक, वाहक आणि प्रवाशांनी सतर्कता बाळगून वेळीच आग विझवल्यानं
मोठी दुर्घटना टळली. या बसध्ये तीस ते पस्तीस प्रवासी होते. ते सर्व सुखरूप आहेत. औरंगाबाद
आगाराची ही बस सिल्लोडवरुन औरंगाबादला आली होती.
****
पुण्यातल्या
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४४ व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा आज पार पडला.
सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थितीत होते.
****
जागतिक तंबाखू
विरोधी दिनाच्या औचित्यानं शासनानं आखलेल्या विशेष प्रचार कार्यक्रमांतर्गत उद्या परभणीच्या
जिल्हा रुग्णालयात विविध कार्यक्रम होणार आहेत. यावर्षी या दिनासाठी जागतिक आरोग्य
संघटनेनं ठरवलेल्या “आम्हाला अन्न हवे, तंबाखू नको” या संकल्पनेवर आधारित, प्रसार फेरी,
रांगोळी स्पर्धा आणि पोस्टर स्पर्धा असे कार्यक्रम शहरात उद्या यानिमित्तानं होणार
आहेत.
****
No comments:
Post a Comment